(स्थळ - आर्यमदिरामंडळ. पात्रे: शास्त्री, खुदाबक्ष, मन्याबापू मवाळ, जनुभाऊ जहाल,सोन्याबापू सुधारक, यल्लप्पा, मगन, रावसाहेब, दादासाहेब, भाऊसाहेब वगैरे मंडळी. तळीराम प्रवेश करतो.)

शास्त्री - शाबास तळीराम, किती उशीर केलास यायला? खरं म्हटलं म्हणजे, तू तर सर्वांच्या आधी यायला पाहिजे होतंस. आज आपलं मंडळ स्थापन करण्याचा दिवस. तुझ्या हातून असा विलंब झाला तरी कसा?

तळीराम - शास्त्रीबुवा, आज विलंब व्हायला तसंच कारण झालं; आज एक इतकी वाईट गोष्ट झाली की विचारू नका!

खुदाबक्ष - मग विचारल्यावाचून सांग!

तळीराम - खुदाबक्ष, खरोखरीच ही थट्टेची गोष्ट नव्हे! आज आमच्या दादासाहेबांची सनद मुन्सफांनी सहा महिने रद्द केली.

शास्त्री - दादासाहेब म्हणजे आपले सुधाकरपंत?

तळीराम - हो!

मन्याबापू - सुधाकर इतका शहाणा, सालस, असे असून असं त्याच्याकडून कारण कसं मिळालं?

तळीराम - मन्याबापू, तसे दादासाहेब तुम्ही म्हणता त्यापेक्षाही चांगलेच आहेत. पण त्यांचा स्वभाव फारच तापट आहे.

शास्त्री - तरण्या रक्ताला इतकी उसळी असायचीच.

तळीराम - ते खंरच; पण अलीकडे दादासाहेबांना शत्रूच फार होत चालले आहेत.

जनूभाऊ - कारण?

तळीराम - अहो, एखाद्याचं नव्यानं नाव होऊ लागलं म्हणजे सारा गाव त्याच्या वाईटावर असतो. आमच्या दादासाहेबांचं बरं इथं कोणालाही बघवत नाही. चारचौघांनी चहूकडून चाव चाव केल्यामुळं ते अगदी चिडल्यासारखे झालेले.

जनूभाऊ - मग मुन्सफांनी मुद्दाम असं केलं म्हणतोस?

तळीराम - छे: छे:, मुन्सफांची तर मुळीच चूक नाही! असं कोण कुणाचं बोलणं सहन करून घेणार? झालं काय- कुठल्याशा मुद्दयावर यांचं म्हणणं मुन्सफांना पटेना; दादासाहेबांनी नीट समजावून द्यायला पाहिजे होतं; पण नव्या दमात एवढा पोच कुठून राहणार? हे रागारागानं बोलू लागले. चारचौघांनी हसून हेटाळणी करायला सुरुवात केली. झालं, दादासाहेबांचा सुमार सुटला, अन् मुन्सफाला होय नव्हे वाटेल ते बोलू लागले. तेव्हा मुन्सफांना असं करणं भाग आलं. तरी बरं म्हातारा पुष्कळ पोक्त, म्हणून सहा महिन्यांच्या मुदतीपुरतीच त्यानं सनद रद्द केली; दुसरा कोणी- अहो, मी असतो तरीसुध्दा जन्माचं संसारातून उठविलं असतं! हा एवढा प्रकार झाल्यावर मग काय? ज्यानं त्यानं दादासाहेबांची तोंडावर हेटाळणी करायला सुरुवात केली. त्या बिचा-याला मरणापेक्षा अपेश खोटं असं होऊन गेलं! शेवटी कसं तरी घरी आणून पोचविलं त्यांना; आणखी तडक इकडे निघून आलो. म्हणून वेळ लागला.

शास्त्री - अरे अरे, फार वाईट गोष्ट झाली. बरं, आधीच उशीर झालेला आहे; आता आणखी वेळ नको. करा कामाला सुरुवात. नाव काय ठेवायचं?

खुदाबक्ष - हे बघा, कामाला आणखी बैठकीला एकदम सुरुवात होऊ द्या.

तळीराम - ही मी काही टाचणं करून आणली आहेत. ती वाचून दाखवितो म्हणजे झालं. या संस्थेचं नाव 'आर्यमदिरामंडळ' असं ठेवावं.

भगीरथ - आर्यमदिरामंडळ? 'आर्य' शब्दाचा जरा दुरुपयोग नाही का हा? दारूसारख्या निंद्य गोष्टीशी एवढा प्रौढ शब्द जोडणं-

तळीराम - हीच समजूत घालविण्याकरिता ही संस्था काढायची आहे. मद्यपानाच्या व्यसनाला सभ्य स्वरूप यावं हाच आमचा खटाटोप आहे. इतर बाबतींमध्ये ज्या शब्दाचा उपयोग होतो, तेच शब्द दारूच्या बाबतीत रुळवून टाकले म्हणजे झालं.

भगीरथ - नुसत्या शब्दाशी अशी सलगी केल्यानं मद्यपानाला महत्त्व कसं येणार? मोठमोठाल्या पवित्र गोष्टींच्यासाठीच शोभणारे शब्द असल्या भलत्या गोष्टीत वापरल्यानं त्या गोष्टीची पवित्रता थोडीच कमी होणार आहे! शिमग्यातल्या शिव्यांनी थोरामोठयांची किंमत कमी होत नाही आणि चोरापोरांची किंमत वाढत नाही. बाजारबसव्यांनी साळसूदपणा पत्करला म्हणून पतिव्रतेची पुण्याई कधी ढळते का?

तळीराम - भगीरथ, तुम्ही अगदी अजाण आहात! दारूकडेच इतका वाईटपणा का यावा हो? आम्ही दारू पिणारांनीच आपण होऊन आमचा कमीपणा कबूल करायला सुरुवात केली आहे. विडीचा धूर सोडणा-यांना काही पातक नाही. भर सभेत रंगलेलं थोबाड कुणी रंगवून काढीत नाही; आणि एखाद्याच्या तोंडाला दारूचा वास आल्याबरोबर लोक लागलीच नाक मुरडायला लागतात. का हो असं? तसा कोणी नेटाचा प्रयत्नच केला नाही. साहेबलोकांत आज काय चाल आहे? समजा, हीच आपली भाऊसाहेब, बापूसाहेब यांच्यासारखी मोठाली माणसं उद्या मनमोकळया धिटाईनं, भरदिवसा दारू पिऊन व्याख्यानांतून किंवा सभांतून मिरवू लागली, सरकारदरबारातून वावरू लागली, म्हणजे चोहोंकडे हाच शिरस्ता पडत जाईल. दिवसेंदिवस चहाप्रमाणे दारूचंही काहीच वाटेनासं होणार आहे! म्हणून म्हणतो की, 'आर्यमदिरामंडळ' हेच नाव उत्तम आहे.

खुदाबक्ष - शाबास तळीराम, तू एक और मनुष्य आहेस.

शास्त्री - हं, पुढे चला.

तळीराम - आता मंडळाचे उद्देश थोडक्यात म्हणजे असे की, मंडळाचा प्रत्येक सभासद रोज दारू पिणारा पाहिजे. आपण दारू पितो हे प्रत्येकानं चारचौघात बोलून दाखवलं पाहिजे. अहोरात्र मंडळात खाण्यापिण्याची सोय तयार ठेवायची. मांसाहाराला ही सभा उत्तेजन देत आहे.

मगन - पण देशी दारू प्यायला हरकत नाही ना?

खुदाबक्ष - हा गुजराथी कंगाल मोठा कंजूष आहे.

मन्याबापू - खांसाहेब, असं का म्हणता? सर्वांचीही सोय झाली पाहिजे.

जनुभाऊ - बरोबर आहे, गोरगरिबानं काय करावं? दारिद्र्याच्या प्रसंगी स्वदेशीकडे साहजिकच सर्वांचं लक्ष लागतं.

तळीराम - झालं, अवांतर काही गोष्टी आहेत. साडेआठ एकदा वाजून गेले म्हणजे गरजवंताला स्टेशनावर रात्री अपरात्री धावावं लागतं.

सोन्याबापू - आणि तीसुध्दा सगळयाच स्टेशनवरून सोय असतेच असं नाही. शाळूच्या शेतात तुरीची पेरणी करावी तशीअधूनमधून काही स्टेशनं सोयीची आहेत. दारूची मेल प्रत्येक स्टेशनवर थांबत नाही.

मगन - आणि शिवाय मेलगाडीप्रमाणं दर भारी! अडल्या वेळी भलत्या भावानं घ्यावी लागते.

तळीराम - म्हणून हे मंडळ सरकारला सारख्या विनवण्या करीत राहणार की, हा साडेआठाचा कायदा मोडून सर्रास दुकाने अहोरात्र उघडी ठेवावी.

शास्त्री - तसंच मी म्हणतो, दुकानाला परवान्याची आडकाठी का असावी?

भाऊसाहेब - मंडळी, काय सांगावं! आम्ही तिकडे गोव्याला गेलो होतो, तिथं वाण्याच्या दुकानी, कापडवाल्याच्या दुकानी हे खातं असायचंच.

बापूसाहेब - पोर्तुगीज सरकारचं एकंदरीनं धोरणच उदार!

तळीराम - हळूहळू मंडळ या सा-या गोष्टी घडवून आणणार. अहो, माझ्या डोक्यात अजून फार कल्पना आहेत. आमच्या भगीरथांसारख्या नवशिक्यांना वासाचा मोठा बाऊ वाटतो. तेव्हा बिनधुराची लढाईची दारू निघाली आहे, तशी बिनवासाची प्यायची दारू शोधून काढण्यासाठी मंडळातर्फे शिष्यवृत्त्या देऊन परदेशात विद्यार्थीसुध्दा पाठवून द्यावयाचे म्हणतो मी. तसंच प्रत्येक सभासदानं नवीन सभासद मिळवून मद्यपानाचा प्रसार जारीनं सुरू केला पाहिजे.

शास्त्री - हो, हो, फारच महत्त्वाचं कलम आहे. कारण अलीकडे पाहावं तो सगळया समाजात, एकंदरीनंच व्यसन सोडण्याचं खूळ सुरू झालं आहे. अमका म्हणतो आजपासून चहा सोडला, तमक्यानं विडासुध्दा खायचा नाही असाच विडा उचलला; या प्रकाराला आपण आळा घातला पाहिजे.

तळीराम - आता वेळ फार झाला आहे. म्हणून चिटणीस, खजिनदार वगैरे निवडणं पुढच्या बैठकीवर टाकू. आत खाण्यापिण्याची तयारी झाली आहे. हो, खांसाहेब, तुमचा दो हुसेन भटयारी आणणार होता ना तुम्ही?

शास्त्री - खरं आहे बुवा! सूपशास्त्रात असा सांप्रदायिक मनुष्यच पाहिजे. 'तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे!'

खुदाबक्ष - ठीक आहे, सर्वांना ही योजना पसंत असल्यास हात वरती करावे. (सर्व हात वरती करतात.)

शास्त्री - सर्व एका हातावर तयार आहेत.

तळीराम - सर्व?

सगळेजण - सर्व!

(पडदा पडतो.)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel