फक्त घरी बसा! तेवढं पुरेसं आहे. हेच आवाहन सध्या जगभर प्रत्येक आरोग्य संस्था, शासन लोकाना करीत आहेत. पण आश्चर्य म्हणजे जगभर लोकांना ह्याचं महत्वच समजत नाहीय. हे सगळं होत असताना ह्याबाबतीत ३५० वर्षांपूर्वी घडलेली एक विलक्षण घटना आठवते, आणि आज त्या घटनेपासून आपण योग्य तो धडा घेणं खूप गरजेचं आहे. Ringa Ringa Roses… ह्या बडबडगीताची पार्श्वभूमी असलेली ही अद्भुत घटना आहे तरी नेमकी काय?

Ringa Ringa Roses
Pocket full of Posies
Hushaih Bushaih
We all fall down..!*

हे गाणं गात फेर धरून नाचणे हा खेळ आपल्यापैकी अनेकांनी लहानपणी खेळला असेल. हे गाणं बडबडगीत म्हणून जगभर प्रसिद्ध असलं तरी हे मूळ गाणं बडबडगीत नसून एक शोकांतिका आहे, आणि ती घटना आजच्या परिस्थितीमध्ये जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. ह्याचं कारण म्हणजे ती घटना घडली तेंव्हा देखील आजच्यासारखीच परिस्थिति निर्माण झाली होती.

इसवी सन १६६५! इंग्लंडमध्ये ब्युबोनीक प्लेगची साथ आली होती आणि त्यांचं राजधानीचं शहर लंडन हे त्या साथीच्या झपाट्यात आलं होतं. तब्बल १० लाख बळी गेले होते तेंव्हा. प्लेगवर औषध तर सोडाच तो नेमका कशामुळे होतो हे देखील लोकांना माहिती नव्हतं, त्यामुळे सगळं ख्रिस्ताच्या भरवशावर चाललं होतं. सुदैवाची बाब म्हणजे त्यांचं दुसर मुख्य शहर मँचेस्टर हे अजून बऱ्यापैकी सुरक्षित होतं. लंडन इतकी भीषण परिस्थिति तिथे नव्हती त्यामुळे अजून तरी तिथे धोका नव्हता. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर लंडन पासून १४० मैलावर पण मँचेस्टरपासून जवळ ९०० इतकी लोकसंख्या असलेलं एक खेड होतं, Eyam नावाचं. ह्या खेड्यात एका शिंप्याकडे *लंडनहून काही धागे आले होते. आले तेंव्हा ते थोडेसे ओलसर होते म्हणून त्याच्या नोकराने ते वाळवण्यासाठी घेतले आणि प्लेगच्या जिवाणूंना एक नवीन शरीर मिळालं. त्या धाग्यांमार्फत Eyam मध्ये प्लेगने प्रवेश केला. बघता बघता त्या खेड्यातली परिस्थिति भीषण झाली आणि अनेक कुटुंब तिथून निघून गेली. काही दिवसांपूर्वीच त्या गावात नवीन सरपंचाची नेमणूक झाली होती. फक्त २७ वर्षे वयाच्या त्या सरपंचाविषयी गावातल्या लोकांचं मत काही चांगलं नव्हतं. मुख्यत्वे सधन कुटुंब गावातून निघून गेली होती आणि आता फक्त ३५० इतकीच काय ती लोकसंख्या शिल्लक राहिली होती. उरलेल्या लोकांपैकी बरेचसे अगदी गरीब वगैरे होते. त्यांच्याकडे पैसे देखील नव्हते. कुठे जायचं म्हटलं तरी ते शक्य नव्हतं. इकडे आड तिकडे विहीर अशा परिस्थितीत त्या सरपंचाच्या लक्षात एक गोष्ट आली, ती म्हणजे गांव सोडून जाणारं प्रत्येक कुटुंब हे सोबत प्लेग घेऊन जातं आहे,आणि त्यांना जवळ होतं ते मॅन्चेस्टर! आजूबाजूच्या इतर गावात प्लेग अजून आला नव्हता. त्यामुळे Eyam हाच एक स्रोत होता प्लेगचा. त्याने एक धाडसी निर्णय घेतला,सर्वांनी गावातच राहण्याचा. अगदी प्लेग झाला तरी सुद्धा. तो काही डॉक्टर नव्हता. पण इतरांसारखं त्याला इतकंच माहिती होतं की प्लेग हा रोग्याच्या संपर्कात आल्यामुळे पसरतो. आधी लोक घाबरले पण त्याने लोकाना समजावलं की हे किती गरजेचं आहे. आपल्या सर्वांचं विलगीकरण झालं तरच हा रोग आटोक्यात येऊ शकतो. देशासाठी आपल्याला हे बलिदान द्यावंच लागेल. लोक तयार झाले आणि मग सुरू झाली एक लढाई जी १४ महिने चालली आणि २० वर्षांचा गावातला शेवटचा मुलगा जेव्हा प्लेगमुळे मृत्युमुखी पडला, तेव्हाच संपली. गावातील कोणीही शेवटपर्यंत गांव सोडून गेलं नाही. ह्या १४ महिन्यात काय झालं, त्याच्या नोंदी ह्या सरपंचाने आणि त्याच्या बायकोने आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवल्या आहेत.

गावातल्या निरोगी लोकांमध्ये प्लेग पसरू नये म्हणून त्यांनी प्लेगमुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांना त्यांच्या घराच्या अंगणात किंवा परसामध्ये पुरत असत. त्यांच्या अंत्यविधीला कोणीही येत नसे. इतर लोक दुरून ते बघत असत. ह्यातली एक मन सुन्न करणारी घटना म्हणजे एलिझाबेथ नावाच्या एका स्त्रीवर एकाच आठवड्यात नवरा आणि तिची सहा मुलं ह्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली, आणि तिने एकटीने ते सगळं केलं. ह्या ७ जणांची थडगी आजही एका दगडी गोलाकार जागेत गावाच्या स्मशानापासून दूर पाहायला मिळतात. आजूबाजूच्या गावातील लोकांनी Eyam वासीयांना शक्य ती सर्व मदत केली. पण शेवटी गावातील २६० लोक प्लेगला बळी पडले, आणि ८३ लोकांचे प्राण वाचले. ह्या घटनेचं वर्णन एका कवितेत खूप दिवसांनंतर आलं ती कविता म्हणजेच हे बडबडगीत होय. मूळ गीत असं आहे..
Ring-a-ring of rosies
Pocketful of posies
Achoo! Achoo!
We all fall down.

ह्यातल्या प्रत्येक शब्दाला अर्थ आहे rosies म्हणजे प्लेगमुळे रोग्याच्या छातीवर आलेले व्रण तर posies चा अर्थ होतो की लहान फुलांचा गुच्छ ज्यामुळे प्लेगला कारणीभूत असणाऱ्या वाईट शक्ति दूर जातात. Achoo हा प्लेगमुळे येणाऱ्या सर्दी सदृश्य लक्षणांचा आवाज. शेवटची ओळ अर्थात सर्वजण मृत्युमुखी पडले आहेत. पण कालांतराने हे गाणं बडबडगीत म्हणून जगभर प्रसिद्ध झालं आणि त्यात काही बदल देखील झाले.

असं असलं तरी Eyam च्या लोकांनी quarantine ही संकल्पना यशस्वी करून दाखवली. त्यांच्या दुर्दैवाने बहुतेक लोकांना वैद्यकीय मदत मिळाली नाही. पण त्यांच्या ह्या कृत्याने प्लेग नियंत्रणात आला, इतकं नक्की सांगता येतं. त्या गावात आज तिथे प्रत्येक घरात एक संग्रहालय आहे आणि ही घटना जपून ठेवली आहे. आज वैद्यकीय क्षेत्र त्या काळापेक्षा कितीतरी पटीने प्रगत झालं आहे. आपल्याला हवी ती मदत मिळू शकते, फक्त गरज आहे ती Eyam च्या लोकांनी बनवलेल्या वाटेवर चालण्याची!

मुळात Quarantine ही संकल्पना १४ व्या शतकात इटलीत जन्माला आली आणि आज त्यांनाच त्याची सगळ्यात जास्त गरज *आहे. त्याकाळी व्हेनिस शहरातून येणाऱ्या मालवाहू जहाजांसोबत प्लेग येतो ह्या समजुतीने ही जहाजं ४० दिवस किनाऱ्यावरच थांबवून ठेवत. त्यानंतरच त्यातला माल आणि इतर लोकांना उतरण्याची परवानगी असे.

तसेच lockdown ही संकल्पना १९१० मधली. चीनचा एक *डॉक्टर Wu-Lien-Teh *(हे नाव मराठीत लिहिणं कठीण आहे) ह्याने प्रथम राबवली. हा मलेशियात असताना तिथे देखील प्लेगमुळे लोक हैराण झाले होते. त्यावेळेस ह्या डॉक्टरने Harbin ह्या शहराचा संपर्क इतर जगाशी तोडून टाकला. रशिया आणि जपान इथे जाणारी संपूर्ण वाहतूक थांबवली. त्यामुळे प्लेग आटोक्यात आला. आज ही संकल्पना चीनने यशस्वीपणे राबवली आहे. इतर देश देखील ह्या काळात आपापली शहरं lockdown करीत आहेत.

ह्या दोन घटना अतिशय महत्वाच्या आहेत. इतिहास अशा प्रकारे शिकवत असतो. Social Distancing, quarantine ह्याची आज तीव्रतेने गरज आहे. Eyam चा धडा त्यासाठीच महत्वाचा आहे. कधी कधी भूतकाळातच महत्वाचे दुवे सापडतात. ज्यांनी आपलं भविष्य आधीच सुरक्षित केलेलं असतं. गरज असते ती फक्त डोळसपणे भूतकाळात डोकावण्याची.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel