दारू म्हणजे राक्षस. दारू म्हणजे सत्यानाश, दारूपायी माणूस माणुसकीला गमावून बसतो. तो गटारात लोळतो. लाचार होतो. नको ही दारू, गणपतरावही सर्वांना तोच उपदेश करतात. ते त्या व्यसनात सापडले होते. परंतु प्रभुकृपेने आणि स्वत:च्या प्रखर निश्चयाने ते त्या व्यसनातून मुक्त झाले.
एकदा गणपतराव एका गावाला दारूबंदीच्या प्रचाराला गेले होते. प्रथम सेवादलाच्या मुलांनी दारूबंदीची गाणी, पोवाडे यांचा कार्यक्रम केला. स्त्री, पुरुषांची तुफान गर्दी जमली होती. मधेच कोणी उठून उभा राही आणि म्हणे, दारू पीना हराम है. पोवाडे ऐकून एक प्रकारचे नवचैतन्य सर्वांच्या मनात संचारले होते.
आणि आता गणपतराव उभे राहिले. तो साधा पोषाख. ती प्रसन्न कोमल मुद्रा, डोक्याला खादीचा रुमाल होता. अंगावर खादीचे उपरणे होते. ते बोलू लागले. लोक तन्मयतेने ऐकत होते.
खरेच मी सांगतो की दारूपासून दूर रहा. दारूमुळे छप्पन कोटी यादव आपसांत लढून मेले. या भारतभूमीत दारू नको. दारू सोडता येते. मीही दारू पीत होतो. त्या व्यसनात मीही बुडालो होतो. दारूचे व्यसन अनेक कारणांमुळे जडते. कधी मित्रामुळे, कधी रोगामुळे, कधी दु:खाचा विसर पडावा म्हणून मला का बरे लागले हे व्यसन? माझे पोट फार दुखे. नाना उपाय केले. परंतु पोटदुखी राहीना. मरण बरे परंतु नको वेदना, असे होई. एकदा एक मित्र म्हणाला.
थोडी दारू घेऊन बघा. कदाचित थांबेल वेदना. निदान विसर तरी पडेल.’ मला धैर्य होत नव्हते. परंतु एके दिवशी मी त्या दुकानात गेलो. दारू पाहिजे, असे शब्द तोंडातून बाहेर पडत ना. मी तसाच माघार गेलो. मनाला शरम वाटत होती. संकोच वाटत होता. शेवटी त्या मित्रानेच एके दिवशी ती वस्तू आणून दिली. पहिला पेला पोटात गेला. वेडेवाकडे तोंड केले. परंतु अखेर मला ती सवय लागली. पोटदुखी गेली नाही. हे व्यसन मात्र बळावत चालले.
माझे वडील मोठे कर्मठ. वेदविद्येत पारंगत. ते तिकडे कोकणात एकटेच असत. परंतु त्यांचे वय झाले होते. मी त्यांना माझ्याकडे आणले. ते देवपूजा करीत. लहान नातवाला खेळवीत. परंतु एके दिवशी मी कचेरीत गेलो होतो. घरी वडील काहीतरी शोधीत होते. तो त्यांना ती लपवून ठेवलेली बाटली दिसली. तो ग्लास दिसला. त्यांना ती गोष्ट असहय झाली. ते दिवसभर बैचेन होते.
मी रात्री घरी आलो. जेवायला चला’, मी त्यांना म्हटले.
मी येथे पाणीही पिणार नाही. मी येथून रात्रीच्या गाडीने जातो. दारू पिणाराकडे मी कसा राहू? तू येण्याची मी वाट पाहात होतो. मी वळकटी बांधून ठेवली आहे ते म्हणाले.
आणि ते खरेच गेले. माझी धाकटी बहीण शिकलेली होती. एका इंग्रजी शाळेत ती शिकवी. ती एकटीच होती. तिचा सर्वांना आधार. लहानपणीच तिचा पती निवर्तला. व्रती जीवन जणू ती जगत होती. ती सेवामूर्ती होती! माझे वडील तिच्याकडे गेले. ते तिला म्हणाले.