१९८१

सर्वभावें शरणागत । जाहलों निश्चित कृपाळु ॥१॥

आतां कळे तैसे करीं । तुम्हीं उदार श्रीहरी ॥२॥

मी आलों असे शरण । कृपा करणें उचितची ॥३॥

शरण एका जनार्दनीं । ऋद्धिसिद्धि तुमचे चरणीं ॥४॥

१९८२

शरण आलों तुझियां पायां । कॄपानिधी देवराया ॥१॥

पशु उद्धरिलें गजासी । गणिका नेली वैकुंठासी ॥२॥

ऐसा कृपेचा कोंवळा । भक्ता अधीन गोपाळा ॥३॥

एका जनार्दनीं शरण । हीच लाधली निजखुण ॥४॥

१९८३

अहो देवा गुणनिधाना । परिसा विज्ञापना माझी एक ॥१॥

माझें मज आश्वासन । देखिल्या चरण तुमचे ॥२॥

हेंचि माझी करुणा करा । भक्ति अवधारा भोळी ते ॥३॥

शरण एका जनार्दनीं । माझा विनवणी परिसावी ॥४॥

१९८४

तुझिया कृपेचें पोसणें मी दीन । करीं तुं जतन जनार्दना ॥१॥

अंकित मी दास कायामनेंवाचा । हेलावा कृपेचा करी देवा ॥२॥

कदा नुपेक्षिसी आलिया शरण । हें मागोनी महिमान चालत आलें ॥३॥

एका जानार्दनीं कॄपेचा वोरस । करी जगदीश मजवरी ॥४॥

१९८५

मज तों अधिकार नाहीं । शरण आलों तुझें पायीं ॥१॥

तुम्हीं पशु गजातें उद्धरिलें । गणिके तारिलें कुंटनीसी ॥२॥

ऐशी शरणागत माउली । एका जनार्दनीं साउली ॥३॥

१९८६

माझे मनोरथ चरणाची आवडी । दुजियाची जोडी नको आतां ॥१॥

वाउगा पसारा नका गोऊं मन । चरणाशी जाण स्थिर होय ॥२॥

एका जनार्दनीं पुरवी वासना । दुजें नारायणा नको कांहीं ॥३॥

१९८७

भक्ति माझी भोळी । भाव एकविध बळी ॥१॥

अहो परिसा नारायणा । जाणोनि अंतरीच्या खुणा ॥२॥

नाहीं तुम्हा सांकडें कायीं । भुक्तिमुक्ति मागणें तेंही ॥३॥

शरण एका जनार्दनीं । माझीं विनवणी परिसावी ॥४॥

१९८८

सर्वाभुतीं तुझें रुप । हृदयीं सिद्धची स्वरुप ॥१॥

इतुलें देईं अधोक्षाजा । नाहीं तरी घोट भरीन तुझा ॥२॥

सकळांहुनी कई सान । सकळिका समसमान ॥३॥

सदा द्यावा संतसंग । अखंड कीर्तनीं अनुराग ॥४॥

निःशेष दवडोनियां स्वार्थ । अवघा करीं परमार्थ ॥५॥

एका जनार्दनीं मागें । नाहीं तरी घाला घालीन अंगे ॥६॥

१९८९

जेथें मुख्यत्वें करावी भक्ति । घडावी संतांची संगती । हेंचि मागणें तुम्हाप्रतीं । द्यावें निश्चिती मज देवा ॥१॥

पुरवा पुरवा माझा हेत । दुजें मागणें नाहीं निश्चित ॥धृ॥

आयुष्य अंतवरी नामस्मरण । गीता भागवताचें श्रवण । विष्णु शिवमूर्तींचें ध्यान । हेंच देणें सर्वथा ॥२॥

ऐकोनी ऐसें वचन । जनार्दन तुष्टला प्रेमें करुन । एका जनार्दनीं पाय धरुन । सप्रेमें आलिगिंला ॥३॥

१९९०

देव तुष्टला मय दे घे । तुजावांचुनी कांही नेघे ॥१॥

देवा इतुली कृपा करीं । जो मी तुझा घोट भरीं ॥२॥

आणिक कांहीं मागेन जरी । तरी मज दंडावें हरी ॥३॥

वैकुंठ देई रे एका । तो तंव फोडीव फटका ॥४॥

क्षीरसागर शेषशयन । इतुकें न दे चाळवण ॥५॥

सोहं पद विसावून । देतां घेतां लाजिरवाणें ॥६॥

एका जनार्दनीं तुष्टला । सकल सर्वांगी घोटला ॥७॥

१९९१

तुमचें जाहलिया दरुशन । जन्ममरण फिटला पांग ॥१॥

आतां धन्य जाहलों करुणाकरा । विश्वभंरा दयाळुवा ॥२॥

मागें कासविसक बहु जाहलों । दरुशनें पावलों सुखातें ॥३॥

एका जनार्दनीं कृपा केली । फळाची आली सर्वस्वे ॥४॥

१९९२

भाग्यहीन बहु असती । कमळापती सांभाळणें ॥१॥

गर्जें ब्रीदाची तोडर । चराचर त्रिभुवनीं ॥२॥

शरणागतां वज्रपंजर । हा बडिवार त्रिजगतीं ॥३॥

शरण एका जनार्दनीम । कैवल्यदानीं उदार ॥४॥

१९९३

ज्याचा केला अंगीकार । न मानी भार त्याचा हा ॥१॥

अरिमित्रां सम देणें । एकचि पेणें वैकुंठ ॥२॥

उत्तर मध्यम चांडाळ । देणें स्थळ एकची ॥३॥

एका जनार्दनीं भाकी कींव । उद्धारा जीव पातकी ॥४॥

१९९४

आम्हीं तो वासना भाजियेली बळें । वैराग्याचोनि बळेंक आथियलें ॥१॥

सांडिला वेव्हार माया लोकाचार । भरला निर्धार हृदयामाजी ॥२॥

एका जनार्दनीं खुंटली भावना । जनीं जनार्दना अभ्यासिलें ॥३॥

१९९५

माझें देईं मजलागुन । म्हणोनि दृढ धरिले चरण ॥१॥

भक्तीचें ऋण देवा । देई माझें मज केशवा ॥२॥

माझें देतां जड काई । अभिलाषेंक धरीन पायीं ॥३॥

एका अभिलाषें फावला । एका जनार्दनीं उभा केला ॥४॥

१९९६

जाईल तरीं जावो प्राण । परी मी न सोडी चरण ॥१॥

ऐसा विश्वासलों हरीं । नाम तुमचें कंठीं धरीं ॥२॥

होईल एं होवो साचा । परी न संडो नाम वाचा ॥३॥

चित्त वेधलें चिंतनीं । शरण एका जनार्दनीं ॥४॥

१९९७

ऐके गा हृषीकेशी । जाणोनि तुं विश्वासी । निजगुह्मा तुजपाशी । ठेवणें दिधलें ॥१॥

आम्हां चाळवोनि विषयासी । थितें बुडवूं पाहासी । क्रियानष्ट होसी तूंचि येक ॥२॥

आमुचें आम्हां देता । तुज कां नये चित्ता । लाजसी तत्त्वतां । भक्ति घेसी ॥३॥

नेतां पंचापाशी । भले नव्हें हृषीकेशीं । मजसी समान होसी । एका जनार्दनीं ॥४॥

१९९८

वेव्हाराच्या ठाई । तुझें न चले कांहीं । मी तूं दोघे पाहीं । सरिसें तेथें ॥१॥

ठेविलें बुडविसी । शेखी जाबही न देसी । ऐकोन नायकसी । गहिंसपणें ॥२॥

खवळलों तरी जाण गिळीन मीतूंपण । तेथें देवपण । उडवीन तुझें ॥३॥

जो सांगे पांचापाशीं । त्याचें तोडं तूं धरिसी । ठकडा कैसा होसी । म्हणे एका जनार्दनीं ॥४॥

१९९९

जीहीं जाणितलें वर्मासी । त्याचें दास्य करिसी । गर्भवास सोसिशी । त्याचें साठी ॥१॥

घर कुंटुंब ना आभावो । गांव न तुज ठावो । सोलाट तुं पाहा हो । लागला जगीं ॥२॥

बहुतांचें ठेवणें । बुडविलें येणें । शेख जीव घेणें । मागत्यासी ॥३॥

मायबापेंविण । वाढला हा जाण । शरण एका जनार्दनीं । जाती गोतपणें ॥४॥

२०००

होतां द्वारपाल लाज वाटे थोरी । न साहे भिकारी जाला हरी ॥१॥

बळीच्या तो द्वारी सारथीं पर्थाचा । गोसावी आमुचा वेदवाणी ॥२॥

गर्भ न साहाती यातायाती जना । एका जनार्दनीं शरण वेगें ॥३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel