(ही कथा काल्पनिक आहे कथा नावे यात साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )
सर्व आवरून रमाकाकूना आडवे होईपर्यंत दुपारचे दोन वाजले होते .आता कुठे त्यांचा डोळा लागला होता .एवढ्यात मोठा गडगडाट ऐकू आला आणि रमाकाकू दचकून जाग्या झाल्या.त्या झोपल्या तेव्हा चक्क उन पडले होते .आणि आता त्या जाग्या झाल्या तो आभाळ भरून आले होते.त्या उठून दरवाज्याजवळ आल्या आणि त्यांनी बाहेर बघितले .अंधारून आले होते .विजा चमकत होत्या.गडगडाट त्याचाच ऐकू आला होता. त्यानेच दचकून त्या जाग्या झाल्या होत्या.
काकूंचे वय साठीच्या आसपास असावे .तात्यांचे त्यांच्या यजमानांचे वय पासष्ट होते.तात्यांचे एकत्र कुटुंब होते.त्यांचा बारदाना फार मोठा होता .तात्यांचे वडील खोत होते .सरकार आपले खोत वतन काढून घेणार हे त्यांनी अगोदरच ओळखले .कुळांकडे कसण्यासाठी असणाऱ्या जमिनी,त्यांनी आपल्याकडे कसण्यासाठी, कुळकायदा येण्याच्या अगोदरच घेतल्या होत्या .खूप मोठी जमीन तात्यांच्या कुटुंबाकडे होती .तात्या त्यांचा लहान भाऊ वहिनी मुले असे एकत्र कुटुंब होते .मुले मुली पुतणे पुतण्या सुना जावई मिळून खूप मंडळी होती .मुली आपापल्या घरी लग्न होउन गेलेल्या होत्या .
घरातील माणसे गडी माणसे सर्व मिळून पंचवीस तीस माणसे जेवायला सहज असत.धाकटी जाऊ सुना यांच्या मदतीने सर्व कारभार रमाकाकू समर्थपणे सांभाळीत असत.रमाकाकूंचा सर्वांवर वचक होता. मुले काही वेळा त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत असत . माणसांकडून काम करून घेण्यामध्येच त्यांचा सगळा वेळ जात असे.
तात्या व त्यांचा भाऊ अण्णा बाहेरील सर्व कामे पाहत असत.अण्णा थोडेसे सांगकामे होते .तात्या सर्वत्र लक्ष देत असल्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी पडली नव्हती .कोर्ट कचेरीची कामे त्याचप्रमाणे शहरातील सर्व व्यवहार तात्या पाहात असत.आज सकाळी लवकर उठून तात्या कोर्टातील कामासाठी शहरात गेले होते .ते गेले त्यावेळी आकाश निरभ्र होते .पाऊस पडेल असा कोणताही अंदाज करता येत नव्हता. दुपारी दोन नंतर एकदम आकाश ढगानी भरून आले .विजांचा कडकडाट व धुवाधार पाऊस सुरू झाला .तात्यांचे गाव थोडे आडवळणाला होते.पाच सहा किलोमीटर जाऊन तिथे शहरात जाणारे वहान बस रिक्षा इत्यादी पकडावे लागे.बसस्टँडवर जाईपर्यंत वाटेत माळरान व जंगल होते .वाटेत दोन ओढे होते.त्याला एरवी पाणी नसे.परंतू पाऊस पडल्याबरोबर चारी बाजूने पाणी एकत्र येऊन पूर् येत असे.ओढा ओलांडता ओलांडता एकदम पाण्याचा मोठा लोंढा येई .त्याचा जोर इतका असे की काळजीपूर्वक ओढा ओलांडावा लागे.नाहीतर माणूस गटांगळ्या खात वहात जाई.ओढे जाऊन समुद्राला मिळत. तिथे किनाऱ्याला कुठेतरी माणूस मृत अथवा जिवंत लागत असे . माळरानावर विजाही चमकत.त्या विजा झाडांकडे खेचल्या जात .लोक पावसापासून संरक्षणासाठी झाडाखाली थांबत आणि नेमकी वीज त्यांच्यावर येऊन पडे. दर पावसात दोन चार माणसे वाहून किंवा वीज पडून अपघाती मरत असत.
तात्या सकाळी जाताना बरोबर छत्री घेऊन गेले की नाही ते रमाकाकूंना आठवत नव्हते.हल्ली तात्यांना सर्दीचा खूप त्रास होऊ लागला होता .पावसात भिजले की त्यांना हटकून सर्दी होत असे .त्यात त्यांना थोडा दमाही लागत असे. डॉक्टरानी काळजी घ्यायला सांगितली होती.त्यामुळे पावसाळ्यात तात्या हल्ली रेनकोट टोपी वापरीत असत.फारच झड लागली तर गरम कपडेही वापरीत असत .त्याचबरोबर पावसाळ्यात छत्रीही नेहमी बरोबर ठेवीत असत.
रमाकाकूंचा जीव खालीवर होऊ लागला .पावसाळ्याची सुरुवात होती .आजच पाऊस येईल असे वाटत नव्हते.तात्या छत्री तरी घेऊन गेले असतील की नाही याची रमाकाकूंना शंका होती. पावसाची काळोखी इतकी दाट होती की सध्याकाळ झाल्यासारखे भरदुपारी वाटत होते.पाऊस धुवाधार ,न खळता सतत पडत होता.घराच्या चारी बाजूनी पाण्याचे लोटच्या लोट वाहत जात होते.ओढ्याला अकस्मात मोठा पूर येणार .विजा जंगलांकडे खेचल्या जाणार.ओढ्याला अकस्मात मोठा लोंढा येणार .पावसाचे पहिले आठ पंधरा दिवस विजांची भीती जास्त असे.
काकूंच्या जिवाची घालमेल सुरू झाली .प्रथम त्यांनी बाहेर जाऊन कपाटातील छत्र्यांचा आढावा घेतला.तात्यांची छत्री कोपऱ्यातच उभी होती .निरभ्र आकाश असताना तात्या रेनकोट नेणे तर शक्यच नव्हते .तरीही त्यांनी रेनकोट जाग्यावर आहे की नाही ते पाहिले .तोही जाग्यावरच होता .
आता मात्र रमाकाकूंचा जीव घाबरू लागला .एकच काळजी हे कुठे असतील ?जंगलातील वाटेवर तर नसतील?पावसापासून संरक्षणासाठी झाडाखाली तर उभे राहणार नाहीत ?नेमकी वीज त्या झाडावर तर पडणार नाही ?का ते ओढा ओलांडत असतील?त्याच वेळी अकस्मात पाण्याचा लोंढा तर येणार नाही ?तात्यांना हल्ली थोडे कमी दिसते ते काळोखात ठेच लागून पडणार तर नाही ना ?त्यांना ओढा ओलांडताना येणारा पाण्याचा मोठा लोंढा दिसेल का ?तात्यांना सर्दी झाली तर ?ताप आला तर ?दमा लागला तर ?का हे अजून काम न झाल्यामुळे शहरात असतील?तिथे पाऊस पडत असेल का ?तात्या नवा रेनकोट खरेदी करतील का?नाहीतरी पहिला रेनकोट जुना झाला आहे.पाऊस शहरात पडत असला तरी किंवा नसला तरी तात्या नवा रेनकोट घेतील का? पावसामुळे किंवा काम न झाल्यामुळे तात्या शहरातच राहातील का?काकूंची प्रश्नावली संपेना.विचारचक्र थांबेना . तात्या कसे असतील म्हणून होणारी जिवाची घबराट थांबेना.
पुढच्या दरवाजापासून माजघरापर्यंत त्यांची येरझार थांबेना .काय करावे ते त्यांना सुचेना.गड्याला छत्री व रेनकोट घेऊन तिठ्यापर्यंत पाठवावे असे त्यांना वाटले.त्यांनी नारायणला हाक मारली .नेहमी घरीच असणारा नारायण आता शेतावर होता .नारायण नाही म्हणून कुणीतरी सांगितले .दुसऱा कुणी गडी पाठवावा तर कुणी हजर नव्हता . अकस्मात आलेल्या धुंवाधार पावसाने सगळे जिथे होते तिथे अडकले होते.त्यांनी त्यांच्या पुतण्याला हाक मारली .सत्तावीस अठ्ठावीस वर्षांचा तो धट्टाकट्टा जवान होता .सुदैवाने तो घरात होता .त्याला त्यांनी रेनकोट व छत्री घेऊन तात्यांना वाटेत बघत बघत तिठ्यापर्यंत जा असे सांगितले .त्यानेही रेनकोट छत्री घेतली स्वतः रेनकोट घातला व तो निघाला.एवढ्यात त्याची बायको, त्यांची सून, धावत आली आणि म्हणाली यांना बरे नाही पावसात जाऊन आणखी आजारी पडतील .पुतण्या बायकोच्या ताब्यात फारच होता .त्याने लगेच पायातील चपला काढल्या. रेनकोट व छत्री जाग्यावर ठेवून दिली.
*एवढ्या पावसात,विजा चमकत असताना, प्रचंड काळोखी आलेली असताना, ढगांचा गडगडाट होत असताना,तू जाच असेही त्यांना पुतण्याला सांगता येईना.*
*वीज, पाण्याचा लोंढा, यांची जी भीती तात्याना होती तीच पुतण्यालाही होती.*
(क्रमशः)
२४/४/२०१९©प्रभाकर पटवर्धन
pvpdada@gmail.com