जाता जाता मंडळी आत शिरली. देवाचे अफाट राज्य. तेथे हवा खाऊनच तृप्ती होत होती. तेथे मुंग्या, चिमण्या, मोर, कोकिळा, गाई, बैल दिसू लागले, परमेश्वराच्या मांडीवरही ती जाऊन बसत. देव त्यांना कुरवाळी. विचारी, “पुन्हा भूतलावर? माझा मनुष्य बाळ अजून सुधरत नाही. तुमचाच तो भाऊ. तो सुधरेपर्यंत त्याच्या साहाय्याला तुम्ही जायला हवे. तुम्ही जाता का?”
“हो देवा, हो, तुझी इच्छा प्रमाण. कसे झाले तरी तो आमचा भाऊ. त्याचाही उद्धार झाला पाहिजे. ईश्वरी इच्छेप्रमाणे वागावयास तो शिकला नाही तोपर्यंत आम्ही पुन्हापुन्हा खाली जाऊ, आणि एक दिवस आम्ही सारे तुझ्याजवळ येऊ.”
यमधर्माने ते सहा कावळे ईश्वराजवळ नेले. ते प्रभूच्या पाया पडले. देवाने त्यांचे पंख कुरवळले. विचारले, “का रे लौकर आलात?”
“देवा तुला पाहण्यासाठी. मनाची शंका फेडण्यासाठी. परंतु शंका नाहीशी झाली. आम्ही जातो. आमच्यावर सोपवलेली कामगिरी करतो. प्रभू, तुझी इच्छा प्रमाण.”
“जा बाळांनो, मी तुमच्या हृदयात प्रेरणा ठेवली आहे. त्याप्रमाणे वागा. मोहात पडू नका. दमलात म्हणजे मी परत बोलवीन हो. जा.” असे म्हणून प्रभूने त्यांना निरोप दिला.
यमधर्माचा निरोप घेऊन आमचे सहा दूत परत आले व त्यांनी पाहिलेले दृष्य आम्हांस निवेदन केले. आम्ही सर्वांनी, माणूस नाचतो म्हणून आपण नाचायचे, ह्या धोरणाचा स्पष्ट शब्दांत निषेध केला. तरुणांनाही सारे पटले. मनुष्य कितीही नालस्ती करो, आपण प्रभूमय जीवन कंठावे, आपले काम करावे, असे आम्ही ठरवले. आम्ही सारे आपापल्या प्रांती गेलो. पूर्वीप्रमाणे वागू लागलो. समजलास मुला. मी आता जातो. माझे ते दोन वृद्ध मित्र आजारी आहेत अजून.” तो कावळा म्हणाला.
“कावळोबा, हा भाकरीचा तुकडा जा घेऊन त्या वृद्ध मित्रांसाठी!” मी त्याला भाकरीचा तुकडा देत म्हणालो.
“ठीक आहे, नेतो. त्या वृद्ध काकांना आनंद होईल. तू नीट वाग. ईश्वराच्या इच्छेप्रमाणे वाग.” तो म्हणाला.