मनसा चिंतितं कार्य दैवमन्यच्च चिंतयेत्। - संस्कृत सुभाषित.
परमेश्वराच्या या विविधविषय विश्वविद्यालयात प्राणिमात्राला आजन्म अनुभवाच्या शिक्षणक्रमांतून पसार व्हावे लागत असते. आणि या आयर्ुव्यापी अभ्यासात प्रत्येकाला त्रिकालबाधित सत्यापैकी कोठल्या तरी प्रमेयाचा कृत्य सिध्दान्त स्वरूपाने यथाबुद्ध्या प्रत्यय येत असतो. कोणाला 'सत्यमेव जयते नानृतम्' या तत्त्वातल्या सत्याची समज पडते तर कोणाची 'नरो वा कुंजरो वा' यासारख्या दुटप्पी बोलण्यावाचून जगात निभावणी होत नाही, अशी खातरजमा होत जाते. एकाला या हातावरचे झाडे या हातावर देण्याचा खरेपणा हाती येतो तर, दुसरा चित्रगुप्ताच्या खातेवहीत पुष्कळदा चुकभूल होत असल्याबद्दल बिनचूक टाचण करून ठेवितो. याप्रमाणे प्रत्येकाला ह्या ना त्या तत्त्वाचे अनुभवजन्य ज्ञान मिळत असते. परंतु त्यातल्या त्यात काही सत्यतत्त्वे अशी व्यापक स्वरूपाची आहेत की, त्यांचा प्रत्यय प्रत्येकाला उभ्या आयुष्यात एकदा तरी येतोच येतो. चालू लेखाच्या मथळयावर दिलेल्या श्लोकांतील सूत्रात्मक सत्य हे असल्या सर्वव्यापक तत्त्वांचे उत्तम उदाहरण आहे. 'आपण चिंतितो एक आणि दैव करिते एक' हा अनुभव आपणापैकी सर्वांना लहानमोठया, बऱ्यावाईट रूपाने आल्यावाचून राहात नाही. आम्ही पौर्वात्यांचे आणि पाश्चिमात्यांचे बहुतेक बाबतीत हटकून पूर्व-पश्चिम असते, परंतु या तत्त्वाच्या स्वीकारात त्यांची आमची एकवाक्यता- बहुतेक एका शब्दातच- झाली आहे असे त्यांच्यातील 'Man Proposes God disposes' या सूत्रावरून दिसून येते. कधी कधी इच्छा आणि तिची तृप्ती यांच्या परिणामस्वरूपात इतका विपर्यास दिसून येतो की, चांगल्या लोकोत्तर बुध्दीच्या लोकांनासुध्दा त्यांचा कार्यकारणभाव जमविताना आपापल्या मतानुसारे, दैव, देव, यदृच्छा किंवा पूर्वसंचित यांपैकी कशाचा तरी हवाला देऊन मोकळीक करून घ्यावी लागते. मात्र हे इच्छेशी विसंगत असणारे परिणाम सदैव विघातक वळणाचेच असतात अशातला नियम नाही. वर सांगितलेल्या भिन्न नावांनी ओळखली जाणारी ही अनोळखी शक्ती इच्छेची प्रवर्तक होऊन गुणकाप्रमाणे इष्टफलाची वृध्दी करिते आणि कधी इच्छेला विरोधी भावाने भागून फलच्छेदामुळे असमाधानतेला कारण होते. कधी कधी तर इच्छातृप्तीच्या प्रयत्नांना शून्यवृत्तीने गुणून परिणामाला अजिबात शून्याकार बनविते. इच्छेच्या प्रयत्नांशी एकरूप होऊन जितक्यास तितकीच फलप्राप्ती करून दिल्याची उदाहरणे मात्र विरळा पाहावयास सापडतात. तात्पर्य, इच्छा व पूर्ती यांच्यातील बेबनावाकडे शुभाशुभाच्या दृष्टीने पाहावयाचे नसून त्यांच्या विपर्यस्त स्वरूपापुरतेच बघावयाचे असते. टोपलीभर मासे धरण्यासाठी टाकिलेल्या जाळयात हमेषा काटेकुटे येऊन कोळयालाही पोटात काटे भरण्याची पाळी येत असते असे नाही; एखादे वेळी टोपलीच्या ऐवजी दोन टोपल्या भरूनही मासे सापडतील आणि एखादे वेळी आत कोंडलेल्या राक्षसासकट एखादा हंडाच पाण्यात सापडून कोळयाचे घरात पाण्याप्रमाणे पैसा खेळू लागेल. फक्त नेमके मागितले दान मात्र पडत नाही. 'केला संकल्प सिध्दीस' गेल्याची उदाहरणे इतकी तुरळक आढळून येतात की, तसला योगायोग संसारात अभिमाननीय गोष्टीत जमा करण्याची मनुष्यमात्राची प्रवृत्ती होऊन बसली आहे. इच्छेचा हेतू सत्स्वरूपाचा असला म्हणजे तरी नेमकी फलप्राप्ती होते अशातलाही प्रकार नाही. अगदी 'सत्यसंकल्प' असला तरीही दातृपदी साधुसंतांनी 'भगवान' योजून ठेविलेला आढळतो. या बहुतांशी निरपवाद नियमाची उदाहरणे पुराणांतून, इतिहासातून व वर्तमान परिस्थितीतून हवी तितकी आढळून येतील. स्ट्राटफर्डच्या खाटकाने आपल्या पोराला नाटकमंडळींतून लावून देतेवेळी मनातली पोराच्या उत्कट उत्कर्षाबद्दलची भावी कल्पना रंगभूमीवर तालात नाचण्यापलीकडे फारशी गेलेली नसेल; परंतु चिरंजीवांनी सदतीस नाटके लिहून जगातल्या उत्तमोत्तम नटांनाच नव्हे तर अगदी प्रौढतम विद्वानांनासुध्दा बेताल नाचायला लावून स्वत:ला अक्षरश: चिरंजीवपदी बसवून घेतले. स्वत: गोल्डस्मिथ कवीची मन:प्रवृत्ती एखाद्या पलटणीत जाण्याची किंवा वैद्य होण्याची असून त्याच्या आप्तांची इच्छा त्याने धर्मोपदेशक व्हावे अशी होती; परंतु विधिलेख असा होता की, त्याने लेखनकलेत जगमान्य व्हावे! एका सदऱ्यानिशी रोजगारावर धाडलेल्या बेनने मळकी लकतरे धुण्याच्या साबूचे एखादे लहानसे तरी स्वतंत्र दुकान काढले म्हणजे तृप्त होणारी त्याच्या बापाची इच्छा, साऱ्या अमेरिका खंडावर युरोपने उडविलेले शिंतोडे धुवून टाकण्यासाठी देशभूमीतर्फेने यशस्वी वकिलात करणाऱ्या बेंजामिन फ्रांकलिनने किती विपर्यासाने पुरे केली बरे! (इ.सन.) 1750 त, फोर्ट सेंट जॉर्जच्या कारकुनी कोठडीत कोंडून घेतलेल्या बॉबीला, भोवतालच्या कारकुनांना अडविणारी एखादी हिशेबी चूक स्वत:ला सोडविता येण्यात आपल्या भावी उत्कर्षाची परमसीमा दिसत होती आणि सन 1751त रॉबर्ट क्लाईव्ह कसलेल्या सेनानीची अडवणूक करणारा, त्रिचनापल्लीचा वेढा उठवून देऊन लॉर्ड क्लाईव्ह होण्याच्या पंथास लागला होता. आत्महत्या करण्याचे तीन प्रयत्न करूनही त्याला ज्या आपल्या डोक्यात नेमकी गोळी सोडता आली नाही त्याच डोक्यातून अल्पावकाशात शत्रूवर नेमकी गोलंदाजी करण्याचे बिनचूक हुकूम निघू लागले. हबसाणातून घर सोडून कुठे तरी पोट भरण्यासाठी निघालेल्या बाळाजी विश्वनाथांनी परक्या प्रांतात पेशवाईचे पद पटकावून सारा देश आपल्या कीर्तीने भरून काढिला आणि त्यांच्या तिसऱ्या पिढीत स्मशानासारख्या परखंडात भगवा झेंडा फडकविण्यासाठी निघालेले भाऊ घरच्या घरीच पानपताच्या गर्दीत मातीत मिळाले. इंग्लंडवर राज्य करण्यासाठी आपल्या नावाची नाणी पाहून मोकळा झालेला नेपोलियन इंग्लंडचा कैदी या नात्याने मरण पावला. आदले दिवशी संसारसुखाच्या भावी कल्पनांत गुंतलेल्या नारायणाने 'सावधान' शब्द ऐकल्याबरोबर उत्सुकतेने अक्षता हातात घेऊन उभे असलेल्या आप्तेष्टांच्या हातावर तुरी देऊन संसाराला वाटाण्याच्या अक्षता दिल्या. पुढील आयुष्यक्रमच नव्हे; पण नावसुध्दा बदलून रामदासरूपाने ब्रह्मचारी मंडळात अग्रेसरत्व मिळविले. खानदेशातल्या काशीरावदादांना आपल्या गोपाळाला नावाप्रमाणे घरची चार गुरेद्वारे कशीबशी वळता आली म्हणजे मिळविली असे वाटत होते; परंतु वरच्या उदाहरणाप्रमाणेच गोपाळाचा पूर्वाश्रम नावाप्रमाणेच नापत्ता होऊन, बडोद्याचे तख्तनशीन प्रभू, श्रीमंत सरकार सेनाखासखेल समशेरबहाद्दर श्रीसयाजीराव महाराज लक्षावधी लोकांचे पोशिंदे होऊन व असंख्य निरक्षर नरांचे नारायण करून आपल्या अंगच्या अलौकिक गुणांमुळे अखिल भारतवर्षाच्या मोठमोठया नामधारकांनाही आज आदर्शभूत होऊन केलेले आपण डोळयांनी पाहात आहोत. धाकटया रघूला कोकणातून नेऊन चार अक्षरे शिकविल्यावर स्कूल फायनलच्या परीक्षेस बसविणारी त्यांच्या कर्वेप्रभृति हितचिंतकांची इच्छा, फायनलच्या परीक्षेस बसविणारी त्यांच्या कर्वेप्रभृति हितचिंतकांची इच्छा, फार झाले तर, रघुनाथाला तो परीक्षा पसार होऊन, एखाद्या हपिसात 'अंब्ली ऐण्ड रिस्पेक्टफुली' उभे राहण्यात वीसतीस रुपये किमतीचे यश मिळविताना पाहून तृप्त झाली असती! दैवयोग निराळा होता. तत्कालीन राणीसाहेबांच्या राजमुकुटात इंग्रजी अलंकारामध्ये अग्रस्थानी चमकणाऱ्या हिंदुस्थानी हिऱ्याप्रमाणेच, केंब्रिजच्या शारदादेवीच्या यशोमुकुटात खचिलेल्या विद्वद्रत्नात अग्रेसरत्वाने लकाकून, मेकॉलेसारख्या अहंमन्यांनी आमच्या मातृभूमीच्या नावावर आणिलेली निर्बुध्दपणाची नसती काळोखी आपल्या तेजाने पार घालविणारा हिंदुस्थानच्या बुध्दिवैभवाचा कौहिनूर, सिनियर रँग्लर, विद्यामृताचे अन्नसत्र होऊन बसलेल्या व महाराष्ट्रीय कर्तबगारीचे कौतुक म्हणून गाजलेल्या फरग्यूसन कॉलेजात अगदी अल्पवयात प्रमुखपदी बसणारे प्रिन्सिपॉल परांजपे, नेक नामदार गव्हर्नरसाहेबांच्या खुर्चीला खुर्ची भिडवून बसलेले नामदार परांजपे.*
या सिध्दान्ताची भूमितीच्या एखाद्या सिध्दान्तासारखी सत्यता पटवून देत आहेत! महिना एकदोन रुपयांसाठी पुणे जिमखान्याच्या पटांगणावर इकडचे चेंडू कसे तरी तिकडे टाकण्यासाठी साहेबांसमोर सारखे नाचणाऱ्या चांभाराच्या पोराने तिथल्या मुकादमात भावी आशादृष्टीने काय पाहिले असेल! आणि परबांच्या विलायती पटांगावर आपले चेंडू टाकण्याचे कौशल्य पाहून नाचणाऱ्या साहेबांत श्रीयुत पी. बालू यांनी काय पाहिले असेल! माझ्या सिध्दान्ताची सत्यता! अगदी परवाचीच गोष्ट घ्या! मरहूम शेठ चुनीलाल सरैय्या यांची धंदा करण्याची सुरुवात व शेवट ही दोन्ही अकल्पित विधिघटनेचीच साक्ष देतील. एल.एम.एस.च्या परीक्षेस ते बसले असतील त्या वेळी उघड उघड डॉक्टरी करण्याची त्यांची इच्छा असली पाहिजे; परंतु त्यांनी धंदा केला पतपेढीचा! अखेरीस स्पीसी बँकेची इभ्रत न्यायाच्या अदालतीत शहाजोग दाखवून बाहेर पडल्यावर त्या दिवशी भागीवाल्या लोकांनी त्यांच्या गळयात हार घातला त्या वेळी त्यांना भविष्यकाळाची काय कल्पना झाली असेल बरे! दुसऱ्याच दिवशी काळाने त्यांच्या गळयात इतका जोराचा फासा घातला की, त्याच्या आवळीने त्यांच्या भागीवाल्या दोस्तांनाही गळफास बसल्यासारखे झाले! यजमानाचे पाय धुण्यासाठी मान वाकवून पाणी ओतताना रामा शागीर्द धन्याच्या कानातल्या चौकडयांसारखा दिसणारा खोटया मोत्यांचा चौकडा मिळाल्यानेही खूष झाला असता; आणि त्या यजमानाच्याही यजमानाला पापक्षालनाचे डोके मारण्याची शिक्षा फर्माविणाऱ्या रामशास्त्र्यांनी, लाचलुचपतीखातर पायांपुढे लोटांगण घालणाऱ्या कुबेरभांडारावरही लाथ मारिली!-
- नामदारांचा भावी उत्कर्ष नमूद करण्यासाठी वाचकांची नम्रपणे परवानगी घेऊन मी वरील जागा मोकळी ठेवीत आहे. परमेश्वर ही मानाची सोपानपरंपरा आमच्या अपेक्षेपेक्षाही उत्कर्षकर रितीने रचून काढून नामदारांना तिचा उपभोग घेण्यासाठी निरामय दीर्घायु देवो!
नामदारांबद्दल अत्यंत अभिमान बाळगणारा - बाळकराम
अशा प्रकारे उदाहरणांची शिरगणती करावयाचा आणखी प्रयत्न करू लागल्यास लेखाचे मूळचे योजिलेले स्वरूप बदलून भलत्या पर्यवसनामुळे तोही या विधानाच्या सत्यतेचे एक उदाहरण होऊन बसेल! वस्तुत: वरील तत्त्वाच्या समर्थनासाठी लांबलांबच्या उदाहरणांची गरजच नव्हती; आजवर आपण तयार केलेल्या मनोरथांना आधी आखलेल्या मार्गापासून कितीकदा व कसकशा रीतीने चळावे लागले व त्यापैकी कित्येकांनी नेमका मुक्कामाचा पल्ला गाठला याची वाचकांनी आपापल्या मनाशी प्रांजळपणे चौकशी केली तर घरबसल्याच या सिध्दान्ताच्या सत्यतेची सहज साक्ष पटण्यासारखी आहे. फार कशाला, माझ्या कंपूतल्या तिंबूनाना वगैरे मंडळींच्या लहानपणच्या इच्छा व हल्लीची वस्तुस्थिती परस्परांशी ताडून पाहताच वरील विधानाचा पटकन् पडताळा पडेल. संन्यस्त वृत्तीने आश्रम बांधून गाई, म्हशी वगैरे जनावरांना पोटच्या पोराप्रमाणे वागवून दाखवून पूर्वीच्या ऋषींची या युगात साक्ष पटविण्याची इच्छा करणारा आमचा भांबूराव पंचविशीच्या आतच संसाराच्या लवेद्याने काहून जाऊन हल्ली पोटच्या पोरांना मात्र जनावरांप्रमाणे झोडपताना दिसून येतो. तिंबूनानाची लहानपणी स्वगत कल्पना 'फारीष्ट रोणगार्ड' होऊन आमच्या गावालगतच्या डोंगरावरून खाकी पोषाखात भटकावे आणि कुणब्यामाळयाचे विळेकोयते जप्त करून गावची गुरे कोंडवाडयात नेऊन गुदरावी ही होती; पण ऐन उमेदीच्या वयात हातापायांचे सांधे धरल्यामुळे घरकोंबडयाप्रमाणे स्वत:ला कोंडून घेऊन रखरखलेली रत्ने पायाखाली तुडविण्याची हौस त्यांना गरम निर्गुडीच्या पाल्याने पाय शेकण्यावरच कैक दिवस भागवीत बसावे लागले: आणि संधिवाताने आयत्या वेळी अशी संधी साधल्यामुळे पुढे त्यांना कायमचा गृहस्थाश्रम स्वीकारणे भाग पडत गेले. बिचाऱ्या आबाभटजींच्या निराशेचा विषय तर तिऱ्हाइताच्याही डोळयांना पाणी आणण्यासारखा आहे. पेशवाईच्या पळत्या पावकात पापड-लोणची, चटण्या-कोशिंबिरी चारून काही लोकांनी ब्राह्मण बादशहाजवळून गावच्या गाव इनाम मिळविल्याच्या गोष्टी ऐकून आबांच्या तत्कालीन पूर्वजाने मोठया कुसराईने कांद्याची भजी व लसणीची चटणी तयार करून पुण्यापर्यंत नेल्यामुळे प्रवासाच्या शेवटी भज्यांना मोटेला लावावयाच्या कातडी ठिगळाचे वातड स्वरूप प्राप्त झाले व चटणीचा गोळा कर्डईच्या पेंडीसारखा किंवा आजकाल जुनाट पेवांच्या कोठारांतून सांडणाऱ्या दाण्यांच्या खडप्यांसारखा दिसू लागला होता. शिवाय जोशीवृत्ती करीत असूनही त्या आंधळयाने त्या दिवशी एकादशी होती हे पाहण्याइतकीसुध्दा दूरदृष्टी ते पदार्थ नजर करिताना वापरली नाही. अशा एकंदर प्रकारामुळे खवळून जातिवंत बादशहावरही ताण करणाऱ्या ब्राह्मण बादशहांनी तलवारीने न तुटण्यासारखी भजी करण्याची कल्पना काढणारे ते डोकेच तलवारीने धडापासून वेगळे केले! (ऐतिहासिक पुराव्याची अठरा अक्षौहिणी सेना डोळयांसमोर असताही आबाभटजींचे घराणे पेशवाई बुडण्याचे कारण सदरील ब्रह्महत्येच्या पातकात आहे असे आग्रही श्रध्देने आजतागाईत प्रतिपादित आले आहे.) पूर्वज मजकुरांची ही अपुरी राहिलेली आशा तडीस नेण्याचा त्याच्या पिंडदानाचे वेळी सर्व सपिंडांनी संकल्प केला; आणि आबाभटजींच्या बाळपणाच्या आशेचा उगमही याच संकल्पापासून झालेला होता. अर्थात पेशवाई बुडाल्यामुळे व इंग्रजीत गावे इनाम देण्याची वहिवाट नसल्यामुळे, आबांच्या या अनुवांशिक प्रतिज्ञेतून वैशिष्टय नाहीसे होऊन तिला राज्यकर्त्यांकडून काहीतरी बक्षीस मिळवावयाचे हे सामान्य स्वरूप प्राप्त होणे अगदी अपरिहार्य होते. आजीच्या तोंडून पूर्वजांच्या पराक्रमाच्या गोष्टी ऐकताना आमच्या छोटेखानी आबाने आपल्या चिमुकल्या मनात ही पूर्वप्रतिज्ञा शेवटास नेण्याचा निर्धार केला आणि एवं प्रकारे 'कलेक्टरां'च्या किंवा निदान 'फष्टा'च्या तरी भटारखान्यात देशी बुटणेराची जागा पटकावावयाची, त्याला कांद्याची भजी व लसणाची चटणी चारून त्याच्याकडून काहीतरी बक्षीस उपटावयाचे ही आबाभटजींची लहानपणची महत्तम मनीषा होऊन बसली होती! परंतु लौकरच गावचे जोशीपण गळयात पडल्यामुळे आबाची बालकल्पना जागच्या जागीच मावळून गेली.
सदरहू गोष्ट लिहिताना मी नुकत्याच घडलेल्या एका रजपूत घराण्याच्या ऐतिहासिक कथेचेच सामाजिक रूपांतर करीत आहे असे कोणास वाटण्याचा संभव आहे! एका नावाजलेल्या रजपूत घराण्याच्या प्रतापशाली पूर्वजाने अशीच दिल्ली शहरावर तोफ लावून आपले निशाण उभारल्याखेरीज त्या शहरात पाऊल टाकावयाचे नाही अशी प्रतिज्ञा मुसलमानी अमदानीत केली होती. परवा दिल्ली दरबारच्या वेळी सदरील घराण्यातील विद्यमान राजबिंडयास त्या समारंभाप्रीत्यर्थ तो निषिध्द नगरप्रवेश करण्याची पाळी आल्यामुळे, आपल्या पूर्वप्रतिज्ञेस जागून त्या नरसिंहाने, दिल्ली शहराच्या रोखाने नुसती नावापुरती वायबाराची तोफ उडवून मग आत प्रवेश करण्याची परवानगी मिळण्यासाठी इंग्रज सरकारांकडे तहाचे बोलणे सुरू केल्याचे बहुश्रुत वाचकांच्या लक्षात असेलच! आपल्या आवाक्याबाहेर भडाभड प्रतिज्ञा करणाऱ्या या नरवीराप्रमाणेच मोगलाच्या हाती गेलेली आपली राजधानी स्वाधीन होईपर्यंत तृणशय्येवर निजण्याची, पर्णकुटिकेत राहण्याची व कदान्न खाण्याची अशीच आणखी एक जीवाअगोचर प्रतिज्ञा करून ठेवली होती. हीही निष्फळतेमुळे आजतागाईत उपरिनिर्दिष्ट राजघराण्याला वंशपरंपरेने बाधत असल्याकारणाने, वर सांगितलेले भीष्माचार्य आपल्या गुडघ्याएवढया मऊ बिछान्याखाली एक गवताची काडी ठेवण्याचा, सातमजली वाडयाच्या टाळक्यावर गवताच्या पेंढीचा तुरा बांधण्याचा व पंचपक्वान्नांचे ताट साफ केल्यावर शेवटी भाकरीच्या तुकडयाने मुखशुध्दी करण्याचा परिपाठ चालवीत असल्याचेही पुष्कळांना ठाऊक असेलच. सदरील गोष्टीवरूनच मी आबाभटजींची कहाणी रचून सांगत आहे असे काही वाचकांस वाटण्याचा संभव आहे; परंतु अशा शंकेखोर वाचकांनी 'इतिहासाची हमेषा पुनरावृत्ती होत असते' (History repeats itself) हे तत्त्व लक्षात ठेवावे. मोगली किंवा ब्राह्मणी सत्तेच्या भरात केलेल्या प्रतिज्ञा इंग्रजी अंमलात निर्जीवपणाने निस्तरीत बसण्याचा प्रकार आमच्या इकडे तरी अगदी नवीन नाही खास! रामावतारी (अहि किंवा महि-) रावणाच्या कुटुंबाला फसविल्याबद्दल भगवंताने कृष्णावतारी प्रायश्चित्त भोगल्याचे पुराण प्रसिध्दच आहे. असो. याप्रमाणे आबाभटजींची बालपणाची आशा वस्तुस्थितीत अवतरली नाही. खुद्द माझी निराशा कोणत्या प्रकारची झाली हे माझ्या 'स्वयंपाकघरातील गोष्टी'च्या वाचकांना तरी आठवत असेलच. एखाद्या कॉलेजातल्या रेसिडेन्सी क्लबाचा मुख्य स्वयंपाकी होण्याचा किंवा साधल्यास स्वतंत्र खाणावळ काढण्याचा माझा मुख्य हेतू होता हे सांगण्याचे कारण नाही. शिवाय, लहानपणी काही क्षणभंगुर पोट-हेतूही होतेच. कडकलक्ष्मीचा डोल्हारा वागवून, सर्वांवर जुन्या काळच्या राजांप्रमाणे झगा चढवून, कपाळभर भला खासा मळवट भरून, लांबलचक केस अस्ताव्यस्त पसरून व आपल्या अंगाभोवती फडाफड कोरडे उडवून, आळीतल्या बायकापोरांची दाणादाण करून सोडण्याची माझी अगदी लहानपणाची हौस होती. पुढे काही दिवसांनी हातात हिरवा कंदील किंवा बाव्हटा घेऊन 'ठेशणावर' मोठमोठयाने 'ओराईट' म्हणत येरझारा घालणारा 'पोटर' होण्याकडे माझ्या मनाचा कल झुकला. दैवाची जराशी थप्पड बसताच तोही नाहीसा होऊन, माझ्या भावी इच्छामय चित्राला सर्कशीतल्या विदूषकाचे गंभीर स्वरूप प्राप्त झाले. याप्रमाणे अनेक बुडबुडे उत्पन्न झाले व लयाला गेले. तत्राप, एवढी गोष्ट मात्र निर्विवाद आहे की, या प्रकारची एखादी आगंतुक इच्छा येऊन गेली म्हणजे माझी स्वयंपाकी होण्याची इच्छा हमेषा दुप्पट जोराने उठाव घेत असे. परंतु बाबांच्या हेकडपणामुळे या आशेची निराशा होऊन माझे आनुवंशिक शहाणपण केवळ लाक्षणिक अर्थानेच धुळीत कसे गेले हे वाचकांना दुसऱ्यांदा सांगत बसण्याची काही जरूर नाही. तात्पर्य, 'मनसा चिंतितं कार्य दैवमन्यच्च चितयेत्' हे तत्त्व आपणास नेहमी खरे ठरलेले भल्याबुऱ्या स्वरूपात पाहावयास सापडते. कर्माचे विंदान काही तरी अघटित असते! साहेबाच्या बबरजीखान्यात अष्टौप्रहर कांदे चिरीत बसल्यामुळे डोळयाला सारखे पाणी येत असावे ही आबाभटजींची इच्छा आणि जोशीवृत्तीमुळे उभ्या वर्षात एखाद दुसऱ्या वेळी चोरूनमारूनसुध्दा कांद्यालसणाची गाठ मोठया मुष्किलीने पडून एरवी कांदे न कापल्यामुळे त्यांच्या डोळयांचे पाणी खळू नये हा तिचा शेवट व्हावा; आकाशाशी गोष्टी सांगणाऱ्या डोंगराच्या माथ्याची जंगलतोड करण्याचे आपल्या हुकमतीत ठेवण्याची ज्यांची महत्त्वाकांक्षा त्या तिंबूनानांना स्वत:च्या माथ्यावरची जंगलतोड करण्यासाठी मान वाकवून न्हाव्याच्या पायावर डोके ठेवण्याचा प्रसंग यावा आणि क्लबचा आचारी किंवा खाणावळीचा मालक या नात्याने विद्यार्थीदशेतल्या भावी मुन्सफ-मामलेदारांच्याही पोटापाण्याची काळजी करू पाहणाऱ्या बाळकरामाला केवळ स्वत:च्याच पोटाखातर मूळचे नाव घालवून एखाद्या मासिकासाठी खर्डेघाशी केल्यामुळे हास्यास्पद होणे भाग पडावे या प्रकाराला काय म्हणावे? कर्मणो गहना गति:।
वरील सूत्रांतील सत्य जवळ जवळ एखाद्या प्रत्यक्ष प्रमाणाइतकेच स्वयंसिध्द असताही त्याच्या विशदीकरणासाठी बसूच्या बीजगणितात साध्या उत्पत्तीसाठी रेटून उदाहरणे देण्यात येणारी सढळ हाताची कंटाळवाणी उदारता गिरवण्याचा हेतू एवढाच आहे की, प्रस्तुत सूत्र एखाद्या म्युनिसिपालिटीच्या मेंबरलाही सांगोपांग समजून यावे आणि या सत्याच्या जाळयात सापडलेल्या सावजाला कोणीही उपहासाचे खडे मारण्याइतकी अनुदारता दाखवू नये. इतके उघड उघड सांगितल्यानंतर, मला खात्रीची आशा आहे की, थोडया दिवसांपूर्वी एखादे सर्वमान्य मासिक पुस्तक अबाधित चालवून दाखविणे हे आमचे 'मनास चिंतिममेकं' असून 'दैवमन्यत्र चिंतयेत्' या प्रेस ऍक्टान्वये, सदरहु काल्पनिक मासिकाचा एकही अंक आमच्याकडून बाहेर पडला नाही. हे आमच्या कंपूचे गुपित जाहीर केले तर आमच्या अकलेच्या या प्रदर्शनाच्या स्वागतार्थ माझे सहृदय वाचक हस्तीदंती कामाचे प्रदर्शन उघडणार नाहीत. सदर मासिक काढण्याचा बेत करण्यात व अखेर ते न काढण्यात वरील सूत्रांतील दोन्ही कलमांची कारणे सापडून येणार आहेत. कल्पक मनाचा जोरकसपणा व आपल्या सामान्य मनाची दुबळीक या दोन विरोधी गुणांमुळे आपण कोणत्याही गोष्टीला 'मनसा चिंतितं' या कोटीत आणीत असतो; व आपल्या अंगी दृढनिश्चयाचा पुरा अभाव असल्यामुळे आपल्या चिंतिलेल्या बाबतीत ढवळाढवळ करावयाला दैवाला सवड सापडत असते! एखादी गोष्ट करण्याविषयीची आपली हौस, ती वेडयावाकडया रूपातही सिध्दीस न नेता येण्याजोगे आपले तद्विषयक अज्ञान व त्या अज्ञानाचे आपल्याला पूर्ण अज्ञान या त्रयीचाही, आपल्या मनात भलतीच इच्छा उत्पन्न करून देऊन तिची पर्यावसनाने पूर्तता करण्यात उपयोग होत असतो. आपल्या अज्ञानापेक्षा आपल्या अज्ञानाबद्दलचे अज्ञानच आपल्याला जास्त नडत असते. विश्वातल्या प्रचंड घडामोडींचे यथातथ्य ज्ञान होण्यासाठी जी विलक्षण शक्ती आपण खर्च करीत असतो तिचा अगदी दुर्लक्ष करण्याइतका अंश जरी आपण स्वत:चे सम्यगज्ञान करून घेण्याकडे वापरू लागलो तर हेच दु:खपूर्ण जग एकदम सुखाचे माहेरघर होऊन बसेल! जगात काम आहे व कामकरीही आहेत; पण योजक: तत्र दुर्लभ:! चिकणमातीचा गोळा व एक लाकडाचा तुकडा, एवढया सामग्रीतून भात शिजविण्याचे एक भांडे व कुत्रे हाकलण्यासाठी एक छडी करावयाची असल्यास तुमच्या आमच्यापैकी शेकडा नव्याण्णव योजक आपल्या उपजत अप्रयोजकतेला अनुसरून त्या लाकडाचे लहान लहान तुकडे चकत्यांप्रमाणे एकमेकांशी मोठया कुशलतेने व प्रयासाने जोडून एक कसेबसे भांडे व तितक्याच प्रयासाने त्या चिकणमातीची कशीजशी काठी निर्माण करतील व या क्षणावधीत तिकडे चुलीवर ठेवलेले ते लाकडी भांडे जळून गेलेले पाहून, इतक्या प्रयासाची अशी राखाडी झाल्यामुळे दैवालाच दोष देत बसतील! याप्रमाणे कार्याशी देहभावाने चिकटून राहणाऱ्या समवायि कारणाची निवड करताना,विसाव्याच्या ठिकाणी मृतासाठी अश्मा उचलण्याइतकी सारासार बुध्दी दाखवून, असमवायि कारणासाठी मात्र आपण मृताचे प्रेत तिरडीवर बांधण्यापेक्षाही जास्त नेटाची सुव्यवस्था वापरीत असतो.
मासिक पुस्तक काढण्याच्या कल्पनेचा आमच्या डोक्यात जन्म कसा झाला हे प्रथम सांगून नंतर तिची उत्तरक्रिया उरकून घेईन.अनुकरण हा मनुष्यजातीचा मोठयात मोठा गुण किंवा दोष आहे! याच्याइतका व्यापक मनुष्यधर्म दुसरा कोणताच नाही. अर्थात् देहधर्माखेरीज-कोणताच नाही असे म्हटले तर खात्रीने अतिव्याप्ति होणार नाही. मनुष्याची उत्पत्ती माकडापासून आहे हे दाखविण्यासाठी कुशाग्र बुध्दीचा डार्विन 'ऑरिजिन ऑफ रपीसीस' या पुस्तकात दिसून येणारी अवाढव्य खटपट करीत बसला ही त्याने शोधिलेल्या उत्क्रांतीतत्त्वापेक्षाही विशेष आश्चर्याची गोष्ट आहे!माकडांच्या अंगी असलेला अनुकरणरूप मुख्य गुण आबालवृध्द मनुष्यांच्याही ठिकाणी किती प्राचुर्याने दिसून येतो याच्यावर नुसती धावती नजर टाकली तरीसुध्दा अगदी हटवादी मनुष्यालाही मनुष्यमर्कटांचा जन्यजनक संबंध कबूल करावा लागेल. जगातल्या लक्षावधी घडामोडीकडे पाहताक्षणीच त्यांच्या आदिभूत एकंस्थानापुरती कल्पकता असून पुढील शुन्यांच्या पलटणीत त्याच किमतीच्या अनुकृतींची भरती झालेली असल्याचे कोणाच्याही चटकन् ध्यानात येईल. (सृष्टीरूप अदस्त्र पुस्तकात आपण नेहमी कमीअधिक प्रमाणाने स्थलकालपात्रे बदलून 'टोपीवाला आणि माकडे' हीच गोष्ट वाचत आहोत असे मार्मिक वाचकांच्या लक्षात आल्यावाचून राहणार नाही.) एखाद्याला एखाद्या गोष्टीत यश येतेसे दिसू लागताच सर्वत्र त्याच्या नकला सुरू होतात; अर्थात् या नकला बाह्यांगापुरत्याच असतात हे सांगणे नकोच. कोणत्याही प्रथमपुरुषाला यशस्वी होण्याला ज्या निसर्गदत्त किंवा निसर्गदत्त व पुढे प्रयासाने परिणत केलेल्या गोष्टी कारणीभूत होतात, त्यांचे अनुकरण मात्र कधी होत नाही, किंबहुना होणे शक्य नसते म्हटले तरी चालेल. कुठेही आणि केव्हाही पाहा, एक मोर नाचू लागताच किमानपक्षी नऊशे नव्याण्णव लांडोरींच्या नाचासाठी वेडेवाकडे अंगण रिकामे ठेवावेच लागते! अंगण मूळचे वेडेवाकडे नसले तरी नाचणाऱ्यांच्या कर्तबागरीमुळे त्यांच्याभोवती नसता वाकडेपणा तरी येतोच येतो. सेनसेनशी तोंड देऊन लोक विसावतात व विसावतात तोच त्यांच्या तोंडावर जीनतानचा गोळीबार सुरू झाला; (काल परवा हातातोंडाशी येण्याजोगा झालेला सेशीनतान हा याच जपानी घराण्यातला तिसरा पुरुष होय; अद्याप याची आमची तशी तोंडओळख झालेली नाही! या धर्तीच्या हिंदुस्थानी भावी गोळकासाठी 'किन्तान्' हे नाव अजून रिकामे आहे!) आतंकनिग्रह गोळयांची रुग्णांच्या वतीने पहिली फैर झाडून काळाची थोडी पिच्छेहाट झाली नसेल तोच काळाच्या बाजूने, वैद्यनाभधारी त्याच्या हजारो दूतांनी रोग्यांवर गोलंदाजी सुरू केली. आंजर्ल्यास आर्यमहौषधालयाचा नुसता पायासुध्दा नीट बसला नाही, इतक्यात तळकोकणाच्या कैक गावांनी आर्यधन्वंतरीप्रीत्यर्थ वारावरच्या इमारतीचा कळस उठवून दिला! रंगभूमीवर तुकारामाने ब्रह्मानंदी टाळी लावताच, प्रेक्षकांनीही टाळीला टाळी मिळविलेली पाहून, ज्ञानेश्वर-नामदेवांसारख्या ईश्वरमान्य साधूपासून कानफाटया गोसाव्यापर्यंत प्रत्येकाला मिरजेच्या मिरासाहेबासमोर हजिरी देणाऱ्या गुणिजनाइतक्या अगत्याने एकेकदा रंगदेवतेला खडी तालीम देऊन जावे लागले. राणा भीमदेवाच्या आरोळीबरोबर प्रेक्षकांनाही आनंदातिशयाने ओरडताना ऐकल्यावर रणांगणावर पडलेल्या सर्व राजस्थानी मुडद्यांनी आजापणजांची वैरे साधण्यासाठी, अंगरख्याचे बंद तडातड तोडण्यासाठी, स्वर्गाची कपाटे फोडण्यासाठी व कानठळया बसविणाऱ्या आवाजात त्रिवार 'सूड, सूड, सूड' घेण्यासाठी रंगभूमीवर जोराची कवाईत दाखविली. महाराष्ट्र रंगभूमीला ललामभूत झालेले नामांकित नट रा. गणपतराव जोशी यांनी हॅम्लेटसारखी भूमिका वठविताना योग्य रीतीने कपाळावर हात मारिताच मार्मिकांच्या माना डोललेल्या पाहून गद्यनाटकांतले लुंगेसुंगे नायकसुध्दा वेळी-अवेळी आपल्या हाताने कपाळमोक्ष करून घेऊ लागले. आपल्या संगीतमाधुर्याने रंगदेवतेलाही रंगवून - (अपूर्ण)