(ही कथा व पात्रे काल्पनिक आहेत साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)
त्याचे बोलणे त्याची वैचारिक पातळी व विचारांची स्पष्टता, शांत स्वभाव व सौजन्य अधोरेखित करत होते.
त्याच्या बोलण्यामुळे सविता मोहित होउन त्याच्याकडे एकटक पाहात होती .
तो पुढे बोलू लागला. हल्लींचे दिवस समानतेचे आहेत.मीही मनापासून दोघांनाही समान समजतो.लग्नामध्ये परस्परांच्या काही अपेक्षा निश्चितच असतात.त्यातही काही जास्त महत्त्वाच्या व काही कमी महत्त्वाच्या असतात.आई वडील माझ्याजवळ राहणार याला अग्रक्रम आहे.बाकी माझ्या विशेष काही खास अपेक्षा नाहीत .तिने नोकरी करावी किंवा करू नये तो तिच्या मर्जीचा प्रश्न आहे .हल्ली महागाई वाढत आहे.राहणीमानाच्या कल्पना बदलत आहेत .दोघेही मिळवीत असतील तर आर्थिक दृष्ट्या सर्व गोष्टी सोप्या होतात.
पुढे तो म्हणाला माझ्या जशा काही अपेक्षा आहेत त्याप्रमाणेच सविताच्याही काही अपेक्षा असणार. मीच बोलत आहे .तिनेही तिचे विचार मोकळेपणाने सांगावेत.एवढे बोलून तो सविताकडे ती काही बोलेल या अपेक्षेने पाहू लागला.
त्याच्या बोलण्यावर सविताने मानेला एक लहानसा झटका दिला.तो झटका बरेच काही सांगून गेला .त्या झटक्यातच अतुल अर्धा गारद झाला.या मुलीशीच लग्न करायचे असा त्याने मनोमन निश्चय केला. सविता तशी स्पष्टवक्ती होती. ती म्हणाली दादा अमेरिकेत स्थायिक झाला आहे .तो आई वडिलांना तिकडे नेहमीच बोलावतो.आई बाबा जन्मभर इथेच राहिलेले असल्यामुळे त्यांचे नातेवाईक व स्नेहबंधही येथेच आहेत.त्यांना तिकडे कायमचे राहणे आवडणार नाही .त्यांना तिथे करमणार नाही.त्यांना तिथली हवाही सोसणार नाही .त्यांची जबाबदारी माझ्यावर आहे .तुम्ही जशा तुमच्या अपेक्षा मोकळेपणाने सांगितल्या तशाच मीही मोकळेपणाने सांगते.ते माझ्याजवळच राहतील.अशा परिस्थितीत आपल्याला मोठा निदान चार बेडरूमचा फ्लॅट घ्यावा लागेल.त्यासाठी लागणारा आर्थिक भार आम्ही सोसू.स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य असावे अशा मताची मी आहे .मी माझी नोकरी तशीच पुढे चालू ठेवणार आहे .याहून माझ्या वेगळ्या काही अपेक्षा नाहीत.
तिचे बोलणे चालू असताना तिचे आईबाबा एकदम म्हणाले की असे काय तू बोलतेस?आम्ही स्वतंत्र राहू .फक्त तुझा फ्लॅट आमच्या फ्लॅटजवळ असावा.गरज पडल्यास तुम्हा दोघांची आम्हाला मदत व्हावी एवढेच आमचे म्हणणे आहे. म्हटले तर स्वतंत्र व म्हटले तर दरवाजा उघडल्यावर एकच अशी रचना असली तर फारच उत्तम परंतु तसे जमले नाही तर निदान तुमचा फ्लॅट आमच्या फ्लॅटजवळ असावा असे आम्हाला वाटते .
त्यावर सविता म्हणाली फ्लॅटची रचना कशी असावी हा नंतरचा भाग झाला परंतु आई वडील माझ्या जवळ राहणार हा मुद्दा महत्त्वाचा.
त्यावरती अतुल म्हणाला माझ्या आई वडिलांचेही एखादवेळ तसेच मत असेल.हा विवरणाचा डिटेलिंगचा भाग झाला मुख्य मुद्दा महत्त्वाचा.
यानंतर आणखी काही बोलणे झाले. दोघांनीही एकमेकांचे मोबाइल नंबर घेतले .
दोघांचेही असे ठरले की असेच आणखी काही दिवस जावू द्यावेत.परस्परांना भेटावे बोलावे आणि नंतर डोळसपणे निर्णय घ्यावा.
अतुलच्या आई वडीलांनी सविताच्या आई बाबांना त्यांच्या घरी बोलाविले.आपला फ्लॅट बघावा मोकळेपणाने बोलणे व्हावे हाच उद्देश त्यामागे होता.
अतुलचे बाबा बोलता बोलता सहज म्हणाले .जेव्हा दोन व्यक्ती एकत्र येतात त्यावेळी काही ना काही तडजोड करावी लागतेच .दोन व्यक्तींचे स्वभाव एकसारखे एक असणे शक्य नाही .त्यात काही ना काही फरक हा असणारच .मी म्हणतो तेच खरे असे म्हणून चालत नाही .व्यवहारामध्ये स्वभावामध्ये नेहमीच लवचिकता आवश्यक आहे .प्रत्येकाला आपल्या स्वभावाला काही ना काही मुरड घालावी लागतेच.लवचिकता, जुळवून घेणे, परस्पर सामंजस्य,हा सुखी जीवनाचा मंत्र आहे .विवाहामध्ये तर ही गोष्ट जास्तच महत्त्वाची आहे .जेव्हा आपण दुसऱ्याकडून काही अपेक्षा करतो त्यावेळी त्याच्याकडूनही आपल्याबद्दल काही अपेक्षा असतात हे विसरून चालणार नाही .
अतुलच्या बाबांचे बोलणे कुणालाच नाकारता येण्यासारखे नव्हते .
बाबा पुढे म्हणाले हल्ली पूर्वीसारखे दिवस राहिले नाहीत .दोघेही शिक्षित असतात. दोघेही मिळवती असतात.स्त्री स्वातंत्र्य समानता या गोष्टी जरी योग्य असल्या तरी त्याचा अतिरेक होता कामा नये .दोघांनीही आपल्या स्वभावाला मुरड घातली पाहिजे .एकमेकांचे अहंकार एकमेकांवर आपटून संघर्ष होता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे .बऱ्याच वेळा अहंकारामुळे पती पत्नी विभक्त झालेली मी पाहिली आहेत .एक रागावला तर दुसऱ्याने शांत राहणे आवश्यक आहे .आपले विचार बदलले पाहिजेत .ही गोष्ट एका बाजूने न होता ती दोन्ही बाजूंनी झाली पाहिजे .सुखी वैवाहिक जीवनाचा हा मूलमंत्र म्हणता येईल .
मुख्य मुद्दा म्हणजे तात्विकदृष्टय़ा आपण सर्व गोष्टी मान्य करतो .मात्र प्रत्यक्षात त्या आचरणात आणीत नाही.दुसऱ्यानी बऱ्याच गोष्टी केल्या पाहिजेत असे आपण सहजपणे सांगतो.आपल्यावर जेव्हा वेळ येते तेव्हा आपण ते सोयीस्करपणे विसरतो.
*सविता वअतुल यांनी एकमेकांना बऱ्याच गोष्टींमध्ये सतर्क केले आहे .*
*दोघांनाही सर्वकाही तात्विकदृष्ट्या मान्य आहे .*
*व्यवहारात त्यातील किती उतरते त्यावर बरेच काही अवलंबून आहे .*
*तडजोड हे सुखी जीवनाचे सूत्र आहे हे विसरून चालणार नाही*
*दोघांचाही विवाह चांगल्याप्रकारे संपन्न झाला आहे *
*दोघेही परस्परांवर खूष आहेत*
*पाहू या पुढे काय होते ते*
*दोघेही एकमेकांच्या अपेक्षांना पूर्णपणे उतरतील. एकमेकांना पूर्णपणे समजून घेतील.एक आदर्श वैशिष्ठ्यपूर्ण संयुक्त कुटुंब म्हणून त्यांच्याकडे बोट दाखवता येईल अशी आशा आहे *
(समाप्त)
१२/६/२०१९©प्रभाकर पटवर्धन