१९४१

हीच मुख्य उपासना । तुमच्या चरणां दंडवत ॥१॥

गुणदोष पाहुं नका । कीर्तनीं सुखा लुटवें ॥२॥

संतचरणीं सदा भाव । करा वाव संसार ॥३॥

लडिवाळ जनार्दनीं एका । कीव देखा भाकितसे ॥४॥

१९४२

कैं मनींची इच्छा पुरेल ही धांव । पाहीन पंढरीराव जाऊनियां ॥१॥

आलीया जन्माचें होईल सार्थक । निवारेल दुःख भव पीडा ॥२॥

कैं हें मस्तक ठेवीन चरणीं । पाहीन डोळे भरुनी श्रीमुख तें ॥३॥

एका जनार्दनीं कैं होईन पात्र । नासेल समस्त तापत्रय ॥४॥

१९४३

माहेरींची वास पाहीन मी डोळां संतांचा पैं मेळा येतां देखें ॥१॥

घालुनी दंडवत लागेन मी पायीं । जीव हा उतराई करुनी सांडीं ॥२॥

कुर्वडीन काया तयावरुन भावें । जीवें वोवाळावें जीवलगा ॥३॥

आषाढी कार्तिकी प्रेमे करिती वारी । तयांची मी थोरी काय वानुं ॥४॥

एका जनार्दनीं धन्य ते दैवाचे । निरंतर वाचे विठ्ठलनाम ॥५॥

१९४४

मागणें हेंचि माझे देवा । दुजेपा दुरी ठेवा ॥१॥

मी तुं ऐसी नको उरी । जनार्दना कृपा करी ॥२॥

रंक मी एक दीन । माझें करावें स्मरण ॥३॥

नीच सेवा मज द्यावी । एका जनार्दनीं आस पुरवावी ॥४॥

१९४५

आम्ही दीन तूं दीनानाथ । तिहीं लोकीं तुझी मात ॥१॥

आम्ही पतित तूं पावन । ऐसें साजे नामभिधान ॥२॥

आम्ही अनाथ तूं कैवारी । ऐसे तुझी आहे थोरी ॥३॥

आम्ही दीन तूं वत्सल । ऐकीला तो ऐसा बोल ॥४॥

नको धरुं दुजे आतां । कृपाळु तूं दीनानाथा ॥५॥

एका शरण जनार्दनीं । ऐसें चालत आलें दुरुनी ॥६॥

१९४६

संपत्ती संतती मजला नावडे । स्वरुप आवडें तुझें देवा ॥१॥

तुझ्या रुपी सुख माझिया लोचनां । आणिक नारायणा न पाहती ॥२॥

हस्त इच्छिताती तुज भेटावया । सेवाहि कराया सर्व काळ ॥३॥

चित्त जडलें पायीं सदा सर्वकाळ । राहिली तळमळ तयाची ते ॥४॥

एका जनार्दनीं तुझें नाम मुखीं । नको अणिका सुखीं गोवुं मज ॥५॥

१९४७

वारंवार संतसंग । गाऊं अभंग हरि नाम ॥१॥

वाचे किर्ति पाय पंथीं । आणिकांची स्तुति न गाऊं ॥२॥

एकविधपणें राहूं । वाचे गाऊं विठ्ठल ॥३॥

एका जनार्दनीं सेवा । तुमचें देवा दास्यत्व ॥४॥

१९४८

मज तो आणिक नाहीं चाड । येवढी जोड पायांची ॥१॥

वास द्यावा पंढरीचा । संतांचा समागम ॥२॥

कीर्तनीं नाचेन महाद्वारी । गरुडपारी कान धरुनी ॥३॥

ऐसें लडीवाळ तान्हें । एका जनार्दनें पोसणें ॥४॥

१९४९

माझें मन राखोनी पायीं । करा समाधान देहीं ॥१॥

हेंचि मागतों साचार । वारंवार जोडोनी कर ॥२॥

ब्रह्माज्ञानाची आटी । नका योगाची कसवटी ॥३॥

भुक्ति मुक्ति नका आड । ब्रह्मा सायुज्यता भीड ॥४॥

लागती चरणा । शरण एका जनार्दना ॥५॥

१९५०

माझें मन अति चंचळ । त्यासी बांधा तुम्हीं सबळ ॥१॥

मग तें कोठें नव जाय । तुमचे सोडोनियां पाय ॥२॥

सुखदुःखाचेम कारण । मनचि हें अधिष्ठान ॥३॥

एका जनार्दनीं शरण । मनें मनासी बंधन ॥४॥

१९५१

माझें मन राहो तुझे पायीं । वास पंधरीचा देई ॥१॥

जन्न्म देशी भलते परी । वाचे राम विठठल हरी ॥२॥

जन्मासी या भिणें । हें तों आम्हा लाजिरवाणें ॥३॥

मोक्ष मुक्तिंतें देवा । नको गोऊं तयाठाया ॥४॥

म्हणे जनार्दनीं एका । संतसंग द्यावा निका ॥५॥

१९५२

वाउगे बोल जाती वायां । पंढरीराया कृपेविण ॥१॥

तुमचा छंद वसो मनीं । संतचरणीं वास सदा ॥२॥

नको आत्मस्थिति वायां शीण । तुम्हांवीण दयाळा ॥३॥

एका जनार्दनीं शरण । मनाचें मोहन तुम्ही माझें ॥४॥

१९५३

जेथें जेथें मन जाईल वासना । फिरवावें नारायण हेचि देई ॥१॥

वारंवार द्यावा नामाचा आठव । कुबुद्धिचा ठाव पुसा सर्व ॥२॥

भेदाची भावना तोडावी कल्पना । छेदावी वासना समूळ कंद ॥३॥

एका जनार्दनीं नका दुजा छंद । रामकृष्ण गोविंद आठवावा ॥४॥

१९५४

येवढा पुरवा मनींचा छंद । वाचे गोविंद आठऊं द्या ॥१॥

मग मी तुमच्या न सोडीं पायां । कारीन काया कुर्वंडीं ॥२॥

वारंवार क्षणक्षणा । संत चरणीं वंदीन ॥३॥

दुजा नका काहीं हेत । एका जनार्दनीं मागत ॥४॥

१९५५

मागणें तें एक आम्हांप्रती द्यावें । निरंतर यावें जागरणा ॥१॥

या हरिदासांचा संग बरवा । आनंदें राघवा गाऊं गीतीं ॥२॥

जो न लभे तप तीर्थदानीं । तो हरिकीर्तनीं तिष्ठातसे ॥३॥

जनार्दनाचा एका म्हणे । कृपा करणें जागरणें ॥४॥

१९५६

सर्वभावें विनवणी । मस्तक चरणीं देवाच्या ॥१॥

सदा रुप पहावें डोळां । वाचे चाळा हरिनाम ॥२॥

निजध्यास कीर्तनाचा । समागम तो संतांचा ॥३॥

एका शरण जनार्दनीं । ठाव मागतसे चरणीं ॥४॥

१९५७

आमुच्या निजसुखधामा । तुझें चरण पुरुषोत्तमा ॥१॥

आम्हांवरी कृपा करा । उद्धरा दातारा दीनासी ॥२॥

देऊनियां नाम कीर्ति । वसवा मूर्ति हृदयीं ॥३॥

एका शरण जनार्दनीं । ठाव मागतसे चरणी ॥४॥

१९५८

तुमचे वर्णितं पोवाडे । कळिकाळ पायां पडे ॥१॥

तुमचे वर्णिती बाळलीला । तें तुज आवडे गोपाळा ॥२॥

तुमचें वर्णील हास्यमुख । त्यांचे छेदिसी संसारदुःख ॥३॥

तुमचे दृष्टीचे दरुशन । एका जनार्दनीं तें ध्यान ॥४॥

१९५९

कांहीं न करुं आणिक आन । वाचे गुण गाऊं तुमचे ॥१॥

पाहुं डोळेभरी मुख । तेणें सुख इंद्रियां ॥२॥

न करी कोना ताडातोडी । आहे खोडी दूर करुं ॥३॥

एका जनार्दनीं प्रमाण । वाचे नारायण आठवुं ॥४॥

१९६०

श्रवणीं ऐकेन तुमचें गुणनाम । वाचे आणिक काम न करीं न कांहीं ॥१॥

डोळें भरुनियां पाहीन श्रीमुख । सुखाचें तें सुख हृदयांत ॥२॥

अष्टभावें कंठीं दाटेन सगद्रद । सांडोनी भेदाभेद आन देवा ॥३॥

एका जनार्दनीं यापरतें प्रेम । आन नाहीं विषम मजपाशी ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel