बुद्धि गमे श्रेष्ठ बहू कर्मापेक्षां जनार्दना तुजला ॥

पार्थ पुसे कां योजिशि युद्धा मज घोर कर्म करणेला ॥१॥

अनिश्‍चित भाषणे या मोहित माझ्याच करिशि बुद्धीला ॥

सांगे निश्‍चित एकच श्रेयस्कर सत्य होय जे मजला ॥२॥

भगवान वदे अनघा मोक्षाचे दोन मार्ग दावियले ॥

ज्ञान योग सांख्यांना योग्यांना कर्मयोग हे कथिले ॥३॥

कर्मारंभ न केला पुरुष तरी कर्ममुक्‍त नच होतो ॥

कर्म त्यागानेंही सिद्धीला निश्‍चये न मिळवीतो ॥४॥

क्षणही नसे कुणीही कर्माविण या जगामधे पाहे ॥

प्रकृतिचेच कर्माला प्रवृत्त गुण या जगांत करिती हे ॥५॥

कर्मेंद्रियास अवरुनि विषयांना मूर्ख जो मनांत धरी ॥

दांभीक सत्य तोचि जगती या खूण होय हीच खरी ॥६॥

इंद्रियनिग्रह पार्था प्रथम मनानें करुन कर्माला ॥

अनासवत आरंभी श्रेष्ठ गणावे अशाच पुरुषाला ॥७॥

धर्मविहित कर्मे करि कर्म अकर्मा परीस मान्य असे ॥

कर्मे नच जरि करिशी रक्षिसि मग तव शरीर हें कैसे ॥८॥

यज्ञार्थी जी कर्मे बांधु न शकती कधीच कर्त्याला ॥

यज्ञार्थी जी नसती बंधक होतीच आचरे त्याला ॥९॥

ऐसे आहे परि तूं यज्ञार्थी तरी अशाहि कर्मांना ॥

कौंतेय परि असावे अनासक्‍त तयास करितांना ॥१०॥

यज्ञ प्रजेस निर्मुनि धाता सांगे प्रजास वाढाया ॥

आराधुनि यज्ञाना ज्या योगे मनोरथ नच पुरति तया ॥११॥

संतुष्ट देव तुम्हा करिती यज्ञे तयास जर पुजिले ॥

परस्परा सुखवोनी मिळवा कल्याण या जगांत भले ॥१२॥

देवा यज्ञे तृप्‍ती देता ते इष्ट भोग देतात ॥

भोगी परत न देई ऐशाचे चोर नांव जगतांत ॥१३॥

विलयास पाप जाते यज्ञ दोश अन्न भक्ष संताचे ॥

आत्मार्थच शिजविती भक्षण ते दुष्ट करिती पापांचे ॥१४॥

यज्ञोत्प‍त्ती कर्मे पर्जन्या यज्ञ कारणी होतो ॥

पर्जन्य करी अन्ना अन्नाने जीवजन्म हा होतो ॥१५॥

प्रकृती पासुनि होते कर्मोत्पत्ती जगी असे समजा ॥

प्रकृतीस जन्म देते अविनाशी ब्रम्ह हे मनी उमजा ॥१६॥

यास्तव जगांत दिसते ब्रम्ह तयाला जगी असे नांव ॥

सदैव भरले आहे यज्ञात असा मनी धरी भाव ॥१७॥

ऐसे चालत आले त्या चक्राला पुढे न चालवितो ॥

पापी जन्म तयाचा इंद्रिय आसक्‍त व्यर्थ जगतीं तो ॥१८॥

आत्म्यांतच जो रमतो आत्म्या योगेच तृप्‍त जो झाला ॥

कर्तव्य जगी अपुले ऐसे जगती न उरत की त्याला ॥१९॥

करणे वा नच करणें दोहोमध्ये हि लाभ ना ज्याला ॥

तैसे कोणा करवी लाभ घडावा मनी नसें त्याला ॥२०॥

कर्तव्य कर्मा यास्तव आचर तू फलेच्छेस सोडून ॥

आसक्‍ति रहित कर्मे मिळतो पुरुषास परम निर्वाण ॥२१॥

जनकादिक भूपाना कर्माने सिद्धि सर्वही मिळती ॥

सन्मार्गा शिकवाया कर्म हेंच उक्‍त या तुला जगती ॥२२॥

श्रेष्ठ जगी ज्या मार्गे वागे तैसेच वागती जगती ॥

प्रमाण तो जें मानी देही सगळे तयास अनुसरती ॥२३॥

कर्तव्य मज न जगती मिळवाया त्रिभुवनी नुरे काही ॥

ऐसे असता पार्था कर्मे मी सर्वदा करित राही ॥२४॥

पार्था आळस सोडुनि कर्म करणेस मीच टाळीन ॥

अनुसरुनि वर्तना त्या वागतील या जगामधील जन ॥२५॥

कर्मा जर मी न करी जातीलच सर्व लोक विलयाला ॥

संकरकर मी होई जन हत्त्या मग घडेल की मजला ॥२६॥

भारत यास्तव कर्मे ज्ञान्यानें अज्ञासमच करावीं ॥

ज्ञान्याने आसक्‍ती अज्ञा सम नच कधीही धरावी ॥२७॥

ज्ञान्याने न करावा बुद्धि भेद अज्ञ कर्मसक्‍तांचा ॥

कर्मे योग्य करावी जेणे वाढेल भाव अज्ञांचा ॥२८॥

सत्त्व रज तम गुणानी प्रकृती कर्मास सर्व करवीते ॥

अज्ञ अहंकारानें म्हणतो मींच कीं करितसे त्याते ॥२९॥

गुण कर्म विभागांचा तत्त्वज्ञ कधी इंद्रियांत आसक्‍ती ॥

न धरीच महा बाहो कारन विषयाकडेच ती वळती ॥३०॥

प्रकृती गुणांनी बनले पूढ कर्म गुणामधे सदा रमती ॥

ऐशा त्या अल्पज्ञा सर्व हीं चाळवू नये जगती ॥३१॥

प्रकृती स्वभाव योगे कर्मे पार्था जगांत घडतात ॥

चित्ती हे समजोनी मजला ती सर्व समर्पावीत ॥३२॥

सोड फलाशा ममता पूर्णपणें अर्जुना विचार करी ॥

इच्छाज्वर ही सोडी होई निःशक ऊठ युद्ध करी ॥३३॥

मत्सरबुद्धी टाकुनि माझ्या आज्ञेनुसार वर्ततिते ॥

करिती कर्म तथापी तोडितीच कर्मबंधना जन ते ॥३४॥

सत्यास दोषणारे मत माझे जे प्रमाण ना धरिती ॥

अज्ञान मूर्ख चंचल समजे ते नाश पावले चित्तीं ॥३५॥

ज्ञानीही अनुसरतो प्रकृतिलाच जीव तीस अनुसरती ॥

हट्टाने आवरणे इंद्रियास फुकट होय या जगती ॥३६॥

प्रेम द्वेष मुळीचा इंद्रियांत भोग्य वस्तुशीं आहे ॥

वश न तयाला व्हावे मानवच शत्रूच कीं जगांतिल हे ॥३७॥

परधर्म अपुल्याहुनी सोपा तरि आत्मधर्म योग्य असे ॥

स्वधर्मी मरणे बरवें परधर्म भयद वरुन सभ्य दिसे ॥३८॥

पार्थ पुसे वार्ष्णेया इच्छा नसता मनुष्य आचरितो ॥

पाप तया करवीते सक्‍तीने कोण सांग करवीतो ॥३९॥

हा क्रोध काम उपजे भगवान वदे रजोगुणां मधुनी ॥

पापी अधाशी हा मान वैरीच समजून यास मनी ॥४०॥

धृम्‍रे अग्‍नी किंवा झाकावे दर्पणास धूलीने ॥

व्यापी ज्ञानानें हा गर्भ जसा लिप्‍त होय वारेनें ॥४१॥

कौंतेय काम अग्नी तृप्‍ति न होते कधीच यास असा ॥

वैर जगातिल याचे ज्ञानि जनाशी कधी न नष्ट असा ॥४२॥

मनबुद्धिइद्रियांचें मुरयपणे अधिष्ठान हो ऐसा ॥

त्यांच्या योगे ज्ञाना झाकी मोहीच मानवा सहसा ॥४३॥

इंद्रियनिग्रह यास्तव भारतकुल-श्रेष्ठ तू करी आधी ॥

शास्त्रे अनुभव यांचा ज्ञानाला घातकीच काम वधी ॥४४॥

ज्ञानास पदार्थाच्या देणारी इंद्रिये लघुच फार ॥

त्याहून सूक्ष्म मन हें बुद्धि तयाहून सूक्ष्म ती फार ॥४५॥

कार्याकार्यविचारी बुद्धीहुनि जो अतीच सूक्ष्मतर ॥

परमात्मा तू जाणे बुद्धीहून श्रेष्ठ जो असे फार ॥४६॥

बुद्धीहुन सूक्ष्म अशा परमात्म्या जाण हे महाबाहो ॥

शत्रूच काम वध जो आत्म संयमनानेंहि बद्ध नच हो ॥४७॥

सारांश

शा.वि.

ज्ञाना श्रेष्ठ गणी असे कथियले कर्माहुनी श्रीधरा ॥

तू माते मग का करी म्हणसि या युद्धास विश्‍वंभरा ॥

सांगे कृष्ण करीच कर्म कथिले धर्मेच जें अर्जुना ॥

निष्कामी घडतेच कर्म न शिवे जेव्हा फलेच्छा मना ॥१॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel