सुरगावचे पूर्वीचे वैभव आज उरले नव्हते. एक काळी ते लहानसे खेडे परंतु गजबजलेले असे. सुरगावचे नाव सर्वांना माहीत. कारण तेथील जमीनदार आनंदराव म्हणजे कर्णाचा अवतार. ते जमीनदार होते परंतु दिलदार होते; उदार होते. पुन्हा त्यांना नाना प्रकाराची हौस. गावात रामनवमीचा मोठा उत्सव असे; पुढे मारुतिजन्मही असे; त्या निमित्ताने कथाकीर्तन व्हायचे; कुस्त्या व्हायच्या; जत्रा भरायची. आनंदरावांच्यामुळे या सर्व गोष्टींना शोभा असे. ते खर्च करायला मागेपुढे पहात नसत. अनेकांचे आदरतिथ्य करतील; अनेकांची सोय लावतील.

आनंदरावांकडे घोडयांची एक जोडी होती. अशी जोडी आसपासच्या पाचपन्नास कोसांत नव्हती उंच, धिप्पाड, रुबाबदार घोडे; आणि आनंदराव त्या घोडयांच्या गाडीतून जायचे-यायचे. ते आपल्या गावी परत येताना दोन्ही हातांनी पैसे फेकीत यायचे. रस्त्याच्या दुतर्फा गोरगरीब माणसे त्यांच्या त्या रथाची वाट पहात बसत. सुरगावला जुनी वेस होती. केवढा उंच दरवाजा! त्याच्यावर चढून लोक वाट पहायचे. धूळ उडवीत येणारा तो रथ दूर दिसताच नगारा वाजे आणि गोरगरीब गावाबाहेर दुतर्फा जमत. दरवाजाजवळ ही गर्दी असायची आणि  आनंदराव यायचे. मुठी भरुन पैसे फेकायचे. लोक ते उचलून घेत. असे हे आनंदराव! देवाने त्यांना भरपूर दिले होते आणि  त्यांनाही सर्वांना द्यायची बुध्दी होती.

परंतु एकदा ते मुबंईला गेले होते. कोणा लक्षाधीशाकडे उतरले होते. तेथे मोठी मेजवानी होती. मेजवानीत एक पेय होते. कोणते; आहे माहित? उंची विलयती दारु! आणि आनंदरावांना तेथील बडया लोकांनी दारुचा पहिला पेला दिला. मुंबईच्या मित्राने त्यांना आणखी काही दिवस ठेवून घेतले. आनंदराव दारुचे भक्त बनले. मुबंईहून जाताना ते उंची दारु बरोबर घेऊन गेले.

आणि आता त्यांना ते व्यसन कायमचे जडले. तलफ येताच ते जिल्हयाच्या मुख्य ठिकाणी जायचे. अर्देसर शेटजींकडून दारु न्यायचे. ते घरी येताना आता शुद्धित नसत. पैसे उधळीत येणारा  तो उदारांचा राणा; तो आनंदराव आता उरला नव्हता. झिंगलेला आनंदराव चाबकाने घोडयांना रक्तबंबाळ करीत यायचा.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel