पंढरी नगरीं नांदतो श्रीहरी । गाई वळित्या करी गोपाळपुरीं ॥ १ ॥

गोपाळ मिळाले गोपाळपुर झालें । अक्षयीं राहिले देव तेथें ॥ २ ॥

संध्या जेथें केली संध्यावळी झाली । प्रतिमा ठेवली स्थळोस्थळीं ॥ ३ ॥

चरण ठेविले पद्मतीर्थ झालें । अक्षयीं राहिलें तेव्हां तेथें ॥ ४ ॥

वेणु वाजवीत चंद्रभागीं आले । वेणुनाद झाले अखंडित ॥ ५ ॥

पंढरी हें स्थळ वैकुंठ सकळ । साधु हो निर्मळ आहे तेथें ॥ ६ ॥

कोटि लिंग आहे कोरटींत पाहें । चक्रोसी राहे देव सर्व ॥ ७ ॥

व्रत एकादशी करिती नेमेसी । पापी चांडाळांशी उद्धरती ॥ ८ ॥

पंढरी द्वारका भूमिका निर्मळ । साधु हो दयाळ आहे तेथें ॥ ९ ॥

राम लक्ष्मण सीता संतजणाची । हवेलींत पूर्ण अक्षयीं तो ॥ १० ॥

अखंडित वाचेते उच्चार नामाचा । सेवक संतांचा नरहरिदास ॥ ११ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel