माझे मनोगत मी जाणीवपूर्वक कादंबरीच्या शेवटी व्यक्त करत आहे कारण वाचकांना ही कादंबरी वाचल्यानंतरच काही गोष्टींचा उलगडा होईल ज्याबद्दल मी येथे लिहिले आहे आणि कथेआधीच त्याबद्दल चर्चा करून मला माझ्या प्रिय वाचकांचा रसभंग करायचा नव्हता. माझी यापूर्वीची "वलय" ही सिनेटीव्ही क्षेत्रावर आधारित कादंबरी 27 फेब्रुवारी 2018 ला प्रकाशित झाली होती त्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर "डिटेक्टिव्ह निगेटिव्ह" ही कादंबरी आली आहे. वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि ऑफिसच्या कामाचा व्याप सांभाळून ही कादंबरी मी लिहिली असल्याने लिहायला जवळपास एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लागला. काही महिने फक्त कादंबरीची रूपरेषा आणि विषय ठरवण्यात गेले तसेच संबंधित वैज्ञानिक माहितीबद्दल संशोधन करण्यात गेले.

 

लहानपणापासून अनेक सायन्स, सुपरहिरो, फँटसी आणि डिटेक्टिव्ह कथा/कॉमिक्स वाचून मी मोठा झालो. जसे फँटम, स्पायडरमॅन, हिमॅन, सॅमसन, नागराज, फौलादी सिंग, तसेच लोकमत कॉमिक्स मधला एक डिटेक्टिव्ह (बहुतेक त्याचे नाव ढंपू होते), व्योमकेश बक्षी, एक शून्य शून्य, परमवीर, कमांडर, विक्रम वेताळ, सिंहासन बत्तीशी, अल्लादिन, गुल बकावली, रॉबिन हूड, परीकथा, तसेच आपले महान ग्रंथ रामायण, महाभारत आणि इतर फँटसी कथा. या सर्व मला काहीतरी नवीन अद्भुत पात्रनिर्मिती करण्यासाठी नेहमी खुणावत होत्या पण कधी वेळेचे गणित जमत नव्हते तर कधी मनासारखे पात्र जन्म घेत नव्हते.

 

मग माझ्या मनात आले की असा एक डिटेक्टिव्ह आपण निर्माण करू ज्याच्याजवळ सुपरपॉवर पण असतील, नंतर एखादा पॉवरफुल व्हिलन घेऊ आणि त्याला सायन्स, फँटसी आणि थरारक कथेची जोड देऊ ज्याद्वारे मनोरंजनासोबतच एखादा चांगला संदेश पण दिला जाईल. तसेच यानिमित्ताने मला काही अस्सल मराठी दमदार सुपरहिरो निर्माण करता आले याचे समाधान आहे ते काही औरच! यातील सुपर हिरोंच्या टीम मध्ये शेवटी शेवटी मी माझ्याच पूर्वीच्या "जलजीवा" नावाच्या एका सायन्स फिक्शन कादंबरीतील सुपरहिरो जलजीवांना पण बोलावले आहे. यापूर्वी बहुतेकांनी जलजीवा कादंबरी वाचली असेलच.

 

दरम्यान 2008 साली शास्त्रज्ञांनी युरोपातील CERN प्रयोगशाळेत "बिग बँग थियरी" वर सुरु केलेल्या प्रयोगाने मला भुरळ घातली होती. तो प्रयोग 2010 साली यशस्वी झाला होता. तेव्हापासूनच त्यातून प्रेरणा घेऊन आणि आणखी थोडी कल्पनाशक्ती वापरून या कादंबरीचा विषय माझ्या मनात घोळत होता. पण कल्पनेला मूर्तरूप येऊन पुरता योग जुळायला आणि त्याचे रूपांतर कादंबरीत व्हायला अनेक वर्षे जावी लागली. यात मी अनेक वैज्ञानिक संकल्पना वापरल्या आहेत. काही खऱ्या तर काही काल्पनिक आहेत. पण आज ज्या वैज्ञानिक संकल्पना काल्पनिक वाटत आहेत त्या कदाचित भविष्यात सत्यात उतरतीलही!!

 

ही कादंबरी लिहितांना आणि लिहून झाल्यावर, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे ज्या सर्वांची मला मदत झाली आहे त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. प्रकाशनापूर्वी ज्यांनी ही कादंबरी वाचून मला त्याबद्दल अभिप्राय दिले किंवा काही चुका लक्षात आणून दिल्या त्या सर्वांचे खूप आभार! या कादंबरीच्या प्रकाशकांचे मी मनापासून आभार मानतो.

 

ही कादंबरी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. आपल्या प्रतिक्रियांची मी वाट बघत आहे.

 

आपला: निमिष सोनार, पुणे

ईमेल: sonar.nimish@gmail.com

व्हाट्सएप/कॉल: +91-8805042502

(सप्टेंबर 2020)

 

 

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Nimish Sonar

आता ही कादंबरी ऑडिओ बुक स्वरूपात सुद्धा उपलब्ध आहे: https://youtube.com/playlist?list=PL3b5C5GmPJolxNZzL9dD2Z54T_L--OSX_

Deepa

please continue to write such amazing stories.

Rujuta

वाह। खूप छान कथा आहे। खरोखर विज्ञान आहे ह्या कथेत आणि रोमांच सुद्धा।

Sayali Raje

कथा फार छान जुळून आली आहे , एका बैठकीत सर्व वाचून संपवली. कथानकाचा मूळ नायक हा एका अर्थाने "दिव्यांग" आहे .

Akshar

Nimish has put a lot of efforts into this book. Must read.

Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel