अनेक चित्रपट, नाटके, पुस्तके, गीते-भीमगीते आणि इतर साहित्य बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर व विचारांवर आधारित आहेत. २००० मध्ये जब्बार पटेल यांनी इंग्रजी भाषेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रपट दिग्दर्शित केला, ज्यात मामुट्टी हे मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट राष्ट्रीय फिल्म विकास महामंडळ आणि सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाने प्रायोजित केला होता. चित्रपटाला लांब आणि वादग्रस्त घटनांनंतर प्रकाशीत केले गेले होते. श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेल्या भारताच्या संविधानाच्या निर्मितीवरील एक टीव्ही लघु-मालिका ‘संविधान’ मध्ये बाबासाहेब आंबेडकरांची प्रमुख भूमिका सचिन खेडेकर यांनी केली होती. अरविंद गौर यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि राजेशकुमार यांनी लिहिलेल्या आंबेडकर आणि गांधी नाटकात या दोन मान्यवर व्यक्तिमत्त्वांचा शोध घेतला.
भीमयाना : एक्सपीरियन्सेस ऑफ अनटचेबिलिटी (भीमयान : अस्पृश्यतेचे अनुभव) हे आंबेडकरांचे ग्राफिक चरित्र आहे, ज्याला परधन-गोंड कलाकार, दुर्गाबाई व्याम, सुभाष व्याम, आणि लेखक श्रीविज्ञान नटराजन आणि एस आनंद यांनी बनवले आहे. या पुस्तकात आंबेडकरांचे लहानपणापासून प्रौढत्वापर्यंतच्या अस्पृश्यतेच्या अनुभवांना दर्शवण्यात आले आहे. सीएनएनने त्यास शीर्ष ५ राजकीय कॉमिक पुस्तकांपैकी एक म्हटले आहे.
लखनौ मधील आंबेडकर स्मारक त्यांच्या स्मृतींना समर्पित आहे. येथील चैत्यामध्ये त्यांचे जीवनचरित्र दाखवणारी स्मारके आहेत.
गूगलने १४ डिसेंबर २०१५ रोजी मुख्यपृष्ठ डुडलच्या माध्यमातून आंबेडकरांचा १२४ वा वाढदिवस साजरा केला. हे डुडल भारत, अर्जेंटिना, चिली, आयर्लंड, पेरू, पोलंड, स्वीडन आणि युनायटेड किंग्डममध्ये चित्रित करण्यात आले होते.
आंबेडकर प्रतीके
अनेक गोष्टीं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतीके बनलेल्या आहेत, त्यापैकी काही खालिलप्रमाणे :-
भीम ध्वज
हा बाबासाहेबांचा अशोकचक्र चिन्हांकित निळा ध्वज भारतातील बौद्ध व दलित आंदोलनात आंबेडकरवाद्यांद्वारे नियमित वापण्यात येतो. या ध्वजाचा रंग निळा असून तो समतेचे व त्यागाचे प्रतिक मानला जातो. बाबासाहेब हे समतेचे पुरस्कर्ते होते. या ध्वजावर सम्राट अशोकांचे पांढऱ्या रंगात बौद्ध धम्मचक्राचा एक रूप असलेले अशोकचक्र असते. बहुतांश वेळा या ध्वजावर ‘जय भीम’ असे शब्द लिहिलेले असतात. हा ध्वज भारतीय बौद्धांचे प्रतिक सुद्धा मानला जातो, बौद्ध विहार किंवा बौद्ध मंदिरसमोर हा ध्वज पंचशील बौद्ध ध्वजांसह उभा केलेला असतो. दलित आणि बौद्धांच्या घराच्या छतावरही हा ध्वज लावला जातो. डॉ. आंबेडकर व बौद्ध धर्मासंबंधीच्या अनेक ठिकाणी हा ध्वज स्थित असतो. भारताबाहेर विदेशात हा ध्वज तेथील आंबेडकरवादी लोक वापरत असतात. आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन, शिवजयंती, मनुस्मृती दहन दिन आदी उत्सवाच्या वेळी या ध्वजाचा वापर होत असतो. भारतीय रिपब्लिकन पक्ष या राजकीय पक्षाच्या सर्व गटांत हा ध्वज पक्षचिन्ह आहे.
नवयान
नवयान बौद्ध धम्म हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महत्त्वाचे प्रतिक आहे. नवयानचे स्थापना डॉ. आंबेडकरांनी केली आहे. भारतातील कोट्यवधी शोषित, पिडित दलित जनतेच्या धार्मिक गुलामीच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी डॉ. आंबेडकरांना त्यांना या नवयान बौद्ध धम्माची दीक्षा दिली. नवयान हा शुद्ध स्वरूपाचा नवीन बौद्ध धम्म (नवबौद्ध धर्म) होता, ज्यात अंधश्रद्धा, जातियता यांना थारा नव्हती. हा नवा बौद्ध संप्रदाय महायान, थेरवाद व वज्रयान या बौद्ध संप्रदायांपेक्षा भिन्न स्वरूपाचा आहे.
आंबेडकर जयंती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन (जयंती) हा भारतासह संपूर्ण जगात साजरा केला जातो. जगातील ६५ पेक्षा अधिक देश दरवर्षी आंबेडकर जयंती साजरी करतात. महाराष्ट्र सरकारने १४ एप्रिल २०१७ पासून आंबेडकर जयंती ही ज्ञान दिवस म्हणून महाराष्ट्र राज्यात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली जयंती सदाशिव रणपिसे यांनी १४ एप्रिल १९२८ रोजी पुण्यात साजरी केली. रणपिसे हे आंबेडकरांचे अनुयायी होते. त्यांनी बाबासाहेबांच्या जयंतीची प्रथा सुरू केली आणि भीम जयंतीचे औचित्य साधत बाबासाहेबांची प्रतिमा हत्तीच्या अंबारीत ठेवून रथातून, उंटावरून अनेक मिरवणुका काढल्या होत्या.