प्रस्तावनेच्या इतर बाजूप्रस्तावनेच्या इतर बाजूप्रस्तावनेच्या इतर बाजू जिल्हानिहाय गौरकाय अधिकारी, जिल्ह्यांच्या विस्तृत पटांगणात कलेक्टर, मॅजिस्ट्रेट व प्रसंगी पोलिटिकल एजंट या तीन निरनिराळया रूपांनी वावरत असतो; त्याचप्रमाणे बार्शी लाइट रेल्वेचा अर्धगौर गार्ड, गाडी चालत असेपर्यंत गार्ड, स्टेशनवर उभी राहावयाचे बेतात असताना उतारूंजवळ तिकिटे घेणारा तिकिट कलेक्टर, गाडी उभी असेपर्यंत स्टेशनावर झपाटयाने येरझारा घालणारा स्टेशनमास्तर व शेवटी गाडी सुटावयाचे वेळी बावटा दाखविणारा पोर्टर, हे चार निरनिराळे हुद्दे सांभाळून असतो. सकृद्दर्शनी यांची कर्तबगारी मोठीशी वाटते खरी; परंतु नाटयसृष्टीमधील गौरमुख सूत्रधार त्याच्या उज्ज्वलतेस काळिमा लविल्याखेरीज राहणार नाही. हा प्राणी प्रस्तावनेच्या आकुंचित जागेतच पाच निरनिराळया नात्यांनी वावरत असतो. बोलण्याच्या भरात कोणतीही गोष्ट सहज विसरणारा अजागळ, घरांतील सर्व भानगडींबद्दल बेदरकार राहून हमेशा नाटकांच्या जाहिराती ठोकणारा लोकरंजनाचा मक्तेदार, ग्रंथकार व नट यांच्याबद्दल देवाजवळ व प्रेक्षकांजवळ वकिली करणारा स्वयंसेवक, एका सदैव उपवर पोरीचा दैववादी बाप व नाटकांचा तिटकारा करणार्या एका हट्टवादी बायकोचा निश्चयी नवरा, ही सूत्रधाराची पाच अंगे आहेत. यथाछंद यांचा थोडथोडा विचार करू.

ईशस्तुती संपून दोन्ही पारिपार्श्वक दोन बाजूंनी (हे दोघे निरनिराळया बाजूंनी कोठे जातात?) निघून जाताच सूत्रधार कायदेशीर 'सूत्रधार' होतो असा नाटयशास्त्राचा नियम आहे. 'गावातला एक सभ्य ब्राह्मण' या नात्यानेच त्याने ईशस्तुती करावयाची असते. यावरून पाहता मनुष्यस्वभावाच्या उद्दामपणाची चांगलीच प्रचिती दिसून येते. जो मनुष्य एका क्षणापूर्वी प्रेमळ शब्दांनी परमेश्वराला आळवीत असतो तोच सूत्रधाराचा अधिकार हाती येताच आपले ताकापुरते रामायण आटोपतो, व लागलाच बेमुवर्तपणाने म्हणावयास लागतो की, पुरे पुरे, हा सभाजनांचा रसभंग करणारा खटाटोप कशाला पाहिजे? मागील कृत्यांबद्दल मनुष्य किती बेदरकार असतो? जमलेल्या लोकांची हांजीहांजी करण्यासाठी हा गृहस्थ खरोखरीच मोठया खटाटोपाने केलेल्या ईशस्तुतीला बिनदिक्कत 'खटाटोप' म्हणून मोकळा होता! माझी खात्री आहे की, प्रत्येक प्रयोगाच्या पूर्वी इतक्या प्रेमळपणाने ईशस्तुती केली तर वाटेल तो देव मूर्तिमंत रंगभूमीवर येऊन उभा राहील; निदान भोळा शंकर तरी खास येईल! पण मध्यंतरीच हा प्रकार होत असल्यामुळे असे झालेले कधी दिसून येत नाही. शंकराच्याही भोळेपणाला काही मर्यादा आहेच. तोंडावर केलेली ही अमर्याद न समजण्याइतका काही तो भोळा नाही. स्तुतीचा प्रेमळपणा ऐकताच गजचर्म पांघरून यायला निघावे आणि पुढली भानगड ऐकताच पुहा मागे फिरावे याप्रमाणे दर शनिवारी-बुधवारी त्याची धांदल होत असावी असा माझा अंदाज आहे. * आता व्यवहारज्ञानदृष्टया पाहिले तर मात्र सूत्रधाराचेच करणे वाजवी दिसते. कारण ज्याच्या अस्तित्वाबद्दलसुध्दा वाद चालू आहेत त्या ईश्वराच्या येण्यासाठी इतका सायास करण्याच्या भानगडीत प्रत्यक्ष चार आणे खर्चून आलेल्या प्रेक्षकास कंटाळून परत घालविण्यात काय शहाणपणा आहे?


यानंतर प्रेक्षकांना 'हंसक्षीरन्याया'ने गुणग्रहण करण्याबद्दल विनंती करण्याची वहिवाट आहे. हा 'हंसक्षीरन्याय' बहुतेक नाटककारांचा मोठा आवडता पदार्थ दिसतो; आणि खरे म्हटले असता दुधाच्या चार थेंबाची आशा दाखवून व प्रेक्षक-वाचकांना आपल्या नाटकरूपी समुद्रात खूप धडपडायला लावून नंतर त्यांची निराशाजन्य तारांबळ पाहणे कोणाला आवडणार नाही? प्रत्येक नाटकात हा न्याय हजर असल्यामुळे माझ्या अनुशासनाप्रमाणे नाटक लिहिणार्या होतकरू नाटककारांना याचा उपयोग करावयाचा उपदेश मी अवश्य केला असता; परंतु पूर्वपरंपरेने वागण्याचा आपला संकल्प जरी प्रचलित नाटकांतील सबंध पर्देच्या पर्दे व प्रवेशच्या प्रवेश आपल्या नाटकात घुसडून देण्याइतका मोठा असला तरी या बाबतीत नाइलाजास्तव आम्हा आर्यांच्या चर्वितचर्वणप्रियतेला क्षणभर बाजूस ठेवणे उचित दिसते. ज्याला ज्या गोष्टीची वार्ताही नाही त्यांनी त्या गोष्टीत परीक्षा घेण्याच्या भरीस पडण्यात काही अर्थ नाही. मुंबई युनिव्हर्सिटीच्या एका विद्वान परीक्षकाने स्वप्रदर्शनार्थ "His verticality went to his horizontality" (साधा अर्थ- तो पडला) या अवाढव्य वाक्याचे संस्कृत रूपांतर करावयास सांगितले होते असे म्हणतात. त्याच मासल्याचा 'हंसक्षीरन्याया'चाही प्रकार आहे. लोकांना या न्यायाची माहिती खात्रीने नाही. ही विद्या जर त्यांना माहिती असती तर दुधात पाणी घालणार्या गवळयाबद्दल घरोघरी इतकी कुरकूर व पात्रोपात्री इतक्या कोटया कधीच सुरू झाल्या नसत्या. लोक मुकाटयाने हंसक्षीरन्यायाने वागावयास लागले असते. पण त्यांना त्यात गम्य नाही. मग उगीच त्यांना त्या न्यायाने जाण्याच्या भरीस पाडण्यात काय अर्थ आहे? नवीन कल्पना शोधून काढणे हे आपली ब्रीद नव्हे, खरे कवित्व त्यात नाही. उगाच एखादा टीकाकार संतापून म्हणावयाचा की, ही कल्पना दुसर्या कोणत्याही नाटकात दिसत नाही; सबब ती चुकीची असली पाहिजे; तसे नसते तर आमच्या एखाद्या तरी जुन्या कवीला ती आठवलीच असती!

  • येथे इतके म्हटलेच पाहिजे की, इतका प्रकार होत असूनही या भोळया दैवताचा नाटकवाल्यांकडे पक्षपात आहेच. प्रत्यक्ष निंदा होत असतानाही स्वत:च जाणे जनरीतीला वाईट दिसले म्हणून निदान आतून तरी नटवर्गाबद्दल सहानुभूती दाखविण्यासाठी या दैवताने आपल्या अनुचरगणाला पाठवून दिले आहे; हे सध्या रंगभूमीवर थैमान करणार्या भूत, पिशाच्च, समंध, वेताळ, ब्रह्मराक्षस वगैरे मंडळींवरून सिध्द होते.

याप्रकारे ग्रंथकाराच्या तर्फेने ही वकिली झाल्यानंतर सूत्रधाराने आपल्या 'मायेचे अनुमोदन' घेण्यासाठी 'वेषसिध्दता' झाली असल्यास तिला इकडे बोलवावी. येता क्षणीच तिने 'काय आज्ञा आहे' म्हणून विचारावे. पुढे सूत्रधाराने एका साकीत (येथे साकीच असावी लागते. आजपर्यंत या कामी जवळजवळ तीनचारशे साक्या खर्ची पडल्या आहेत.) नाटकाचे नाव, ग्रंथकाराचे नाव, त्याच्या गोत्राचे नाव वगैरे हकिगत जाहीर करावी. एका कुशल लेखकाने तर आपले नाव, बापाचे नाव, आडनाव, टोपणनाव, मूळ गाव, हल्ली वस्तीचे नाव, तालुक्याचे नाव, जिल्ह्याचे नाव, प्रांताचे नाव, पोस्टहपिसाचे नाव व अगदी जवळच्या रेल्वे स्टेशनचे नाव इतक्या गोष्टी एका पद्यात खेचून भरून त्या पदाचा जवळजवळ एक नकाशाच बनविला आहे! या लेखावरही ताण करण्यासाठी माझ्या एका नाटककार मित्राने आपल्या एकाच पद्यात वर सांगितलेल्या गोष्टींच्या भरतीस जी.आय.पी. रेल्वेच्या सर्व स्टेशनांची नावे, आपल्या लग्नाच्या वेळी जमलेल्या करवल्यांची नावे, पानिपतच्या लढाईवर गारद झालेल्या सर्व वीरांची नावे, इराणच्या राजाच्या तीस हजार आवडत्या मांजरींची नावे, मटेरिया मेडिकामधील सर्व औषधांची नावे व विलायतच्या मेलने येणार्या उतारूंची नावे देण्याचा निश्चय केला आहे. हा अमरकोश लौकरच बाहेर पडेल. आगाऊ गिऱ्हाईक होणारासही आपले नाव या संगीत यादीत गुंफलेले पाहण्याचा लाभ करून देण्यात येईल.

त्याचप्रमाणे या साकीत स्वत:बद्दल व स्वत:च्या कृतीबद्दल वाटतील त्या थापा मारण्याची ग्रंथकाराला पूर्ण मुभा असते. कालिदासासारख्याने स्वत:चा कमीपणा दाखविण्याचा प्रयत्न ठिकठिकाणी केलेला दिसून येतो. हा त्याचा भित्रेपणा होय. सध्याच्या कायद्याच्या कडक युगात कोणाचीही भीती बाळगण्याचे कारण नाही. फार झाले तर आपणच आपल्या कवितेची स्तुती केल्याबद्दल एखादा अलंकारिक टीकाकार 'कवित्व केले कविनायकाने' एकदादि श्लोकाच्या आधारे 'कवी आपल्याच कन्येवर लुब्ध झाला' असे म्हणेल एवढेच. पण त्यातही काही वावगे नाही. सर्व सृष्टीचा शहाणासुरता विधाता जर आपली कन्या सरस्वती हिचा अभिलाष धरावयाला चुकला नाही म्हणतात, तर मग शब्दसृष्टीचा विधाताच आपल्या सरस्वतीभोवती घिरटया घालू लागल्यास कोठे चुकते?

'आपला नवरा नाटक करणार' हे समजताच नटी खूप रागावते व त्याला नानाप्रकारे बोध करून पाहते; परंतु तिचे म्हणणे सूत्रधाराला कधीच पटत नाही व पटून उपयोगही नाही, कारण नाटकाच्या जाहिराती निदान चोवीस तास आधीच लागलेल्या असतात. यानंतर ही नवराबायको आपसात भांडतात. एकमेकांना शाबासक्या देतात, एकमेकांची मते खोडून काढतात, घरातल्या भानगडींची वाटाघाट करतात, एकमेकांच्या करमणुकीसाठी गातात, मध्येच अगदी साध्या गोष्टीही विसरतात आणि पुन्हा एकमेकांस विसरलेल्या गोष्टींच्या आठवणी करून देतात. या सर्व गोष्टी होईपर्यंत प्रेक्षकांनी घरातल्या निरुपद्रवी देवांप्रमाणे निर्विकार मनाने स्वस्थ बसावयाचे असते. सरतेशेवटी कोणाची तरी चाहूल लागताच सूत्रधार एखाद्या भुरटया चोराप्रमाणे नटीसह निघून जातो. या बाबतीत हा लाजाळूपेक्षाही जास्त भेकड असतो. हा इतका माणूसघाण्या का असावा हे समजत नाही. पण मी चुकलो. या दोघ्यांच्याविषयी कोणती गोष्ट नीटशी समजली आहे तर हीच एक समजावयाची राहिली आहे? प्रस्तावनेच्या दोनचार पानांतच या जोडप्याच्या परस्परविरोधी विसंगत वाक्यांची इतकी गर्दी असते की, त्याच्यावरून या दोघांचे स्वभावचित्र रेखाटताना शेक्सपीयरच्या सदतीस नाटकांतल्या विविध भूमिकांचे सम्यक निरीक्षण करणारा जर्विनससुध्दा आपले अनुभविक कलम निराशेने खाली ठेवील. नटी ही वस्तू मानी असते, थट्टेखोर असते, मूर्ख असते, कल्पक असते, संसारदक्ष असते, सांगकामी असते, नवर्याचा स्वभाव ओळखणारी असते व तशीच न ओळखणारीही असते. वेषसिध्दी झाल्यावर हमेषा आपला नवरा आपल्याला हाक मारतो हे पूर्णपणे ठाऊक असताही दर प्रयोगाचे वेळी त्याच्या बोलावण्याची वाट पाहात बसते. यावरून ती मोठी मानी तरी असावी किंवा वहिवाटीच्या कायद्याला बगलेत गुंडाळणारी तरी असावी असा तर्क होतो. बरे; रंगभूमीवर प्रवेश केल्यानंतर तरी काही शहाणपणा असतो म्हणावा तर तोही नाही. तेथे गेल्यावर तरी नवर्याचा पोषाख, दिव्यांचा चकचकाट, प्रेक्षकांची दाटी, (तबलजी, पेटीवाला) वगैरे गोष्टी पाहिल्यावरच तिला 'बहुतेक प्रकार' ताडता येतो. नवरा वेषसिध्दी करावयास सांगतो त्यावरून तिला काहीच कल्पना करता येत नाही. बरे उलटपक्षी उगीचच्या उगीच नवर्याने सोंगे सजविण्यास सांगितले असावे अशा समजुतीवर ती स्वस्थ बसली असावी म्हणावे तर नवर्याला वेड लागल्याबद्दलचा संशयही ती कधी दर्शवीत नाही.

जगात प्रत्येक मनुष्य अनुभवापासून शहाणपणा शिकत असतो आणि याच कारणामुळे इतिहास लिहिले जात असतात; परंतु नटी या गोष्टीला अपवाद आहे. हजारो वेळा नवर्याने झिडकारून टाकिले असताही दर नाटकात ही अनुभवाला विसरणारी व हट्टी स्त्री पुन्हा आपले चऱ्हाट सुरू करिते व नवर्याला नाटकाचा धंदा सोडून देण्याविषयीची मसलत देत असते. तोही अगदी ठरावीक शब्दांनी तिचे समाधान करतो. सतत पंचवीस वर्षे भिक्षांदेहीचे फलरहित व्रत चालवूनही निराश न होणार्या राष्ट्रसभेतील राजकीय भिकाऱ्यांच्यापेक्षा हजारो वर्षे एकच भीक मागणार्या नटीची चिकाटी हजारो पटींनी मोठी आहे हे सांगणे नकोच. हिंदुस्थानात स्त्री-पुरुषांना समान हक्क देण्याचा कायदा पसार होताक्षणीच मी नटीला अध्यक्षस्थानी बसविण्याची सूचना पुढे आणणार आहे. जहाल नाटककारांनी वाटेल तर आपल्या नटीला 'अडवणुकीचे मार्ग' सुचवावेत; परंतु सध्याची 'मवाळ' नटी कित्येक वर्षेपर्यंत तरी आपला प्रयत्नवादीपणा सोडणार नाही.

नाटकाचा धंदा सोडण्यासाठी पुढे केलेल्या कारणांपैकी मुलीच्या लग्नाबद्दल दिरंगाई हे एकच कायमचे कारण आहे. शंकराचे व कंचुकीचे वार्धक्य, पार्वती व गंधर्वकन्या यांचे तारुण्य आणि ध्रुव व उपमन्यूचे बाल्य यांच्याप्रमाणेच कार्तिकस्वामी व सूत्रधाराची मुलगी यांचे कौमार्य अक्षय्य आहे. ही सदैव उपवर असते. काळाचा हिच्या वयावर परिणाम होत नाही किंवा हिला कोणी नवराही मिळत नाही. हिच्यात काही तरी खोड असल्यामुळे म्हणा, किंवा ही नाटकवाल्याची मुलगी असल्यामुळे म्हणा, हिला पत्करावयास कोणीही तयार नाही. हिचा बापही या बाबतीत बेफिकीर राहतो. प्रेक्षकांच्या मनोरंजनाच्या अगदी नित्याच्या व साध्या कर्तृत्वाबद्दल अगदी चिंतातुर होऊन प्रयत्नवादीपणाच्या मार्गास लागणारा सूत्रधार या कन्येच्या लग्नासारख्या नैमित्तिक आणि महत्त्वाच्या कर्तव्याबद्दल मात्र देवावर भरवसा टाकून पूर्ण दैववादी बनतो! मग कदाचित् 'रोज मरे त्याला कोण रडे' अशातला प्रकार येथे झाला असल्यास न कळे! हा प्रकार हमेषा पाहून कंटाळलेल्या प्रेक्षकांतूनच कोणी परोपकारशील 'कोदंड' उत्पन्न होऊन या मुलीचे पाणिग्रहण करील तरच बाकीच्या प्रेक्षकांच्या मागची ही पुराणश्रवणाची कटकट चुकण्याचा संभव आहे. एरवी दुसरा मार्ग काही दिसत नाही.

सूत्रधार हा सदैव निपुत्रिकच असला पाहिजे. याला पुत्र होतच नाही म्हणून म्हणा किंवा माकडाच्या टोळीपैकी हुप्या नवीन जन्मलेल्या पुल्लिंगी वानरबालकांना मारून टाकितो तशी प्रवृत्ती या सूत्रधारात असेल म्हणून म्हणा पुत्रसुख याच्या दैवी नसते. नाटके पाहू लागल्यापासून व पुढे लवकरच वाचूही लागल्यापासून मला पुष्कळ दिवसपर्यंत आशा असे की, एखादा तरी सूत्रधार मुलासह प्रवेश करील किंवा एखादी तरी नटी कन्याविवाहाच्या नेहमीच्या काळजीतून मुक्त होऊन आपला मुलगा स्कूल फायनलच्या परीक्षेत नापास झाल्याबद्दल खेद करीत असलेली दिसेल; परंतु अनुभवांती त्या आशेचेही सूत्रधाराप्रमाणेच निसंतान झाले आहे.

नाही म्हणायला एका नाटकात मात्र सूत्रधाराचा एक मुलगा दृष्टीस पडतो; पण तो प्रकार हिशेबात घेण्याच्या लायकीचा नाही. 'वीरतनया'त बकुलाने, 'शुभसेनाचे काळीजच उलटे असल्यामुळे त्याला सर्व गोष्टी सहजच उलटया दिसाव्यात' असे म्हटले आहे. त्याच धर्तीचा प्रकार तेथेही झालेला आहे. त्या ग्रंथकाराचा सर्वच प्रयत्न हेतूसह उलटा आहे. आधी हरिश्चंद्र राजाच्या दु:खमय कथेतून हास्यरस उत्पन्न करण्यासाठी हे नाटक निर्माण झाले आहे. पुढे बोबडे बोलण्याचे अनुकरण करण्यासाठी एका लहानशा पात्राला अस्पष्ट वर्णोच्चाराऐवजी अगदी स्पष्ट परंतु उलटी भाषा बोलावयास लाविले आहे! या व अशाच इतर प्रकारांमुळे हे नाटक ग्रंथकाराच्या म्हणण्याप्रमाणे खरोखरीच 'हास्यरसप्रधान' झाले आहे, एवढे येथे सांगणे अप्रासंगिक होणार नाही.

सूत्रधार इतक्या वेळा आपल्या दृष्टीस पडतो; परंतु जातगोताविषयी आपणाला काहीच माहिती मिळावयाचा संभव नसतो; अपवादाखातर एका सूत्रधाराच्या भाच्याचे नाव 'चंद्रकांत' एवढेच आजपर्र्यंत कळले आहे. परंतु एवढया आधारावरून असा तर्क करता येईल की, सूत्रधाराच्या गणगोताच्या माळेचे सूत्र 'चंद्रकान्त, सूर्यकान्त' यांसारख्या मण्यांनीच युक्त असावे. एखाद्या एथ्नॉलॉजीकल* कमिटीला याची वंशपरंपरा शोधून काढण्यासाठी नेमल्यास चालण्यासारखे आहे.

- 'सवाई नाटक'

  • या शब्दाच्या खरेपणाबद्दल माझी खात्री नाही. कदाचित् 'एथ्नाग्राफीकल' असाही खरा शब्द असू शकेल.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel