जया काकू आज बऱ्याच दिवसांनी घरी आल्या..
चहापाणी झालं ..आणि म्हणाल्या ,"काय ग ,लेकी कुठेयत ?दिसल्या नाहीत आल्यापासून.."

"अहो काकू,आज सुट्टी ना त्यामुळे सकाळीच आज्जीकडे गेलेल्या आहेत मुक्कामाला,धाकटी नाही राहत अजून रात्रीची तिकडे तिला आणू पण मोठी राहील आता 2 दिवस सुट्टी आहे तर" मी म्हटलं.
"व्वा ,तुझ्याशिवाय राहतात बऱ्या दोघी ,रडत नाहीत का आठवण काढून?" काकू म्हणाल्या..

त्यावर मी म्हटलं ,"नाही हो काकू रडतील कशाला ,सवय आहे त्यांना अस जायची ..अधूनमधून आत्याकडे ,मामाकडे अस जात असतात त्या..शिवाय सगळेजण आमच्याकडे ही नेहमी येत असल्यामुळे माणसांची सवय आहे त्या दोघींना "

"हे खरंय ग बाई ,माणस येत जात असली नातेवाईक असले तरच मुलाना सवय होते माणसात मिसळायची ,ऍडजस्ट करायची ..नाहीतर आताची मुलं बघ एकुलती एक असतात, आईबाप आणि मूल यापलीकडे विश्व नाही ,आज्जी आजोबांपासून कित्येक मैलावर यांचं विश्व वसलेलं ..वर्षातून 4 वेळा फार तर ते भेटणार..कशी ग ही मुलं ऍडजस्ट व्हायला शिकणार ? नातेवाईकांशी ,कुटुंबाशी कशी यांची नाळ जोडली राहणार ग ? " काकू थोडस अस्वस्थपणेच म्हणाल्या…

"काय झालं काकू?अचानक एवढ्या अस्वस्थ का झालात? " मी विचारलं..
तशी काकू म्हणाल्या ," काय सांगू तुला ,लेकीकडे नेहाकडे गेले होते थोडे दिवस ..पुण्यात असते न ती ..तिला इकडे यायला वेळ नाही ,सुट्टी नाही म्हणून म्हटलं आपणच जावं आणि गेले ..जावई आणि ती दोघंही नोकरी करतात, उत्तम पगार आहेत दोघांनाही ,लग्नाला आता 5 वर्ष झाली ..तिला म्हटलं "काय ग, तुझी तिशी आली काही पुढचा विचार करताय का नाही तुम्ही ? " तस तिने जे उत्तर मला दिल त्याने थक्क झालेय ग मी..ती म्हणाली, "आई , आम्ही दोघांनी ठरवलंय की मूल वगैरे नको , त्यासाठी लागणारा वेळ द्यायला माझ्याकडे वेळ नाही ,मला माझं करिअर आहे ,आत्ता एवढं चांगलं पॅकेज असलेली नोकरी सोडली तर किती नुकसान होईल आमचं?"
"अग ,पण बाळ एकदा 2 वर्षाच झालं की कर ना पुन्हा नोकरी ..आणि आम्ही आहोत की बाळाला सांभाळायला ,मी आणि तुझे बाबा आहोत ,तुझे सासू सासरे आहेत ,आलटून पालटून येऊन राहू आम्ही इथे ..जमेल ग काही काळजी करू नको .." जयाकाकू म्हणाल्या ..
" छे ग आई तू उगाच काही सांगू नकोस ..एवढी 3 वर्ष गॅप घ्यायची म्हणजे माझ्या जॉब प्रोफाइल वर परिणाम होईल ..आणि पुन्हा जॉब मिळाला तरी त्या मानाने पॅकेज कमी मिळेल ..आणि एवढं नुकसान करून नाही हा घेणार मी ..मी एवढं शिकलेय ते काय उगाच का ?मला नाही जमणार हे मुलंबाळं वगैरे आणि तुझ्या जावयाला ही हे पटतंय " नेहा म्हणाली..
 
"आणि पुढे जाऊन आपलं मूल असावं असं वाटलं तर काय कराल ग ?"काकूंनी विचारलं..
त्यावर नेहा पटकन म्हणाली "अग त्यात काय ..कधी अस वाटलंच ना तर अनाथाश्रमात जायचं तिकडे खूप मूल असतात त्यांच्यात दिवस घालवायचा ..बर वाटेल त्यांनाही ,नाहीतरी त्यांना कोण असत ? त्यांना द्यायचे पैसे संस्थेला,मदत म्हणून"

"अग मग तुम्हाला त्या मुलांबद्दल आपुलकी असेल तर त्यापैकी एखाद मूल दत्तक घ्या ,त्याच संगोपन करा की आम्हाला तेही चालेल "काकू म्हणाल्या..
 त्यावर नेहा म्हणाली," छे ग आई ,घरात मूल आलं की पुन्हा मी अडकलेच ना? आणि आजकाल आपल्या मुलाला चांगलं शिक्षण ,आयुष्य द्यायचं म्हणजे किती खर्च होतो माहीत नाही का तुला?आणि दुसरं म्हणजे तुम्हाला जर अस वाटत असेल की आम्हाला म्हातारपणी कोणी आधार नसेल म्हणून बाळ पाहिजे तर असलेली मुलं तरी कुठे बघतात आजकाल पालकांना?"

हे सगळं ऐकून मी थक्कच झाले होते,काकूंना थोडं शांत करण्यासाठी मी म्हटलं ,"काकू ठीक आहे ना ,आता त्यांनी अस ठरवलंय म्हटल्यावर तुम्ही काय करणार? जास्त विचार करू नका"
 त्यावर काकू म्हणाल्या ,"अग कसं विचार करू नको सांग ..पैसा इतका महत्वाचा असतो का ग आयुष्यात ?..एक कुटुंब म्हणून राहताना आपण किती विचार करतो घरातल्या सगळ्यांचा.. एक मूल घरात असणं ही केवढी मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे हे कसं कळत नाही ग यांना? स्त्री म्हणून आपल्याला काही भावना असतात ना गमाया ममता उधळावीशी वाटत नाही का मुलावर? एक मूल आयुष्यभर नवराबायकोच्या नात्याला घट्ट करायला मदतच करत काही अपवाद वगळता ..अख्ख्या कुटुंबाला जवळ आणत एक मूल,आजवर आपल्या मुलांसाठी एवढ्या खस्ता खाल्ल्यावर आता त्यांच्या मुलाबाळांमध्ये रंगून जावं अस कोणत्या आईबापाला नाही वाटणार सांग..आधीच एकुलती एक मूलं आमची ,त्यांना पुढे ना भावंड ना नातेवाईक..जे आहेत त्यांच्याशी याना संपर्क ठेऊन राहायची आवड आणि वेळ तितपतच.. आम्ही आहोत तोवर लोक येऊन जाऊन तरी आहेत ,आमच्या मागे हेही होणार नाही हे माहीत आहे आम्हाला ,मग पुढे जाऊन स्वतःच म्हणून कोणी नको का ग यांना ..आणि काही मुलांनी आपल्या आईवडिलांना टाकलं म्हणजे सगळीच टाकतील असा निष्कर्ष काढून आपण मोकळं का व्हायचं ?शेवटी जे समोर दिसत ना तेच मूलं करतात त्यामुळे आपण त्यांच्या समोर चांगल्या गोष्टी आणल्या तर तीही त्याच शिकतील नाही का? सारासार विवेक बुद्धी वापरून विचार करणारी पिढी आपण निर्माण करूच शकतो.. आणि अस मुलांमध्ये जाऊन बालपण अनुभवावस वाटल्यावर अनाथाश्रमात जाऊन पैसा फेकायला तो काय शॉपिंग मॉल आहे का ग ?दिले पैसे घेतली माया प्रेम विकत...सध्या एक एकटी असलेल्या मुलांना पुढे मामा ,मावशी ,काका ,आत्या ही नाती तरी माहीत असतील का ग? सख्खे आज्जीआजोबा पण कुठेतरी एका टोकाला आणि ही मुलं दुसऱ्या टोकाला राहत असताना कसे काय बंध निर्माण होणार यांच्यात ..

आपुलकी ,प्रेम ,स्नेह सगळं हळूहळू विसरणार का आपण? प्रत्येक सुट्टीत अशा नातेवाईकांकडे जाऊन करायची मजा माहीतच नसेल ना पुढच्या पिढीला ..
आजवरची मूल प्रत्येक वेळी नातेवाईकांकडे जात आली आणि काही न काही शिकत आली .. प्रत्येक गोष्ट वाटून घेणं , असेल त्यात ऍडजस्ट करण ,माणसांशी जुळवून घेणं, जाऊ तिथल्या वातावरणाशी जुळवून घेणं ,तिथल्या खाद्य प्रकाराशी जुळवून घेणं थोडक्यात काय ज्या ठिकाणी जाऊ तिथे तस तस राहायला शिकण हे वेगळं शिकवाव नाही लागलं आजवरच्या मुलांना ..पण आता सगळंच बदलत चाललंय ग. आधीच एकेकटी म्हणून लाडकी असतात ही मुलं सगळं मनासारखं करतात आमच्यासारखे पालक एकच मूल म्हणून आणि त्यामुळेच असेल का ग वाढत ही अशीप्रवृत्ती? कशातच बांधून घ्यायची सवय नसल्यामुळे? पैसा म्हणजे सर्वस्व असत का ग? उद्या आपली माणस उपयोगी पडतील का नुसता पैसा? का ग समजत नाही या मुलांना हे ?खर तर माझ्या लेकीला कस समजत नाही याचं जास्त आश्चर्य वाटलं मला ...स्त्री पुरुष समानतेच्या भ्रामक गोष्टीत किती वाहते ही पिढी ?कसली समानता ग आणि ?खर तर पुरुषापेक्षा कितीतरी पटीने अधिक कणखर असतो आपण ..सृजनाच वरदान आहे आपल्याकडे ..एखादी स्त्री जेवढ्या खंबीरपणे घर सांभाळेल ते एखाद्या पुरुषाला नाही जमणार कदाचित ..स्त्री आहे म्हणून निर्माण आहे..अख्खी कुटुंब व्यवस्था आहे ..आणि आपल्या या ताकदीने आपण सगळं जग बांधून ठेऊ शकतो फक्त आपल्यातली माया आणि प्रेम जागृत असेल तरी ..आणि आपल्या या ताकदीलाच आपण आपला कमकुवत पणा समजायची चूक करायची का? प्रत्येक गोष्टीत स्वैर वागायचं का आणि तेही किती दिवस जमेल? अस असेल तर लग्न तरी का करायचं? जगा की स्वच्छन्द ..फक्त ज्यावेळी खरच आपलं कोणी असावं असं वाटायची वेळ येईल त्यावेळी कोणीच नाही आपलं म्हणून रडू नका म्हणजे झालं " जया काकू भडाभडा बोलत होत्या ,डोळ्यातून सरसर पाण्याच्या धारा वाहत होत्या आणि मी मात्र त्यांच्यासमोर सुन्न होऊन बसले होते…

#उत्तराजोशी

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel