धाकटा जगू कळू लागल्यापासून एका नाटक मंडळीतच होता. एकदा मंडळीच्या मालकाबरोबर एक लग्नसमारंभ पाहून आल्यावर त्याने आपल्या समवयस्क मित्रांना खाली लिहिल्याप्रमाणे 'रिपोर्ट' दिला-
खेळ मुद्दाम बांधिलेल्या मांडवात झाला. स्टेज मातीचेच केले होते आणि फारच लहान होते. 'सीन' जंगलाचा होता असे वाटते; पण जंगलाच्या 'झालरी' मुळीच नव्हत्या म्हणून त्याच्याबद्दल स्टेजवर झाडांचा पालाच बांधला होता. पडदे स्टेजच्या भोवती न बांधता सगळया थिएटरभोवती गुंडाळले होते. खेळाचे 'पास' फुकट वाटले होते. खुरच्याबिर्च्या काहीच नव्हत्या. सगळयांना जाजमावरच बसावे लागले. 'कुलीन' स्त्रियांसाठी स्टेजच्या आजूबाजूस जागा राखून ठेविली होती; पण गर्दी फार झाल्यामुळे त्यांना उभ्याने सगळा खेळ पहावा लागला. वेश्यांसाठी जागा मुळीच ठेवली नव्हती आणि त्या आल्याही नव्हत्या. मॅनेजर लोकच पानविडीतंबाखू घेऊन ऑडिअन्समध्ये फिरत होते. पण ते कुणाजवळून पैसे घेत नव्हते. सोडालिंबूची काहीच सोय नव्हती. पेटीतबल्याबद्दल सनया आणि ताशे ठेवले होते. त्या लोकांची कामे केव्हा केव्हा होती हे सुध्दा त्यांना ठाऊक नव्हते म्हणून त्यांना मधून मधून 'वाजवा' 'वाजवा' म्हणून सांगावे लागत होते. आम्ही गेलो त्या वेळी स्टेजवर मुख्य पुरुषपार्टी, मुख्य स्त्रीपार्टी व एक भटाचे सोंग घेतलेला मनुष्य यांची कामे चालली होती. फक्त मुख्य पार्टी लोकांनीच रंग लावला होता. तो सगळया अंगभर होता. रंग फारच वाईट- अगदी हळदीसारखा होता. त्याची 'नक्कल' अगदी चोख होती; परंतु तो फार घाईने बोलत होता. म्हणून त्याचे बोलणे ऐकू येत नव्हते. मुख्य पुरुषपाटर्याचा आवाज बसला होता; कारण त्याने सगळी पदे सोडून दिली होती. शिवाय त्या दोघांच्या 'नकला' मुळीच पाठ नव्हत्या; म्हणून भट त्यांना स्टेजवर 'प्रॉम्ट' करीत होता. प्राम्टिंग ऑडिअन्समध्ये स्पष्ट ऐकू येत होते. भटाचे ऍक्टिंग छान होते. राजाराणींना ऍक्टिंग मुळीच येत नव्हते. स्त्रीपाटर्यांचे हे पहिलेच काम होते असे वाटते; कारण तो फार घाबरून मान खाली घालून होता. बोलतानासुध्दा तो चाचरत होता; पण ऑडिअन्स फारच चांगले होते. एकानेसुध्दा टाळया दिल्या नाहीत. शेवटी त्या दोघांचे लग्न झाले आणि त्या वेळी सात-आठ जणांनी 'कोरस' म्हटला आणि खेळ आटोपला. राजाराणी 'कोरसा'त म्हणत नव्हती.