ईशस्तुतीला सुरुवात करण्यापूर्वी वास्तविक पाहता नाटयकथानक (Plot) वगैरे काही गोष्टींचा विचार करावयास पाहिजे होता; पण मागील खेपेस वचन देऊन चुकल्यामुळे 'ईशस्तुती'पासूनच सुरुवात करणे भाग पडत आहे. म्हणून कथानक वगैरेंचा विचार मागाहून होईल.

ईशस्तुतीपासून खुद्द नाटकाच्या कथाभागाला सुरुवात होईपर्यंत जो भाग जातो त्यालाही प्रस्तावनाच म्हणतात. आपल्या थोरल्या बहिणीप्रमाणे या छोटया प्रस्तावनेच्या काही गोष्टी अगदी ठरावीक आहेत. या प्रस्तावनेचा नायक सूत्रधार असतो. सूत्रधाराने पडदा उघडताक्षणीच 'गुलाल व पुष्पे उधळून' ईशस्तुती म्हणावयास सुरुवात करावयाची असते. या ईशस्तुतीचा विषय कोणताही देव असू शकतो. परंतु वहिवाटीप्रमाणे पाहता शंकर व 'गुरुदत्त निरंजन' या दोघांचाच हक्क विशेषआहे, आणि हा एक वाजवीही आहेच. शंकर तर बोलून चालून अर्धनारीनटेश्वर! पुरुषाने स्त्रीवेष घेण्याची कल्पना प्रथम त्यानेच शोधून काढली आणि या कल्पनेवर तर नाटकवाल्या मंडळींचे सारे जीवन! एवढा त्याचा नाटयकलेशी दांडगा संबंध असल्यावर त्याच्या हक्काबद्दल तक्रार करणे योग्य नाही. हा संबंध व्यक्त करण्यासाठी ईशस्तुतीच्या तोंडाशी 'नटवर' 'श्रीनटनायक' अशा अर्थाचे शब्द मात्र जरूर ठेवून द्यावेत. याशिवाय तोंडाला पिवडी चोपडण्याची कलाही शंकराच्या भस्मलेपनावरूनच निघाली असावी. सूत्रधाराच्या पगडीचा उगमही गंगेप्रमाणे शंकराच्या जटेतूनच झालेला आहे. शंकराच्या चित्रमय स्वरूपातील सदेह गंगेचे डोके व पगडीची कोकी यांतील साम्य लक्षात घेतले असता वरील विधानाचे सत्यत्व सहज कळून येईल. याप्रमाणे शंकराचे नाटयकलेवर हस्ते परहस्ते अनेक उपकार झाले आहेत; म्हणून नाटकात त्याला इतर देवांपेक्षा अधिक मान मिळाल्यास फारसे नवल नाही.


दत्तात्रेयाचा प्रस्तावनेत प्रवेश 'समानशीले व्यसनेषु सख्यम्' या न्यायाने आलेला आहे. तामसवृत्तीच्या लोकांना जर रुद्र हे दैवत आवडते व सात्त्वि वृत्तीला जर विष्णू प्रिय वाटतो तर मग महिना-पंधरवडयात सारखी थारेपालट करीत असणार्या प्रवासशील नाटकमंडळयांना, आपल्या नाटकाचे अधिदैवत, सकाळी प्रयागी स्नान करून दोन प्रहरी कोल्हापुरास मिळविलेली भिक्षा कावेरीतिरी भक्षण केल्यावर माहुरास जाऊन झोप घेणारा दत्तात्रेय हेच असावे असे वाटणे अगदी स्वाभाविक आहे, दत्तात्रेयाचे व नाटकवाल्या मंडळींचे दुसरे मोठे साम्य हे आहे की, गुरुदत्तात्रेयही अविवाहित आणि नाटकमंडळयांचे बहुतेक घटकही अविवाहितच! दत्तात्रेयापासून भुते दूर पळतात तर नाटकवाल्यांपासूनही भूतमात्राचा दूर राहण्याचा प्रयत्न असतो. सच्छील लोक दत्तगुरूचे नाव ऐकताच जसे त्याला नमस्कार करतात तसे नाटकवाल्याचेही नाव ऐकताच त्याला नमस्कार ठोकतात. मात्र पहिला नमस्कार दत्ताला मान देण्यासाठी असतो व दुसरा 'दुर्जनं प्रथमं वंदे' या तत्त्वाला मान देण्यासाठी असतो. परंतु कारण काही का असेना; परिणाम मात्र एकच असतो यात शंका नाही. त्याचप्रमाणे बहुतेक नाटकमंडळयांतील मुख्य पात्रांना खडावा घालण्याचा नाद असतो, त्यातही आपल्या अधिदैवताचे अनुकरण करण्याची दांडगी इच्छा दिसून येत नाही असे कोण म्हणेल? शिवाय दत्तात्रेयाची स्तुती करण्यात थोडासा प्रमाणशीरपणाही दिसून येतो. सूत्रधार व दोन पारिपार्श्वक अशा तीन व्यक्तींनी एकच स्तुती करावयाची, मग ती तीन देव मिळून झालेल्या एकाच देवाची केल्यास अनायासे त्रैराशिकालाही मान दिल्यासारखे होत नाही काय? याप्रमाणे या दोन देवांचा नाटकातील ईशस्तुतीवर हक्क आहे.

पूर्वी नाटकाची सुरुवात करण्याची कामगिरी गणपतीकडे होती. कवीने त्याला 'मम स्तवना देउनी माना सभेसी यावे' अशी विनंती सूत्रधारामार्फत करताच विघ्नहर्ता स्वत: ताबडतोब रंगभूमीवर येत असे. त्याने येऊन सूत्रधाराला सरस्वतीस बोलाविण्याची सूचना करावयाची व सूत्रधाराने ती सूचना लागलीच अंमलात आणावयाची. सूत्रधाराची दीन वाणी श्रवण करिताच सरस्वतीही पित्याच्या अंकभागावरून उठून त्या स्थळाप्रत प्राप्त होत असे. तिच्या कृपेने सूत्रधाराची बालके अज्ञान असत ती सज्ञान होऊन बृहस्पतिवत् भाषणे करू लागत. सरस्वती ही स्वत: विद्याच असल्यामुळे बृहस्पतीच्या ज्ञानाविषयी तिची इतकी हलकी कल्पना असणे अगदी साहजिक आहे. ही कामगिरी आटोपल्यावर सरस्वतीने नृत्य करीत करीत (मोरावर बसली असूनही) नाकी गमन करावयाचे. धूर्त विदूषक या वेळी आपले नाक दाबून धरीत असे. न जाणो ती एखादे वेळी याच्याच नाकी गमन करावयाची!

अशी नाटकाची जुनी व्यवस्था असे; पण एका सूत्रधाराच्या खुनशीपणामुळे नाटककारांची ही सोय नाहीशी होऊन त्यांना दुसर्या देवांची प्रार्थना करण्याची वेळ आली. याविषयी कथा अशी आहे:- एका सूत्रधाराचे व गणपतीचे नाटक मंडळींतील मनुष्ये या नात्याने वाकडे होते. गणपतीला चांगला हात दाखविण्यासाठी त्याच्या पाया पडतेवेळी सूत्रधार त्याच्या पायाच्या अंगठयाला कडकडून चावला. विघ्नेशाने हे विघ्न टाळण्यासाठी आपली सोंड उपटून सूत्रधाराच्या पाठीवर आपटली. थोडयाच वेळाने तो दंगा व ते नाटक ही दोन्हीही थांबली; परंतु तेथून गणपती मात्र नाटकास येईनासा झाला. पुढे नाटककारांनी इतर देवांस आमंत्रणे देऊन पाहिली परंतु कोणीही येईना. प्रत्यक्ष विघ्नहाराचीच अशी दैना झाल्यावर दुसरा कोणता देव रंगभूमीवर येण्यास धजेल? अखेर नाटककारांनी शंकराकडे धाव घेतली. हे दैवत मात्र खरे! सर्व देवांनी मंथनविष घेण्याचे नाकारले तेव्हा आयत्या वेळी शंकरांनीच पुढे होऊन ते प्राशन केले. त्याचप्रमाणे येथेही सर्व देव घाबरले असे पाहून शंकरांनी नाटककारांवर कृपा करण्याचे कबूल केले.

ही हकिकत पुष्कळांस खोटी वाटेल; परंतु मी तिच्यात तिळमात्रही बदल केलेला नाही आणि मी तरी खोटे कशाला सांगू? जे ऐकलन् तेच सांगितलन्!

असो. आता स्तुती कशी करावयाची हे पाहू. शंकराचे वर्णन आणि स्तुती ही करण्याचे श्रम आपण स्वत: घेण्याचे काही कारण नाही. किर्लोस्करांच्या शाकुंतलातील 'पंचतुंड नर रुंडमालधर' न 'अष्टमूर्ती परमेश' या दोन खाणी कायम आहेत तोपर्यंत नवीन नाटककाराला ईशस्तुतीपर शब्दरत्ने* शोधावयासाठी दूर जावयास नको. अण्णांनी आपली नाटके करण्याची जशी सर्व नाटकमंडळयांना सदर परवानगी देऊन ठेविली आहे तशी सर्व नाटककारांनाही आपल्या नाटकांतून वाटेल ते चोरण्याची परवानगी देऊन ठेविली आहे. बहुतेक नाटकांतून अण्णांच्या पदांसारखी पदे, शब्दयोजनेसारखी शब्दयोजना, वाक्यांसारखी वाक्ये वगैरे प्रकार- प्राचुर्याने दिसून येतात याचे कारण ही परवानगीच होय.

ईशस्तुतीची एक किंवा दोन पदे झाल्यावर 'झाले इतके ईशस्तवन पुरे आहे' या ठरावीक वाक्याने तिचा शेवट करावा. नाटकात नायक-नायिका नसली तरी चालेल; परंतु या वाक्यांवाचून मात्र चालणार नाही. ईशस्तुतीचा शेवट करण्याचा किर्लोस्करांनी शोधून काढलेला हा सडेतोड मार्ग त्यांच्यानंतर होणार्या सार्या नाटककारांना इतका आवडला आहे की, थोडथोडया फरकाने हे वाक्य बहुतेक नाटकांतून दृष्टोत्पत्तीस येते.

ईशस्तुती ही फक्त संगीत नाटकांसाठीच आहे. 'गद्य' नाटकांत तिला थारा नाही. सबब आपल्याला जर संगीत नाटक गद्यात लिहावयाचे असेल तर परमेश्वरापाशी तोंड वेंगाडण्याचे (नाटककाराने नव्हे; पण गाताना सूत्रधाराने) काही कारण नाही. असो. झाले इतके ईशस्तवन पुरे आहे.

  • किर्लोस्करांच्या शब्दरत्नांवर दरोडा घालणार्या बहादुरांपैकी एकाने तर इतकी तन्मयता दाखविली आहे की, किर्लोस्करांची शब्दयोजना, पदांच्या ओळी, वगैरेची चोरी करूनच न थांबता, त्याने किर्लोस्करांच्या नावावरही हल्ला केला आहे. किर्लोस्कर काही पदांच्या शेवटी 'बलवत्' असा स्वत:चा नामनिर्देश करीत हे पाहून या भक्तानेही स्वत:च्या 'बाळकृष्ण' या नावाला वेडीवाकडी वळणे देऊन त्याचे 'बलवत्' हे रूप बनविले आहे. हा प्रकार पाहून हसावे की रडावे हे माझ्या वाचकांनीच ठरवावे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel