(ही कथा व पात्रे काल्पनिक आहेत साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

कांचन बाबांबद्दलच्या आठवणीमध्ये गुंग झाली होती.बाबांच्या एकेक गोष्टी तिला आठवत होत्या .

केव्हा केव्हा आईला सकाळची शिफ्ट असे .त्यावेळी सकाळी सर्व आवरून आई शाळेत पळत असे.बर्‍याच  वेळा मिनी (कांचनला बाबा लाडिकपणे मिनी म्हणून हाक मारीत)  झोपलेली असे.तिला उठवून, तिचे सर्व आवरून, तिला डबा देण्यापर्यंत बाबा सर्व काही करीत असत.बाबाना वेण्या नीट घालता येत नसत .दोन वेण्या घालताना नेहमी एक वेणी जाड व एक वेणी बारीक होत असे.आरशात पाहताना ती दोन्ही वेण्या पुढे घेत असे व बाबांना म्हणत असे हे हो काय बाबा,आई किती छान वेण्या  घालते तुम्हाला एवढेही येत नाही.त्यावर बाबा मोठ्याने गडगडाट केल्यासारखे हसत असत .ते मोठे हसणे अजूनही तिच्या कानात तिला ऐकू येत होते .

केव्हा तरी काही कारणानी बाबांना स्वयंपाक करावा लागला तर मग बाबांची उडणारी धांदल पाहण्यासारखी असे.ती धांदल आठवून कांचनला दवाखान्यात खुर्चीत बसल्या बसल्या हसू आले .

बाबा म्हणजे तिचे हिरो होते .बाबांचे चालणे, बाबांचे बोलणे, बाबांचे हसणे, बाबांचे स्कूटर चालवणे,बाबांचे सर्व काही तिला आवडत असे .

बाबांच्या आठवणीत ती हरवलेली असताना तिचा फोन वाजला.ती एकदम दचकली . फोन तिच्या आईचा होता.तिने दचकून समोर भिंतीवर टांगलेल्या घडय़ाळाकडे बघितले.साडेदहा वाजून गेले होते .तिचा स्टाफ मॅडम केव्हा निघतात याची वाट पाहात होता.मॅडम विचारात असताना त्यांना जाऊन काही विचारण्याची कोणाची हिंमत नव्हती .फोन तिच्या आईचा होता .आईला तिने ही काय आले म्हणून सांगितले व ती निघाली .आपल्या केबिनचा दरवाजा तिने बंद केला आणि स्टाफला सर्व काही नीट बंद करा व घरी जा असे सांगून ती निघाली .

अजूनही तिच्या डोक्यात बाबांचे विचार होते.यांत्रिकपणे ती आपली मोटार चालवीत होती .आईमुळे बाबा मेले हे तिच्या डोक्यात का कोण जाणे घट्ट बसले होते .त्यामुळे एकाच वेळी आईबद्दल प्रेम जिव्हाळा आपुलीक कर्तव्यबुद्धी व अढी तिच्या मनात होती .

ती घरी आल्यावर फ्रेश होऊन आईबरोबर जेवायला बसली .आज आई पुन्हा लग्नाचा विषय काढील की काय अशी तिला भीती वाटत होती.परंतु आई सटरफटर विषयावर गप्पा मारीत होती .आईला आपल्याला काहीतरी सांगायचे आहे असे तिला जाणवत होते.आईला काय बोलायचे असेल ते मात्र तिच्या लक्षात येत नव्हते .

शेवटी आईनेच सुरुवात केली. मिनी, तुझ्या मनात माझ्याबद्दल अढी आहे हे मला माहीत आहे .तुझे बाबांवर अपरंपार प्रेम होते हेही मला माहीत आहे .जर बाबांच्या आजारावरील उपचारासाठी पैसा खर्च केला असता, तर बाबा वाचले असते, असा तुझा समज आहे हेही मला माहीत आहे .मी पैसा खर्च केला नाही आणि बाबांना मरू दिले असे तुला कुठे तरी वाटत आहे  हेही मला माहीत आहे .तू स्वतः केव्हा तरी विषय काढशील आणि मी बोलेन म्हणून मी वाट पाहात होते. बाबांना असाध्य रोग झाला होता .त्या वेळच्या वैद्यकीय प्रगतीप्रमाणे तो रोग बरा होण्यासारखा नव्हता .बाबांना तू खूप मोठी व्हावी असे वाटत होते.त्यासाठी आम्ही दोघांनी पै पै करून पैसा साठविला होता .बाबा ज्यावेळी आजारी पडले त्यावेळी आम्हाला जी शक्यता होती तेवढे उपचार केले .तू फार लहान होतीस म्हणून तुला सर्व गोष्टी नीट माहीत नाहीत .शेवटी बाबांच्या डॉक्टर मित्राने हा रोग असाध्य आहे यावर आज तरी काही उपचार नाही. जरी तू अमेरिकेत गेलास तरी पैसे मात्र खर्च होतील .तुझा मृत्यू कदाचित थोडा पुढे ढकलला जाईल .असे सांगितले .मीही अगदी अमेरिकेत नाही, कारण तेवढे पैसे आमच्या जवळ नव्हते, तरी भारतात उपलब्ध सर्व उपचार करू म्हणून त्यांना विनवणी केली .डॉक्टर जरी काही म्हणाले तरी शेवटी चमत्कार म्हणून काही गोष्ट आहेच .शेवटी प्रत्येकाचे दैव हे असतेच .मिनी हुषार आहे .ती स्कॉलरशिपने आपला खर्च भागवील.आपण सोने नाणे मोडू.कर्ज काढू.परंतु तिला शिकवू.मला तुम्ही हवे आहात .निदान आपण उपलब्ध आहेत ते सर्व प्रयत्न केले असे समाधान आपल्याला वाटले पाहिजे .मला ते समाधान मिळू दे .म्हणून त्यांची खूप विनवणी केली .त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला .परंतु ते काहीही ऐकायला तयार नव्हते.उपचार म्हणजे क्लेशकाल वाढविणे होय .मला सुखाने जाऊदे.माझी तुला शपथ आहे .म्हणून त्यांनी निक्षून सांगितले .

आपण जे पैसे साठविले आहेत ते तुला तुझ्या कठीण काळात  उपयोगी पडतील .मिनी खूप खूप शिकावी खूप खूप मोठी व्हावी असे मला वाटते .हा पैसा तिच्या शिक्षणासाठी वापर .माझ्यावर पैसा खर्च करणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी आहे .

हे सर्व ते सांगत असताना आम्ही आपसात चर्चा करीत असताना तू गाढ झोपलेली होतीस,असा आमचा समज होता .परंतु प्रत्यक्षात तू जागी होतीस .अर्धवट झोपेमध्ये अर्ध्याकच्च्या वयामध्ये तू जे ऐकले त्यावरून तू आपला काहीतरी ग्रह करून घेतलास.आणि माझ्याबद्दल विनाकारण मनात कुठेतरी खोलवर अढी बाळगलीस.तू जरी बोलली नाही तरी मला ते कुठेतरी खोलवर लक्षात येत होते.जिथे प्रेम असते तिथे बोलल्याशिवाय कितीतरी गोष्टी आपोआप लक्षात येतात .

तू आपणहून कधीतरी विषय काढशील  आणि मी तुला समजावून सांगेन म्हणून मी वाट पाहत होते .परंतु तू मधून मधून आतल्याआत कुढत असतेस हे मला जाणवते.त्यामुळे मलाही अस्वस्थता वाटते .तेव्हा आज स्पष्टपणे मी बोलण्याचे ठरविले आहे .

बाबांना उपचाराशिवाय तसेच मी कसे जाऊ दिले असते?आजारच असा होता, आजाराची स्टेजच अशी होती, की कुणाचाच काही इलाज नव्हता .आता तू डॉक्टर आहेस .बाबांचे सर्व वैद्यकीय रिपोर्ट्स व त्यावरील निरनिराळ्या डॉक्टरांची मते मी जपून फाईलमध्ये ठेवली आहेत .ती तू पाहा.त्याचप्रमाणे बाबांनी तुला एक पत्र लिहून ठेवले आहे .योग्य वेळ येताच मी तुझ्याशी सर्व स्पष्ट बोलावे आणि ते पत्र तुला वाचायला द्यावे.असे बाबांनी सांगितले होते .

एवढे बोलून कांचनची आई रडू लागली.हुंदके देत देत तिने ती फाईल मिनी जवळ दिली.मिनीच्या सर्व काही लक्षात आले होते .इतके दिवस आई मनातल्या मनात कुढत होती ते तिच्या लक्षात आले .आपल्या कधीतरी होणाऱ्या  तुटक विचित्र वागणुकीची तिला लाज वाटली.तिला फाईल बघण्याची किंवा बाबांचे पत्र वाचण्याची  गरज नव्हती.आईने आपल्यासाठी केवढा त्याग केला तो तिला जाणवला.इतके दिवस, इतकी वर्षे, आई मनातल्या मनात काय सहन करीत होती ते तिला जाणवले.

ती सोफ्यावरून उठली . आईच्या जवळ येऊन बसली .

आईचे हात तिने आपल्या हातात घेतले.

काही बोलल्याशिवाय त्या स्पर्शातून कितीतरी गोष्टी परस्परांना कळल्या.

*नंतर दोघांनीही एकमेकांना घट्ट मिठी मारली.गालावर गाल टेकले.*

*दोघांच्याही डोळ्यातून ओघळणारे अश्रू एकमेकात मिसळले.*

* गंगा व यमुना एकमेकांत मिसळल्या .*

*दोघांच्याही मनात असलेले किल्मिष  त्याबरोबर वाहून गेले .*

(समाप्त)

१४/४/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel