जयजयाजी गुरुवरा । स्वामी सद्गुरुदातारा ।
ज्ञानदीपें ओवाळीन । सर्व साराचिये सारा ॥धृ॥
अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञान ।
आनंदादि पंचक्रोशी वर्ते तुझी सत्ता जाण ॥
त्याहुनि वेगळा तूं अस्तिभाति प्रियपण ।
तुरीय चवथा तूं ज्ञेयज्ञानादिहीन ॥१॥
ब्रह्मादिक बाळकाची मूळभूत जे माया ।
नसोनि भासलीसे तुझे सत्तेनें वाया ।
तीहूनी वेगळा तूं नसे ते तुझिया ठाया ।
सत्यज्ञान पूर्णानंता सर्वाधार गुरुराया ॥२॥
पिंडब्रह्मांडाच्या ग्रासें तुजलागीं पाहूं जातां ।
ध्यानचि हरपलें मग कैचा मी ध्याता ॥
मन हें मावळणें शद्बा आली निशद्बता ।
निरंजन ह्मणावया नाहीं कोणीही निरुता ॥३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel