अभिजीतने तयार केलेल्या योजनेप्रमाने सगळ्या गोष्टी घडत होत्या. अँजेलिना आणि लिसा ने त्यांचं काम चोख पार पाडलं होतं. अग्निसूर्याच्या शरीरावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यामूळे जॉनला अग्निपुत्राच्या सर्व योजनांची माहिती मिळत होती. सोबतच लहान रोबो त्यांच्या सर्व हालचाली स्कॅन करत होते.
"आता आपल्याला जे काही करायचं आहे ते एक आठवड्याच्या आतच, अशी संधी आपल्याला परत मिळणार नाही." जॉर्डन जॉनला म्हणतो.
"हो, पण आता आपल्याला आणखी सावधगिरी बाळगावी लागेल. अग्निपुत्राने जी घोषणा केली आहे, त्यानुसार आता सगळे देश आपला शोध घेत आहेत. एव्हान अमेरिकी आणि भारतीय लष्कर सोबत आहेत म्हणून आपण ही मोहीम यशस्वी करु शकू. खरं तर त्यांनी आपापल्या देशांसोबत न राहता आपल्यासोबत राहून खुप मोठी जोखीम घेतली आहे." जॉन म्हणतो.
"आता आपल्याला पुढे काय करायचं आहे?" लिसा तिथे येत विचारते.
"अर्धसर्पानुष्याला कशा प्रकारे मारता येईल एवढंच आपल्याला माहीत करुन घ्यायचं आहे. एकवेळ अभिजीत अग्निपुत्राला मारेल सुद्धा, पण ५०,००,००० एवढं सैन्य आपण सहजच नाही संपवू शकत" जॉन म्हणतो. थोड्या वेळाने तिथे अँजेलिना सुद्धा येते.
"काही समजलं का?" अँजेलिना विचारते.
"अजुन तरी काही नाही. मला एका गोष्टीचं विशेष वाटतंय, अग्निपुत्राने या सर्वांना जिवंत केलं तरी कसं? जिवंत केल तर केल, सोबत कधीही न मरण्याची शक्ती कुठून दिली त्याने?" लिसा विचारते.
"मला तर आता कोणत्याही गोष्टीचं आश्चर्य वाटत नाही." जॉर्डन म्हणतो.
"अभिजीत आणि तलवार व्यवस्थित आहे ना!" अँजेलिना विचारते.
"काळजी करु नकोस. आकाशातून एलियन सुद्धा आले तरी त्यांना सुद्धा तो सापडणार नाही." जॉन म्हणतो. अँजेलिना नंतर काही विचारत नाही. सगळे अग्निसूर्याची सीसीटीव्ही फुटेज बघतात.
दुसरीकडे संपूर्ण जग एकमेकांच्या जीवावर उठतात. अभिजीतला शोधण्यासाठी सगळे देश आपली पूर्ण शक्ती पणाला लावतात. अनेक मोठे देश एकमेकांसोबतचे करार रद्द करतात, तर लहान देश देवाकडे प्रार्थना करतात. पुन्हा एकदा कुणाला देव आठवतो तर कुणाला अल्लाह, कुणाला येशु आठवतो तर कुणाला निसर्गदेव आठवतात. पण यावेळी या सर्वांची प्रार्थना जगासाठी नसून स्वतःसाठी होती. जो तो फक्त स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होता.
संपूर्ण जगावर अर्धसर्पानुष्य सैन्याने पहारा ठेवला होता. प्रत्येक मनुष्याला एक पुरेल इतकी त्यांची संख्या झाली होती. मनुष्यापेक्षाही त्यांची संख्या वाढली होती.
तीन दिवसांनंतर
प्रत्येकाच्या हृदयाची धडधड वाढतच होती. कुणालाही अभिजीतच्या डोक्याचा केससुद्धा सापडला नव्हता. अर्धसर्पानुष्य तर मनुष्याला संपवण्यासाठी टपून बसले होते.
"काही सापडलं का?" लिसा जॉनला विचारते.
"बहुतेक, अग्निसूर्याचं त्याच्या काही सैनिकांसोबत संभाषण झालं होतं... कुठल्यातरी विचित्र भाषेत तो त्यांच्याशी बोलत होता... मी अँजेलिनाला बोलावलय. बघू... काही समजतय का ते..." जॉन म्हणतो. इतक्यात तिथे अँजेलिना येते.
"कधीचं फुटेज आहे?" कोणतीही औपचारिकता पार न पाडता ती थेट मुद्द्याचं विचारते.
"आज पहाटेचं आहे. त्याच्याजवळ काही सैनिक आले तेव्हा तो बोलत होता. सगळ्यांचे चेहरे गंभीर दिसत होते, वाटलं आपल्या कामाचं आसवं काही." जॉन म्हणतो.
"ठीक आहे. फुटेज प्ले करा." जॉन लगेच ते फुटेज प्ले करतो. अग्निसूर्य आणि त्याचे काही विश्वासु सैनिक काहीतरी महत्त्वाचं बोलत होते. बोलून झाल्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावर काहीतरी जिंकल्यासारखे भाव होते. सुदैवाने अँजेलिनाला ती भाषा ज्ञात होती. फुटेज संपल्यावर ती हसू लागते.
" अँजेलिना, काय झालं? काही महत्वाची माहिती मिळाली का?" जॉर्डन विचारतो.
"तो मुर्ख अग्निसूर्य आपल्या बाजूने आहे. त्याचे सहकारी म्हणत होते, 'आम्हाला तुम्ही पृथ्वीचे सम्राट म्हणून हवे आहात.' तर तो म्हणे, 'मला स्वतःला पृथ्वीचा सम्राट व्हायच आहे. फक्त एकदा अभिजीतने अग्निपुत्राला संपवल की आपल्यासमोर मनुष्यच शिल्लक राहतात. आपली सेना त्यांना सहजच मारु शकते. अग्निपुत्र मेला की मनुष्य प्राण्याला संपवायच, मग आपणच पृथ्वीवर सत्ता स्थापन करु.' आणि त्याने आणखी एक खुलासा केला आहे, तो म्हणजे अग्निपुत्र मेल्यानंतर आपण त्याला मारल तर त्यांचे ४ नवीन अर्धसर्पानुष्य तयार होणार नाहीत. म्हणजे आपण त्या सर्वांना मारु शकतो." अँजेलिना म्हणते.
"याचा अर्थ अग्निपुत्राला संपवण्यासाठी आपल्याला अग्निसूर्याची मदत घ्यावी लागेल तर..." लिसा म्हणते.
"हो. तर आता आपली योजना ही असेल की, अग्निसूर्याला आपल्या विश्वासात घेऊन अग्निपुत्रापर्यंत पोहोचायच. अग्निपुत्र संपला की अर्धसर्पानुष्याला आपले सैनिक आणि पोलिस बघून घेतील. आणि त्याला कसं पटवायचं ते मी बघते." असं म्हणून अँजेलिना त्या सर्वांना एक युक्ती सांगते. एका खास विमानाने तिला आफ्रिकेजवळील जंगलात सोडण्यात येतं. अर्धसर्पनुष्याचे सैनिक तिला ताब्यात घेत अग्निसूर्याकडे नेतात. अँजेलिना बेशुद्ध असल्याच नाटक करत असते.
"महाराज, ही मनुष्य स्त्री आम्हाला जवळच्या जंगलात सापडली. त्या दिवशी पत्रकारांमध्ये ही सुद्धा होती." एक सैनिक अग्निसूर्याला आठवण करुन देतो.
"अच्छा! तर हीच ती स्त्री आहे का? आज तर मी हिला संपवूनच टाकतो. पण ही इथे कशी?" अग्निसूर्य विचारतो.
"मला पाणी हवंय." क्षणातच अँजेलिना शुद्धिवर आल्याचं दाखवत म्हणते. एक सैनिक तिच्यासाठी पाणी घेऊन येतो. पाणी प्यायल्यावर अँजेलिना अग्निसूर्याकडे बघते "मला तुमच्याशी काही महत्वाच बोलायच आहे. तुमच्या सर्व सैनिकांना बाहेर जायला सांगा." अँजेलिनाकडे अभिजीतबद्दल काही माहिती असावी असा अंदाज बांधून तो आपल्या सर्व सैन्याला बाहेर जायला सांगतो.
"अभिजीत कुठे आहे हे मला माहीत आहे." अँजेलिना म्हणते.
"तो जिवंत आहे का?" अग्निसूर्य पुढे येत म्हणतो.
"रुद्रस्वामी माहीत आहे का तुम्हाला?" अँजेलिना.
"त्या नराधमाला मी इतक्या सहज कसं विसरेन? तुला त्याच्याबद्दल काय माहीत आहे?" अग्निसूर्य.
"अग्निपुत्राला त्यांनीच निर्माण केलं आहे. मनुष्याकडून जराशी चूक झाली, नाहीतर त्याने तुम्हाला संपवल असतं. असो, मनुष्याला संपवल्यावर तो तुम्हाला सुद्धा जिवंत ठेवणार नाहिये. सर्वांना संपवून तो पृथ्वी नष्ट करणार आहे." अँजेलिना त्याच्या भाषेत त्याच्याशी संवाद साधते, ज्याने अग्निसूर्याला तिच्या बोलण्यावर विश्वास बसतो.
"मनुष्य प्राण्यामध्ये तू समजूतदार आहेस. मी तुला अभय देतो. अग्निपुत्राचा वध व्हावा अशी माझी सुद्धा इच्छा आहे. तू माझ्यासाठी अभिजीतला अग्निपुत्राचा वध करायला सांगशील का? मी तुला माझ्या राज्यात मोठं पद देईन." अग्निसूर्य म्हणतो.
"तुम्ही जे सांगाल ते करायला मी तयार आहे." अँजेलिना म्हणते.