“हो आज मैं उपर, आसमाँ नीचे... आज मैं आगे, जमाना हैं पिछे ss"
ही गाणे सायलीचे सर्वात आवडीचे गाणे झाले होते. कारण निगेटिव्ह मेमरी ऑब्जेक्ट्स डिलीट करणे शक्य झाल्यानंतर ऐकेलेले सकारात्मक गाणे होते ते! त्यामुळे ती अधून मधून हे गाणे गुणगुणायची!
"सायली मॅडम, आसमाँ से नीचे उतर जाओ, पेशंट को होश आया है!", तिची मैत्रीण आणि नर्स असलेल्या सुप्रियाने विनोदाने म्हटले.
"नको तिथे तुझा विनोद वहावत जातो सुप्रिया!", सौम्य रागाने हॉस्पिटलच्या खालच्या मजल्यावर घाईघाईने येता येता सायली म्हणाली.
त्या दिवशी नरिमन पॉईंटला गाडीतील स्फोटात रणजित आणि सोबत असलेले बाकी इतर सर्वजण यांचा मृत्यू झाला होता. सुनिलच्या घरातील सर्वजण मानसिक धक्क्यातून अजून सावरले नव्हते. तसेच पोलीस डिपार्टमेंट सुद्धा हादरून गेले होते.
त्यानंतर दोन दिवस उलटल्यानंतर आज प्रथमच सुनिल शुद्धीवर आला होता. घरचे सर्वजण आणि पोलीस डिपार्टमेंट त्याच्या शुद्धीवर येण्याची वाट बघत होते. चिंताग्रस्त होते.
स्फोटातून आलेल्या तीव्र प्रकाशाच्या झोताने त्याच्या डोळ्यांना आणि मागे फेकल्या गेल्याने पाठीला मुका मार लागला होता. डोके मात्र वाचले होते. शरीराच्या प्रतिक्षिप्त क्रियेमुळे स्फोटाच्या वेळेस सुनिलने स्वत:चा हात डोळ्यासमोर धरला होता, त्यामुळे जास्त काही इजा डोळ्यांना झाली नव्हती. पण अजूनही त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली होती. तो हॉस्पिटलमध्ये बेडवर होता. शुद्धीवर येताच त्याला डोळ्यासमोर अंधार जाणवला आणि स्फोटाचा आवाज, वर उडणारी गाडी आणि स्फोटाने पोलिसांचे हवेत उडणारे देह, आगीचे आणि धुराचे लोट आठवायला लागले आणि त्यात एक आवाज ऐकू येत होता: "ते लोकं वाईट आहेत, त्यांचे वाईट हाल होतील! वाईट लोकं येतील आणि वाईट लोकांना मारतील!"
एकदम हे सगळे असह्य झाल्याने तो बेडवरून उठून बसू लागला पण शरीराला लावलेल्या वेगवेगळ्या उपकरणांमुळे त्याला ते शक्य झाले नाही आणि सायलीने त्याचा हात धरून त्याला पुन्हा बेडवर झोपवले आणि नर्स सोबत बोलू लागली.
थोड्या वेळाने त्याच्या डोळ्यावरची पट्टी काढण्यात आली. तेव्हा सुनिलच्या लक्षात आले की हातावर घड्याळ नाही! हे लक्षात येताच त्याने अस्वस्थ होऊन इकडेतिकडे पाहिले तेव्हा समोरच्या टेबलावर त्याचे घड्याळ ठेवलेले त्याला दिसले तेव्हा त्याचा जीव भांड्यात पडला आणि पटकन ते घड्याळ त्याने हाताला बांधले. एवढ्या सगळ्या घटनेत ते घड्याळ हरवले असते तर? विचारही करवत नाही काय झाले असते!! विशेष म्हणजे घड्याळाला काहीही झाले नव्हते! काचेला तडासुध्दा गेला नव्हता.
"र र रणजित मामा कुठे आहेत?",त्याने अंग दुखत असल्याने थोड्या घाबऱ्या, कापऱ्या आणि अस्वस्थ आवाजात विचारले.
शांतता!
पोलीस आयटी सेक्शनमधल्या सारंग दातेला आणि राघव यांना चूप बसण्याची खूण करत सायलीने त्यांना बाजूला नेले.
'थोडे थांबूया आपण. त्यांना लगेच सगळे सांगू नये. तब्येत सुधारतेय त्यांची आता. पण त्यांना लगेच रणजित यांच्या मृत्यूबद्दल सांगितले तर ताण येईल!', सायलीने समजावणीच्या सुरात दोघांना सांगितले.
सारंग पोलिस डिपार्टमेटमध्ये फोन करू लागला आणि राघव यांनी घरी इतरांना कळवले की सुनिल शुद्धीवर आलेला आहे.
"डॉक्टर सायली अगदी घरच्या सदस्यासारखी काळजी घेत आहेत आपल्या सुनिलची! त्याचमुळे तो लवकर बरा झाला असे म्हणायला हरकत नाही!", राघव यांनी राधाला फोनवर सांगितले.
सुनिलला हॉस्पिटलमध्ये आणले गेले तेव्हापासूनच सायलीला त्याचेकडे बघून एक अनामिक आकर्षण निर्माण झाले होते. जणू काही हा आपला जन्मजन्मांतरीचा साथीदार आहे अशी एक लहर तिच्या हृदयात चमकून गेली. विशेष म्हणजे त्याचे चमकदार रंगीत डोळे सायली सोबतच सर्वांच्या कुतूहलाचा विषय होता. त्या चमकदार डोळ्यांमुळे सुनिलच्या चेहऱ्यात एक वेगळीच मोहकता सायलीला जाणवली. मात्र याच्या अगदी विरुद्ध होते त्याचे शरीर!
जखमांवर उपचार करतांना त्याचे संपूर्ण उघडे शरीर बघितल्यावर तिच्या लक्षात आले होते की मूर्तीकाराने बनवलेल्या अगदी आखीव रेखीव अशा सशक्त मानवाच्या पुतळ्यासारखा तो बनलेला होता. पहिल्याच नजरेत तिचे त्याचेवर प्रेम जडले! पोलिस डिपार्टमेंटकडून त्याच्याबद्दल तिने ऐकले होतेच. जेवढे त्याच्याबद्दल ऐकले तेवढे सगळे तिच्या कायम लक्षात राहिले.
डोळ्यावरची पट्टी काढल्यानंतर जेव्हा सुनिलला सायली दिसली होती तेव्हा तो तिच्याकडे बघतच राहिला होता. सायलीचा चेहरा बघितल्याबरोबर त्याच्या हृदयात एक प्रेमाची लहर उमटू लागली होती. तिच्या कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे असलेल्या दोन्ही रेखीव, काळ्याशार, बोलक्या आणि निष्पाप डोळ्यांकडे बघतच रहावे असे त्याला वाटले. एकमेकांच्या कायम लक्षात राहतील असे दोघांचे डोळे होते. तिच्या एकूणच व्यक्तिमत्वामुळे तो प्रभावित झाला. एकसारखे डोळे रोखून तो तिच्याकडे आणि ती त्याचेकडे बघतच होते. जणू काही अदृश्य चुंबकीय लहरींनी त्यांचे डोळे एकमेकांशी बांधले गेले होते!
सायलीच्या हातांचे नाजूक लांबसडक बोटं, तसेच सायलीच्या व्यक्तिमत्वाचा एकूणच कमालीचा नाजुकपणा त्याला आतापर्यंत जाणवत आला होता. जणू काही हीच समोरची व्यक्ती आपल्यासाठी बनलेली जोडीदार आहे अशी दोघांना अंतर्मनातून जाणीव झाली. "समिधा हे तर केवळ एक तारुण्यातील आकर्षण होते आणि हीच आपल्या जन्माची जोडीदार आहे", असे सुनिलला प्रकर्षाने वाटून गेले. हिनेच तर अगदी मनापासून त्याची सेवा सुश्रुषा केली होती, नाही का?
सुप्रिया खाकरली. सुनिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यापासूनच तिच्या नजरेतून सायलीचे सुनिलबद्दलचे सुप्त आकर्षण सुटले नव्हते!
"डॉक्टर और पेशंट की लव्ह स्टोरी? क्या बात है!", असे म्हणून तिने सायलीला टाळी द्यायला हात पुढे केला, तर दोघेही भानावर आले.
थोड्याच वेळात राघव आणि सारंग आतमध्ये आले. डोळ्यांना काहीही इजा झाली नव्हती ही मुख्य जमेची बाजू होती आणि डोक्यालाही मार लागला नव्हता. पाठ थोडी दुखत होती आणि थोडा शरीराला लागलेला मुका मार ठणकत होता, बाकी तब्येत आता उत्तम होती. दोन दिवसांनी डिस्चार्ज मिळायला आता हरकत नव्हती असे सायलीने सांगितले. हॉस्पिटलचा सगळा खर्च हा पोलीस डिपार्टमेंटतर्फे करण्यात आला होता. सुनिलने एक नवा काळा गॉगल मागवून घेतला. त्या दिवशी त्याचा गॉगल तुटला होता. कालांतराने त्याला नवा गॉगल मिळाला.
दुसऱ्या दिवशी सुनिलला सांगण्यात आले की त्या दिवशीच्या स्फोटात रणजित आणि इतर सर्व सोबतचे पोलीस कर्मचारी मृत्यू पावले. सुनिलला प्रचंड धक्का बसला. रणजित यांनी केवढा मोठा विश्वास टाकला होता त्याच्यावर! आणि मिळालेली नवीन दूरदर्शन शक्ती त्यांना न सांगण्याचा निर्णय घेतल्याचा त्याला आता पश्चाताप झाला. आता त्या शक्तीचा वापर करून त्यांच्या मृत्यूचा छडा लावून दोषींना शिक्षा देणे आणि ते तपास करत असलेल्या प्रकरणाच्या मुळाशी जाणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असणार होती.
रणजित या जगात नसल्याच्या दु:खातून सावरणे आता आवश्यक होते. कारण रणजित यांनी त्या दिवशी जे काही फक्त त्यालाच विश्वासात घेऊन सांगितले होते त्यावर आता लवकर काम करणे आणि त्याचा छडा लावणे अतिआवश्यक झाले होते. नाहीतर अनर्थ होऊ शकणार होता. उद्या सुनिलला डिस्चार्ज मिळणार होता. पण रणजित त्या दिवशी नरिमन पॉईंटला गाडीत बसतांना मला आणखी कोणती महत्वाची गोष्ट सांगणार होते??
"मला सारंगशी महत्वाचे बोलायचे आहे, आताच!", सुनिलने मनाशी एक निश्चय करून सायलीला आग्रह केला.
"आता तुम्ही आराम करा सर!", सायली म्हणाली.
"आराम करायची ही वेळ नाही आहे डॉक्टर! वेळ कमी आहे आणि खूप काही करायचे आहे! सारंगला बोलवा प्लीज!", सुनिल अगतिकतेने सायलीच्या डोळ्यात सरळ सरळ रोखून बघत म्हणाला.
"बरं बोलावते, थांबा!", सायलीने सारंगला बोलावणे पाठवले.
सारंग आल्यावर -
"अर्धा तास फक्त, जास्त ताण नको!", असे म्हणून ती निघून गेली.
आता सारंग आणि सुनिल दोघेच होते.
"सारंग, काही तपास लागला का स्फोट कुणी केला ते?"
"नाही सर! अजून ठोस काही हाती आलं नाही!"
"आणि तो तुरुंगातला गुन्हेगार जग्गू भुसनळ्या? त्याला सोडलं का?"
"नाही, बहुतेक दोन दिवसांनी सोडणार आहेत त्याला तुरुंगातून!"
"आणि लोकांना अनोळखी नंबरवरून येणाऱ्या त्या मेसेजचा काही तपास लागला का?"
"नाही अजून, ते सर्व नंबर्स ओळखण्यात अजूनपर्यंत अपयश आलेलं आहे पण तपास सुरु आहे! आणि हो काल जयवंत जसकर येऊन गेले होते आपल्या डिपार्टमेंटला!"
"ठीक आहे, तू जा आता! उद्या डिस्चार्ज मिळाले की आपल्याला बरीच कामे असतील!"
मग रात्र झाली. एक इंजेक्शन देऊन झाल्यावर सायलीने सुनिलला शांत झोपण्याचा सल्ला दिला आणि ती निघून गेली, जातांना म्हणाली, "मी अकरा वाजेपर्यंत आहे, काही लागलं तर बोलवा!"
रात्री त्याच्याजवळ आई आलेली होती. बाजूच्या बेडवर आईचा डोळा लागला पण सुनिलला झोप येत नव्हती. पडल्या पडल्या दूरदर्शन दृष्टी वापरून जग्गू भुसनळ्या सध्या तुरुंगात काय करतोय ते बघायचे ठरवून त्याने मनातून डोळ्यांना सूचना द्यायला सुरुवात केली. त्याप्रमाणे डोळे आज्ञा पाळून अंतर सरकवत त्याला रस्ता दाखवू लागले.
हॉस्पिटल कॉरिडॉरमधून दृष्टीने पुढे जाता जाता त्याला सायलीच्या रुममध्ये एकदा डोकावून बघण्याची इच्छा झाली. ती टेबलाजवळ खुर्चीवर बसून भराभर काहीतरी लॅपटॉपवर लिहीत होती. तोंडाने काहीतरी म्हणत होती आणि टाईप करत होती. क्षणभर तिच्या ओठांकडे त्याची नजर स्थिर झाली आणि तिच्या गुलाबी ओठांकडें तो बघतच राहिला. तिचा गोड चेहरा आणि एकूणच मोहक शारीरिक हालचाली याकडे त्याची नजर खिळून राहिली. त्यातून सावध झाल्यावर त्याच्या लक्षात आले की ती कुठेच काहीच न बघता तोंडी सर्वकाही लॅपटॉपवर सहज टाईप करते आहे. लॅपटॉपकडे जवळ नजर आणल्यानंतर त्याला दिसले की दिवसभरातील ती हॅण्डल करत असलेल्या सर्व पेशंटच्या केसेसबद्दल आठवून ती सर्व रिपोर्ट्स फाईलमध्ये न बघता आठवून आठवून लिहीत होती. पेशंटच्या तपासणीतून आलेले रिपोर्ट आणि त्यातील रीडिंग, नंबर्स, वेगवेगळ्या औषधांची नावं ती भराभर कुठेही न बघता टाईप करत होती. सुनिलबद्दल माहितीसुध्दा ती न बघता फटाफट लिहीत होती. हे कसं शक्य आहे? बरं असो, ते नंतर बघतो. प्रथम जग्गू काय करतोय ते बघू असा विचार करून सुनिलने आपली दृष्टी बेडवर झोपल्या झोपल्याच दुसरीकडे वळवली. कॉरिडॉरमधून तो पुढे पुढे सरकू लागला. रात्री हॉस्पिटल मध्ये वर्दळ कमी होती. तुरळक हॉस्पिटल स्टाफ इकडून तिकडे जातांना दिसत होता.
एक नर्स इकडे तिकडे बघत बघत संशयास्पदरित्या हातातील रुमालात काहीतरी गुंडाळून सायलीच्या रुमकडे जातांना सुनिलला दिसली. विशेष म्हणजे तिच्या डोळ्याभोवती प्रखर लाल ज्वाळा असलेलं वलय तळपत होतं. म्हणजे हिच्या मनात सायलीसाठी काहीतरी दुष्ट हेतू जरूर असला पाहिजे. आता दृष्टीने नाही तर स्वतःच उठून तिचा पाठलाग केला पाहिजे नाहीतर काहीतरी अघटीत घडेल!!
आईला जाग येणार नाही अशा रीतीने तो हळूच बेडवरून उठला आणि त्या कॉरिडॉरमधून हळूहळू त्या नर्स च्या मागेमागे जाऊ लागला. तिने आपला वेग वाढवला आणि रुमालात गुंडाळलेल्या गोष्टीकडे ती परत परत बघत होती आणि खात्री करून घेत होती. तिने सायलीच्या केबिनला टकटक केली, सायलीने दार उघडले आणि ती मध्ये शिरली. तोपर्यंत सुनिल दरवाज्याच्या मागे बाजूला लपला आणि दृष्टी दरवाजातून आत नेऊन आतले पाहू लागला. ती सायलीच्या ओळखीची नर्स होती.
"मॅडम, ते संध्याकाळी एक मशीन इथे विसरून गेले होते, घ्यायला आले मी!", असे म्हणून ती मशीन शोधण्याचा बहाणा करत अधून मधून संशयास्पदरित्या सायलीकडे आणि हातातल्या रुमालात गुंडाळलेल्या इंजेक्शनकडे ती बघत होती. शोधता शोधता ती थांबली.
"का गं, झालं नाही का मशीन शोधून अजून?", सायलीने लॅपटॉपवर टाईप करता करताच विचारले. नर्स दचकली.
"न न नाही, अजून! शोधते आहे!", असे म्हणून तिने क्षणार्धात हातरुमालाच्या आत लपवलेले एक इंजेक्शन बाहेर काढले आणि सायलीकडे जाऊ लागली. ती नर्स सायलीचा चेहरा एका हाताने मागून पकडून स्वतःकडे करणार आणि एका हाताने तिचे तोंड दोन्ही बाजूनी गालावर दाबून उघडून इंजेक्शनचा स्प्रे तिच्या तोंडात मारणार तितक्यात वेगाने केबिनचा दरवाजा उघडून सुनिल आत गेला आणि त्याने खुर्चीवर बसलेल्या सायलीला जोराचा धक्का दिला. सायली खाली पडली. आणि पळायच्या बेतात असेलल्या नर्सच्या पायात पाय अडकून सायलीच्या अंगावर सुनिल पडला. या प्रकाराने सायली भांबावली आणि तिने सुनिलच्या थोबाडीत ठेऊन दिली. सुनिलला तिच्या नाजूक शरीरावरून उठायला जमते न जमते तोच ती नर्स ते इंजेक्शन घेऊन वेगाने चालत चालत जाऊन दूर असलेल्या एका वॉशरूम मध्ये शिरली.
"सॉरी मी तुम्हाला का ढकलले ते नंतर सांगतो, मला आधी त्या नर्सला पकडण्याच्या सूचना द्यायच्यात!", असे म्हणून सायलीच्या अंगावरून कसाबसा उठून उभा रहात त्याने हॉस्पिटल बाहेर उभ्या असलेल्या पोलिसांना फोन केला ते पटकन आत आले.
काही वेळासाठी हॉस्पिटलमधून बाहेर निघायला कुणालाही परवानगी नाकारण्यात आली. अर्ध्या तासापासूनचे सीसीटीव्ही फुटेज तपासायला सांगण्यात आले. नर्सच्या सगळ्या हालचाली सीसीटीव्ही मध्ये दिसत होत्या पण ती लेडीज बाथरूममध्ये गेल्यानंतर ती बाहेरच आली नसल्याचे स्पष्ट झाले. अनेक वेळा व्हिडीओ प्ले केला गेला पण त्या नर्सचा ठावठिकाणा लागला नाही. नर्सच्या सगळ्या अंतरवस्त्रांसाहित तिने घातलेले इतर कपडे आणि एक दोन दागिने मात्र वॉशरूममध्ये सापडले. ते कपडे ओले झालेले होते कारण तिथला शॉवर सुरू होता.
हा सगळाच प्रकार एकदम गूढ होता.
त्याने पोलिसांना सूचना देऊन तपास करायला सांगितले. वॉशरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने तपासावर मर्यादा येत होत्या.
^^^