मला दारु दे, स्पिरीट दे. म्हणे जेवायला चला. मला दारू लागते, समजलीस. ती पोटभर मला पाज. मिलमधून सारा पगार आण. याद राख. तो नशेत बोलला. तिचे अश्रू थांबत ना. ती थकली होती. परंतु तिला भाकरी खाववेना. ती तशीच निजली. सकाळी तीच शिळी भाकरी घेऊन दोघं कामाला गेली. सीतेचा पगार आला. त्याने ताब्यात घेतला. तिच्या नेसूचे फाटले होते. परंतु कोण घेणार लुगडे? मागती तर मार खाती. आणि मिलच्या रेशनशॉपमधून धान्य आणी. परंतु पैसे दारूला. हवेत म्हणून तो त्याचा काळाबाजार करी. घरात भाकरीला. पीठ नाही. भाताला तांदूळ नाही. तो हॉटेलात राइसप्लेट खाई. सीतेला घरी उपवास. आठवडयाला आरंभी दोन, तीन दिवस घरात धान्य असे. पुढे तो ते नेई.
तिला दिवस गेले होते. आता तिला रजा होती. परंतु इतक्यात रजेवर कशाला आलीस?’ तो म्हणे नि अंगावर धावे. ती गिरणीत जाऊन म्हणे, येऊ द्या मला कामावर! तेथील अधिकारी म्हणे, कायद्याप्रमाणे ठेवता येत नाही. हाल, अपमान, उपासमार, पोटात बाळ वाढणार कसा? ती रडे. बाळंतपणाला तिला मुलखात कोण पोचवणार? माहेरी कागद कोण लिहिणार?
एका इस्पितळात ती बाळंत झाली. तिला मुलगा झाला होता. परंतु बाळाला पाहून तिच्या पतीला आनंद वाटला नाही. कोण वाटणार पेढे? कोण करणार बाळाचे कौतुक? दहा दिवस झाले. ती घरी आली.
मी हा मुलगा अनाथालयात नेऊन देतो. कशाला घरी ब्याद? त्याच्यासाठी पैसे कोठून आणायचे? माझ्या दारूच्या आड हे कारटे येईल. मी त्याला नेऊन देतो. घ्या, नाहीतर फेकून देईन असे सांगतो. ती संस्था घेईल तो म्हणाला.
काय बोलता तुम्ही? हे बाळ नेणार? सोन्यासारखे बाळ! मग मी कोणाला पाजू, कोणाला पाहू? बाळाला नेणार असाल तर माझे प्राणही घ्या.
तुझे प्राण घेतल्यावर दारूला पैसे कोठले? पोराची कटकट गेली म्हणजे तू कामाला लौकर जाशील. मला पैसे होतील आणि त्या पोराला गुंडाळून. चल आण लक्कन त्याने पोर उचलले तिने आकांत मांडला. गप्प बस. ओराडायचे नाही. वरवंटा घालीन टाळक्यात. गप्प. तुझा पोर काही मरत नाही. जगात वाढेल. घरीच मरायचा, आजारी पडायचा. त्या संस्थेत वाढेल.
मुलाला घेऊन तो गेला. पहाटेची वेळ. माटुंग्याच्या बाजूला तो गेला. तेथे संस्थेच्या दारात गुपचूप मूल ठेवून तो गेला. देवाचे वारे बाळाला अंगाई गीत म्हणत होते. भूमातेच्या मांडीवर बाळ झोपले होते. अनाथालयाच्या चालकांनी सकाळी ते बाळ नेले. बाळ चिमण्या डोळयांनी बघत होते. ते रडू लगले. कोण घेणार, पाजणार? परंतु संस्थेने काळजी घेतली. ते बाळ सर्वांचे प्रिय झाले, ते फार रडत नसे. जणू शहाणे होते. ती तरुण माता करूण दशेत होती. तिच्या मातृहृदयाच्या चिंधडया उडाल्या. तिला अन्न गोड लागेना. बाळाची आठवण येऊन पान्हा फुटे. ती झुरणीला लागली.