जय जय श्रीगुरुशरभंगा । आरति उनकेश्‍वर-लिंगा ॥धृ०॥

भूमंडळीं उनकेश्‍वर क्षेत्र । पुण्यस्थळ पावन सुपवित्र

सन्मुनि वसति दिवस-रात्र । जपति शिवपंचाक्षरि मंत्र

गंधाक्षता, बिल्वपत्र । अर्पितां प्रसन्न त्रिनेत्र

(चाल) भक्‍तजन पुजिति नीळकंठा

गर्जती शंख, दुंदुभि, घंटा

महोत्सव पर्व----गाति गंधर्व----स्तविति सुर सर्व

उजळुनि कर्पूर, दीप रांगा । ओवाळिती कर्पुरांगा ॥१॥

निकट अर्धांगि शैलबाळी । विराजे अर्धचंद्रमौळी

नंदि विरभद्र भद्रकाळी । नाचती गण सायंकाळीं

उष्ण जळिं करितां आंघोळी । होय कुळपातकाचि होळी

(चाल) भ्रमत अवधूत दत्त लहरी

फिरत शुक नारदाचि फेरी

उडे भजनरंग---सदा सत्संग---डुल्लति भुजंग

पूर्वमुखाऽमृत जळ-तरंगा । प्रदक्षिणिं वाहे बाणगंगा ॥२॥

सुरभिसम विपुल वृषभ-गाई । सुशोभित वनचंपक-जाई

कल्पद्रुम-लता-आमराई । वाहती पाट ठाइं ठाई

येति वट-अटन करित पायीं । राम-सौमित्र-सिताबाई

(चाल) अखंडित उष्ण शितळ पाणी

करि कोदंड चापपाणी

सगुण गंभीर---महारणधीर---बाप रघुवीर

सनातन भक्‍त-कामिं जागा । प्रकट करि पुण्याश्रम जागा ॥३॥

नमस्ते विश्‍वंभरभरणा, करुणानिधे, करी करुणा

निवारी जन्ममरण भ्रमणा, दयाळा, श्रीपार्वतिरमणा

दिनाच्या दुरित दुराचरणा, नाठवी दावि सुखद चरणां

(चाल) विष्णूस्वामि म्हणे स्वानंदें,

निरंतर भजनीं वासना दे

शुंभशंकरा----प्रभो दशकरा----प्रमोदित करा,

प्रबोधी ज्ञानपदाभंगा, जयजय उनकेश्‍वर-लिंगा ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel