“आलास का कावळोबा, केव्हापासून मी तुझी वाटच पाहत होतो. आम्हा माणसांबद्दल तुम्हा पशुपक्ष्यांना काय वाटते, ते मला समजून घ्यायचे आहे. कावळ्यांची प्रचंड सभा भरवायचे ठरले म्हणून मागच्या वेळी तू सांगितले होतेस.” मी विषयाला एकदम हात घालण्याच्या हेतूने दुस-या दिवशी जेवताना कावळ्याला बोलावून म्हणालो.
त्या कावळ्याने आदल्या दिवसाप्रमाणेच आपली चोच घासून पुसून जरा साफ केली आणि तो म्हणाला, “नर्मदातीरी कबीर वडावर सभा भरवण्याचे आमचे ठरल्याचे मागेच मी तुला सांगितले होते. त्या सभेला दक्षिण हिंदुस्थानातला एक कावळा अध्यक्ष नेमला. वय झाले तरी त्याचा रंग कुळकुळीत काळा होता. वृद्ध असून तेजस्वी, तेजस्वी असून क्षमावान्; मोठा दूरदर्शी, धोरणी असा तो होता. अध्यक्षांच्या स्वागतासाठी आम्ही मिरवणूक काढली. त्याला हजारो कावळे आले. अध्यक्ष येताच हजारो कावळ्यांच्या तोंडून “काऽका, काऽका!” असे आनंदोद्गार बाहेर पडले. सर्व वड चकचकीत काळ्या रंगाने भरून गेला. स्वागताध्यक्ष भाषणात म्हणाले, “हजारो वर्षांनंतर आपण पुन्हा एकत्र जमलो आहोत. मानव उठल्याबसल्या सभा बोलावतात. सभा म्हणजे त्यांची फॅशनच झाली आहे. आज गंभीर प्रसंग म्हणून आपण जमलो आहोत, आज कावळा जागा झाला आहे. आपल्यातील तरुण वर्गाने नवीन झेंडा उभारला आहे. त्यांच्या हृदयाला अपमान झोंबत आहे. मानवपशूने चालवलेली निंदा आपण हजारो वर्षे सहन केली, याचे त्यांना वाईट वाटत आहे. चित्त जळत आहे. रक्त उसळत आहे. पंख फडफडत आहेत. चोच शिवशिवत आहे. पण आपले पूर्वज रागाने बडबडले नाहीत तर तेही मानधन होते. मानवांनी चालवलेल्या निंदेची त्यांनी उपेक्षा केली. मनात मत्सर ठेवला नाही. मानवाची सेवाच करीत राहिले. आजच्या पिढीला हे शल्य सलत असेल, पण आपण विचारपूर्वक पाऊल टाकावे. अशा वेळी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी थोर अध्यक्ष लाभले हे सुदैव. त्यांची फार स्तुती मी करीत नाही. शब्दावडंबर हा मानव-पशूचा धर्म आहे. प्रदर्शन करणे, दंभ मिरवणे, सोंगे आणणे या त्याच्याच कला. आपण जमलो आहोत त्या वृक्षाचा इतिहास फार उज्वल आहे. हजारो पक्ष्यांची पूर्वी येथे वसाहत होती. सारे प्रेमाने नांदत होते. अशा या पवित्र वडावर शिखरारूढ होण्याची मी अध्यक्षांना विनंती करतो.”