(स्थळ: सुधाकराचे घर. पात्रे: तळीराम, सुधाकर, सिंधू, शरद.)

तळीराम - असं आम्ही बोलू नये; पण दादासाहेब, आता बोलायची वेळ आली! अहो, या घरात तुमची काय किंमत आहे? तुम्ही कोण आहात? अहो दादासाहेब-

सुधाकर - तळीराम, तू मला अजून दादासाहेब म्हणतोस? दोस्त, मी तुझा साहेब का? अशा परकेपणानं मला का हाका मारतोस? मला सुधाकर म्हण- दादासाहेब म्हणू नकोस- सुधा म्हण-

तळीराम - दादासाहेब, तुम्हाला सुधा म्हणणारी माणसं निराळी आहेत. आम्ही काय दरिद्री माणसं! फार झालं तर तुमच्या जिवाला जीव देऊ एवढंच! आम्ही काय तुम्हाला सुधा म्हणावं? तुमची लायकी आम्हाला कळते. तुम्हाला सुधा म्हणणारे थोर लोक निराळे आहेत.

सुधाकर - कोण आहेत ते थोर लोक? मला सुधा म्हणणारा कोण आहे? माझ्या घरात मला अरेतुरे? प्रत्यक्ष माझ्या घरात?

तळीराम - तुमचं घर? दादासाहेब, हे घर तुमचं नाही. हे घर रामलालचं आहे!

सुधाकर - रामलालची काय किंमत आहे?

तळीराम - किंमत आहे, म्हणून तर त्यानं मला घरात यायची बंदी केली. आम्ही तुमचे जिवलग दोस्त- आम्हाला घरात यायची बंदी! रामलालनं बंदी केली मला!

सुधाकर - मी रामलालला बंदी करतो. घरात पाऊल टाकू नकोस म्हणून सांगतो. घर माझं आहे!

तळीराम - तुमचं ऐकतो कोण? बाईसाहेब त्यांना अनुकूल, शरदिनीबाई त्यांना अनुकूल! सगळयांनी संगनमत करून आज पद्माकराला तार केली आहे. तो येऊन तुमचा बंदोबस्त करणार! आता आम्हाला धक्का मारून घराबाहेर घालविणार!

सुधाकर - सगळे पाजी, चोर, हरामखोर लोक आहेत! येऊ दे, पद्माकर येऊ दे, नाही तर त्याचा बाप येऊ दे! पद्माकर, त्याचा बाप, रामलाल, शरद, सिंधू- एकेकाला लाथ मारून हाकलून देतो घराबाहेर!

तळीराम - ते लोक बरे जातील बाहेर? पद्माकर तर आता खर्च चालवितो तुमचा! तो कसा जाईल? घर त्याचं आहे. पैसा त्याचा आणि घरही त्याचं!

सुधाकर - मला कुणाची कवडी नको आहे! मी लाथ मारीन तिथं पाणी काढीन! मला कुणाचा पैसा नको आहे! मला थोडीशी दारू पाहिजे! आण थोडीशी!

तळीराम - या घरात तुम्हाला घेताना पाहिलं तर बाईसाहेब काय म्हणतील मला?

सुधाकर - काढ पेला! सिंधूच्या, शरदच्या देखत भरून दे! कुणी एक अक्षर बोललं तर पाहतो! सिंधू, शरद, सिंधू, चलाव! सगळे इकडे या- चलाव! सिंधू, शरद! तळीराम, भर पेला! (सिंधू व शरद येतात; तळीराम पेला भरू लागतो.)

सिंधू - तळीराम, तळीराम, काय करता हे?

सुधाकर - एक अक्षर बोलू नकोस! मुकाटयानं दोघी उभ्या राहा आणखी पाहा! तळीराम, आण इकडे तो पेला!

शरद - तळीराम, तू अगदी नरपशू आहेस! दोन्ही डोळयांची भीडमुरवत, लाजलज्जा काहीतरी आहे का तुला?

(राग- सोहनी; ताल- त्रिवट. चाल- काहे अब तुम.)
दुष्टपति सर्पा सदर्पा, कालकूटा वमसि भुवनासि अखिलाही तये जाळितोसि ॥धृ०॥
पितृमातृरुधिरी तृषित गमसि अति । कृतान्तासि भय निकट बघुनि तुजसि ॥१॥

तळीराम - दादासाहेब, तुमच्या बायका आम्हाला शिव्या देतात; ऐका! (पितो.)

सुधाकर - सिंधू, शरद, लाथ मारीन एकेकीला!

तळीराम - माझ्या बायकोच्या गळयातलं मी मंगळसूत्रसुध्दा तोडलं! पण दादासाहेब, तुमच्या बायकांनी आम्हाला खेटरं दिली, शिव्या दिल्या! बायकोच्या गळयातलं मंगळसूत्र तोडणारा मर्द मी!

सुधाकर - सिंधूच्या गळयातलं मंगळसूत्र तोड! ऊठ तळीराम, माझी तुला शपथ आहे! तू माझा दोस्त आहेस! जिवाचा कलिजा आहेस! माझा भाऊ आहेस! बाप आहेस! माझा देव आहेस! ऊठ, सिंधूच्या गळयातलं मंगळसूत्र तोड! शरदच्या गळयातलं असेल ते तोड! ऊठ, मंगळसूत्र तोड आणि मग माझं जानवंही तोड! (तळीराम उठतो आणि सिंधू व शरद यांच्याजवळ येऊन मंगळसूत्र ओढू लागतो.)

शरद - दादा, दादा, काय हा अविचार? अरे हे तू-

सिंधू - देवा, भाई-

सुधाकर  - हं, खबरदार, हलू नका जागच्या; नाहीतर मान कापीन! भाईचं नाव घ्यायचं नाही! हलू नका- तळीराम, बघतोस काय? तोड मंगळसूत्र! (तळीराम मंगळसूत्राला हात घालतो, तोच रामलाल, पद्माकर व बाबासाहेब येतात. पद्माकर तळीरामला लाथेने उडवितो. तळीराम रडू लागतो व पिऊ लागतो.)

तळीराम - दादासाहेब, आम्हाला लाथ मारली! पद्माकरानं लाथ मारली! रामलाल आहे! आम्ही पीत बसतो!

पद्माकर - बेशरम्, निर्लज्ज जनावरा, तुला उभा चिरून टाकतो!

रामलाल - सिंधूताई, हा तळीराम कसा आला घरात?

सुधाकर - तू कसा आलास घरात? चल, माझ्या घरातून चालता हो! पद्माकर, तू पण चालता हो! त्या थेरडयाला एक लाथ मार! चले जाव! तळीराम, लगाव लाथ एकेकाला! पाजी लोक!

पद्माकर - दादासाहेब, आपण हे मांडलं आहे तरी काय?

सुधाकर - चल जाव! पद्माकर, रामलाल, आधी तू नीघ! सिंधूशी संगनमत करतो माझ्या घरात?

तळीराम - तुमची सनद गेली त्या वेळी यानं बाईसाहेबांना मिठी मारली!

पद्माकर - हरामखोर! जिव्हा छाटून टाकीन एक अक्षर बोललास तर!

तळीराम - दादासाहेब, - म्हणून यानं मला परत घरात यायची बंदी केली?

सुधाकर - रामलाल, माझ्यासमोर उभा राहू नकोस! पद्माकर आधी घरातून बाहेर निघ! ए थेरडया चलाव!

पद्माकर - छे:, छे:, हा तर बेताल अनर्थ आहे! भाई, चल, इथं उभं राहण्यात अर्थ नाही! सिंधूताई, चल, याउप्पर तू या घरात राहणं योग्य नाही. हा शुध्द नरकवास आहे!

तळीराम - दादासाहेब, पैसा बोलतो आहे हा!

सुधाकर - चल जाव, सिंधू, तू पण चालती हो! शरद, तू पण जा! मला कोणाची जरूर नाही!

पद्माकर - ठीक आहे. ऊठ सिंधू, या घरात पाणी प्यायलासुध्दा राहू नकोस! चल-

सिंधू - दादा, या घरातून कुठं जाऊ म्हणतोस?

पद्माकर - कुठंही! या नरकाबाहेर अगदी कुठंही!

सिंधू - हा नरक? हे पाय जिथं आहेत तिथं नरक? दादा, अरे, तू चांगला शहाणा ना? वेडया, हे पाय जिथं असतील तिथंच माझा स्वर्ग, तिथंच माझं वैकुंठ, आणि तिथंच माझा कैलास!

(राग- पहाडी- गज्जल; ताल- धुमाळी. चाल- दिल बेकरार तुने.)
कशी या त्यजू पदाला । मम सुभगशुभपदाला । वसे पादयुग जिथे हे । मम स्वर्ग तेथ राहे॥
स्वलोकी चरण हे नसती । तरी मजसी निरयवसती ती॥ नरकही घोर सहकान्ता । हो स्वर्ग मला आता ॥१॥

या पावलांविरहित मात्र मला देवादारीसुध्दा नरकवास घडेल! तुमच्या चौदाचौकडयांच्या राज्यात राहून रौरवाची राणी होण्यापेक्षा दुर्दैवाची दासी होऊन दु:खात दिवस कंठीत मी या पायांजवळ अशी अष्टौप्रहर बसून राहीन. (सुधाकराच्या पायांवर मस्तक ठेवते; तो तिला लाथ मारतो.)

सुधाकर - अशी लाथ मारून तुला झुगारून देईन!

पद्माकर - पाहा, ताई, पाहा! अजून तरी या पायांचा मोह सोड!

सिंधू - दादा, मोह का सोडू? हेच पाय माझ्या कपाळी आहेत. अरे, देवानं पाठ पुरविली तर ज्या पायांच्या आश्रयानं उभं राहायचं, त्या पायांनी झुगारून दिलं तर कुठं जायचं? (सुधाकराला) का मला दूर लोटणं झालं? वैकुंठेश्वरा, माझ्या कपाळीच्या कुंकवासाठी या पायधुळीत मला राहायला नको का? आपल्या पायांपासून- दैवाच्या दैवतापासून- या दीन दासीला दूर लोटू नका!

(राग- पहाडी- जिल्हा; ताल- केरवा. चाल- मान नाही सैय्या.)
लोटू नका कान्ता । अशी दूर कान्ता । केवि जगे दीना मीना । जललवरहिता ॥धृ०॥
हेचि चरण माझे । जीवन जगती । मृतचि गणा मज हे दुरी होता ॥१॥

सुधाकर - सिंधू, तुला इथं राहायचं असेल तर या हरामखोरांचं नावसुध्दा घेऊ नकोस! या चोरांच्या घरातला एक पैसादेखील माझ्या घरात आणायचा नाही. असं असेल तर या घरात राहा!

तळीराम - शाबास, दादासाहेब! अशी शपथ घ्यायला लावा आणि मग या घरात राहायला परवानगी द्या! शपथ घ्यायला लावा!

सुधाकर - सिंधू, कबूल आहे तुला हे? नुसत्या तुझ्या गंगायमुना मला नकोत!

तळीराम - नुसते कबूल नाही! दादासाहेब, वाहत्या गंगेत हात धुवून घ्या! शपथ घ्यायला लावा- हॅम्लेटच्या बापासारखा तुम्हाला इशारा देतो आहे! बाईसाहेब, शपथ घ्या!

सुधाकर - (मोठयाने ओरडून) 'त्रस्त समंधा, शांत राहा!' सिंधू, आत्ताच्या आता शपथ घे, नाही तर घरातून चालती हो! कोणाचा पैसा, कोणाचे काही काही घरात आणायचं नाही!

सिंधू - आपल्या पायांवर हात ठेवून सांगते, आजन्म हाल सोशीन, काबाडकष्ट करीन, पण दुसर्‍याच्या कष्टाची कवडी म्हणून या घरात येऊ देणार नाही! आपल्या दोघांच्या कष्टाविरहित सगळया जगातील धनदौलत आजपासून मला शिवनिर्माल्य आहे!

(राग- काफी- जिल्हा; ताल- कवाली. चताल- कत्ल मुझे कर.)
सत्य वदे वचनाला । नाथा । स्मरुनि पदाला या सुरविमला ॥धृ०॥
वित्त पराजित मानि विषसम । स्पर्शिन ना कधी मी त्याला ॥१॥

बाबासाहेब - सिंधू, काय भलतीच शपथ घेतलीस ही?

पद्माकर - ताई, तू शुध्दीवर तरी आहेस का? या रौरवात राबून, अन्नाला मोताद होऊन, याच्या शिव्याशापात जळून उभ्या आयुष्याची राखरांगोळी का करायची आहे तुला?

सिंधू - राखरांगोळी काय म्हणून? माझ्या देवासाठी जळून गेले तर माझी राखरांगोळी होईल? देवाकारणी मातीची लंका जळाली, तिचंसुध्दा सोनं झालं! मग मी तर माणसासारखी माणूस आहे! दादा, बाबा, तुम्हाला वेडं तर लागली नाहीत? सुखाच्या संसारातसुध्दा चार दिवस माहेरी राहायचं आम्हा बायकांच्या जिवावर येतं आणि तुम्ही मला आता घर सोडायला सांगता? इकडची अशी अवस्था झालेली, घरात हा प्रकार; आता तर डोळयात तेलवात घालून मला बसायला पाहिजे! मला काही वेडंवाकडं झालं असतं, तर इकडून मला टाकणं झालं असतं का? माझ्याकरता आकाशपातळ एक करायचं झालं नसतं का? मग मला इकडच्या जिवासाठी पडतील ते काबाडकष्ट उपसायला नकोत का? आमच्या गरिबीसाठी मोलमजुरी करायला नको का?

पद्माकर - ताई, काबाडकष्ट उपसायचे आणि तेसुध्दा या महारवाडयात राहून?

बाबासाहेब - सिंधू, ज्या ठिकाणी तुला पोटापाण्याची पंचाईत पडावी, तिथं टाकून-

पद्माकर - ताई, तुला झालं तरी काय? तू काबाडकष्ट करणार? कुबेराला कर्ज देण्याइतका धनंतर हा तुझा बाप, कोसळत्या आकाशाला थोपवून धरणारा मी तुझा डोंगराएवढा भाऊ!- आणि तू एखाद्या दिवाण्या दारूबाजासाठी-

सिंधू - हा! दादा, या घरात, या पायांसमोर- माझ्यासमोर असं अमंगल मी तुला बोलू देणार नाही! पतिव्रतेच्या कानांची ही अमर्यादा आहे! जा- बाप, भाऊ, माझं या जगात कोणी नाही? पतिव्रतेला नाती नसतात. ती बापाची मुलगी नसते, भावाची बहीण नसते, मुलाची आई नसते! देवाब्राह्मणांनी दिलेल्या नवर्‍याची ती बायको असते! बाबा, ज्या दिवशी माझं लग्न झालं त्याच दिवशी तुमची मुलगी तुमच्या घराला मेली आणि नव्या नावानं मी या घरात जन्माला आले. मुलीच्या लग्नाचा समारंभ आई बापांना सुखदायक वाटतो; पण मुलीचं लग्न म्हणजे तिची उत्तरक्रिया हे त्या बापडयांच्या ध्यानीमनीसुध्दा येत नाही. बाबा, कन्यादानासाठी इकडच्या हातावर तुम्ही जे उदक सोडलंत, त्यानंच माझ्या माहेरच्या नावाला तिलांजली दिलीत!

सुधाकर - सिंधू, हे हरामखोर इथं कशाला उभे राहिले आहेत? तुला राहायचं असेल तर या सगळयांना हाकलून दे!

सिंधू - दादा, बाबा, भाई, ऐकलंत ना हे? माझ्याबद्दलची माया-ममता सोडून आल्या पावली आता बाहेर चला! वन्सं, हात जोडून, पदर पसरून तुमच्याजवळ मात्र एवढं मागणं आहे की, तुम्ही मात्र आता या घरात राहू नका. नाही म्हणू नका- माझ्या गळयाची शपथ आहे तुम्हाला! तुम्हाला इकडल्याप्रमाणंच आपला भाई आहे! घरात असा प्रकार सुरू झाल्यावर तुमच्यासारख्यांना अब्रूनं दिवस निभावून नेणं मोठं कठीण आहे!

शरद - वहिनी, माझ्या अब्रूचं बोलतेस आणि तुझ्या अब्रूचं मात्र-

सिंधू - या पायांच्या छायेत असले, म्हणजे माझ्या अब्रूला कळिकाळाचीसुध्दा भीती नाही.

सुधाकर - सिंधू, अजून- खोटी शपथ घेतलीस तू.

सिंधू - आता जर कुणी इथं थांबाल तर माझ्या गळयाची शपथ आहे! पंचप्राणांच्या परमेश्वरा, मी खोटी शपथ घेतली नाही. सिंधूचा सगळया जगाशी संबंध सुटला! आपल्या दोघांच्या कष्टाविरहितची एक कपर्दिकादेखील घरात आणीन तर आपल्या पायांचीच शपथ आहे-

(राग- पिलू; ताल- केरवा. चाल- डगमग हाले.)
सकल जगाचा । संसृतीचा । पाश तोडी झणि ॥धृ०॥
पदि या सारा । वसत पसारा । त्रिभूवना संसाराचा । मम साचा ॥१॥
(त्याच्या पायावर डोके ठेवते.)

सुधाकर - तळीराम, भर आता पेला राजरोस आणि दे मला!

तळीराम - आता कुठं आहे शिल्लक? (ओतून) हा एवढा एकच प्याला!

सुधाकर - किती का असेना? पण सिंधूच्या देखत घेणार! बस्स झाला तेवढा एकच प्याला!(पेला पिऊ लागतो. पडदा पडतो.)

अंक तिसरा समाप्त.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel