स्वागताध्यक्षांच्या भाषणानंतर सभेस रीतसर सुरवात झाली. एक तरुण संघाचे उत्साही कार्यकर्ते प्रथम बोलावयास उठले. सर्वांनी पंख फडफडवले व त्यांचा जयजयकार केला. ते म्हणाले, “आजपर्यंत आपल्या जातीने कमाल सहनशीलता दाखवली. जगात जो जो तुम्ही मवाळ व्हाल, तो तो जग तुम्हांला दडपील. या माणसाने सा-या गरिबांची पायमल्ली चालवली आहे. तो कोकरांचा, कोंबड्यांचा बळी देतो, सिंह-वाघाचा देत नाही. मऊ लागले म्हणजे जग कोपराने खणू लागते.  क्षमावृत्ती ही तरुणांना लाजिरवाणी. आपण काळे आहोत म्हणून आपली निंदा. आणि हिंदुस्थानातल्या मानवाने का काळ्या रंगाची निंदा करावी? सर्व रंगांच्या पलीकडे असणारे चैतन्य एक आहे, हे याच देशात ना सांगितले? आणि यांचा देव तरी पाहा, शालिग्राम तर काळा असतो. गंडकीची काळी शिळा. तिच्या सुंदर मूर्ती करतात. काळ्या संगमरवरात तोंडदेखील दिसते. यमुनेचे पाणी काळे आहे. मानव भराभर ग्रंथ लिहितो ती शाई काळीच. मेघाचा रंग काळा. काळी चंद्रकळा यांना आवडते, काळ्या फळ्यावर यांचे शिक्षण. कुणा धर्मोपदेशकांचे झगे काळे. काळी कपिला पवित्र. बुक्का काळा असतो. कस्तुरी काळी असते. काळे डोळे गहन आणि सुंदर असतात. सुंदर केसांचा रंग काळा असतो. शेतक-याची घोंगडी पांघरणारा कृष्ण काळा, रामही काळा. काळा रंग सुंदर आहे, पवित्र आहे, पण हा मानव आमच्या डोळ्यांची थट्टा करतो. एकडोळ्या म्हणतो, एक बुबुळ नाचवून आम्ही दोन बुबुळांचे काम करतो. बुबुळ एक असले, तरी  नजर कशी तीक्ष्ण असते. एक बुबुळ नाचवून आपण ईश्वराची काटकसर करतो. माणसांची नाके बसकी, फताडी, फुगीर! त्यापेक्षा आपली चोच किती चांगली! या माणसांना समाजात वेगवेगळया भाषा, त्या आपल्या शब्दापेक्षा किती कर्कश! मानवांची रोजची भांडणे ऐकून आपले कान किटत चालले आहेत, मिरवणुकीत ओरडत आहेत, प्रेतयात्रेत हेल काढताहेत, क्रीडांगणावर आरोळ्या ठोकीत आहेत. नाना प्रकारचे विचित्र आवाज काढणारा हा प्राणी.  पण लहानपणी हा जेवताना याची आई आम्हांसच बोलावते. गोष्टी आमच्या, गाणी आमची. पण हा उपकार स्मरत नाही. मोठेपणी हा कृतघ्न मनुष्य आम्हांसच दुष्ट म्हणतो. म्हणे कावळा लबाड, धूर्त! काय फसवले बा यांना आपण? केव्हा यांची कोठारे लुटली? केव्हा खोटीनाटी भांडणे लढलो? खोटे दस्तऐवज केले, दिलेली वचने मोडली, झालेले तह गुंडाळले? स्वत: लबाड म्हणून त्याला आपण लबाड दिसतो. तसे पाहिले तर आपल्यात केवढा बंधुभाव. शेजारी चिमण्या असोत, पोपट-मैना असोत, आम्ही कधी भांडत नाही. मनुष्य दुबळ्यांना चिरडतो, रडवतो, गांजतो. बायकांना छळतो. नोकरांना, मजुरांना गांजतो. आम्हांला का दुबळ्या चिमणीच्या थोबाडीत मारता नसती आली?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel