सुनिल शाळेत जाऊ लागला. अनिलने आवडीने गॅलरीत पिंजऱ्यात एक पोपट पाळला होता. त्या पोपटाचा लळा घरातील सर्वांनाच लागला होता. त्याचे नाव होते - फिनिक्स!

 

मोठा होईपर्यंत सुनिलच्या बाबतीत विशिष्ट व्यक्तीकडे बघून अचानक कारण नसताना रडायला लागणे असे बरेचदा घडले. काही वेळेस आई-वडिलांना हे अनाकलनीय आणि विचित्र वाटले. मध्यंतरी एकदा त्यांनी संपन्न डॉक्टरला विचारून बघितले की याचा संबंध त्याच्या विशिष्ट प्रकारच्या डोळ्यांशी तर नसेल? तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की त्याची दृष्टी नॉर्मल आहे त्यामुळे  चिंता करण्याचे कारण नाही. सुनिलला सगळे रंग पण व्यवस्थित ओळखता येत होते, शाळेतून सुद्धा तशी काही तक्रार आली नव्हती त्यामुळे रंगांधळेपणा असण्याची शक्यता पण नव्हती. मात्र नेत्रा डॉक्टर सुनिलच्या केस मध्ये बारकाईने लक्ष ठेऊन होती. त्या संदर्भातील प्रत्येक माहिती त्यांना हवी असायची.

 

राघव यांचं बँकेमध्ये आता छान चाललं होतं. बँकेचा परफॉर्मन्स चांगला झाला होता. बँकेचे शेअर सुद्धा वधारले होते. बँकेची कर्ज सुद्धा वेळेवर फेडले जात होती. बँकेत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढली. बाकी किरकोळ वादविवाद संपून आता राघव यांना बँकेत अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. अशातच एकदा बँकेने राघव यांना तसेच इतर अनेक कर्मचाऱ्यांना ज्यांनी गेली दोन वर्षे चांगले काम केले होते त्यांना इन्सेंटिव्ह (प्रोत्साहन) म्हणून ट्रॅव्हल पॅकेज दिले. 

 

त्यानुसार साहसबुद्धे फॅमिली दहा दिवसांच्या टूरवर निघाली. रखमा घरीच थांबली, पोपटाची काळजी आणि गॅलरीतल्या विविध फुलांच्या रोपांना पाणी देण्यासाठी! पॅकेजमध्ये महाबळेश्वर, माथेरान आणि अलिबाग अशी ठिकाणं होती. माथेरानला सनसेट पॉइंट बघून झाल्यानंतर चौघेजण दोन किलोमीटरवर असलेल्या त्यांच्या हॉटेलमध्ये पायी जायला निघाले. सकाळी दोन वेळा घोड्यावरून रपेट मारली गेली असल्यामुळे आता पायी जायचे असे त्यांनी ठरवले.

 

सुनिल आणि अनिल दोघांची आपल्या वयाप्रमाणे मनासारखी खेळणी खरेदी करून झाली होती. राधानेसुद्धा मार्केटमधून बरीचशी खरेदी केली होती. रस्त्यावरची लाल माती, रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले जंगल आणि त्यातून असणारी ही पायवाट असे निसर्गाच्या सान्निध्यात चालताना खूप मजा येत होती आणि आल्हाददायक वाटत होतं. सगळी मुंबईची धावपळ लगबग विसरून गेल्याने शांतता जाणवत होती. मनाला गारवा देत होती. राघवजवळ आता छोटा नोकियाचा साधा मोबाईल आलेला होता. मोबाईल कॉल रेट त्यावेळेस महाग होते!

 

सुनिल आईचे तर अनिल बाबांचे बोट धरून चालत होता. अंधार पडलेला होता. संध्याकाळ झालेली होती. त्या चौघांच्या मागोमाग एक मनुष्याकृती बरंच अंतर राखून संशयास्पदरीत्या पाठलाग करत होती. त्या माणसाच्या मागे बराच अंतर आणि चौघांचे पुढे बरंच अंतर जास्त वर्दळ नव्हती. एखाद-दुसरा घोडेस्वार होता पण त्यांचे अंतर बरेच दूर होते. राधाने खांद्यावर अडकवलेली पर्स त्याला चोरायची होती. पावलांचा किंचितही आवाज तो होऊ देत नव्हता. त्यामुळे कुणाचे तसे लक्षही गेले नाही किंवा कोणाला संशय सुद्धा आला नाही.

 

अचानक काहीतरी वाटून सुनिलने मागे पाहिले आणि त्या माणसाच्या चेहऱ्याकडे एकटक बघून मोठ्याने रडायला सुरुवात केली. काय झाले म्हणून सगळ्यांनी मागे बघितले तर अचानक झालेल्या रडण्याच्या आवाजाने तो माणूस उलट्या दिशेने पळून आजूबाजूच्या जंगलातील झाडाझुडूपांमध्ये उड्या मारत गायब झाला.

 

राघव काळजीने म्हणाले, "अगं कुणीतरी आपला पाठलाग करत होता, बरे झाले सुनिल रडला त्यामुळे तो पळून गेला!"

 

"हो, कदाचित पैशांचे पाकीट किंवा पर्स चोरी करण्याचा त्यांचा इरादा असावा अन्यथा तो असा पळाला नसता", राधा घाबरून म्हणाली.

"होना पप्पा! खरंच, माझा भाऊ खूप हुशार आहे!", अनिल कौतुकाने म्हणाला.

 

"भर गर्दीत मार्केटमध्ये पर्समध्ये काही ठेवताना किंवा काढताना थोडं सांभाळून राहत जा राधा, मी तुला अनेक वेळा सांगितलेलं आहे. लोक नजर ठेवतात आणि माग काढतात. बरं असो! बेटा सुनिल त्या माणसाकडे बघून तू का रडलास?", राघव यांनी सुनिलला विचारले.

 

हळूहळू रडणे थांबत सुनिल म्हणाला, "पप्पा पप्पा त्या माणसाच्या डोक्यावर लाल लाल काहीतरी होते!"

 

आधीच घाबरलेल्या सगळ्यांना अचानक सुनिलने असं विचित्र काहीतरी सांगितल्याने सर्वांच्या अंगावर शहारे आले. लाल लाल म्हणजे रक्त तर नव्हतं? कुणी गुन्हेगार तर नव्हता ना तो? एक ना अनेक कुशंका!

 

सगळे विचारात पडले. पण त्या माणसाच्या डोक्यावर लाल असे काही नव्हते. जरी संध्याकाळ होती तरी तो माणूस पाठमोरा पळताना त्याचं डोकं थोड्यावेळा करता का होईना दिसत होतं. त्यांने डोक्यावर काहीही घातले नव्हते आणि लाल रंगाचे तर नाहीच नाही. रक्त असण्याचीही काही शक्यता नव्हती कारण रक्त असते तर याआधीसुद्धा इतर कुणाच्यातरी नजरेस तो माणूस सहज पडला असता. काहीही असो पण अनर्थ टळला हे बरे झाले.

 

सगळेजण थकले असल्यामुळे लवकर निद्रेच्या अधीन झाले. दुसऱ्या दिवशी पुन्हा भ्रमंती आणि भटकंती होणार होती. लहान वय असले तरीही आपण काहीतरी वेगळे आहोत याची जाणीव सुनिलला होत होती.

 

राघव यांनी त्यांचा रोल असलेला जुना कॅमेरा सोबत आणला होता. अजून बाजारात मोबाईल मध्ये कॅमेरे आलेले नव्हते, असले तरीही फार थोड्या लोकांजवळ ते असायचे कारण ते मोबाईल महाग होते.

 

हॉटेलमधल्या रूमवर कॅमेरात फोटो काढून संपलेला आधीचा रोल काढून नवा रोल टाकतांना सुनिलची चौकस बुद्धी जागृत झाली.

त्याने विचारले, "पप्पा, हे काय आहे?"

"बेटा हा कॅमेरा रोल आहे. हा रोल डेव्हलप करायला द्यायचा. यात आपण काढलेल्या फोटोंचे निगेटिव्ह प्रिंट असतात! ते फोटो धुवावे लागतात मग त्यांचे नंतर फोटो तयार होतात!"

"पण पप्पा निगेटिव्ह म्हणजे काय?"

"अरे, निगेटिव्ह म्हणजे विरूद्ध कलर!"

"विरूध्द म्हणजे?"

"जसे चांगला विरूद्ध वाईट, गोड विरूद्ध तिखट असते तसे रंगांचे पण विरूद्ध रंग असतात जसा हा भिंतीचा पांढरा रंग आहे ना त्याचा विरूद्ध रंग असतो काळा! कळलं का बाळा?"

 

हॉटेल रूममधील टीव्हीवर कार्टून बघता बघता अनिल ब्रेड बटर दूध घेत होता आणि त्याची आई खोलीतले सामान आवरत होती. अनिलचे लक्ष त्या दोघांच्या संभाषणाकडे अधून मधून जात होते.

 

"पण पप्पा, काळ्याचा विरुद्ध रंग पांढराच का असतो? निळा का नाही? आणि गोड विरुद्ध तिखटच का? कडू का नाही? आणि पप्पा मला सांगा फोटो धुतात तर ते खराब नाही का होणार?"

 

एवढे विज्ञान राघव यांना माहिती नव्हते.

ते काही सुनिलला सांगणार एवढ्यात आईच म्हणाली, "अरे बाबांनो बस करा आता. चला पटापट तयारी करा. फिरायला निघायचे आहे. गप्पा नंतर मारा!"

ट्रीपमध्ये पुढे त्यांनी एक प्राणी संग्रहालय बघितले. तेव्हा सुनिलला काही प्राण्यांच्या पिंजऱ्यातून एक विशिष्ट प्रकारचा ध्वनी ऐकू येत होता. प्राणी जे आवाज काढतात त्यापेक्षा तो ध्वनी वेगळाच होता.

सुनिल: "अरे दादा, तो शिंह बघ कसा आवाज करतोय विचित्र! आणि त्याच्या डोक्यातून लाल रंगाचा प्रकाश येतो आहे!"

अनिल: "तो सिंह विचित्र आवाज कशाला करेल ? शांत बसलाय तो! दिसत नाही का? आणि त्याच्या डोक्यावर काहीच लाल रंगाचे नाही आहे!!"

सुनिल: "पण मला तर लाल रंग दिसतो आहे आणि आवाज पण येतो आहे!"

अनिल: "आवाज? कसा?"

सुनिल: "सु SS सु SS असा!"

अनिल: "गप बस रे! उगाच आपलं काहीतरी सांगत असतो! पप्पा! याला सांगा ना, उगाच काहीतरी आवाज येतो आवाज येतो असे सांगत बसतो! मला भीती वाटते! याला तुमच्याकडे घ्या!"

राघव राधा हसू लागले.

राघव: "अरे, तो लहान असून तुला आवाज येतो, आवाज येतो, लाल रंग दिसतो असं सांगून घाबरवतो आणि तूही मोठा असून लगेचच घाबरतोस?"

सुनिल: "नाही पप्पा, खरच सु SS सु SS असा आवाज येतोय! मी दादाला घाबरवत नाहीए!"

राघव: "राधा, त्याला सू लागली असावी बहुतेक, बघ जरा! केव्हाचा सु SS सु SS करतोय!"

आणि मग सर्वजण हसले.

 

ते कुटुंब तिथून निघून गेल्यावर तो सिंह जबडा मोठा करून त्या पिंजऱ्यावर जोरजोरात आपले पंजे मारू लागला होता आणि एक पंजा त्याने पिंजऱ्याच्या गजाबाहेर काढला होता, त्याची नखे फार तीक्ष्ण होती! इतरांचे नाही पण पाठमोरा असतांनाही सुनिलच्या हे पटकन लक्षात आले आणि त्याने मात्र मागे वळून त्या खवळलेल्या सिंहाकडे पाहिले होते. त्या सिंहाचा चिडलेला चेहरा नंतर बरेच दिवस त्याच्या मनातून गेला नव्हता.

 

मात्र त्यानंतर सुनिलने त्याला अनुभवास येत असलेल्या बऱ्याच गोष्टी घरात सांगणे बंद केले. वयाच्या मानाने इतरांपेक्षा त्याला खूप लवकर मॅच्युरीटी येत होती, मनाची परिपक्वता येत होती. त्याची विचारशक्ती खूप तीक्ष्ण होती. वेगवान होती. इतरांपेक्षा वेगळी होती.

 

घरी परतल्यानंतर काही महिन्यानंतर सर्वजण टिव्हीवर कोणतातरी मारधाड एक्शन आणि बदला किंवा सूडकथा सिनेमा बघत होते. त्या पिक्चरमधल्या हिरोला त्याच्याबरोबर पूर्वी घडलेल्या काही वाईट घटना निगेटिव्ह स्वरूपात आठवतात. 

 

"तीन चार जण त्यांच्या घरात घुसून हल्ला करतात, घरात असलेल्या त्याच्या आई वडिल आणि मोठ्या भावावर हल्ला करतात. भावाच्या डोक्यावर सळई मारतात", एवढं आठवून त्या हीरोला असह्य होते, डोक्याला हाताने गच्च दाबून धरतो आणि फ्लॅशबॅकमधून भानावर येतो आणि हा सगळा फ्लॅशबॅक निगेटिव्ह मध्ये दाखवत होते. सुनिलला हा फ्लॅशबॅक आणि वडिलांनी मागे दाखवलेल्या कॅमेरातल्या निगेटिव्ह रोलमध्ये जे दिसत होतं ते सारखंच दिसत होतं. निगेटिव्ह प्रकरण काहीतरी वेगळंच आहे हे त्याला समजत होतं!!

 

एकदा शाळेतर्फे एका दिवसाच्या ट्रीपला सगळेजण ठाणे येथील 'कला भवन' मध्ये गेले होते. तिथे विविध प्रकारच्या चित्रांचे प्रदर्शन बधून सुनिलला चित्रांविषयी आवड निर्माण झाली. त्याची चित्रकला तशी लहानपणापासून चांगलीच होती पण उत्तरोत्तर चित्रकलेविषयीची आवड कला भवनला भेट दिल्यानंतर वेगाने वाढत गेली. येतांना वडिलांनी दिलेल्या पैशांत त्याने चित्रकलेचे साहित्य विकत आणले. शाळेत असतांना त्याने एलिमेंटरी आणि इंटरमिजीएट चित्रकलेच्या परीक्षेत A ग्रेड मिळवली. निसर्ग, गूढ आणि फँटसी प्रकारातील चित्रे तो काढू लागला. काही प्राण्यांच्या आणि माणसांच्या चित्रांत त्याने डोक्याभोवती लाल वर्तुळे काढली होती. बरेचदा तो  अर्धा प्राणी आणि अर्धा माणूस असे चित्र काढायचा. तसेच सुपरहिरो असलेले कॉमिक्स त्याला वाचायला आवडायला लागले.

 

पण एक होते की प्रत्येक ठिकाणी सुनिलसोबत सर्वजण फोटो काढायला आवर्जून पुढे येत आणि आग्रह करत, कारण असा हा रंगीत आणि चमकणाऱ्या डोळ्यांचा मुलगा एकमेवाद्वितीय असा होता. बरेचदा वाईट नजरेपासून वाचण्यासाठी आई त्याला सार्वजनिक ठिकाणी नेहमी गॉगल घालायला लावे.

 

दहावीत त्याला चांगले मार्क्स मिळाल्यावर त्याचा गॉगल नसलेला रंगीत फोटो स्थानिक वर्तमानपत्रातील पुरवणीत छापून आला होता तेव्हा त्याच्या डोळ्यांबद्दल सगळीकडे समजले. टीव्हीतील वृत्तनिवेदकाने आवर्जून त्याच्या डोळ्यांबद्दल सांगतांना असे म्हटले होते - "चमकदार रंगीत डोळ्यांचा हा मुलगा त्याच्या मार्कांमुळे आणि त्याच्या विशेष डोळ्यांमुळे सगळ्यांच्या लक्षात राहील असाच आहे!"

 

आपल्या माध्यमिक शाळेतील आयुष्यात सुनिलला विज्ञानाचा अभ्यास करायला लागल्यापासून तसेच सुपरहिरोंचे कॉमिक्स वाचून त्याला जाणीव झाली होती - की त्याला इतरांपासून काहीतरी वेगळी अशी शक्ती लाभली आहे. जसे कुणी काही तीव्र नकारात्मक विचार करत असेल तर त्या व्यक्तीच्या डोक्याभोवती आपल्याला लाल रंगाचे वलय दिसते. तसेच आपले लक्ष त्या व्यक्तीकडे नसले तरीही ती व्यक्ती जवळपास असेल तर त्या नकारात्मकतेचा विशिष्ट आवाज ऐकू येतो.

 

या सगळ्या शक्ती त्याच्यात वयाने मोठा होत असतांना हळूहळू विकसित होत गेल्या. रात्री सर्व जणांना अंधार असल्याने अर्थातच कमी दिसायचे पण सुनिललाच मात्र रात्री इतरांपेक्षा जास्त ठळक आणि स्पष्ट दिसायचे, हे नक्की का व कसे हे मात्र त्याला अजून नीट उलगडत नव्हते आणि याबद्दल त्याने घरात कुणाला सांगितले नाही.

 

सुपरहीरोंचे कॉमिक्स वाचून वाचून त्याने एक गोष्ट मात्र मनाशी नक्की आणि पक्की ठरवली होती ती म्हणजे या शक्तीबद्दल कुणालाही न सांगणे! ही शक्ती आपल्याला का मिळाली हे त्याला अजून कळले नव्हते! नंतर नंतर त्याने त्याच्यासोबत घडत असलेल्या अद्भुत गोष्टींची उघड वाच्यता करणं किंवा त्याबद्दल आश्चर्य व्यक्त करणं बंद केलं. घरच्यांसाठी सुनिलचे वेगळेपण म्हणजे फक्त त्याचे रंगीत चमकदार डोळे आणि त्याला रात्रीच्या प्रकाशात थोडे जास्त दिसणे एवढेच होते. बाकी इतर काही त्यांना माहिती नव्हते. त्या गोष्टी स्वतःपुरत्या ठेऊन त्यासंदर्भात आणखी संशोधन करायचं त्याने ठरवलं.

 

दरम्यान त्याला खात्री झाली होती की, आपल्याला लोकांच्या डोक्यात जेव्हा निगेटिव्ह गोष्टी सुरू असतात तेव्हा त्या ओळखता येतात म्हणून मग त्यांना सकारात्मकतेमध्ये बदलण्यासाठी त्याने त्याबद्दल विविध पुस्तके वाचायला सुरुवात केली. आता अनिल मेकॅनिकल इंजिनियरिंगला होता तर सुनिल अकरावी सायन्सला गेला. दरम्यान त्याने आपला चित्रकलेचा छंद कायम ठेवला! गॅलरीत पिंजऱ्यात असलेल्या पोपटाला तो अधून मधून आपल्या मनातील गोष्टी अभ्यास करता करता सांगायचा. अनिलचे कॉलेज दूर असल्याने प्रवासात खूप वेळ जाणार होता म्हणून त्याने मुंबईतच माटुंग्याला हॉस्टेलमध्ये राहण्याच्या निर्णय घेतला. मुलांकडे नीट लक्ष देता यावे म्हणून स्वेच्छेने आतापर्यंत हाऊसवाईफ असलेल्या राधाने आता डोंबिवलीतच एका लायब्ररीत पार्ट टाईम जॉब स्वीकारला होता. धुणी, भांडी, बाजार वगैरेसाठी रखमा होतीच.

^^^

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Nimish Sonar

आता ही कादंबरी ऑडिओ बुक स्वरूपात सुद्धा उपलब्ध आहे: https://youtube.com/playlist?list=PL3b5C5GmPJolxNZzL9dD2Z54T_L--OSX_

Deepa

please continue to write such amazing stories.

Rujuta

वाह। खूप छान कथा आहे। खरोखर विज्ञान आहे ह्या कथेत आणि रोमांच सुद्धा।

Sayali Raje

कथा फार छान जुळून आली आहे , एका बैठकीत सर्व वाचून संपवली. कथानकाचा मूळ नायक हा एका अर्थाने "दिव्यांग" आहे .

Akshar

Nimish has put a lot of efforts into this book. Must read.

Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to डिटेक्टिव्ह निगेटिव्ह


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
सापळा
झोंबडी पूल
श्यामची आई
खुनाची वेळ
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
कथा: निर्णय
गांवाकडच्या गोष्टी
लोकभ्रमाच्या दंतकथा
रत्नमहाल
अजरामर कथा
पैलतीराच्या गोष्टी
मृत्यूच्या घट्ट मिठीत