ह्या २१ दिवसांच्या लाॅकडाऊन च्या निमित्तानं मला पुर्वीच्या ब्लॅक ॲंड व्हाईट जमान्यात दूरदर्शनवर एक कथासागर नावाची मालिका लागायची त्याची आठवण आली. त्यात जगातल्या गाजलेल्या गोष्टींचं दूरदर्शन रुपांतर दाखवायचे. त्यातच दाखवलेल्या एका गोष्टीत काही मित्र पार्टी करत असताना एका तत्कालीन गुन्हेगाराला २० वर्ष झालेल्या कैदेच्या शिक्षेवर चर्चेला तोंट फुटतं तेव्हा एक मित्र सोडता बाकी सर्वांना २० वर्ष एका खोलीत बंदिस्त राहण्याची शिक्षा अघोरी वाटते. पण त्या एका मित्राला मात्र ह्या शिक्षेतही संधी दिसुन येते. तो म्हणतो असा एकांत आपण कधीच आयुष्यात अनुभवणार नाही! वादावादात पैज लागते. तो मित्र एका खोलीत स्वत:ला २० वर्ष बंद करुन घ्यायला तयार होतो. पैजेच्या अटी अशा की त्या खोली चा दरवाजा फक्त आतुनच बंद असेल व जेव्हा वाटेल तेव्हा तो मित्र दरवाजा ऊघडुन बाहेर येऊ शकेल आणी अर्थातच तो बाहेर आला की पैज हरला! त्याल जे काही हवं असेल ते त्याने कागदावर लिहुन दरवाज्या खालच्या फटीतुन बाहेर सरकवायचा व बाकीच्या मित्रांनी ती त्याची ईच्छा पूर्ण करायची. २० वर्ष जर हा मित्र खोलीतच राहीला तर त्याला एक ठरलेली भली मोठी रक्कम बक्षीस म्हणुन मिळेल! दिवस ठरतो व तो मित्र खोलीत बंद होतो. रोज कागदाची चिठ्ठी बाहेर यायची व त्यानुसार वेगवेगळे खायचे पदार्थ, पुस्तकं त्याला पुरवण्यात येऊ लागली. दिवसांपाठोपाठ दिवस जाऊ लागले तसे चिठ्ठीतील यादीत पुस्तकांच्या नावांचाच अधिक भरणा दिसु लागला.
बाकीचे मित्र वरचेवर भेटतच होते. सुरुवाती सुरुवातीला सर्वांचाच सूर असा होता की मित्राचा ऊत्साह काही फार दिवस टिकणार नाही. पण जसजसा शेवटचा दिवस जवळ येऊ लागला तस तसं बाहेरच्या मित्रांचं धाबं दणाणायला लागलं. आपला हा मित्र तर खरोखर जिंकणार असं दिसायला लागलंय! आता कबुल केलेली एवढी मोठी रक्कम त्याला द्यावीच लागणार! जड अंत:करणाने मित्रांनी पैशांची जमवजमव सुरु केली.
ठरलेला दिवस अगदी ऊद्यावर येऊन ठेपला. आता ऊद्या सकाळी ९:०० वाजता दरवाजा ऊघडणार आणी मित्राला ती ठरलेली भली मोठी रक्कम द्यावी लागणार ह्या विचारांनी मित्रांची झोपच उडाली. न रहावल्याने पहाटे चार च्या सुमारास दोन मित्र त्या खोलीजवळ आले आणी पहातात तर काय? खोलीचा दरवाजा चक्क उघडा होता! त्यांचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना! जवळ जाऊन त्यांनी खात्री केली की खरोखरच दरवाजा उघडा आहे. हळुच दरवाजा ढकलुन पाहीला तर खोली रिकामी! त्यांचा मित्र खोलीत नव्हता! हे पाहताच प्रथम दोन्ही मित्रांना अतीशय आनंद झाला की आता मित्राला पैजेची रक्कम द्यायची गरज नाही. मित्र पैज चक्क हरला होता!
आनंदाचा भर ओसरल्यावर दोघांना प्रश्न पडला की असं काय झालं की आपल्या मित्राने २० वर्षांनंतर जिंकत आलेली पैज अशी काही तास आधी सोडली? खोलीत शिरल्यावर दोघांनाही खोलीभर पसरलेली अगणीत पुस्तकं व कागदांवर काढलेली बरीचशी टिपणं दिसली.त्यातच मित्रने लिहीलेली एक चिठ्ठीही त्यांना सापडली
" मित्रांनो, काही तासांतच आपली २० वर्षांपुर्वी लावलेली पैज संपतेय. सहाजीकच तुम्हाला आश्चर्य वाटेल की ही एवढी मोठी पैज मी जिंकत आलो असताना काही तासांआधी का सोडली?
पैजेच्या पहिल्या दिवशी मला पैजेच्या रक्कमेचं खूप आकर्षण होतंच. पण जसजसा मी वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं वाचत गेलो, त्यावर विचार करत गेलो तसतसं मला ह्या जगाकडे आणी स्वत:कडे पाहण्याचा वेगळा द्रुष्टीकोण असु शकतो हे जाणवलं आणी पैजेच्या रक्कमेपेक्षाही खूप काही मला मिळालंय हेही जाणवत राहीलं. गेली २० वर्ष न कंटाळता मी जे काही मागत होतो ते सर्व मला तुम्ही पुरवत गेलात. २० वर्ष बाहेरील जगात घडणार्या बर्या वाईट गोष्टींची कोणतीही झळ न बसु देता मला अंतर्मुख होण्याची संधी दिलीत, मला जगातील अजरामर साहित्य बसल्याजागी विना व्यत्यय वाचायला दिलीत ह्याची किंमत मी कशी तुम्हाला परत करु शकेन? हा सर्व ज्ञानखजिना मला तुम्ही भरभरुन दिलात त्याची एक छोटीशी पावती म्हणुन ही पैजेची रक्कम समजावी. शतश: धन्यवाद" चिठ्ठी वाचल्यावर खूप वेळ मित्र काहीच बोलले नाहीत. प्रत्येकजण एकाच विचारात होते. आपण पैज नक्की जिंकलो की हरलो?"
— संदर्भ: कथासागर दूरदर्शन