कुंपणावर मधुमालतीचा वेल हवा हा तिचा हट्ट होता म्हणून कुंपण गर्द मधुमालतीनी शाकारलं गेलं
कृष्णकमळ सुद्धा तिला आवडतो म्हणून कुंपणाच्या कमानीवर चढवला होता,गुलमोहराचं तिला इतकं अप्रूप नव्हतं पण बुचाच्या झाडाची फर्माईश तिची म्हणून अंगणात डाव्या बाजूला तिघांची वर्णी लागलेली, त्यांच्या शेजारी नागचाफा सुद्धा तिनेच आणून लावला त्यांच्यामुळे अंगणात दुपारी सुद्धा संध्याकाळ दिसायची,
समोरच्या अंगणात एक तर मागच्या परसात तीन तीन प्राजक्त वार्‍या बरोबर झुलत होते ते सुद्धा तिची आवड ओळखून कोणी कोणी सप्रेम भेट दिलेले, चौघांची फुलं वेगळी रंगवेगळा तसा आकारही
सोनट्क्क्याची एका रांगेत हिरवी कंच पसरलेली रोपं  दिसतायत ती तिची कल्पना आणि जागोजागी विखुरलेली रंगीबेरंगी गुलबाक्षी पसरली आहे ती सुद्धा तिचीच कल्पना
तगरीची झाडं  बर्‍याच ठिकाणी बेवारशी सोडलेल्या गुरांसारखी वाढत असतात
पण इथे मात्र त्याना हक्काचं स्थान मिळालं ते हिच्यामुळे, हिला तगरीचे  हार करून मुरलीधराला आणि शंकराला वाहयला फार आवडतात
त्या हारामधे अधून मधून गुंफायला शंकासुराची फुलं हवीत म्हणून शंकासुराबरोबर  झेंडूची  रोपं सुद्धा हिनेच शोधायला लावली, जरा पायपीट झाली पण तिला हवी तशी दोन तीन रंगातली शंखासुराची रोपं सुद्धा मिळालीच आणि हिचे  तगरीचे पांढरे शुभ्र हार अधे मधे येणार्‍या या रंगीत फुलाने चांगलेच नजरेत भरायला लागले
तिच्या बागेतल्या डबल तगरीला अनेक जण अनंताचं फुल समजायचे इतके ते टट्ट फुलायचं मग ती गालात हसतं आपला लांबसडक शेपटा झॊकात मागे लोटत अशी शंका घेणार्‍याला दहा पावलं पुढे घेऊन जायची, जाताना त्यांचे  बागेला नवे असलेले पाय लीलीचे ताटवे तुडवत नाहीतना याकडे तीचं धास्तावलेल्या  मनाने बारीक लक्ष असायचं, लीली सुद्धा पाच रंगातली बरं का
ज्या पाहुण्याचं नं सांगता नं  दाखवता चिनी गुलाबाकडे अथवा बटशेवंतीकडे नाहीतर बांबूच्या आधाराने फोफावलेल्या चमेलीकडे आणि गुच्छाच्या गुलाबाकडे  लक्ष जाईल असे पाहुणे तिच्या विशेष मर्जीतले होऊन जायचे
अट एकच त्यानी उगाच झाडावरचं फुल विनाकरण ्खुडायचं नाही
मौसम नसताना मोगर्‍याची हिरवीकंच झाडं हिच्याच बागेत दिसायची, तिच्यासाठीच तो सुट्टीच्या दिवशी तिच्या बरोबर मोगर्‍याची नीगा राखण्यासाठी चार चार तास खपायचा
एरवी मेहेनतीचं फळ मिळतं म्हणतात
पण इथे  या दोघांच्या मेहेनतीला मोहवून टाकणारी फुलं यायची
आपण स्वप्न ओंजळीत घ्यायला आसुसतो पण  ही दोघं ते समाधान मोगर्‍याच्या फुलानी ओंजळ  भरून अनुभवायचे
केवडा घरामधे लाऊ नये  हा हट्ट त्याचा होता जो तिने ऐकाला होता आणि डेरेदार बेलाच्या त्रिकुटाच्या जाळीत शिवलींग स्थापण्याचा तिचा हट्ट त्याने मानला होता, तिन्हीसांजेला तिथेदिवाबत्ती नेमाने होत होती
तसच शमीच्या वृक्षालाही तिन्हिसांजेला नेमाने दिवा  दाखवला जात होता, शमी तिच्या माहेराहून मिळाला होता
तिचे बाबा गेले तेंव्हा वहिनी दादा माहेरपणाला आलेल्या ताईला म्हणाले काय हवं ते माग तिने तो शमी मागितला कारण त्याची नीगा राखली नं गेल्याने तो खुरटत चालला होता आणि हे दादा वहिनीला सम्जावणं कठीण होतं त्यापेक्षा यातायात सोसून  त्याने तिच्यासाठी तो  शमी बागेत आणून   वसवला होता त्यापासून बनवलेलं एक रोप त्यानी गणपतीपुळ्याच्या पुजार्‍याना दिलं होतं
त्या शमी साठी शेजारी असलेल्या गुंजेच्या वृक्षाला अधून मधून छाटून घेण्याचे सोपस्कार सोसावे लागतात पण इतकी छान सोबत असल्याने  तो ही फार  मनावर न घेता ते सोसत होता म्हणून शेवग्य़ाची काटकुळी झाडं सुद्धा आपली जागा अबाधीत ठेऊ  शकत होती
सारखी कीड लागते म्हणून चिकू पेरूची झाडं जरा कोपर्‍यात गेली होती पण हिचं सतत लक्ष असल्याने त्याना आपण बाजुला पडलोय असं वाटत नव्हतं
आणि शिवाय त्यांची तिनही मुलं याच चिकूच्या झाडाला बांधलेल्या झुल्यावर झुलता झुलता मोठी झाली
चिऊ काऊचे घास मुलानी चिऊ काऊच काय अगदी राघू, साळूंक्या, भारद्वाज, बुल बुल यांच्या सोबत घेतले होते,सिताफळ मात्र कधी म्हणावं तसं फुटलच नाही, ते आहे तसच राहिलं  कदाचीत रामफळाची सोबत मिळाली तर ते जगणं मनावर घेईलही
पण हवं ते सगळंच कुठे मिळतं आपल्याला
पण जे मिळालं ते उदंड होतं तिचा हट्ट म्हणून तो हा हिरवा शेवाळी पसारा पसरवत गेला ती सुखावत गेली जशी तिच्या तुळशीवृंदावनातलीमनापासून डवरलेली कृष्ण तुळस
मग याचा काहीच हट्ट नव्हता?
नाही कसा? होताना
तू फक्त सोबत रहा हा त्याचा हट्ट तिने मनापासून  पुरवला होता
तिच्या दृष्टीने त्या हिरव्याकंच टपो‍र्‍या पसार्‍याचा तो मध्यबिंदू होता आणि त्या मध्यबिंदूची ती साम्राद्न्यी होती
Chandrasekhar Gokhale
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel