जयदेव, जयदेव, जय सिद्धेश्‍वर देवा

जय करुणाकर, शंकर हर हर महादेवा ॥धृ०॥

श्रीमातापुरक्षेत्रोत्तरपंचक्रोशीं

सिद्धेश्‍वर पुण्यस्थळ निर्मळ निर्दोषी

वसति श्रीदत्तात्रय-कपिलादिक ऋषी

म्हणती, मोक्षपुरी ही न तुळे सहस्त्रांशीं ॥१॥

श्रीप्रणिताख्या गंगातट दक्षिणभागीं

वाहे पूर्वाभिमुख पार्वति वामांगीं

सन्मुख गणपति, नंदी, गण, शृंगी, भृंगी

वाजति मृदंग, घंटा, दर, डमरु, पुंगी ॥२॥

ऋद्धि, सिद्धि, सरस्वती, लक्ष्मी, महाकाळी

नारद, तुंबर गंधर्वादिक सायंकाळीं

गाती, नाचति, गर्जति, परमगदारोळी

सुरवरमुनिजन भजती शिव चंद्रमौळी ॥३॥

शोभति गुल्मलताद्रुम-घनमंडपव्योमीं

निजस्वानंदें खगमृगगण क्रीडति भूमीं

झाले साधक सिद्धचि जन या बहु धामी

विष्णुस्वामि वदे, श्रुति न वदे बहुधा मी ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel