(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)
रघुनाथ एका नामांकित कॉलेजचा प्राचार्य होता .ज्युनिअर व सिनिअर कॉलेज एकत्र होते .जरी ज्युनिअर विभाग स्वतंत्रपणे व्हाइस प्रिन्सिपलकडे सोपवलेला असला तरी शेवटी नियंत्रण रघुनाथकडे होते .इथे पदव्युत्तर विभागही होता .आर्टस, कॉमर्स, सायन्स, पदव्युत्तर विभाग, ज्युनिअर कॉलेज,या प्रत्येकासाठी स्वतंत्र व्हाइस प्रिन्सिपल नेमलेले होते .कॉलेज एका शिक्षण संस्थेमार्फत चालवले जात असे.संस्थेचे आजीव सदस्य संस्था चालवत असत .आजीव सदस्य होण्यासाठी संस्थेमध्ये शिक्षक असलेच पाहिजे अशी अट होती.अॅडमिनिस्ट्रेशनसाठी एक स्वतंत्र व्हाइस प्रिन्सिपल होता .या सर्वांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी एक कॉर्डिनेटरही होता .कॉलेजचा आवांका फार मोठा होता .पांचदहा एकरमध्ये निरनिराळ्या इमारती, काही प्राध्यापकांची निवासस्थाने, इत्यादी पसरलेली होती.
अशा परिस्थितीत प्राचार्याला रघुनाथरावाना काही विशेष काम नसेल असे कदाचित एखाद्याला वाटण्याचा संभव आहे. परंतु प्रत्यक्षात तसे नव्हते.सर्व विभाग व्यवस्थित काम करीत आहेत की नाही यावर रघुनाथरावांचे बारकाईने लक्ष असे.विभागीय बैठका, संस्थेच्या संचालक मंडळाच्या बैठका, सर्व व्हाइस प्रिन्सिपलसच्या बैठका ,प्रत्येक व्हाइस प्रिन्सिपलशी कामासंबंधी सविस्तर चर्चा ,याशिवाय वेळोवेळी विद्यापीठीय पातळीवर बैठका असत त्यासाठी त्यांना विद्यापीठांमध्ये वेळोवेळी जावे लागत असे. या सर्व कामात रघुनाथराव सदैव गुंतलेले असत.हा सर्व डोलारा ते यशस्वीपणे सांभाळीत होते .केवळ सांभाळीत होते असे नव्हे तर त्याचा विस्तारही होत होता .रघुनाथराव एक यशस्वी प्राचार्य म्हणून ओळखले जात असत .
रघुनाथरावांचे वय अवघे बेचाळीस वर्षे होते.एम.ए. झाल्यावर तेवीसाव्या वर्षी ते लेक्चरर म्हणून नोकरीला लागले.नोकरी करीत असताना ते पी.एच.डी. झाले.लेक्चरर ते हेड ऑफ द डिपार्टमेंट सर्व टप्पे त्यांनी दहा वर्षांत पार केले.पाच सहा वर्षे व्हाइस प्रिन्सिपल म्हणून काम केल्यावर संस्थेने प्राचार्यपदाची धुरा त्यांच्यावर सोपविली .गेले तीन वर्षे ते प्राचार्य म्हणून काम करीत होते .एक यशस्वी प्राचार्य म्हणून त्यांचा विश्वविद्यालयात दबदबा होता . त्यांचे वय बेचाळीस असले तरी ते पस्तिशीचे दिसत असत.
पाच फूट आठ इंच उंची, भरदार शरीरयष्टी, पाणीदार डोळे, उजळ वर्ण ,धारदार नजर,खर्जातील आवाज,अत्यंत टापटिपीचा पोषाख, यामुळे त्यांची कुणावरही सहज छाप पडत असे. त्यांची वक्तृत्व शैली आकर्षक होती. त्यांच्या विषयातील वर्गातील त्यांची व्याख्याने जशी विद्यार्थ्यांवर परिणामकारक ठरत त्याचप्रमाणे त्यांची इतर व्याख्यानेही श्रोतृवर्गाला जिंकत असत.गावातील निरनिराळ्या संस्थांमध्ये, सभांत त्यांना सन्माननीय पाहुणे म्हणून आवर्जून बोलाविले जात असे
त्यांचा विवाह पूर्व नियोजित विवाह (अॅरेंज्ड मॅरेज) होता.त्यांची पत्नी माधुरी विवाहापूर्वी एका ऑफिसात काम करीत असे.माधुरी दिसायला आकर्षक चटपटीत रघुनाथरावाना शोभणारी होती.रघुनाथराव जरी कॉलेजमध्ये निरनिराळ्या कामात व्यस्त असले तरी ते आवर्जून माधुरीला वेळ देत असत.चित्रपट नाटक शॉपिंग इत्यादीसाठी ते तिच्याबरोबर आवर्जून जात असत .एक प्रेमळ जोडपे म्हणून ते त्यांच्या नातेवाईक व ओळखीच्या मंडळीत ओळखले जात असत . दोघांचा संसार व्यवस्थित चालला होता . रघुनाथराव प्राचार्य होईपर्यंत ती एका ऑफिसात काम करीत होती.नंतर तिने आपल्याला संपूर्णपणे प्रापंचिक जबाबदारीत गुंतवून घेतले होते..रघुनाथराव प्राचार्य झाल्यावर तिच्या घरच्या जबाबदाऱ्या वाढल्या होत्या.
माधुरीचा स्वभाव फार चांगला होता .ती सर्वांशी मिळून मिसळून वागत असे .कॉलेजातील फंक्शन्सना ती आवर्जून हजेरी लावीत असे.प्राचार्यांना भेटायला घरी येणाऱ्या निरनिराळ्या अभ्यागतांचे ती मनापासून स्वागत करीत असे .प्यून पासून वरिष्ठांपर्यंत सर्वजण तिच्या सौजन्यपूर्ण प्रेमळ वर्तणुकीचे कौतुक करीत असत .एक आदर्श जोडपे म्हणून त्यांचा उल्लेख होत असे .
रघुनाथराव एक दिवस कॉलेज परिसरात राऊंड मारीत होते .ते फिरत असताना सर्व प्रकारचा स्टाफ त्यांना अभिवादन करीत होता. कॉलेजमधील मुलेही त्यांना पाहून वर्गात जात होती. कुठे चाललेला कमीअधिक दंगा लगेच थांबत होता.रघुनाथरावांचा आदरयुक्त दरारा होता .
एका अनोळखी तरुणीने त्यांना अभिवादन केले.तिच्या छातीवर तिचे नाव व हुद्दा दर्शवणारी नेमप्लेट लावलेली होती.ही शिस्त रघुनाथरावांनी लावली होती .हा पायंडा रघुनाथरावानी पाडला होता.त्यामुळे स्टाफ व त्याचे काम ओळखणे कुणालाही सोपे जात असे. तिला स्टाफमध्ये पाहिल्याचे त्यांना आठवत नव्हते.तशी त्यांची स्मरणशक्ती तीव्र होती. सर्व स्टाफला ते नावाने ओळखत असत.बहुधा ती मुलगी स्टाफमध्ये नवीन असावी .तिच्या चालण्यावरून ,नम्र अभिवादन करण्यावरून ,ती विद्यार्थिनी नसावी.तिच्या छातीवर नेमप्लेट बघितलेली त्यांना आठवत होती . तशी ती पोरसवदा होती .तिचे वय जेमतेम तेवीस चौवीस असावे.
तिला पाहून रघुनाथरावांची चलबिचल झाली . कुणाही मुलीला पाहून आतापर्यंत त्यांच्या हृदयात कळ उठली नव्हती.ते तोपर्यंत स्वतःला अत्यंत स्थिरचित्त समजत होते. शेवटी कुणाला बघून कोणाला काय होईल ते सांगता येणे कठीण आहे .तिचे नाव जाणून घेण्याची त्यांना तीव्र इच्छा झाली.परंतु तसे करणे त्यांच्या स्थानाला डिग्निटीला शोभले नसते, याची त्याना जाणीव होती .तिचा इंटरव्ह्यू घेतलेला त्यांना आठवत नव्हता.बहुधा एका इंटरव्ह्यूला ते गैरहजर होते.त्यावेळी तिचा इंटरव्ह्य़ू झाला असावा. तिची नेमणूक केली गेली असावी.तिच्या अपॉइंटमेंट ऑर्डरवर अर्थातच त्यांनी सही केली होती .इतर कागदपत्र शिफारशी इत्यादी पाहून त्यानी सही केली असावी .ती आपल्या स्टाफवर असल्याचे त्यांना आत्ताच लक्षात आले होते .
नंतर पंधरा वीस दिवसांमध्ये एक डिपार्टमेंटल मिटिंग होती.त्यामध्ये ती मुलगी होती .तिचे नाव रचना होते.ती इंग्लिश घेऊन एम.ए. झाली होती.जुनिअर कॉलेजमध्ये ती शिकवत होती. काही ना काही कारणाने रचना त्यांना पुन्हा पुन्हा दिसत होती .रघुनाथराव तिला पाहिल्यावर अस्वस्थ होत होते . तिला पुन्हा पुन्हा पाहावे ही आस त्यांच्या मनात राहातच होती . ते तिला दुरूनच जसे जमेल तसे न्यहाळत होते.त्यांचे एक मन त्याना हे बरोबर नाही असे बजावत असे .परंतु त्यांचे मन तिच्याकडे ओढ घेण्याचे थांबत नव्हते.
*बहिणाबाईनी म्हटलेच आहे.मन वढाय वढाय जसे पिकातील ढोर.*
*कळते पण वळत नाही अशीही एक म्हण आहे.*
*रघुनाथराव फावल्या वेळात आपण रचना बरोबर बागेत फिरत आहोत .मॉलमध्ये खरेदीला गेलो आहोत . चित्रपट नाटक बघत आहोत .अशा कल्पना करीत असत .*
*त्यांच्या मनात आणखी काय काय विचार येत असत ते त्यांचे त्यांनाच माहित .*
*एवढा मोठा प्राचार्य त्यांचा वेळ काल्पनिक मनोरंजनात जाऊ लागला होता .हे सर्व चूक आहे असे कळत असूनही त्यांचे मन तिच्याबरोबर अनेक गोष्टी करीत असे .*
(क्रमशः)
१३/५/२०२०©प्रभाकर पटवर्धन