तो मुलगा असून नसल्यासारखा. तूच माझा मुलगा. शेवटचे दिवस येथे तुझ्याकडे जावोत. ते तेथे राहात होते. माझे व्यसन चालू होते. एकदा कचेरीतील ५०० रुपयांचा चेक वटवायला म्हणून निघालो. वाटेत दारू प्यालो. तो चेक कोठे पडला, गेला, कळलेही नाही. फजिती होती. बेअब्रूची पाळी होती. नोकरीही गेली असती. माझ्या बहिणीला मी तार केली की पाचशे रुपये पाठव, आणि बिचारीने पाठवले. बहीण सर्वांना आधार देत होती. माझ्यावर तिचे प्रेम होते. मीच तिला शिकवले होते. परंतु मी दारूत बुडालो.

वडिलांना फार वाईट वाटे. त्या पाचशे रुपयांची गोष्ट त्यांना कळली. लौकर डोळे मिटोत असे त्यांना वाटू लागले. ते शेवटी आजारी पडले. त्यांचे मन खचले. ते अंथरुणाला खिळले. माझ्या बहिणीने रजा घेतली. ती सेवा करीत होती. एके दिवशी वडील तिला म्हणाले.

‘गणपतीला बोलव. शेवटचे शब्द त्याला सांगेन. म्हणावं नातवालाही घेऊन ये त्याला शेवटचे पाहीन.

आणि बहिणीचे पत्र आले. मी मुलाला घेऊन बहिणीकडे गेलो. वडील अंथरुणावर होते. त्यांनी नातवाला जवळ घेतले. डोळयांत पाणी आणून ते म्हणाले.  तु लहान आहेस. देव तुझा सांभाळ करो. गणपती, अरे नीट वागतास तर या मुलाला काही कमी पडले नसते. परंतु तुझ्याजवळ दिडकी उरणार नाही. प्रभूची इच्छा. मी बोललो नाही. वडिलांचे पाय चेपीत बसलो. मी काही वाईट मनुष्य नव्हतो. परंतु एका दारूमुळे सर्वांची मान खाली व्हायला मी कारणीभूत झालो होतो. थोर पितृहृदयाला मी दुखवले होते, जखमी केले होते, ते पाप मला जाळी, ते मला पोळी. परंतु व्यसन सुटत नव्हते.

आणि ती रात्र आली. मी घरातून बाहेर पडलो. खूप दारू प्यालो. रात्रभर जवळ जवळ बाहेर होतो. एका मैदानात पडून होतो. बारा - दोनचा सुमार. थंडगार वारा होता. दंवही टपटप पडत होते. मी उठलो. अजून पुरी शुध्द नव्हती. आणि मी घरी आलो. सारे सामसूम होते.

माझ्या बहिणीने दाराला कडी लावली नव्हती. ती वडिलांजवळ बसलेली होती. दिवा मिणमिण करीत होता. वडिलांची प्राणज्योतही मंदावत चालली होती. मी त्यांच्याजवळ बसलो. मला एकदम रडू आले. मी मोठयाने काहीतरी बडबडून रडू लागलो. वाडयातील मंडळींस वडील गेले, असे वाटले.
शेजारची स्त्री-पुरुष माणसे दाराशी बाहेर जमली. माझी सत्वशील बहीण! सारे दु:ख नि फजिती गिळून ती शांतपणे बाहेर जाऊन त्या लोकांना म्हणाली.’अजून प्राण आहे. भावाला अनेक आठवणी येऊन त्याला हुंदका आला. निजा तुम्ही. तुम्हांला त्रास झाला'

शेजारची मंडळी गेली, झोपली. किती करुणगंभीर प्रसंग! केवढा फजीतवाडा! परंतु माझी बहीण धीरोदात्तपणे सारे सहन करीत होती. तोंडाने गीता म्हणत होती, आणि जवळच्या अंथरुणावर मी पडलो.

आता उजाडले होते. वडील शांत दृष्टीने पाहत होते. ‘गणपती’ त्यांनी हाक मारली.

‘काय?’    

‘माझ्या कपाळाला भस्म लाव. तुला लहानपणी रुद्र शिकवला होता. ते रुद्रमंत्र म्हण. ते पवित्र वेदमंत्र ऐकता ऐकता नि मनात म्हणता म्हणता मला मरण येवो.’

‘तुम्ही मला क्षमा करा.’ ‘पिता नेहमीच क्षमा करतो. क्षमा देवाजवळ माग. तो चांगली बुध्दी देणारा.’


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel