(स्थळ: तळीरामाचे घर. पात्रे: तळीराम आणि गीता)

तळीराम - घरात असेल ते सामान पुढे आण! मंडळाची वर्गणी द्यायची आहे आज. काय जे असेल ते आण.

गीता - आणायला आहे काय घरात कपाळ तुमचं? झाडून सारून घर स्वच्छ आरशासारखं करून ठेवलं आहे! सार्‍या घरात जिकडे तिकडे पाहाल तिकडे तुमच्या रूपाची अवकळाच दिसेल.

तळीराम - खोटं बोलते आहेस तू! दागदागिना काही काही नाही अगदी घरात!

गीता - अहो! नाही, नाही, नाही! आता काय कपाळ फोडून घेऊ तुमच्यापुढं!

तळीराम - पाहा, खोटे बोलू नकोस. काही नाही तुझ्याजवळ?

गीता - हे एवढं कुंकू कपाळावर तुमच्या नावाचं बाकी राहिलं आहे. (कुंकू पुशीत) हे एकदाचं घ्या- त्या कलालाच्या कपाळाला लावा, आणि घ्या शेवटचा घोट बायकोच्या आणखी संसाराच्या नावानं! म्हणजे तुम्ही सुटलात आणि मी पण सुटले!

तळीराम - काय बायकोची जात आहे पाहा! गीते, माझी अमर्यादा होते आहे ही!

गीता - अहाहाहा! मर्यादा ठेवायला काय गुणांचे दिग्विजयी लागून गेलात! स्वत:च्या संसाराचं वाटोळं केलंत, दुसर्‍याच्या संसाराचं वाटोळं केलंत! घरात चुलखंड थंडावले आहे. तिथं माझी हाडं लावू की तुमची?

तळीराम - काय बेमुर्वत बाजारबसवी आहे! घेऊ का नरडं दाबून जीव? मी दारू पितो म्हणून माझी अशी अमर्यादा करतेस? थांब, अशी पालथी पाडून तुलाही दारू पाजतो! चल, दारू तरी पी, नाहीतर घरातून चालती तरी हो! नाही तर जुन्या बाजारात नेऊन लिलाव पुकारून आडगि-हाइकाला फुंकून टाकीन!

गीता - हं! तोंडाच्या गोष्टी असतील अगदी! वरूनच उतरले पाहिजेत तुमचे! स्वत: खातेर्‍यात लोळता आहात ते थोडं नाही का झालं?

तळीराम - जातेस का पितेस? दादासाहेबांच्या तिथं लावालावी करून मला त्यांच्या घरी जायला बंदी करवलीस? चल, घे हा दारूचा घोट का घेऊ नरडीचा घोट? (तिला धरतो. दोघांची झटापट होते. ती त्याला ढकलून देते.)

गीता - देवा, नकोरे नको या घरात राहणं आता! (जाते.)

तळीराम - बेहत्तर आहे गेलीस तर! तुझ्या नावानं आंघोळ करून मोकळा होईन! आता पुन्हा घरात ये- जर उभी ठार केली नाही तर नावाचा तळीराम नव्हे. (जातो. पडदा पडतो.)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel