(स्थळ- तळीरामाचे घर. पात्रे- बिछान्यावर आसन्नमरण तळीराम, त्याच्या भोवती शास्त्री, खुदाबक्ष, डिसोझा, दादीशेठ दारूवाला, मन्याबापू मवाळ, जनूभाऊ जहाल, सोन्याबापू सुधारक, यल्लाप्पा वगैरे आर्यमदिरामंडळाचे सभासद.)

सोन्याबापू - शास्त्रीबुवा, कालची रात्र फारच जड गेली; वास्तविक काल रात्रीच तळीराम गार व्हायचा! पण आजचा दिवस आणखी दारू पिण्याचं याचं सद्भाग्य होतं म्हणूनच हा वाचला!

खुदाबक्ष - तशीच रात्र लांबलचक तरी किती वाटली! काही केल्या संपेना! तळीरामाच्या आयुष्यात आणि तिच्यात चेंगटपणाबद्दल जशी काय पैजच चालली होती!

सोन्याबापू - जितकी लांबलचक तितकीच भेसूर! आम्ही इतकी संध्या केलेली पण डोळयाला डोळा लावून पळभरसुध्दा ध्यान करण्याचा कोणाला धीर झाला नाही.

मन्याबापू - खरंच आहे; घडीभराच्या ध्यानानं कायमचा प्राणायाम व्हायचा एखादे वेळी! यमदुतांच्या स्वार्‍या येणार आहेत असं कळल्यावर झोपेनं मुडद्यासारखं पडायची कोण छाती करणार? तळीरामाऐवजी न जाणो ते आपल्यालाच चुकून न्यायचे ही प्रत्येकाला धास्ती वाटायचीच!

सोन्याबापू - तेवढी दिव्याची ज्योत काय ती संथपणानं तळीरामाची प्राणज्योती विझते की काय हे टक लावून पाहात होती!

विरूपाक्ष - ठीकच आहे. जन्ममरणाचा जिचा रोजचा रोजगार, तिला कसली भीती वाटणार? बरं, दिव्याची ज्योत जरी संथ असली तरी तळीरामाची धडपड सारखी चालू असेल, नाही?

मन्याबापू - मुळीच नाही! आज ही जी तळीरामाच्या देहाची यमराजाच्या विरुध्द नि:शस्त्र प्रतिकाराची चळवळ इतक्या हातघाईवर आलेली दिसते तिचा काल मागमूससुध्दा नव्हता! काल सारी रात्रभर तळीरामानं फक्त सनदशीर चळवळच चालू ठेवलेली होती. शरीराचा स्वामी स्थानभ्रष्ट होऊ नये म्हणून इमानी अवयवांनी इतकी जबाबदारी घेतली होती की डेक्कन सभेनेसुध्दा तिच्यापुढे हात टेकावेत! डोळयांत उरलेला प्राण तसाच निघून जाऊ नये म्हणून ती पापणीपासून दुर झाली नाही. त्याची झोप नेहमी म्हणजे इतकी जहाल असायची, पण काल रात्री तिच्यावर सभाबंदीच्या कायद्याची अंमलबजावणी झाल्यासारखं दिसत होतं! नेहमी वटवट करणारी जीभ आज अशी सरकारजमा का झाली हे पाहण्यासाठी एखादं कपोलकल्पित कारण सापडेना म्हणून दोन्ही गाल एखाद्या विरक्त साधूप्रमाणं अंतर्मुख झाले आहेत. नाकानं सुध्दा पंचप्राणांना बाहेर जाता येऊ नये म्हणून विश्वासातल्या वार्‍यालासुध्दा येरझार्‍या करता येऊ नयेत अशी कडेकोट नाकेबंदी केली होती. सारी रात्रभर असा निपचित पडला होता, की विलायतेतल्या कसलेल्या परीक्षकालासुध्दा छातीला हात लावून सांगता आलं नसतं, की हा तळीराम असा बेशुध्द पडला आहे तो मेल्यामुळं, झोपेमुळं, दारूमुळं-

सोन्याबापू - किंवा वैद्याच्या औषधामुळं म्हणून.

मन्याबापू - अरे खरंच, औषध देण्याची वेळ झाली! जागा करावा आता याला! तळीराम, ऊठ, औषध घेतोस ना?

तळीराम - मला नीट बशीव; आता मला औषध नको आहे. माझं मरण अगदी जवळ आलं आहे.

जनूभाऊ - तळीराम, असा धीर सोडतोस? भिऊ नकोस! आम्ही तुला मरू देणार नाही; अरे, ती दारूची बाटली याच्यापुढं आणून ठेव. डोळयासमोर दारूची बाटली असल्यावर हा कामयचे डोळे मिटील ही भीतीच सोड! जीव गेला तरी मरायचा नाही!

मन्याबापू - ऐका हो जनूभाऊ! शास्त्रीबुवा, बघा हो यानं जरा डोळे पांढरे केले हो!

विरूपाक्ष - अरे, अरे, अरे! अहो, कुणी गंगा इकडे घ्या बरं जरा! आणि तसंच तुळशीपत्रही आणा! तळीराम,

तळीराम, सावध हो. बाबा! वैद्याला, डॉक्टरला बोलावू का?

तळीराम - गंगा नको; तुळशीपत्र नको, काही नको! मला मरताना थोडीशी दारू पाजा म्हणजे झालं! तुळशीपत्राऐवजी तोंडावर एक बूच ठेवा म्हणजे ठसका लागला तरी तोंडातली दारू सांडणार नाही! आणा थोडीशी!

विरूपाक्ष - अहाहा, याला म्हणावं खरा दारूचा अभिमानी! पुढच्या जन्मी तू यापेक्षाही मोठा दारूबाज होणार! प्रत्यक्ष भगवंतांनीच गीतेत म्हणून ठेवलं आहे, की यं यं वाऽपि स्मरन् मावं त्यजत्यंते कलेवरं । तं तमेवैति कौंतेय सदा तद्भावभावित:॥ (त्याला दारू पाजतो.)

तळीराम - आणखी थोडी दे म्हणजे मला थोडासा थकवा येईल! मला तुम्हाला माझी अखेरची इच्छा सांगायची आहे! जरा आणखी दे पाहू!

मन्याबापू - आणखी दारूला तू सध्या पात्र नाहीस!

जनूभाऊ - पिऊ दे रे त्याला; या वेळी नाही म्हणू नकोस! (त्याला दारू पाजतात.)

तळीराम - अरेरे, मला दारूसुध्दा नीटशी पिता येत नाही! शास्त्रीबुवा, खुदाबक्ष, मी आता मरतो. माझं सांगणं लक्षात ठेवा. आधी त्या भगीरथाला सांगा, की तळीराम दारू पिता पिता मेला; अखेरपर्यंत प्रेमाच्या पकडीत सापडला नाही. सांगाल ना?

विरूपाक्ष - अगदी बजावून सांगू!

तळीराम - मी मेल्यावर, माझ्या घरात दारूचाच गुत्ता काढा! त्याचं नाव 'तळीराम मोफत मद्यालय' असं ठेवा. ते सारी रात्रभर उघडं ठेवण्याबद्दल खटपट करून परवानगी काढा! म्हणजे अडल्याबिडल्याची अडचण होणार नाही! त्या मद्यालयात आल्या-गेल्यांना, गोरगरिबांना, गोब्राह्मणांना फुकट दारू पाजा! विद्यार्थ्यांना निम्मे दरानं दारू विका! माझी खरी भिस्त तरुण पिढीवरच आहे! माझ्या घरातल्या रिकाम्या बाटल्या, ग्लासं एखाद्या कुटुंबवत्सल दारूबाजाला द्या! माझ्या वर्षश्राध्दाच्या दिवशी एखाद्या सत्पात्र ब्राह्मणाला सडकून दारू पाजा! गोप्रदान करण्याऐवजी बुचांचा एक तराफा माझ्या नावानं नदीत सोडा म्हणजे मी त्याच्यावर बसून वैतरणानदी उतरून स्वर्गात जाईन! दोस्त हो! माझी ही इच्छा पुरी कराल ना? न केलीत तर माझी आशा गुंतून मी भूत होईन; मला मुक्ती मिळणार नाही!

मन्याबापू - आम्ही सगळेजण वाटेल ती मेहनत करून तुझी इच्छा पूर्ण करू! तू काही काळजी करू नकोस.

जनूभाऊ - तशातून तू भूत झालासच तरी तुझ्या भुताला आम्ही व्हिस्कीच्या बाटलीत भरून कोंडून ठेवू! आणखी काही इच्छा आहे!

तळीराम - आणखी काही नाही; वाटेल त्याच्या नादी लागून दारू सोडू नका! दारू न पिण्याची शपथ फार दिवस टिकत नाही; आपल्या आर्यमदिरामंडळाचा अभिमान धरा- काही झालं तरी संस्था बुडवू नका! आई आई गं! शास्त्रीबुवा, मला आणखी थोडी दारू द्या! आणि तुम्ही सारेही माझ्याबरोबर शेवटची घ्या! माझी हेल्थ- भरपूर ड्रिंक करा! (त्याला दारू देतात व सर्वजण मोठाले पेले भरतात.) स्वर्गात मला दारू मिळेल का रे?

सोन्याबापू - तळीराम, टु युवर हेल्थ! (सर्व पितात)

तळीराम - थोडी दारू! आणखी एकच प्याला! (मरतो.)

सोन्याबापू - अरेरे, आटपला बाजार! दारूच्या या जिवंत गुत्त्याचे एकदम साडेआठ वाजले!

शास्त्री - गेला, मदिरेचा खरा कैवारी गेला!

खुदाबक्ष - अभागी अर्यमदिरामंडळाचा खरा आर्य आधार तुटला!

जनूभाऊ - मदिरे, मदिरे, तुझी धुंदी उतरली! तुझ्या यशाचा वाटा इथंच राहिला! तुझ्या सौभाग्याच्या लाल तजेल्यावर प्रेतकळा आली! तुझी अडखळती चाल इथं कायमची खुंटली! तुझं बरळणं यापुढं बंद झालं!

शास्त्री - खरा खरा महात्मा दारूबाज आज आम्हाला सोडून गेला! असा दारूबाज पुन्हा होणं नाही!

खुदाबक्ष - ती गोष्टच काढावयाला नको! आपण सारेच पिणारे, पण तळीरामाची गोष्ट निराळी! पिताना कधी दिवस पाहिला नाही, की रात्र पाहिली नाही!

शास्त्री - आज बारा वर्षे झाली, केव्हाही तळीरामाच्या तोंडाची दुरूनच घपकन् घाण आली नाही असं झालंच नाही! असं खडतर व्रत एक पुरं तप चालविलं!

खुदाबक्ष - तपस्वीच तो! बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले! बारा वर्षे अडखळत बोलला, आणि अडखळतच चालला!

जनूभाऊ - स्वार्थत्याग तरी केवढा! दारूसाठी बायको सोडली; मग दुसर्‍या आप्तांची काय कथा!

शास्त्री - दारू पिणारालाच त्यानं आप्त केलं! हा मन्याबापू जरा नेमस्तपणानं घेणारा, म्हणून नेहमी त्याला आपल्या शेजारी यानं आग्रहानं पाजावी, तसाच मगनभाई, जरा भित्रा, पण त्यालाही-

मगन - (एकदम मुक्तकंठाने रडून) तळीराम, आता मला आग्रहानं कोण रे दारू पाजील? काटकसरीनं निशा चढविण्यासाठी, मिक्श्चर करण्याचा उपदेश कोण रे करील?

जनूभाऊ - शास्त्रीबुवा, अशा रडण्यानं या महात्म्याचा गौरव कसा होणार? याच्यासाठी उघडया मैदानात एक जंगी जाहीर सभा जरूर भरविली पाहिजे.

मन्याबापू - बेजबाबदार जंगी जाहीर सभा मुळीच नको! सनदशीर पध्दतीनं इथंच एक सभेची बैठक उठवूया आणि काय करायंच ते ठरवून टाकूया. एक छोटंसं कार्यकारी मंडळही नेमा पाहू-

शास्त्री - तुमचं म्हणणं उक्त आहे. तुम्हीच कार्यकारी मंडळाचे चिटणीस व्हा.

मन्याबापू - बरं, मग आधी अध्यक्ष निवडा! कोण होतो अध्यक्ष?

खुदाबक्ष - तसं कोण सांगणार? सगळयांचीच योग्यता सारखी वाटते.

जनूभाऊ - मग चिठ्ठया टाका!

यल्लाप्पा - दम खा! माझी अशी सूचना आहे, की मी अध्यक्ष होतो, तिला आपण सर्वांनी अनुमोदन द्यावं! कारण, अध्यक्षाला सभा संपेपर्यंत स्वस्थ बसून राहणं एवढंच काम करायचं असतं आणि मला इतकी जास्त झाली आहे, की थोडया वेळात माझा अगदी लोळागोळा होईल! तेव्हा सभेचे काम आटपेपर्यंत मी आपला प्रेत होऊन अध्याक्षांप्रमाणं पडून राहीन!

खुदाबक्ष - मग तळीरामाचं प्रेतच तुझ्यापेक्षा जास्त योग्य आहे.

जनूभाऊ - बरोबर आहे! शिवाय, हल्ली सभांतून, कामाच्या दृष्टीनं थोर माणसांच्या तसबिरा अध्यक्षस्थानी ठेवण्याची वहिवाट आहे. त्या दृष्टीनं तसबिरींपेक्षा प्रेत केव्हाही अधिक लायक! सबब तळीरामाच्या प्रेतालाच अध्यक्षस्थानी बसवावे!

खुदाबक्ष - अध्यक्षांची निवड झाल्यावर, मी आता सभेपुढं जोरानं पहिला ठराव असा आणतो, की आधी घरातली सगळी दारू पिऊन मग पुढं कार्याला लागावं. ठराव पसार! कार्यकारी मंडळाच्या उत्साही चिटणिसांनी सर्वांना पेले भरून द्यावेत अशी मी त्यांना जोरानं विनंती करतो.

शास्त्री - ज्याअर्थी सर्वांनाच चढत चालली आहे, त्याअर्थी यापुढं प्रत्येकानं बसूनच बोलावं, असा दुय्यम ठराव मी पुढं आणतो. माझे पाय लटपटताहेत- ठराव लवकर पसार करा!

मगन  - (त्याला सावरून) या ठरावाला मी टेका देतो. ठराव पसार!

जनूभाऊ - तळीरामाच्या मरणानिमित्त शहरातील सर्व दारूची दुकानं दिवसभर बंद ठेवण्याची मक्तेदारांना विनंती करावी, असं या सभेचं ठाम मत आहे.

शास्त्री, खुदाबक्ष वगैरे - शेम! धिक्कार! नो, नो!

मन्याबापू - सन्मान्य सभासद जनूभाऊ यांचा ठराव पुष्कळशा सभेला मान्य नाही. मिस्टर विरुपाक्षशास्त्री, राजश्री खुदाबक्ष, श्रीयुत मगनभाई, व श्रीयुत मी या ठरावाबद्दल जोरानं खेद करतो. मृत महात्म्याच्या धोरणाकडे सभेचा कटाक्ष आहे. तळीरामाला दारूची दुकानं बंद झालेली खपत नसत; म्हणून सबंध दिवस दुकानं बंद ठेवण्याऐवजी सबंध रात्रभर दुकानं उघडी ठेवण्यासाठीच सभेनं खटपट करावी. ठराव पसार!

शास्त्री - सदरहू प्रेताची यात्रा वाजतगाजत काढावी!

मगन - दारूखेरीज अनाठायी खर्च न करण्याकडे तळीरामाचं धोरण होतं; म्हणून वाजंत्र्यांचा खर्च ही सभा करू इच्छित नाही! त्याच्या हातापायांच्या काडयांनीच पोटाचा नगारा वाजवावा, अशी माझी उपसूचना आहे. उपसूचना पसार! प्रेतामागं भाडोत्री रडण्यासाठी काही गुजराथी बायका आणण्याची मी खटपट करतो.

जनूभाऊ - शेम्! तळीरामाला बायकांच्या नावाचासुध्दा तिटकारा होता; म्हणून रडण्यासाठी, बायकांऐवजी मन्याबापू यांनी काही मवाळ मित्रच आणावे, अशी मी शिफारस करतो.

मन्याबापू - ही सभा या ठरावाचा निषेध करीत आहे. मी असं विचारतो की, जोरानं विचारतो- की, मृताच्या अंत्यविधींच्या वेळी, एक विशिष्ट ध्वनी करावा लागतो. त्यासाठी आपल्या जहाल जिवलगांना आणायला जनूभाऊ तयार आहेत का? मी स्पष्टच सांगतो, की नेमस्तांसाठी जर पितरपाकाचा रडका पंधरवडा असेल तर जहालांसाठी जोरकस तोंडसुखाचा फाल्गुनमास असता!

खुदाबक्ष - दोस्तहो, असे भांडून सभेत बखेडा घालू नका! ही काय देशातल्या दोन्ही पक्षांतल्या विद्वानांची सभा आहे, म्हणून तुम्ही असा धिंगाणा घालावा? मी ठासून सांगतो- कुत्सित कोटी मनात आणून कोणी हसू नये- मी म्हणून टाकतो की- मी दारू ठासून सांगतो की, ही आम्हा दारूबाजांची सभा आहे. वर्षातून तीन दिवस चढणारी ही देशभक्तीची निशा नाही; पण दिवसांतून तीन वेळा पचनी पाडलेली ही दारूची निशा आहे. तुम्ही देशभक्त आहात का? तुम्ही विद्वान आहात का? नाही! मग एकेरीवर येऊन सुरळीत सभा मोडण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? अशी एकमेकांवर आग पाखडण्यात काय अर्थ आहे? काम पुढे चालवा.

शास्त्री - मी असा ठराव पुढे आणतो, की तळीरामाचे प्रेत व्हिस्कीच्या बाटल्यांभोवती येणार्‍या पेंढयाच्या पिशव्यांनी जाळावं!

खुदाबक्ष - आर्यधर्माच्या दृष्टीनं हा भडाग्नि होतो. हा धर्मबाह्य ठराव आहे. या ठरावाला मी तळीरामाच्या वतीनं हरकत घेतो.

मन्याबापू - दोघेही श्रीयुत चुकताहेत! तळीरामाचा दारू पिणं हा एकच धर्म होता. सबब धर्माच्या दृष्टीनं पाहता तळीरामाला एखाद्या दारूच्या भट्टीत जाळावं, असा ठराव मी आणतो! पसार!

जनूभाऊ - मी असा ठराव आणतो, की आपण सर्व अगदी गाढव आहोत! प्रेतयात्रा कशी न्यायची हे ठरविण्यापूर्वीच आपण जाळायला आरंभ केला! मिरवणूकीच्या वेळी गाडीचे घोडे सोडून, आपण गाडी ओढून तळीरामाचा सन्मान करावा, अशी मी सूचना करतो.

मगन - या ठरावाला माझा असा वांधा आहे, की घोडे सोडून आपण गाढव गाडी ओढीत बसलो तर ते उलट अपमानकारक आहे!

मन्याबापू - आता फार महत्त्वाचा ठराव मी फारच जोरानं पुढं आणतो. तळीरामाचं काहीतरी स्मारक करायला पाहिजे; त्यासाठी 'तळीराम स्मारक फंड कमिटी' स्थापून तिच्यामार्फत फंड गोळा करण्याचं सभेनं ठरवावं! वर्गण्यांचे आकडे भराभर पडले पाहिजेत! आणि याच बैठकीत पडले पाहिजेत. आकडे मोठाले पण पाहिजेत! किमानपक्ष एकेकानं हजाराचा आकडा तरी घातलाच पाहिजे.

शास्त्री - लाखाची गोष्ट सांगितलीत! आपले श्रीमंत शेट मगनभाई यांच्यापासूनच शेज धरावी! शेटजींनी तोंड वाईट करण्याचं कारण नाही! हे आकडे वसूल करण्यात येतील अशी त्यांनी मुळीच भीती बाळगू नये! आजवर कोणत्या स्मारकसभेनं आकडे वसूल करून स्मारक केल्याचं कोणाच्या स्मरणात आहे? त्या वेळेपुरतेच पहिल्या उसळीच्या भरात हे दर्शनी आकडे टाकायचे असतात! पुढं सर्वांनाच त्या आकडयांसकट स्मारकाचाही विसर पडत जातो!

मगन - तत्राप मी लेखी गुंतायचा नाही; म्हणून या ठरावाला मी जोरानं-

खुदाबक्ष - हा, मगनभाई-

मगन - या ठरावाला मी जोरानं-

खुदाबक्ष - हा- हा-

मगन - या ठरावाला मी जोरानं काहीच करीत नाही!

शास्त्री - आता मृताचं प्रेत बाहेर काढावं असा माझा शेवटचा ठराव आहे. उठा सर्वजण, आधी प्रेत बाहेर नेऊन ठेवू! (सर्वजण उठतात व धुंद झालेल्या यल्लाप्पाच्या हातापायांची ओढाताण करतात.)

यल्लाप्पा - मला कोण ओढत आहे, असं ही सभा जोरानं विचारीत आहे.

शास्त्री - मेलेला मनुष्य काही विचारीत नाही, असं बहुमतानं सभेचं ठाम मत आहे.

यल्लाप्पा - मी मेलो नाही, असा एकमताने ठराव मी मांडतो.

खुदाबक्ष - मग कोण मेला आहे? कोणी तरी मेला आहे हे खास!

मन्याबापू - पुन: सभेत दंगा सुरू झाला! थांबा, खुदाबक्ष, शास्त्रीबुवा, सभेची जादा बैठक भरवा आणि कोण मेला आहे, हे शिरस्तावर ठरवा!

खुदाबक्ष - ठीक आहे! सभा अशी सूचना करीत आहे, की जो मेलेला असेल त्यानं हात वर करावा. (काही वेळ थांबून) कोणीच हात वर करीत नाही त्याआधी कोणीच मेलेलं नाही असं सभा प्रतिपादन करीत आहे! तळीरामसुध्दा मेला नाही, असं सभेचं ठाम मत आहे!

शास्त्री - याबद्दल सभेला फार आनंद होत आहे. या आनंदाच्या भरात तळीरामाच्या मृत आत्म्याला, तळीराम मुळीच मेला नाही, अशी स्वर्गात अभिनंदनपर तार पाठविण्याची ही सभा ठराव करीत आहे.

सोन्याबापू - अरेरे! फुकाफुकी सभेचा सारा समारंभ झाला म्हणावयाचा!

खुदाबक्ष - नाही. हा खटाटोप फुकट जाऊ द्यायचा नाही. या खटपटीचा उपयोग होण्याची वेळ येईपर्यंत, म्हणजे कोणीतरी मरेपर्यंत सर्वांनी मुडद्याप्रमाणं इथंच पडून राहावं असा ठराव मी पुढं आणतो. ठराव पसार! (सर्व अस्ताव्यस्त पडतात. पडदा पडतो.)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel