एक आटपाट गाव होते. त्याचे नाव मोदगाव. मोदगाव म्हणजे आनंदाचे गाव. सारे सुखी होते. कधी भांडण नाही, तंटा नाही. एकमेकांस मदत करीत. भाऊ भाऊ म्हणून सारे नांदत.
परंतु कोणी तरी त्या गावात दारू आणली. नवीन वस्तू! हळूहळू तिचे व्यसन लागले. गावात रोज उठून मारामारी नि कटकटी. स्त्रियांचे अश्रू संपत ना. मुलांचे हाल थांबत ना. गावाचे वैभव लोपले. गाव भिकारी झाला. शेते नीट पिकत ना. झाडावर फळे नीट येत ना, गुरे दूध देतनाशी झाली. विहिरी आटू लागल्या. गावात पाप फार झाले.
तो पाहा एक मुलगा दीनवाणा आहे. आई मरून गेलेली. बाप दारूडा. मुलगा त्या शेतात पडला आहे. नाही खायला. नाही ल्यायला. पहाटेची वेळ झाली. आकाशात कृत्तिकांचा पुंजका दिसत होता. कोठून तरी सुगंध आला. मुलगा जागा झाला. तो एका रथातून देवता जात आहे असे त्याला दिसले.
‘थांब, आई जगदंबे' तो रथापुढे होऊन म्हणाला.
‘काय रे बाळ?' ती विश्वमाता म्हणाली.
‘आई, आमच्या गावाची अशी का दशा? शेते-भाते पिकत नाहीत. गायी दूध देत नाहीत. आम्हा मुलांना खायला नाही. आयाबाया रडतात. मोठी माणसं भांडतात. का हे असे?
‘तुमच्या गावात दारू आली. जेथे दारू असते, तेथे मी भाग्य ठेवीत नाही. रात्रंदिवस सेवा करणा-या आयाबाया, त्यांच्या डोळयांतुन जेथे अश्रू गळतात, त्या गावाला मी शाप देते. ‘आमचा गाव दारू सोडील तर?’
‘पुन्हा भाग्य येईल. मोदगाव पुन्हा मोदाने, आनंदाने भरल्या
गोकूळासारखा गजबजेल.’
‘आम्ही तसे करू, आई.’
‘करा. पुन्हा उतू नका, मातू नका.’
मुलाने प्रणाम केला. भाग्यदेवतेचा रथ गेला. मुलगा तेथेच झोपला. आता उजाडले. पाखरांनी त्याला जागे केले. सूर्यकिरणांनी गुदगुल्या केल्या. तो उठला, गावात आला. सांगू लागला की, ‘मला देवता भेटली’ त्याच्याभोवती सारा गाव जमला, ती वार्ता ऐकून मायबहिणींचे डोळे भरुन आले. एक म्हातारी म्हणाली, ‘खरे आहे पोराचे म्हणणे. गावातील दारू दूर करा. पुन्हा सर्वांचे संसार सोन्यासारखे होतील. ’
त्रिपुरीपौर्णिमा जवळच होती. त्रिपुरासुरास शंकराने जाळले. शरीर, हृदय, बुध्दी या तिन्ही पुरांना व्यापणा-या दारूच्या असुराला नष्ट करायचे लोकांनी ठरविले. त्रिपुरी पौर्णिमेला दारूचा पुतळा करुन लोकांनी वाजतगाजत गावाबाहेर नेला नि जाळला. आणि परत येताना भाग्यदेवतेची पालखी मिरवत आणली. सारा गाव लतापल्लवांनी शृंगारला होता. सर्वजण रात्री टिप-या खेळले. गोफ विणला. ऐक्य, देवतेची गाणी म्हटली. प्रतिवर्षी त्रिपुरी, पौर्णिमेला दारूचा पुतळा जाळतात. भाग्यदेवतेचा उत्सव करतात. त्या दिवशी सारे प्रतिज्ञा करतात, गावात दारू आणणार नाही. कोर्टकचेरीत जाणार नाही. गावात ज्ञान, उद्योग प्रेम, स्वच्छता आणू, आणि पुन्हा त्या गावात भाग्य आले. मोदगाव मोदाचा झाला, तेथील लोक सुखी झाले. तसे आपण सारे होऊ या!!!