(ही कथा व पात्रे काल्पनिक आहेत साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

डॉ. कांचन आपल्या दवाखान्यात बसली होती .शेवटचा पेशंट  आताच तपासून प्रिस्क्रिप्शन घेऊन गेला होता.रात्रीचे दहा वाजले होते .रिसेप्शनिस्ट सिक्युरिटी इत्यादी स्टाफ, मॅडम निघण्याची वाट पाहात होता. मॅडम गेल्या की पटापट कुलुपे लावून आपापल्या घरी पळण्याची प्रत्येकाला घाई होती .नंतर फक्त गुरखा तिथे राहणार होता .का कोण जाणे कांचन जुन्या आठवणीत गुंग झाली होती .दवाखाना सुरू करून तिला एक वर्ष झाले होते.ती एमडी जनरल फिजिशियन होती .त्यामुळे हॉस्पिटल वगैरे काही भानगड तिच्या पाठीमागे नव्हती .तसा दवाखाना नवीनच असल्यामुळे काही वेळा पेशंटची गर्दी नसे.जर पेशंट नसले तर एखादेवेळी ती साडे नऊ वाजताच घरी पोहोचत असे.तिच्या आईचा एकदा साडेनऊला फोन येत असे.आजही आईचा फोन आला होता.तिने आज जरा गर्दी आहे यायला उशीर होईल म्हणून सांगितले होते .

आई तिच्यामागे आता लग्न कर म्हणून लागली होती.आणि ती तो विषय सफाईने टाळीत  होती.आई वडिलांची तिच्या कल्पनेप्रमाणे झालेली लग्नाची शोकांतिका बघून तिला लग्न करण्यासाठी उत्साह वाटत नव्हता .वैद्यकीय महाविद्यालयात असताना तिच्या अनेक मित्र मैत्रिणी होत्या .एक दोन मित्र जरा जास्त जवळचे होते.ते तिच्या घरी येऊनही गेले होते आणि अजूनही येत असत.त्यातील एखाद्याशी कांचन लग्न करील असे आईला वाटत होते .ती आईला मी अजून त्या दृष्टीने विचार केला नाही म्हणून सांगत असे . नेहमी विषय टाळीत असे 

आता ती त्याचाच विचार करीत होती.तिच्या आईने तिच्यासाठी अपरंपार कष्ट घेतले होते .वडिलांच्या मृत्यूनंतर आईने दुसरे लग्न न करता, तिचे शिक्षण, तिची प्रगती या सर्वावर लक्ष केंद्रित केले होते.तिची आई एका प्राथमिक शाळेत नोकरी करीत होती .तिला विशेष पगार नव्हता .त्या तुटपुंज्या पगारातून कांचनचे सर्व उच्च शिक्षण होणे शक्य नव्हते.वडिलांनी ठेवलेल्या रकमेतूनच तिचे उच्च शिक्षण झाले होते .याना तू खूप शिकलेली पाहायचे होते. त्यासाठी त्यांनी एवढा पैसा काटकसर करून ठेविला होता .  तुला जेवढे शिकायचे असेल तेवढे शीक.कोणत्याही परिस्थितीत मी तुला पैसा कमी पडू देणार नाही.असे तिच्या आईचे नेहमी सांगणे असे .स्वतः काटकसर करून व बाबांनी ठेवलेल्या पैशातून तिने कांचनला कधीही काही कमी पडू दिले नव्हते.

आईवर तिचे खूप प्रेम होते .तरीही तिच्या मनात कुठे तरी आईबद्दल एक अढी होती .त्यावेळी ती फार लहान होती. तिला नीट काही स्पष्टपणे आठवत नव्हते .तरीही आईमुळे बाबा मेले असा तिचा ग्रह झाला होता. 

ती बाबांची लाडकी होती .तिचे बाबा खूप आजारी पडले होते .आई बाबांचा संवाद तिला  ऐकलेला आठवत होता .बाबांच्या उपचारांसाठी खूप खर्च येणार होता .त्यासाठी पैसे खर्च केल्यास कांचनच्या शिक्षणासाठी पैसे कमी पडले असते.तेव्हा आईने बाबांच्या उपचारासाठी पैसे खर्च केले नाहीत .त्यामुळे तिचे बाबा वारले .असा तिचा ठाम ग्रह झाला होता .जर आईने त्यावेळी खर्च केला असता तर तिला तिचे बाबा मिळाले असते .तेव्हा आईने बाबांना एक प्रकारे मारले असा तिचा ग्रह झाला होता .बाबांच्या मृत्यूला ती आईला जबाबदार धरत होती . 

*आणि आईने तिच्यासाठी कितीही त्याग केला असला तरी तिच्या मनात आईबद्दल सूक्ष्म अढी होती.*

एकाच वेळी तिच्या मनात आईबद्दल अपरंपार प्रेम, अपार कणव व तशीच एक  अदृश्य अढी होती .आपले बाबा आईमुळे मेले असे तिला वाटत होते.बाबांच्या अस्पष्ट आठवणींमध्ये ती गुरफटली होती.

ऑफिसमधून आल्यावर तिचे बाबा तिला माझा बाब्या म्हणून उचलून घेत असत.अॉफिसला जाताना व आल्यावर तिच्या गालाचे पापे घेतल्याशिवाय त्यांना राहवत नसे .त्यांच्या मिशा तिला टोचत आणि ती हाताने त्यांचे तोंड बाजूला करीत असे .

ते नेहमी येताना चॉकलेट आणीत असत .चॉकलेट तिला फार आवडत असे .चॉकलेटवरून तिची आई नेहमी बाबांना ओरडत असे .चॉकलेटमुळे पोरीचे दात किडतील म्हणून आई नेहमी बाबांना ओरडत असे.बाबा नेहमी सर्व गोष्टी हसण्यावारी नेत असत .मात्र चॉकलेट खाल्ल्यावर तिला नेहमी ब्रश करावे लागे.

नेहमी ती बाबांच्या कुशीत रात्री झोपत असे .झोपताना तिला एखादी गोष्ट बाबा रोज सांगत असत .गोष्ट ऐकल्याशिवाय तिला झोप येत नसे.सकाळी उठल्यावर तिला आपण आपल्या खोलीत आपल्या कॉटवर झोपलेले आहोत असे आढळून येई .ती त्यावर बाबांना तुम्ही मला रोज उचलून इकडे का ठेवता म्हणून रागावत असे .त्यावर तिचे बाबा तू झोपेत उठून चालत तिकडे जाऊन झोपतेस त्याला मी काय करू असे हसत उत्तर देत असत.झोपताना ती दररोज रात्री झोपेत उठून आपल्या कॉटवर जायचे नाही म्हणून निश्चय करी.परंतु सकाळी ती आपली तिच्या कॉटवर असे .

तिचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा होत असे .तिला हवी असलेली वस्तू त्या दिवशी बाबा तिला नक्की आणून देत असत .कितीही खर्च होवो परंतु बाबा मागेपुढे पाहात नसत .त्यावरूनही नेहमी बाबा व आई यांचे भांडण होत असे .

तुम्ही तिचे वाटेल तसे लाड करतात उद्या ती मोठी झाल्यावर हट्टी होईल.तिला ते पुढे जड जाईल.मुलांना, मुलांनाच काय प्रत्येकाला नकार ऐकायची सवय पाहिजे असे आईचे ठाम मत होते.सर्व गोष्टी सहज मिळतात असे झाल्यावर त्या वस्तूंची किंमत राहात नाही .त्यावर बाबा नेहमी जाऊ दे ती मोठी झाली म्हणजे तिला आपोआप समज येईल असे सांगत असत .

उद्या लग्न झाल्यावर नकार मिळाला कि तिला जड जाईल.असे आई म्हणत असे. त्यावर तिचे बाबा हसून म्हणत कि मी तिला इतके शिकविन, ती इतके कमवील कि तिला काही कमी पडणार नाही.

तिची शाळा बाबांच्या ऑफिसच्या वाटेवरच होती .

*शाळेची वेळ व बाबांच्या ऑफिसची वेळ साधारण एकच असल्यामुळे  बाबा तिला शाळेमध्ये सोडून पुढे जात असत. *

*बाबांच्या स्कूटरवर पाठीमागे त्याना धरून बसल्याची पक्की आठवण तिला अजूनही होती .*

*आईबद्दल तिच्या मनात एकाचवेळी असलेली अढी व प्रेम यामुळे ती उदास होत असे*

*कांचन बाबांबद्दलच्या आठवणीमध्ये गुंग झाली होती.*

(क्रमशः)

१४/४/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel