(ही कथा काल्पनिक आहे कथा नावे  यात साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )

पाऊस थांबत नव्हता . उलट त्याचा जोर आणखी वाढला असे वाटत होते .क्षितिज रेषेवर विजा चमकत होत्या .ढगांचा गडगडाट चालू होता .चार वाजताच तिन्हीसांजा झाल्यासारखी काळोखी पडली होती.आकाश फाटल्यासारखा पाऊस पडत होता .कुणीतरी पखाली भरून पाणी ओतत आहे असे वाटत होते .काकूंचा एक कान फोनकडे होता .लॅण्डलाइन हेच दळणवळणाचे साधन होते .गावात जवळपास टॉवर नसल्यामुळे मोबाइलला रेंज येत नसे .तात्या जर शहरात थांबले तर ते नक्की फोन करतील .जरी तिढ्यावर आले असले आणि पाऊस पडत असला तरी ते फोन करतील .कुणाला तरी बोलावून घेतील.याची काकूंना खात्री होती .त्यांच्या  येरझारा चालू होत्या . प्रत्येक फेरीमध्ये फोन उचलून  तो चालू आहे ना हे त्या पहात होत्या . मगाशीच त्यांनी तात्यांना फोन केला होता.रिंग वाजत होती परंतु तात्या फोन उचलत नव्हते .  काय झाले? तात्या कुठे आहेत? ते कळत नव्हते .शहरात व तिठ्यापर्यंत रेंज चांगली असे.ज्याअर्थी तात्या फोन घेत नाहीत त्याअर्थी  तात्या तिठ्याहून गावाकडे निघाले असावेत असा अंदाज करता येत होता.हा विचार मनात येऊन काकू आणखीच घाबरल्या.त्यांना झाडाखाली उभे असलेले तात्या त्यांच्यावर पडणारी वीज दिसू लागली .अर्ध्या ओढ्यात उभे असणारे व ओढा ओलांडणारे  तात्या आणि वरून येणारा लोंढा दिसू लागला.त्या आणखीच घाबरल्या .गार वाऱ्याने शिरशिरी  येण्याऐवजी त्यांना घाम फुटला.येरझारा मारून त्यांचे पाय दुखू लागले.दमल्या की त्या एका जागी थोडा वेळ बसत. परंतु तिथे त्यांना फारवेळ बसवत नसे.त्यांच्या येरझारा पुन्हा चालू होत.मध्येच थांबून त्यांनी शंकराला हात जोडले आणि तात्या सुखरूप येऊ देत मी सोळा सोमवाराचे व्रत  करीन म्हणून संकल्प सोडला .सत्यनारायण घालीन हे तर त्यांनी सत्यनारायणाला केव्हाच सांगितले होते.  

एवढ्यात भिजत भिजत त्यांचा मुलगा घरी आला. तो आता शेतावरून  येत होता .त्याला बघितल्यावर त्यांच्या जिवात जीव आला .त्याला त्यांनी सर्व हकीगत सांगितली .गरम गरम चहा घे कपडे बदल आणि रेनकोट छत्री घेऊन तिठ्यावर तात्याना आणण्यासाठी जा म्हणून त्यानी सांगितले.विजय त्यांचा मुलगा यालाही तात्यांची काळजी होतीच.त्याने तात्यांना तसाच ओलेत्याने फोन लावण्याचा प्रयत्न केला .आता फोन डेड झाला होता .रमा काकूंच्या काळजीत आणखीच भर पडली .दळणवळणाचे एकमेव साधन बंद पडले होते.शहरातून, तिठ्यावरून, कुठूनही त्यांनी फोन केला असता तरी तो आता काकूना घेता येणार नव्हता .मन चिंती ते वैरी न चिंती .त्यांच्या मनात आणखी आणखी नको नको ते विचार येऊ लागले .विजा व पाण्याचा लोंढा  त्यांना डोळ्यासमोर दिसत होता. तशाच त्या उठल्या आणि तरातरा देवघरात गेल्या .गणपतीला काढून त्यांनी ताम्हनात ठेविले.आणि तो बुडेल इतके पाणी त्याच्या डोक्यावर ओतले.त्याला नमस्कार करून यापुढे मी संकष्टी  चतुर्थी करीन  तात्यांना सुखरूप घरी आण म्हणून सांगितले.  

विजयने कपडे पटकन बदलले .चहा घेताना त्याने आईलाही तू चहा घे म्हणून सांगितले .तू चहा घे. हे दिसल्याशिवाय मी चहा घेणार नाही. तोंडात पाणीही घालणार नाही.असे त्या निक्षून बोलल्या .यावर बोलण्यासारखे काही राहिले नव्हते .विजय चहा घेऊन, रेनकोट छत्री घेऊन, जाण्यासाठी तयार झाला.त्याची बायको माहेरी गेली आहे हे बरेच आहे नाही तर तिने या धुवांधार पावसात त्याच्या जाण्याला आडकाठी केली असती असा एक विचार त्यांच्या मनात आला.त्यांनी मुलाला काय काय काळजी घे ते सांगण्यास सुरुवात केली . 

झाडाखाली थांबू नको .कोणताही ओढा ओलांडताना पाण्याचा लोंढा येत नाही ना इकडे नीट लक्ष दे .वाटेत तात्या कुठे झाडाखाली थांबले नाहीत ना ते नीट पाहा .नाहीतर ते झाडाखाली असतील.तुला अंधारात दिसणार नाही आणि तू पुढे तसाच निघून जाशील .तिठ्यावर गेल्यावर त्यांची वाट पाहा .त्यांना सांभाळून घेऊन ये .ओढा ओलांडताना त्यांचा हात घट्ट धर.त्यांना अंधारात कमी दिसते .कुठे तरी ठेच लागून पडतील.तुमची चुकामुक झाली तर मी तिठ्यावरील हॉटेलात लॅन्डलाईनला फोन करीन.तू वाट पाहात आहेस हॉटेलवाल्याजवळ बोलून ठेव.तात्या येऊन घरी गेले का ते विचार .त्याला माहीत असेल .नाहीतर तू तिथे वाट पहात राहशील आणि ते घरच्या रस्त्यावर असतील .

विजा चमकत होत्या .ढगांचा गडगडाट होत होता .धुवाधार पावसाचा आवाज येत होता .मोठ्या पागोळ्या पडत असल्यामुळे त्यांचाही आवाज येत होता .जोराने वाहणाऱ्या पाण्याचा आवाज त्यात मिसळला होता. खवळलेल्या समुद्राचा त्यात भरतीची वेळ असल्यामुळे मोठा आवाज येत होता .या सर्व आवाजावर आवाज चढवून रमाकाकू मोठ्या आवाजाने मुलाजवळ बोलत होत्या.त्यांना त्यामुळे धाप लागली . त्यांना धड बोलता येईना .शेवटी मुलगा थोडेसे चिडून म्हणाला की आई मी आता लहान आहे का ?मला किती समजून सांगशील .किती सूचना देशील.तुला दम लागला आहे. तुला नीट बोलताही येत नाही. जरा स्वस्थ बस. किती येरझारा घालशील .तू येरझारा घालून काळजी करून तात्या लवकर येणार आहेत का ?

तेवढ्यात त्यांना कसली तरी आठवण झाली .बाहेर गेलेला माणूस लवकर यावा असे वाटत असेल तर माप उंबरठ्यावर उपडे घालतात .त्यांनी माप आणून उंबरठ्यावर उपडे घातले .आईची घालमेल विजयला कळत होती.तिच्याकडे बघून त्याने स्मित केले.तू काळजी करू नकोस . तात्या सुखरूप घरी येतील .मी त्यांना नीट घेऊन येईन.असा दिलासा त्याने आईला दिला .

तो घराबाहेर पडणार एवढ्यात फोनची रिंग वाजली .डेड फोन एकदम चालू झाला होता.माय लेकरांनी फोनकडे धाव घेतली .पलीकडून तात्या बोलत होते .ते शहरात सुखरूप होते .किती तरी वेळ  ते फोन लावण्यासाठी प्रयत्न करीत होते .आज ते शहरात त्यांच्या मित्राकडे राहणार होते.उद्या सकाळच्या गाडीने ते येणार होते .त्यांनी नवा रेनकोट घेतला होता .उद्या सकाळी त्यांनी नारायणला तिठ्यावर पाठविण्यास सांगितले होते .पुढे ते म्हणाले रमा तू माझी काळजी करीत असशील.तुझा स्वभाव मला माहित आहे .तुझ्या येरझारा चालू असतील .तू देवांनाही सोडले नसणार .नेहमीप्रमाणे काय काय नवस बोललीस सांग बरे.अग वेडे हस,आता चहा घे, तू चहा घेतला नाहीस तर तुझे डोके दुखते मला माहित आहे.इकडेही पाऊस पडत आहे .माझ्या काळजीने  तुझ्या घशाने चहाही उतरला नसेल .

*हे सर्व ऐकल्यावर, तात्यांचा आवाज ऐकल्यावर, रमाकाकूंचा जीव भांड्यात पडला.*

*तात्या आपल्याला किती बरोबर ओळखतात ते ऐकून त्यांचे डोळे पाणावले . *

* तात्यांचे आपल्यावर किती प्रेम आहे ते पाहून त्यानी आनंदाने  स्वतःभोवती गिरकी मारली. *

*मटकन खाली बसल्या .तिथूनच त्यांनी देवाला दोन हात जोडले .पाण्यात घातलेले देव बाहेर काढून पुसण्यासाठी,व उंबरठ्यावरील माप उचलण्याला  त्यांनी मुलाला सांगितले .*

*रमा काकूना या सर्व ताणामुळे दमल्यासारखे वाटू लागले.हात उशाला घेऊन तिथेच त्या जमिनीवर आडव्या झाल्या* 

(समाप्त)

२४/४/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

pvpdada@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel