एका अनामिक लेखकाने इंग्रजीत लिहिलेली गोष्ट मनाला भावली. म्हणून आपल्या मराठी बांधवांसाठी तिचा स्वैर अनुवाद करून सादर करीत आहे.
            - मंगेश जांबोटकर
              9322656923

-----------------------------------

एकदा एक तरुण उद्योगपती त्याच्या नवीन आलिशान कारमधून तुफान वेगाने जात असताना अचानक त्याच्या कारच्या दरवाज्यावर एक मोठा दगड जोरात आदळला. तो भडकला.  त्याने लगेच ब्रेक मारला, गाडी थांबवली आणि कार मागे घेऊन दगड जिथून आला होता तिथपर्यंत गेला.

संतापाने झटकन गाडीतून उतरला. तिथे त्याला एक लहान मुलगा दिसला. रागारागाने तो त्याच्याकडे गेला त्याला पकडून, भिंतीवर दाबून धरले आणि विचारले,
"काय रे, हे तू काय करतो आहेस? दगड मारलास. माझी नवीन कार किती महागडी आहे तुला कल्पना तरी आहे का ? मला आता दुरुस्तीसाठी किती पैसे लागतील माहित आहे का ?"

 तो मुलगा ओशाळून म्हणाला,
"मला माफ करा. मी काय करू? मी किती जणांना थांबण्यासाठी विनंती केली पण कोणीच थांबले नाही.  काय करावे मलाच कळेना. म्हणून मी तुमच्या कारवर दगड मारला."

त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. त्याचे गाल ओलेचिंब झाले होते.त्याने जवळच उभ्या असलेल्या कारकडे बोट दाखवले आणि रडत रडत संगितले,
 " माझा मोठा भाऊ तिथे त्याच्या चाकाच्या खुर्चीतून खाली पडला आहे. त्याचे वजन जास्त आहे. मला त्याला उचलून चाकाच्या खुर्चीत बसवायला जमत नाहीये. कृपा करून मदत करा. त्याला उचलून त्याच्या चाकाच्या खुर्चीत बसवाल का? "

तेव्हा त्या तरुण उद्योगपतीला भावना आवरणे कठीण झाले. तो धावतच गेला आणि त्या खाली पडलेल्या त्याच्या भावाला उचलून त्याने त्या चाकाच्या खुर्चीत ठेवले. त्याच्या खरचटलेल्या हाताला आपला रुमाल बांधला. त्या छोट्या मुलाच्या गालावरचे अश्रू पुसले.
 
मुलाने आभार मानतांना म्हटले,
 " तुम्ही देवासारखे धावून आला आणि माझी मदत केलीत. देव तुमचे भले करो. तुमचा मी आभारी आहे"

 आपला भाऊ खुर्चीवर बसलेला पाहून त्या छोट्या मुलाचा चेहरा आनंदाने फुलला.

तो मजेत खुर्ची ढकलत त्याच्या भावाला घेऊन घराकडे निघाला
आणि
तो अनोळखी उद्योगपतीही  जड पावलांनी आपल्या गाडीकडे परतला आणि मार्गस्थ झाला.

त्या उद्योगपतीच्या कारच्या दरवाज्याला आलेला मोठा पोचा लोकांचे लक्ष वेधीत होता.
तरीही त्याने तो तसाच ठेवला. कधीही दुरुस्त केला नाही.

केवळ या प्रसंगाने त्याने शिकलेल्या धड्याची कायम आठवण राहण्यासाठी !

तो असा....

" जीवनात कधीही इतक्या वेगाने धावू नकोस की तुला थांबवण्यासाठी कुणाला दगड मारून तुझे लक्ष वेधावे लागेल."

 या गोष्टीचा संदर्भ आजच्या युगात लावायचा तर......

- तो कार चालविणारा उद्योगपती म्हणजे आपणच सारे

- ती महागडी आलिशान कार म्हणजे आपले आजचे वेगवान जीवन आणि जीवन शैली

- त्या चाकाच्या खुर्चीत बसलेला मुलगा म्हणजे आपले पर्यावरण आणि पृथ्वी .... जिच्या शोषणामुळे होणाऱ्या जखमा सोसत असलेली

आणि

- तो दगड म्हणजे आजचा... कोरोना विषाणू जो निसर्गाने आपले लक्ष वेधून घेण्यासाठी आपल्यावर भिरकावलेला आहे.

 म्हणून ....

 भूतलावरील सर्वच प्राणिमात्रांच्या सुखमय सहजीवनासाठी संवेदनशीलता ठेवली पाहिजे,

आपल्या जीवनाच्या वेगावर लक्ष ठेवायला हवे,

जीवनातील आपल्या प्राधान्यक्रमांचाही विचार करायला हवा.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel