(स्थळ: सुधाकराचे घर. पात्रे: सुधाकर, पद्माकर, सिंधू आणि शरद.)

सिंधू - (राग- मांड-गर्भा; ताल- दादरा. चाल- गोकुलमा लई.)
मानस का बधिरावे हे? । बघतसे खिन्न जगता ॥धृ०॥
गृहशृंखला या । दृढ बध्द पाया । बल ना भेद तया होता ॥१॥

पद्माकरदादा, अजून माझं मन निघायला घेत नाही.

पद्माकर - सिंधूताई, अगदी नाइलाज झाल्यावाचून मी तरी इतका आग्रह धरला असता का? बाबांनी- स्वत: श्रीमंतांनीसुध्दा, इंदिराबाईंना पुष्कळ सांगून पाहिलं; पण पोरीच्या जातीपुढं इलाज चालेना! दादासाहेब, तुमच्या लग्नात तुम्ही पाहिलंच असेल, श्रीमंतांच्या आणखी आमच्या घराचा ऋणानुबंध किती आहे तो! इंदिराबाई म्हणजे संस्थानिकांची मुलगी, त्यातून एकुलती एक, पोरवय आणि नव्यानं सासरी जायला निघालेली. आमची सिंधूताई म्हणजे तिची जिवाभावाची सोबतीण. तेव्हा घेतला हट्ट, की सिंधूताईच पाठराखणी पाहिजे म्हणून! दादासाहेब, एक म्हण आहे, राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्रीहट्ट, विधात्यालासुध्दा पुरवावे लागतात, मग यांचा तिहेरी जोर एकवटल्यावर आपल्यासारख्यांची त्रेधा उडाली तर नवल काय? हा, सिंधूताईला लवकर परत पाठवावयाचं मात्र माझ्याकडे लागलं; शिवाय तिच्या वाढत्या जिवाची दगदग सोसायला आमची श्रीमंती तरी कुठं वर आली आहे? शरदिनीबाई, तुमचा ठरलाना विचार यावयाचा?

शरद - दादा-वहिनी काय ठरवतील ते खरं! दादा, जाऊ ना मी वहिनीच्याबरोबर?

सिंधू - वन्संना एकटयांना इथं ठेवून कसं चालेल? घरात बायकोमाणूस कुणी नाही. बरं, दिवसभर कोर्टात असावं लागणार. शिवाय भाई म्हणावा तोही इथं नाही.

सुधाकर - शरदला न्यायलाच पाहिजे. पण भाऊसाहेब, अगदी आजच निघालं पाहिजे का?

पद्माकर - तुम्ही राहा म्हणावं, आणि मी जातो म्हणावं, अशातलं आपलं काही नातं नाही. पण आम्ही गिरण्यांचे मालक म्हणजे लोकांना बाहेरून दिसायला सुखी असतो; पण खरं म्हटलं तर गिरणीचा मालक म्हणजे हजार यंत्रांतलं एक यंत्र असतो. ठरलेली चक्रं घेणं त्याला कधी चुकत नाही. म्हणून म्हणतो मला आजच्या आज निरोप द्या.

सुधाकर - नाही, म्हटलं राहिला असता, तर तेवढेच चार दिवस बोलण्या-चालण्यात गमतीनं गेले असते. भाई गेल्यापासून मोकळेपणानं चार शब्द बोलण्याचं समाधानच नाहीसं झालं आहे.

(राग: देस-खमाज; ताल: त्रिवट. चाल- हा समजपिया मान मोरे.)
हे हृदय सुख-विमुख होई । मन खिन्न सतत, भ्रमणनिरत शांती नाही ॥धृ०॥
श्वसन मित्र जणु, दुरी तो होता । देही कसे चैतन्य राही ॥१॥

पद्माकर - काय करावं? अगदी इलाज नाही. शिवाय आमच्याशी बोलण्यानं तुम्हाला काय समाधान होणार? दादासाहेब, केवळ भाईची कृपा म्हणून तुमच्यासारख्या विद्वद्रत्नाचा आम्हाला लाभ झाला. आमची सिंधूताई मोठी भाग्याची! दादासाहेब, तुमच्याबद्दल चारचौघांना सांगताना दुनिया अगदी तुच्छ वाटते. तुमच्याशी बरोबरीनं बोलायची आमच्यासारख्या सजलेल्या मजुरांची लायकी तरी आहे का? खरं म्हणाल तर तुमच्याशी बोलताना माझा जीव अगदी खालवर होत असतो. जरा चुकून एखादा शब्द पडला तर तुमच्या मनाला आमचा रांगडी धक्का लागेल अशी भीती वाटते. बिरबलानं वाघासमोर बांधलेल्या अजापुत्राप्रमाणं मी तुमच्यासमोर अगदी धास्तावल्यासारखा बसलेला असतो. म्हणून तुम्हाला आपलं हात जोडून सांगणं आहे, की आमची आजच रवानगी करा.

सुधाकर - बरं आहे! सिंधू, गीता आहे ना घरात? तिला सांग तळीरामाला बोलावयाला, म्हणजे तो करील व्यवस्था.

पद्माकर - तळीराम म्हणजे तुमचा तो कारकूनच का?

सुधाकर - मनुष्य मोठा चलाख, हुषार आणि जिवाला जीव देणारा आहे.

सिंधू - आणि गीताबाई तर घरच्या माणसाच्या पलीकडे!

पद्माकर - ताई, आता असा बोलण्यात वेळ गमवून कसं चालेल?

सुधाकर - खरंच, राणीसाहेबांच्या जवळून घराचा चार्ज अजून घ्यावयाचा आहे. एकदोन नाही, पण निदान चार महिने तरी मला या बदलीवर राहावं लागणार! कारण हक्काची रजा तुंबता तुंबता जितक्या दिवसांची, तितक्या महिन्यांची-

सिंधू - दादा येवो, बाबा येवोत, मूळस्वभाव जाईना!

सुधाकर - बरं चला-

सिंधू - हो, पण भाईनं सांगितलेलं लक्षात आहे ना? माझ्या जिवाला नाही तर अगदी टांगल्यासारखं होईल. इथं एकटं राहायचं-

सुधाकर - मग एखाद्या बोर्डिंगात ठेवतेस मला? तो रामलाल आहे शहाणा आणि तू आहेस दीडशहाणी! सिंधू, या जगात तुझ्याखेरीज अशी एकही गोष्ट नाही की, जिचा म्हणून या सुधाकराला मोह पडेल-

(राग- बेहाग; ताल- त्रिवट. चाल- टेर सुनीपाये.)
वेध तुझा लागे सतत मनी । वसतिच केली नामे वदनी ॥धृ०॥
जगत् सकल सखी भासत त्वन्मय । मधुर रूप तव खेळे नयनी ॥१॥
(सर्व जातात.)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel