मी एका शेतात गेलो. दुपारची वेळ होती. मी माझी भाकर घेऊनच शेतात गेलो. मी झाडाखाली भाकर खात बसलो. आधी चारी दिशांना मी भाकरीचे तुकडे फेकले. फेकले नाही, अर्पण केले! आजूबाजूला किड्या-मुंग्या असतील. अदृश्य योनीही असतील त्यांना नको का थोडेसे द्यायला. एकटे खाणे हे पाप. प्राचीन काळापासून वेद ओरडून सांगत आहे. ‘केवलाघो भवती कैवलादि’ –‘जो केवळ एकटयाने खाईल तो पापरूप होईल.’ परंतु आज ऐकतो कोण? कावळे, चिमण्या, किडा-मुंगी, मांजर, कुत्रे यांनाही आपण जेवताना घास देणे हे तर दूरच राहिले; परंतु शेजारी भाऊ उपाशी असेल, घरातील गडीमाणसे उपाशी असतील इकडे तरी आपले लक्ष कोठे असते? थोर हिंदी संस्कृतीचे स्वरूप अजून आपल्या गळी उतरतच नाही. आपण सारे उदरंभर. आपलेच पोट भरणारे झालो आहोत.
तुकडे अर्पण करून मी जेवू लागलो. मी कावळ्याला हाक मारली. ‘मला सोबतीला ये’ म्हणून बोलविले. “काऽ काऽ का” हाक मारली. फारसे कावळे आजूबाजूला नव्हते. तरी पण तो पहा, एक आला. भीत भीत आला. मी त्याच्या भाषेत बोलू लागलो. तो आनंदला. “तुम्हाला येते आम्हा कावळ्यांची भाषा!” तो आश्चर्याने म्हणाला.
“हो, मला येते तुमची भाषा. आणि मला पशुपक्ष्यांची भाषा आवडते.” मी म्हणालो.
“आम्ही व आमची भाषा तुम्हांला आवडते? आम्ही तर नीच जातीचे, अति दुष्ट, आम्ही वाईट, लोभी, व्रणावर बसणारे! आम्हांला तर तुम्ही त्याज्य ठरवले आहे. तुम्ही मानवजातीचे असून अपवाद कसे? तुम्ही आमचा तिरस्कार नाही करीत?” त्या कावळ्याने विचारले.