दसरा झाला.
त्याच्या कंपनीत बोनस पण जाहीर झाला.
कंपनीत तो साधा वर्कर म्हणून लागला होता बारा वर्षांपूर्वी.
आता सुपरवायझर झाला.
दिवसभर हात काळे व्हायचे मशीनवर.
पण घरी जाऊन त्याच्या परीचा हसरा चेहरा बघितला, की थकवा कुठल्या कुठे पळून जायचा .
छोटीशी का होईना स्वतःची जागा घेतली होती त्यानं.
बँकेचा हफ्ता भरताना ओढाताण व्हायची.
काही नाही तरी या बारा वर्षात 'गणित' विषय पक्का झालेला.
महिनाअखेरीला परीक्षेचं जाम टेन्शन यायचं.
काठावर पास व्हायचा दरवेळी.
शिलकीत काही पडायचं नाही.
पण कुठं ऊधारीचीही वेळ आणली नाही कधी.
आता तर दिवाळी तोंडावर.
नंतर दुकानांत खूप गर्दी होते म्हणून, बाॅसकडून आधीच ऊचल घेतलेली.
त्याची बायको समजूतदार.
स्वतःहून कधी मागितलं नाही बिचारीनं.
पण यावेळी त्यानं ठरवलं होतं.
त्याच्या परीला छान ड्रेस घ्यायचा.
परी ड्रेस...
तो पायघोळ ड्रेस हातांनी वर उचलत, पायातलं छुमछुम वाजवत..
त्याच्या छोट्याश्या अंगणात, फुलबाज्या ऊडवणारी त्याची परी..
क्षणभर त्या फुलबाज्यांच्या चांदण्यांनी, त्याच्या मनात आत्ताच दिवाळी साजरी झाली.
परीला तो शोकेसमधला गुलाबी परीचा ड्रेस घ्यायचा.
बायकोला छान डिझायनर साडी.
नंतर छानशा हाॅटेलात जेवायला जायचं..
त्यानं पुन्हा गणिताचा 'होम'वर्क करायला सुरवात केली.
जमेल..
जमवायचंच.
बहुधा सगळ्यांनी त्याच्यासारखंच ठरवलेलं.
नंतर गर्दी होईल, म्हणून दुकानात आत्तापासूनच गर्दी केलेली.
काऊंटरवरच्या गर्दीत तो घुसतो.
शोकेसमधला तो ड्रेस काढायला लावतो.
परीचा चेहरा आनंदी फुलबाजी झालेला.
ट्रायल रूममधनं त्याची परी बाहेर येते..
त्यानं जशी कल्पना केली होती तशीच...
तशीच गोऽऽड दिसत्येय.
किमतीचं लेबल पाहून बायकोचा जीव वरखाली.
त्याला फुलबाजीशिवाय दुसरं काहीच दिसत नाहीये..
तो ड्रेस पॅक करायला लावतो.
परी पंख लावून ऊडताना बघून ,तो आभाळाएवढा खूष.
मग साड्यांची शोरूम.
यावेळी तो बायकोला सांगतो, चांगला तास दीड तास लागू दे..
शंभर साड्या बघ..
मनासारखी मिळेपर्यंत हो म्हणायचं नाही.
तो सतत तिच्यावरच लक्ष ठेवून आहे..
ती लाल रंगाची साडी..
तिनं किंमत बघून हळूच मागे ढकललेली.
तीच घ्यायची..
तो ठार बहिरा झालेला..
बायकोचं 'नाही' त्याला ऐकूच येत नाही.
शेवटी तीच साडी पॅक करून तो बाहेर पडतो.
लाल रंगाच्या साडीतली त्याची बायको जगात सगळ्यात सुंदर वाटू लागते...
क्षणभरात तो 'श्रीमंत' होतो.
मनासारखी खरेदी झालेली.
त्याची परी आणि बायको, त्याच्या खरेदीच्या मागे लागतात.
तो घड्याळ दाखवतो..
तुम्हाला माहित्येय ना, मला किती वेळ लागतो ते..
आज नको..
चला आता बाहेर जेवायला जाऊ..
त्याची सोनपरी..
"नको बाबा...
खूप दिवसात आईच्या हातची शेवभाजी खाल्ली नाहीये.."
गुलाबजामून घेवून तो घरी..
मस्त गोऽड जेवण.
त्याच्या परीलाही 'गणित' छान येतंय की.
ऊगाच परी नाही म्हणत तो..
हात डोक्याखाली घेवून तो विचार करू लागतो.
दिवाळीत तयार होत नाही कुणी .
तीन दिवस ओव्हरटाईम करू..
भाऊबीजेला ताई येईल तेव्हा घरी थांबू..
मग मला नवीन कपड्यांची काय गरज ?
आपला निळा वर्कशाॅपसूट सगळ्यात भारी ड्रेस.
कंपनीचं वर्कशाॅप हेच खरं शाॅपींग फेस्टिवल.
सगळे सण ईथेच साजरे करायचे.
त्याच्याच जीवावर..
ताईच्या ओवाळणीचं पुढच्या रविवारी बघू.
त्याचा पटकन डोळा लागतो.
सकाळ ऊजाडायच्या आत तो कामावर पळतो.
दिवसभर काम करून तो घरी येतो.
जेवण झाल्यावर बायको त्याच्या हातात नवीन ड्रेस ठेवते.
येलो शर्ट अन् चाॅकलेटी पॅन्ट.
ताईंच्या ओवाळणीची साडीही.
त्याच्या चेहर्यावर भलामोठ्ठा क्वश्चनमार्क ?
"तुमचीच बायको आहे मी.
वर्षभर साठवलेले पैसे आहेत माझे..."
आणि हो बिलकूल डबल शिफ्ट करायची नाही दिवाळीत.
तुम्ही असाल तरच दिवाळी साजरी होईल माझी.
मनकवडी..
खरंच ओळखून होते दोघं एकमेकांना.
खरंच तिघांनी  गणितात पैकीच्या पैकी मार्क्स मिळवले यावेळी..
तो दिवाली शाॅपींग फेस्टिव्हलच्या, तुडूंब गर्दीएवढा खूष होतो.
जगातला सगळ्यात श्रीमंत..
डोक्यावर गजरा लावून बायको परीला झोपवू लागते..
तो त्या दिवाळी सुंगधात, घनघोर हरवतो..
स्वप्नील..
त्याच्या बायकोबरोबर..
काश्मीरी जंगलात..
बर्फांच्या गोळ्यांची रप्पाधप्पी..
न संपणारी स्वप्ने ऊशाशी घेवून,
तो तिची वाट बघू लागतो.

हॅप्पी दिवाली.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel