विक्रांत देशमुख
आतापर्यंत आपण रक्त व रक्तामधील घटकाची माहिती घेतली. आता आपण युवा मोरया सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सर्पदंश झालेल्या एका आजीला वेळेवर रक्तामधील घटक कसा उपलब्ध झाला व त्यांचे प्राण वाचविण्यास कशी मदत झाली हे जाणून घेऊ.
विजया दशमी म्हणजे दसरा हा हिंदू धर्मातील मोठा उत्सव. याच दिवशी दुर्गा मातेने राक्षसाचा वध केला. त्याच रात्री मी विसर्जन मिरवणुकीतून अंदाजे ११.४५ मि. घरी आलो. व जेवण करुन झोपलो. साधारणत: १२.३० ला मला फोन आला व माहिती मिळाली की दुर्गम भागातील एका ५५ वर्षीय आजीला सकाळी सर्पदंश झाला आहे व तिच्या वर जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत. सर्पाच्या विषामुळे शरीरामधील रक्त गोठत आहे. त्यासाठी रुग्णालयातील डॉक्टरानी प्लाझ्मा हा रक्तामधील घटक लागणार असल्याची माहिती दिली. प्लाझ्मा हा रक्तामधील घटक असून तो रक्त पातळ करण्याचे काम करतो. पण रुग्णाचे नातेवाईक हे दुर्गम भागातील असल्यामुळे त्यांना रक्त व रक्तामधील घटकाची माहिती नव्हती त्यांनी कोठूनतरी माझा फोन नं. मिळवला व मला फोन करून घडलेला प्रकार सांगितला, मी ही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून मी मोठ्या बंधूना बरोबर घेऊन जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली व नातेवाईकाना भेटून फॉर्म बघितला तेव्हा समजले हा रक्तामधील घटक आहे आणि रक्तामधील घटक हे शासकीय रुग्णालयामध्ये मिळत नाहीत. मी खाजगी रक्तपेढी मध्ये गेलो व फॉर्म आणि रक्ताचा नमुना दिला व अनेक वाटाघाटी करून प्लाझ्मा चे चार युनिट उपलब्ध केले. या दरम्यान रात्रीचे १.१५ वाजले होते. मी ते घेवून जिल्हा रुग्णालयामध्ये आलो. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार सर्व युनिटची तपासणी केली, योग्य असल्याची खात्री पटल्यावर त्या बॅग पाण्याच्या नळाखाली पातळ केल्यानंतर त्या वयोवृध्द आजीला लावल्या. तोपर्यंत २.३० वाजून गेले होते. त्यानंतर आजींच्या प्रकृतीमध्ये सुधारणा जाणवू लागली हे आम्हांस समजले तेव्हा आम्ही अंदाजे ३.३० च्या दरम्यान रुग्णालयातून आनंदाने बाहेर पडलो.
त्यानंतर दोन दिवसांनी आजींना घरी सोडले आजी पूर्णपणे व्यवस्थित झाल्या होत्या. त्या निमित्ताने एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे आपण केलेली थोडीशी धावपळ ही एका गरजूचे प्राण वाचवते.
या समाजात प्रत्येकजण जन्मास येतो, पण आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेतून जर राहिलो व प्रत्येकवेळी अशा गरजू रुग्णांना मदत केली तर रक्तावाचून कोणाचाही जीव जाणार नाही. समाजामधील काही लोकांकडे पैसे खूप असतात, पण जेव्हा त्यांना रक्ताची गरज पडते तेव्हा ते मिळत नाही, मग त्या पैशाचा काय उपयोग? यासाठी अशी वेळ कोणावरही येऊ नये म्हणुन आपण गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी वेळोवेळी रक्तदान केले पाहिजे.
आपल्या रक्तदानाने नक्कीच कोण्या एका गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यास मदत होत असते.