(स्थळ: घरासमोरील अंगण. वेळ- चांदण्या रात्रीचा पहिला प्रहर. पात्रे: भोकाड पसरून रडणारा आठ-दहा महिन्यांचा बाबू. बाबूची समजूत घालीत असलेले त्याचे वडील- तर्कालंकारचूडामणी प्रोफेसर कोटिबुध्दे.)
प्रा. कोटिबुध्दे : (गंभीर वाणीने) बाबू, रडू नकोस! रडण्याने स्वत: रडणाराला काहीच फलप्राप्ती होत नसून, आसमंतात्भागी वास्तव्य करणाराला- म्हणजे निकटतरवर्ती जनसमुदायाला मात्र कर्णकर्कश रुदनध्वनीपासून महत्तम त्रास होण्याचा संभव असतो. किंबहुना खात्री असते, असेही म्हटले असता अतिशयोक्ती होणार नाही.
बाबू : (जोराने) ह्या- आ- ह्या- आ- ऑं- ऑं
प्रो. कोटिबुध्दे : (विशेष गांभीर्याने) अरे रडू नकोस! बाबू, आरोग्यशास्त्राच्या दृष्टीनेसुध्दा, दीर्घक्रंदन प्रकृतीला अत्यंत अपायकारक आहे, हे भूमितीच्या प्रत्यक्ष प्रमाणासारखे स्वयंसिध्द आहे! आक्रोशामुळे अंत:स्नायूंच्या ज्ञानमज्जा विस्तृत होऊन त्यामुळे बाह्यस्नायूंची रेषावलयेही अत्यंत वेगाने इतस्तत: आकर्षिली जातात! श्वासनिरोधामुळे रुधिराभिसरणक्रिया जिला इंग्रजीत (Blood circulation) असे म्हणतात- मंदतम होत्साती, रुधिरलोहपिंडाच्या स्वैरगतीला प्रतिबंध झाल्यामुळे अंतर्गत चलनवलन-व्यापाराची अप्रत्यक्षरीत्या नियंत्रणा होते. त्याचप्रमाणे तत्त्वज्ञानाच्या दृष्टीनेही रुदनाची व्यंगे दिसून येतात, श्रीमद्भगवद्गीतेत प्रत्यक्ष भगवंतांनी असे सांगितलेच आहे की, अस्तत्वं च महाबाहो नैनं शोचितुमर्हसि! पाश्चिमात्य तत्त्ववेत्त्यांचा मुकुटमणी सुप्रसिध्द हर्बट स्पेन्सरसुध्दा कंठरवाने हेच प्रतिपादन करीत आहे, की-
बाबू : (दुसर्या सप्तकाचे सूर काढीत) हां- हां- एं- एं
प्रो. कोटिबुध्दे : (चढत्या गांभीर्याने) रडू नये, बाबू रडू नये! तो बघ सिंहराशीतला जोडतारा! त्यातल्या दोन ताऱ्यांच्या परस्परांभोवती पूर्ण प्रदक्षिणा व्हावयास छत्तीसशे बेचाळीस वर्षे, सात महिने, तीन दिवस, चार प्रहर, छप्पन्न मिनिटे व अठरा पूर्णांक सात दशलक्षांश पळे लागतात. दशांशाची शेवटली पाच स्थळे आवर्त दशांशात आहेत, असे सुप्रसिध्द आर्यज्योतिषी भास्कराचार्यांचा सूर्यकिरणांच्या परावर्तनाने त्याला प्रकाशप्राप्ती होऊन पृथ्वीच्या कक्षेत सूर्यास्तानंतरही पर्यायाने सूर्यप्रकाशाचा संचार होतो. या प्रकाशप्रत्यक्षाला चंद्र हे निमित्तकारण आहे. याला वेदांतून 'सोम' या नावाने संबोधिले असून त्याचे वनस्पतीचा पती असेही नामकरण केले आहे. त्यावरून वनस्पतिशास्त्राची एके काळी आपल्या देशात किती प्रगती झाली होती, याचे स्वयंप्रकाश प्रत्यंतर मिळते! या दृष्टीने चंद्राकडे पाहिले म्हणजे जणू काय तो आपल्या प्रकाशाने अज्ञानयुगावरची कालपटले भेदून आमच्या पूर्वजांच्या अगाध ज्ञानावरच प्रकाश पाडीत आहे असे वाटते! पाहा, त्याच्याकडे विचारपूर्ण दृष्टीने पाहा. असा रडू नकोस-
बाबू : (कोणत्याही सप्तकाच्या आटोक्यापलीकडच्या सुरात) यां- ह्या- में-
प्रो. कोटिबुध्दे : (स्वगत) Oh! nonsense! whatever shall I do now? (काय त्रास आहे हा! आता करावे तरी काय?) (दहा-बारा वर्षांची मनुताई येते.)
मनुताई : बाबा, द्या बाबूला इकडे! मी खेळवते त्याला! (बाबूला कडेवर घेते.) मनुताई : (काहीतरी निरनिराळे सूर काढून) बाबुडया रे, छकुल्या रे, सोनुल्या रे, बाबूराया, तो बघ चांदोमामा! मा- म्मा!
बाबू : (रडे आटपून पाहतो) आ- आ! (हात पसरतो.)
मनुताई : चांदोबा चांदोबा भागलास का ।
निंबोणीच्या पानामागे लपलास का।
निंबोणीचे पान करवंदी।
मामाचा वाडा चिरेबंदी॥
मनुताई : (त्याला खाली ठेवून बोटे पुढे करून) चाल चाल बाळा! सोन्याचा वाळा! चाल चाल बाळा! सोन्याचा वाळा! चाल चाल बाळा! सोन्याचा वाळा!
बाबू : (आनंदाने हातपाय हालवीत) आऽ आऽऽऽ!
(बाबू उत्कट आनंदाने एक दोन पावले टाकून हसत हसत मनुताईच्या गळयात झेप टाकितो. मनुताई त्याचे दोन चार मुके घेते. प्रोफेसरसाहेब टेबलाजवळ जाऊन नोटबुकात लिहितात.
प्रो. कोटिबुध्दे : (थोडक्यातच जगाचा प्रलय होण्याची खात्रीची बातमी कळली असून, आपला काही इलाज नाही, असा विचार करणार्या मनुष्याप्रमाणे हताश व सखेद मुद्रेने लिहितात.) आमच्या स्त्रीवर्गाच्या तोंडी बसलेली अर्थशून्य, विसंगत व वेडीवाकडी गाणी ऐकली म्हणजे मानस व्यग्र झाल्यावाचून राहात नाही! गीता व उपनिषदे यांचे पाठ या केव्हा म्हणणार? वाङ्मयातही हेच! गंभीर तत्त्वज्ञानाची, शास्त्रसाहित्याची पुस्तके फार तयार न होता दरवर्षी नाटके, कादंबर्या, गोष्टी यांनी भरलेल्या पुस्तकांचाच वाढता भरणा होत आहे! लोकांना उच्च ज्ञानाची प्राप्ती कशी होणार, हा प्रत्येक विद्वानापुढे मोठा प्रश्न आहे!
भरतवाक्य
वाग्देवी : जिते रहो, पठ्ठे! जिते रहो! (पडदा पडतो.)
प्रस्तावना : सभांतून, व्याख्यानांतून, संमेलनांतून, वर्तमानपत्रांतून, वाङ्मयविषयक सिंहावलोकनांतून कित्येक पक्वपंडित हेच म्हणतात व लिहितात की, आमच्या वाङ्मयात तत्त्वज्ञानविषयक, शास्त्रीय वगैरे गंभीर पुस्तके थोडी तयार होऊन 'नाटके-कादंबर्या'चाच विशेष भरणा होत आहे! अशाने लोकशिक्षण कसे होणार, हा प्रत्येक विद्वानापुढे मोठा प्रश्न आहे! आणि या दीडशहाण्यांना काय म्हणावे, हा प्रत्येक सामान्य वाचकांपुढे मोठा प्रश्नच आहे! -नाटककर्ता