२४२१

कल्पित देह कल्पित प्रबंध । कल्पित षट् चक्रमाळा ।

कल्पित धारण कल्पित सुषुम्ना । कल्पित मेरुमंडळ रे ॥१॥

कल्पित छांडो कल्पित छांडो । निर्विकल्प वृत्ति मांडो ।

सहजीं सहज भरपुर भरले । देह विदेह दुरी छांडो ॥धृ॥

कल्पित द्विदळ कल्पित चतुर्दळ । कल्पित अष्टकमळ कल्पित ।

द्वादश कल्पित षोडश । कल्पित ते सहस्त्र दळ रे ॥२॥

कल्पित श्रीहट कल्पित गोल्हाट । कल्पित औठ पीठ कल्पित भ्रमरगुंफा ।

कल्पित हंसपद कल्पित योग अचाट रे ॥३॥

कल्पित शिव कल्पित शक्ति । कल्पित ते निजप्राप्ति ।

जनार्दनीं निजकल्पयोगें । सहज चैतन्य निज शांति रे ॥४॥

२४२२

खांबसुत्राची बाहुली । सुत्राआधीन उगली ॥१॥

माझें मीपण नाहीं स्वतंत्र । क्रियाकर्म ते परतंत्र ॥२॥

बाहुलीये नाहीं स्वतंत्रता तैसा नव्हे कर्म कर्ता ॥३॥

एका एकपणाचे सूत्र । जनार्दनपायीं स्वतंत्र ॥४॥

२४२३

वदे तोचि कल्पित शास्त्र तें शाब्दिक । पुराणा सकळिक बाष्कळचि ॥१॥

बाहुली तो जीव सुत्रधारी तो शिव । मिथ्याचि हे भाव जग सर्व ॥२॥

येथें कैंचा मुक्त मुळींच नाहीं बद्ध । सर्वहि अबद्ध दिसे जें कां ॥३॥

एका जनार्दनीं ऐसी याची खूण । जाणें तोचि धन्य गुरुपुत्र ॥४॥

२४२४

जेथें निरसोनियां द्वैत म्हणताती अद्वैत । त्याहुनी अतीत स्वरुप माझें ॥१॥

तें मी लक्ष्याही लक्ष्य पराचेंही पर । जेथें वेदशास्त्रें लाजोनी गेलीं ॥२॥

गिळोनी अज्ञान निखळ म्हणती ज्ञान । उभयाहुनी भिन्न स्वरुप माझें ॥३॥

सच्चिदानंदा प्रतिपादिती वेद । याहुनी अगाध स्वरुप माझें ॥४॥

निरसूनियां कर्म म्हणती परब्रह्मा । याहुनी उत्तम स्वरुप माझें ॥५॥

माया आणि ममत्व निरसुनी शुद्ध सत्त्व । सत्त्वाचें निजसत्व स्वरुप माझें ॥६॥

जेथें पद आणी पिंड अभिन्न अखंड । त्याहुनी उदंड स्वरुप माझें ॥७॥

जेथें शुद्ध आणि शबल म्हणताती केवळ । याहुनी निर्मळ स्वरुप माझें ॥८॥

ब्रह्मा स्फुरण स्फुर्तीचि कारण । याहुनी परतें जाण स्वरुप माझें ॥९॥

एका जनार्दनीं एकपणा अतीत । चित्ताचें अचिंत्य स्वरुप माझें ॥१०॥

२४२५

देव जाला पाठींपोटीं । तया नाहीं आटापाटी ॥१॥

जेथें जाय तेथें देव । नाहीं भेव सर्वथा ॥२॥

संसारासी मारुनी लाथा । केला तत्त्वतां देशोधडी ॥३॥

विषयांचें ठेचिलें तोंड । मोडिलें बंड पांचाचें ॥४॥

जनार्दनाचा एक म्हणे । देवा पाहणें पाठींपोटीं ॥५॥

२४२६

साचपणें देवा शरण पैं जाती । तया वैकुंठपती विसरेना ॥१॥

जैसी कन्या दुरदेशीं एकटी । रात्रंदिवस संकटीं घोकी मायबाप ॥२॥

पतिव्रतेचें सर्व मन पतिपायीं । तैसा देव ठायीं तिष्ठतसे ॥३॥

एका जनार्दनीं मज हा अनुभव । जनार्दनें देव दाखविला ॥४॥

२४२७

नेणतिया ठायीं पाहुं जाय देवा । तों अवघें या केशवा व्यापियेलें ॥१॥

नेणतपण गेलें पाहतां पाहणें पडियेलें टक । अवघाचि हरिख वोसंडला ॥३॥

एका जनर्दनीं पडियेलें टक । जाणतां नेणतां सर्वाभुतीं देख ॥४॥

२७२८

जाणती हे कळा हारपोनि गेली । वृत्ति मावळली तयामाजीं ॥१॥

पाहतां पहाणें हारपोनि गेलें । मी माझें सरलें तयामाजीं ॥२॥

अंतर बाहेरीं पाहतां शेजारीं । शून्याची वोवरी ग्रासियेली ॥३॥

ग्रासियेलें तेणें चंद्र सुर्य दोन्हीं । एका जनार्दनीं आनंद झाला ॥४॥

२४२९

सत्त्व रज तम गेले निरसोनी । दृश्याची लावणी कैशी झाली ॥१॥

गेलिआ माघारीं पाहतां न दिसे । स्वतः तो प्रकाशे सदोदित ॥२॥

अंतर बाहेरीं पाहतां शेजारीं । प्रकाशतां अंतरीं लखलख ॥३॥

एका जनार्दनीं प्रकाश संपुर्ण । सर्व नारायण बिंबलासे ॥४॥

२४३०

चित्त चैतन्य पडली गांठी न सुटे मिठी । संचित कर्माचि झाली आटी उरफाटी दृष्टी ॥१॥

कैंचा आठव दृश्याचा । खुंटली वाचा उदय झाला सुखाचा ॥२॥

देह विदेह वाढिलें मीतूंपणे । एका जनार्दनीं सहज एकपणें ॥३॥

२४३१

देखिलें कंदर्पाच्या बापा । आम्हीं नेणों पुण्य पापा ॥१॥

कैंचे पाप कैंचे पुण्य । देह नामें पडलें शून्य ॥२॥

शुन्य म्हणताती बिंदुलें । तेंचि विश्वाकार झालें ॥३॥

एका शुन्याचा विस्तारु । जनार्दनींक जगदाकारु ॥४॥

२४३२

ध्येय ध्यातेविण ध्यान । ज्ञेय ज्ञातेविण ज्ञान ॥१॥

ऐसें जनार्दनाचें ध्यान । साधनांचें निज साधन ॥२॥

साध्य साधनेंविण साधणें । दृश्य द्रष्टत्वेंविण देखिणें ॥३॥

बोल बोलणेविण बोलणें । एकाएकी जनार्दनें ॥४॥

२४३३

नेत्राचेनीं तेजें पोळला चंडाश । नभचि नाहीं तेथें कैंचे अवकाश ॥१॥

रात्र हारपली पाहुं मी कोठें । दिवस रुसुनी गेला पहातां न भेटे ॥२॥

अंगाचेनी तेजें डोळा आली चवी । पाहुं गेलों तंव बुडाला रवी ॥३॥

एका जनार्दनीं पाहतां पाहणें । रात्रंदिवस दोन्हीं गेलें हरपोन ॥४॥

२४३४

जळ स्पर्शा जाता स्नानीं । तंव चिन्मात्र भासे जीवनीं ॥१॥

कैसी वहाताहे गंगा । स्नानीं हारपलें अंगा ॥२॥

अंगत्व मुकलें अंगा । स्नानीं सोवळी जाली गंगा ॥३॥

एका जनार्दनीं मज्जन । सकळ तीर्थे जालीं पावन ॥४॥

२४३५

येणें जानें खुंटलें क्रियाकर्म ठेलें । मज माझें भेटलें आत्मरुप ॥१॥

त्यागुं तें काय भोगुं तें काय । सर्व ब्रह्मारुप पाहे कोंदाटलें ॥२॥

क्रियाकर्मधर्म निखिळ परब्रह्मा । त्यागुं भोगुं तेथें केवळ भ्रम ॥३॥

एका जनार्दनीम सहजीं सहज एक । एकीएक पहातां कैंचे अनेक ॥४॥

२४३६

जाणपणें वस्तु जाणों मी जाये । माझी जाणीव कैसी मज आड ठाये ॥१॥

जाणों मी कैसें जाणों मी कैसें । जाणपणें पिसें लावियेलें ॥२॥

जाणपणाचें पडळ जें आलें । जवळीचे वस्तुचें देखणे ठेलें ॥३॥

एका जनार्दनीं सुदलें अंजन । पडळ भेदोनियां दाविलें निधान ॥४॥

२४३७

शुन्य निरशुन्य तयामाजीं बीज । तया नांव गुज निजवस्तु ॥१॥

जाणण्याचें मूळ अकुळांचें कुळ । अलक्ष्याचें स्थळ तयाठायीं ॥२॥

एकाजर्नादनीं प्रसाद लाधला । जनार्दनीं वोळला सुखरुप ॥३॥

२४३८

सोनियांचा देव सोनियाचें देऊळ । सोनियांचा भक्त पूजी सोनियाच्या कमलें ॥१॥

नामची पैं रूप तें अभिन्न । जगीं जनार्दन तोचि पाहे ॥२॥

मृत्तिकेचा घट मृत्तिकेची वेळणी । मृत्तिकेचें आळें तेथें मृत्तिकेची माथणी ॥३॥

भिन्न भिन्नाकारीं मृत्तिका दिसते. साकार । एका जनार्दनीं निज निर्विकार ॥४॥

२४३९

अभेदाच्या द्वारापाशीं । तीर्थे प्रयागादि काशीं ॥१॥

भक्तिमुक्तिचें माहेर । अभेदाचें तें घर ॥२॥

ऐसी अभेद भक्ति घडे । कामक्रोध तेथें दडे ॥३॥

एका जनार्दनीं शरण । अभेद भक्ति मुख्य ज्ञान ॥४॥

२४४०

समुळ मुळीं पाहतां पाहण्या उपरम । भोग भोक्ता तेथें सहज परब्रह्मा ॥१॥

भोगुं मी काय त्यागुं मी काय । त्याग भोग दोन्हीं चैतन्य माय ॥२॥

भोग भोगितां भोग त्यागितां त्याग । दोन्हींचें निखळ अधिष्ठान अंग ॥३॥

एका जनार्दनीं एकपण त्यागी । ब्रह्मारुप जग आदळे अंगीं ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel