आता एकच विचार, कोणी नवरा त्याशी समर्पू म्हणे।
मानवी बुध्दीच्या आटोक्यात येणार्या कोणत्याही विषयाच्या ज्ञानाची, सामान्यत: तात्त्वि (Theoretical) व व्यावहारिक (Practical) अशी दोन अंगे असतात. यापैकी कोणत्याही एकाचाच परिचय होऊन भागत नाही. त्यापैकी कोणतेही एक दुसर्यावाचून भटकताना दिसले, म्हणजे विरहावस्थेतील प्रणयीजनाप्रमाणे बेवकूब ठरून ते उपहासाला पात्र होते. पहिल्याला 'पुस्तकी विद्या' हे नाव मिळून दुसर्याची आडमुठेपणात जमा होते. 'बारीक तांदूळ तितके चांगले' हे पुस्तकी सूत्र पाठ म्हणणारा पक्वपंडित व्यावहारिक ज्ञानाच्या अभावी, बारकातले बारीक तांदूळ म्हणून कण्याच घेऊन घरी येतो! पोहण्याच्या पुस्तकातील नियम हृदयात साठवून, समोर मोठया मेजावर ठेवलेल्या बशीभर पाण्यातल्या बेडकाबरहुकूम हातपाय पाखडणारा तितीर्षु बारा वर्षे असे अध्ययन करूनही शेवटी स्नान करताना झोक जाऊन बालडीभर पाण्यात बुडून मेल्यास नवल नाही! चोवीस वर्षाच्या एका नवरदेवाऐवजी बारबारा वर्षाचे दोन विचवे चालतील किंवा नाही, ही शंका काढणारे डोकेही केवळ एकांगी ज्ञानानेच एकीकडे कलते झाले असले पाहिजे. उलटपक्षी, संथपणे चाकूने पोट चिरून, वाढलेली पानथरी वेताची कापून पुन्हा जागच्या जागी चिकटवून चांगल्या लडीच्या दोर्याने पोट शिवून जसेच्या तसे आगबंद केले असताही रोगी मेल्याबद्दल आश्चर्यचकित होणारा नाकाडोळयाचा वैदू तात्त्वि ज्ञानाचे अज्ञान दाखवितो. तात्पर्य, ज्ञानाच्या या दोन्ही बाजू मनुष्याला अवगत असल्याखेरीज कोणत्याही बाबतीत त्याची खरी वाहवा होत नाही; आणि याच कारणामुळे, पहिल्या लेखांकात वरसंशोधनाचे तात्त्वि ज्ञान वाचकांपुढे ठेवून, मागील खेपेला कबूल केल्याप्रमाणे प्रस्तुत ज्ञानाची व्यवहारात अंमलबजावणी कशी होते, हे सांगण्याचा मनसुबा आहे.
गावात नवीन दिसू लागणार्या कोणत्याही गोष्टीची गावगुंडांकडून पहिली हजेरी होते, व पुढे शिष्ट लोक तिची संभावना करितात, हा सार्वत्रिक नियमच आहे. आमची गाडीही या नियमाला अपवादभूत झाली नाही. गाडी रस्त्याने पुणे शहराच्या सरहद्दीजवळ येऊन ठेपताच आम्ही हिंदू लोकांच्या उपजत व्यवहारबुध्दीला अनुसरून, आमच्या भरल्या गाडीची जकात चुकवून टोलनाक्यावरून राजरोस कसे जावे याचा आम्ही विचार करू लागलो. हमरस्ता सोडून गाडी टोलनाक्याच्या पाठीमागून नेऊन थोडया अंतरावर गेल्यावर रस्त्यावर मिळवून घ्यावी, असे माझे मत होते; सर्वजणांनी शक्य तितका बोजा खांद्यावर घेऊन चालत गेल्याने रिकाम्या गाडीला जकात पडणार नाही, असे नानांचे म्हणणे पडले; आणि एखाद्याने पुढे जाऊन नाकेदाराला पानतंबाखूच्या नादात गुंतवून गाडी मुकाटयाने हाकून न्यावी, असा गनिमी कावा आबाभटजी सुचवीत होते. या गनिमी काव्यात पुढाकार घेऊन नाकेदाराशी जाऊन भिडण्यात आबांचा एक तलफ भागविण्यापुरता अप्पलपोटेपणाचाच हेतू होता, हे सांगणे नकोच! बराच वेळ भवति न भवति होऊनही आमचे एकमत होईना. अखेर या तिरंगी सामन्याच्या भरात वादविषयक लबाडीचाही विसर पडून आम्ही मोठमोठयाने वादविवाद करावयाला लागताच हळूहळूआमच्याभोवती गावगुंडांचे एक भरीव कडे जमू लागले, आणि त्यांच्यात आमच्याबद्दल हमरीतुमरीची कुजबूज सुरू झाली. गाडीतल्या सामानाच्या विविधतेमुळे आमच्याबद्दल त्या लोकांची भलतीच समजूत झाल्यास तीत आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. त्यातील अगदी मागासलेला वर्ग, आम्हाला 'खजिनदार संगीत मंडळी'च्या जामदारखान्यातील रत्ने ठरविण्याचा प्रयत्न करीत असून, दुसरा पक्ष एका स्त्री-संगीत नाटक मंडळींतून फुटून नवीन मंडळी काढल्याचे श्रेय आमच्या पदरी बांधीत होता. खोबरेल तेलाने चबचबलेल्या आणि बर्याच वाढलेल्या केसांच्या ठकीच्या मानेपेक्षाही तिर्कस भाग काढणार्या, आणि घरी धुतल्यामुळे म्हातार्या माणसाच्या चेहेर्याप्रमाणे सुरकुतलेल्या खमिसावर बिनगुडयांचा मळकट पांढरा अंगरखा घालणार्या एका मुलाने तर स्त्री-संगीतवाल्या पक्षाला जोराचा दुजोरा देऊन, गेल्या महिन्यात मुंबई मुक्कामी, तिंबूनाना 'मृच्छकटिका'त मांगाचे, मला 'सत्यविजया'त भुताचे आणि आबाभटजींना 'रामराज्यवियोगा'त मंथरेचे काम करताना पाहिल्याचे प्रतिज्ञेवर सांगितले! शेवटी, त्याने स्वत: आबांवर गंडेऱ्यांचा वर्षाव केल्याचे सांगताच सर्वांची खात्री होऊन आम्ही एकमताने एका नाटक मंडळीचे चालक व मालक ठरलो. जाता जाता एका धाडशी इसमाने पुण्यास आमचा पहिला खेळ कोणता व कधी होणार, एवढे विचारण्यापलीकडे यानंतर काही विशेष घडले नाही. डाव्या मिशीला चाई लागल्यामुळे आलेला तोंडाचा विदूपणा घालविण्यासाठी आबाभटजी क्षौरकर्माच्या धार्मिक सवलतीचा फायदा घेत असल्यामुळे त्यांना मंथरेचे सोंग करण्याचे प्रायश्चित्त मिळाले असावे, असे आम्ही तेव्हाच तरकलो. प्राचश्चित्तामुळे क्षौर करण्याऐवजी क्षौरामुळे प्रायश्चित्त भोगण्याचा हा प्रसंग आबाभटजींना मात्र फारसा रुचला नाही, असे त्यांनी मंथरेच्या सवाई हावभावांनी आमच्या निदर्शनाला आणून दिले. अखेर अशा प्रकारच्या चिकित्सेला भिऊन जकातीचा लकडा चुकविण्यापेक्षा आधी या गावगुंडांचा लकडा चुकविलेला बरा, अशा विचाराने आम्ही जकातीची भरपाई करून गाडी एकदाची गावात आणली.
आमच्या आगमनाची कारणासकट प्रसिध्दी सार्या शहरभर होण्यासाठी आम्ही काय काय प्रयत्न केले, त्यांचे थोडेसे दिग्दर्शन गेल्या खेपेला केलेलेच आहे. काही दिवस पुण्यास घालविल्यानंतर प्रसिध्दीचे एकदोन ठळक मार्ग राहिले होते, त्यांचाही उपयोग करून घेतला. रस्त्यांत दोन माणसे एकमेकांशी भांडताना दृष्टीला पडली, म्हणजे रिकामटेकडया चौकसांची त्यांच्याभोवती केवढी गर्दी जमते, याचा अंदाज होताच नाना, आबाभटजी व मी आपसात जोडया ठरवून वेळी-अवेळी भर चवाठयावर लटकी भांडणे निकराने भांडून मधून मधून आमच्या नावाचा भरपूर उल्लेख करू लागलो. मात्र, या सर्व भांडणांतून 'ठकीचे लग्न' हे एकच कारण ठेवण्याबद्दल आम्ही काटेतोल सावधगिरी ठेवीत होतो! या मार्गाने सार्या शहराची आमच्याशी तोंडओळख झाली. याप्रमाणे जय्यत तयारी झाल्यावर आम्ही प्रत्यक्ष कार्याला सुरुवात केली. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमची ही फेरणी सारखी चालू असे. शाळा, कॉलेज, ऑफिसे, कचेर्या, हॉटेले, दवाखाने, फिरावयाला जाण्याच्या जागा, नदीकाठ, तालमी, आखाडे, देवळे, बाजारचौक, गिरण्या, कारखाने, व्याख्यानस्थळे, नाटकगृहे, खाणावळी- सारांश, जेथे जेथे तरुण मंडळी येण्याचा संभव असतो, तेथे तेथे जाऊन वराचा तपास करण्याचा धुमधडाका मांडला. आमची विशेष मदार शाळांवर असल्यामुळे सर्व प्रकारच्या शाळांची हजेरी घेण्याची आम्ही शिकस्त केली. मराठी शाळा, इंग्रजी शाळा यांपासून तहत वेदशाळा, वेधशाळांपर्यंत झाडून सार्या शाळा, पालथ्या घातल्या; धर्मशाळासुध्दा आम्ही सोडल्या नाहीत. येरवडयाच्या बेकार मुलांच्या शाळेतूनसुध्दा एक चक्कर घेऊन येण्यास चुकलो नाही. इतकेच नव्हे, तर एका आदितवारी तर शाळांना सुट्टी असल्यामुळे शेवटी पांजरपोळातील गोशाळासुध्दा आम्ही नजरेखाली घातली. या शेवटच्या शाळेत एक विशेष आढळून आला तो नमूद केल्यावाचून राहवत नाही. इतर प्रकारच्या शाळांतील विद्यार्थी बुध्दिबळाच्या बाबतीत बहुतेक या शाळेतल्या रहिवाशांच्या लायकीचे असूनही त्यांची हुंडयाची धाव हजार-पाचशांच्या पैकी असावयाची, आणि या शाळेत मात्र हुंडयाची हुंडी पाचपन्नासापलीकडे जाताना दिसली नाही; तथापि होता होईतो दोन पायांचे जनावर गाठण्याचा आमचा संकल्प असल्यामुळे, गोशाळेतल्या स्वस्ताईचा फायदा आम्हाला घेता येईना. दवाखान्यांचीही अशीच शिरगणती करण्याचा ठराव केल्यामुळे आम्हाला शेवटी वेडयांच्या दवाखान्यातही मुलांची चौकशी करण्यासाठी शिरकाव करण्याचा प्रयत्न करावा लागला. आमच्या येण्याचे कारण ऐकताच आमच्या इच्छेबरहुकूम त्या दवाखान्यावरच्या अधिकारी लोकांनी आम्हाला आत शिरण्याची परवानगी दिली; परंतु त्यांच्या एकंदर झोकावरून त्या दवाखान्याशी आमचा निराळयाच प्रकारचा संबंध जोडण्याचा त्यांचा मानस आमच्या ताबडतोब लक्षात आला. मुलीचे लग्न जमविण्याच्या नादाने आमची माथी फिरल्याचा आरोप आमच्या माथी मारून, आम्ही त्यांच्या या समाजाविरुध्द गडबड करताच विशेष खात्री झाल्यामुळे आमचे मेंदू तपासण्यासाठी त्यांनी आमची थोरल्या दवाखान्यात रवानगी केली. तेथे सुध्दा नानांच्या फाजील आविर्भावामुळे व आबाभटजींच्या चेहेर्यावरील सफै विकारशून्यतेमुळे थोरल्या डॉक्टरसाहेबांचीही आमच्याबद्दल नजर फिरलेली दिसू लागली. तरी बरे झाले, मला ऐन वेळी बुध्दी सुचली! नाही तर नानांनी आणखी एक घोटाळा करून ठेवला असता. डॉक्टरमजकूर नानांचा मेंदू तपाशीत असता त्याचे डोके एका तरुण विद्यार्थ्याने धरून ठेवले होते. तेवढयात नानांनी त्याचे पाय धरून पोरीला पदरात घेण्याची विनंती करावयास सुरुवात केली; परंतु या विनंतीचा चालू तपासणीवर फारच अनिष्ट परिणाम होईल, हे लक्षात येताच मी नानांना दटाविले. अखेर डॉक्टरसाहेबांनी आमचा मेंदू शाबूत आहे, असे ठरवून आम्हाला सोडून दिले, आणि सतत तीन वर्षे मुलीच्या लग्नाच्या विवंचनेत असूनही आम्ही खरेखरे वेडे कसे ठरलो नाही, याबद्दल आश्चर्य करीत आम्ही घराकडे वळलो. विचारांती डॉक्टरी विद्येवरचा माझा विश्वास पार उडाला.
या सुमाराला पुणे शहरात आमच्यासारखे अनेक तेलंग भिक्षुक अनेक ठिकाणांहून येऊन वरसंशोधनाचा खटाटोप करीत होते. वऱ्हाडांतून आलेले एक गृहस्थ कोणाशी ओळखपाळख नसल्यामुळे एखाद्या चुकलेल्या वाटसराप्रमाणे रोज वाचनालयात जाऊन बसत, व आल्या-गेल्याजवळ मुलाची चौकशी करीत. एक कुलीन मराठे गृहस्थ कॉलेजातल्या एका स्थळाच्या नादी भरून सारखे हेलपाटे घालीत होते. सदर स्थळाच्या व त्यांच्या दरम्यान झालेल्या सहामाहीभराच्या पत्रव्यवहाराचे भले मोठे बाड ते बरोबर बाळगीत असत. या स्थळाने प्रथम मामुली हुंडा घेण्याचे कबूल करून ते पुढे सहा महिने सारखी चाळवाचाळव केली. व अखेर बेसुमार हुंडयाच्याच अटीमुळे गृहस्थमजकुरांना वाटाण्याच्या अक्षता दिल्या. या बिचार्या थोर गृहस्थांनी तो सारा पत्रव्यवहार मला वाचून दाखविला. त्यावरून मागासलेल्या जातींनीसुध्दा हुंडयापांडयासारख्या बाबतीत तरी आम्हा उच्च म्हणविणार्या जातींच्या बरोबरीने चालीस चाल ठेविली आहे, हे पाहून मला साभिमान कौतुक वाटले! एक म्हातारी देशस्थ विधवा इतर कोणी जबाबदार आप्तसंबंधी नसल्यामुळे आपल्या बारा-चौदा वर्षांच्या दोन उपवर नातींना बरोबर घेऊन सार्या गावभर भटकत होती. पोरी अगदी नक्षत्रासारख्या सुंदर- पण बाई पडली गरीब! ज्याच्या त्याच्या जवळ तोंडवेंगाडणी करून शेवटी दोन महिन्यांच्या रिकाम्या रखडपट्टीने कंटाळून त्या हतभागी जीवाने परत आपल्या गावचा रस्ता धरला. दाखविण्यासाठी म्हणून आणलेल्या त्या दोन सुंदर बालिकांसह त्या म्हातारीला उन्हातान्हातून दारोदार उंबरठे झिजविताना पाहिले, म्हणजे आमच्या वैवाहिक चालीरीतींबद्दल मला मोठा अभिमान वाटे! आम्ही आमच्या बायकांना घरातच कोंडून ठेवतो, त्यांच्या शहाणपणाला चुलखंडातच होमून टाकतो, वगैरे बाष्फळ बडबड करणार्या चारगट सुधारकांनी या गोष्टीकडे जरूर लक्ष द्यावे. त्या आईच्या शहाणपणाला गावगन्ना मोकळे सोडून व त्रिखंड धुंडाळायला लावून सारी गंमत निर्विकार मनाने पाहणार्या समाजाने बायकांवर आणखी कोणती जबाबदारीची कामे टाकावयाला पाहिजेत?
मुली दाखवायला नेण्याची वहिवाटही विविध रूपाची आहे. कोठे बापाच्या मित्राच्या कारकुनाने वधूपक्षाच्या उपाध्यायाची टापशी पाहूनही मुलगी पाहण्याचा कार्यभाग उरकतो, तर कोठे स्वत: मुलगा आपल्या इष्टमित्रांच्या उपदेशमंडळा (Board of advisers) सह मुलीची मानसिक व शारीरिक व्यंगांबद्दल कसून खातरी करून घेतो. मुलीची परीक्षा घेण्याचे जुन्या वळणाचे मार्ग इथूनतिथून गनिमी काव्याचे असतात. कर्णेंद्रियाची परीक्षा हलक्या आवाजात एखादे काम सांगून घेण्यात येते. डोळयांची परीक्षा घेण्यासाठी भातकुणांतून दोरा ओवावयाला सांगण्याची वहिवाट आहे. अलीकडे सुधारलेल्या रीतीप्रमाणे हे मार्ग मागे पडून वाचन, संभाषण आणि विशेषत: रूपनिरीक्षण या गोष्टींवरच विशेष भिस्त ठेवण्यात येते. कधी मुलगी पाहावयाला मुलीच्या घरी येतात, तर कधी मुलीला घेऊन गावपरगाव करावे लागतात. आमच्याप्रमाणे कित्येक गरजवंत, कोणी खिशात मुलीचा फोटो घेऊन तर कोणी मुलगीच खाकोटीला मारून फिरत असलेले आम्हाला ठिकठिकाणी आढळून येते. स्वत: मुलानेच- त्यातल्या त्यात जरा शिकलेल्या मुलाने मुलगी पाहण्याचा प्रसंग आला म्हणजे एखाद्या वेळी मोठे मासलेवाईक प्रकार नजरेला पडतात. आपल्यापुढे गुडघ्यात मान घालून बसलेल्या त्या हतभागी प्राण्याची जी हेटाळणी चालते आणि जे अनादरपूर्वक फिदिफिदी हसणे उकळते, ते पाहून त्या चढेल चटोराचा व त्याच्या सल्लागार मंडळाचा तिटकारा आल्यावाचून राहत नाही. त्या वेळी स्वत:ची बुध्दिमत्ता व चाणाक्षपणा दाखविण्यासाठी त्या गरीब जनावरावर वाटेल त्या प्रश्नांचा मारा होतो. या बाबतीतले काही काही आचरट व अत्यंत निंद्य प्रकार वेळोवेळी पाहिल्यावरही त्याबद्दल दोन शब्द लिहिल्यावाचून कसे राहावेल? अशा अवघड परीक्षेत सापडलेल्या त्या मुक्या अर्भकाच्या मनाची काय दशा होत असेल बरे! 'अडकली गाय आणि फटके खाय!' अशा वृत्तीने धरणीमातेला दुभंग व्हावयाला- आपल्या हृदयाप्रमाणेच दुभंग व्हावयाला- ती विनवीत नसेल काय?बाजारात आठ-बारा आण्यांची निर्जीव बाहुली विकत घेण्यापूर्वी ती पाहताना तिच्या कपडयांना मळके हात न लावण्याची आम्ही जपून सावधगिरी घेतो आणि जन्माची सोबतीण पाहताना तिच्या हृदयाच्याही चिंध्यापांध्या करताना आम्ही मागेपुढे पाहत नाही! माझ्या दयाशील वाचकभगिनींनो! स्त्रीजातीचा अभिमान धरा! अगदी नाइलाजामुळे का होईना- पण अशा रितीने आपल्या पोटच्या गोळयाचे प्रदर्शन करावयाला तयार होणार्या 'घर'च्या मंडळींच्या आड या, आणि दुसर्याच्या आतडयांची अशी हेटाळणी करावयास सरसावणार्या आपल्या उच्छृंखल मुलाभावांना आळा घाला! वर जे दोन शब्द लिहिले, ते तुमच्या पवित्र नावाचा उपमर्द करण्यासाठी नाहीत; तर त्याच्याशी दांडगाई करणार्या हुच्चपणाला हाणून पाडण्यासाठीच! ज्या मंगलमयी मूर्तीला 'गृहदेवता' म्हणून घरात आणावयाची, तिला पाहताना भांबुडर्याच्या गुरांच्या बाजारात गाई-म्हशीची खरेदी करताना दाखविण्यात येणारी आस्था व पूज्यबुध्दीही ज्या काही नरपशूंच्या ठायी दिसून येत नाही, त्यांचा उल्लेख चांगल्या रितीने करावयाचा तरी कसा? त्याचप्रमाणे वधूवरांच्या जाहिराती लावण्याची अपमानास्पद व हलकेपणाची चाल प्रचारात येण्याचा उपजता आरंभ होत आहे, तोच तिची पिछेहाट करण्यासाठी जर अंमळ कडक थट्टा केली, तर तीमुळे फाजील सभ्य नाकांनी मुरडीवर मुरडी पलटविल्या तरी हरकत नाही; पण भगिनींनो! तुम्ही तरी बिचार्या बाळकरामाच्या हेतूचा विपर्यासाने अर्थ करणार नाही, असा भरवसा आहे. जीवाभावाच्या मोलाच्या पोटच्या गोळयाच्या नावाच्या, दीडदमडीच्या औषधांच्या गोळयाप्रमाणे, खरेदी-विक्रीसाठी जाहिराती लागलेल्या तुम्हाला तरी आवडतील काय?
युनिव्हर्सिटीच्या मंडपातून अवघड 'पेपर'मुळे अर्धीमुर्धी गचांडी खाऊन बाहेर निघालेले विद्यार्थी ज्याप्रमाणे आशावादीपणाने आपल्या सजातीयांशी आपापल्या प्रश्नांची उत्तरे ताडून पाहतात, त्याप्रमाणे आमच्यात व वरील मंडळींतही वरसंशोधनाबद्दल विचारपूस व वाटाघाट होत असे. आमच्या मानाने त्या लोकांनी स्वत:च्या प्रसिध्दीसाठी केलेले प्रयत्न आम्हाला अगदी कमकुवतपणाचे वाटत. आमचा खाक्या अगदीच निराळा! आपल्या हेतूच्या प्रसिध्दीसाठी कोणतीही गोष्ट करावयाला कसूर म्हणून करावयाची नाही, हा आमचा बाणा होता. दुकानदाराच्या दारावरील पाटया पाहताच आमच्याही दरवाज्यावर आम्ही 'बाळकराम आणि मंडळीं'ची एक पाटी लटकावून दिली. नगरमंडळा (Municipal Committee) च्या निवडणुकीच्या वेळी निरनिराळे उमेदवार आपापल्या मतदारांची ने-आण करण्यासाठी गुंतविलेल्या तांग्यांवर व्हिक्टोरियावर आपापल्या नावाच्या पाटया लावतात; हे पाहताच आमच्या गाडीच्या तट्टयालाही आम्ही आमची पाटी लोंबकळवून दिली. फार काय सांगावे, एका ठिकाणी ओळख पटविण्यासाठी भांबुराव आमच्या गावाहून पुण्याला आला असता आम्ही त्याला आणण्यासाठी आमची गाडी स्टेशनावर नेली, व येते वेळी गाडीचे बैल सोडून आम्हीच ती ओढावयासा लागलो. जरासा गाजावाजा करताच आमच्याभोवती चांगली गर्दी जमली. अशा प्रकारच्या माझ्या कल्पकतेमुळे पुणे शहरात 'बाळकराम' हे नाव ज्याच्या त्याच्या तोंडी झाले!
मुलांची चौकशी करताना आम्ही पंक्तिप्रपंच मुळीच केला नाही व कसला संकोचही ठेवला नाही. केव्हाही, कोठेही, कोणताही तरुण दृष्टीस पडला, की आम्ही यंदा कर्तव्य आहे का?, हुंडयाचा काय मानस आहे?, पत्रिका पाहणार काय? वगैरे प्रश्नांचा मारा सुरू करून थेट मुलगी दाखविण्यापर्यंत मजल नेऊन ठेपवीत होतो. पुण्यातल्या यच्चयावत् तरुण सृष्टीला आम्ही याप्रकारे प्रश्चचिन्हांकित करीत चाललो होतो. विद्यादेवीला डोक्यावर घेऊन नाचणार्या कॉलेजकर तरुणांपासून ते तिला पायाखाली तुडविणार्या तालीमबाजांपर्यंत, तक्क्याशी टेकून बसलेल्या शेठजींपासून तो हॉटेलातील कपबशा धुणार्या हरकाम्यापर्यंत, झाकीचा पोषाख करणार्या पालखीपदस्थापासून ते तहत खाकीचा युनिफॉर्म घालणार्या तांगेवाल्यापर्यंत जो जो म्हणून 'लग्नाला योग्य' असा तरुण दृष्टीला पडे, त्याला त्याला आम्ही आमच्या प्रश्नांच्या जाळयात गुरफटवून टाकीत होतो. कितीही नकार मिळाले तरी तिळमात्र हिय्या न खचू देता, सारख्या नेटाने नित्य नवा किंवा त्याच त्याच वृत्तपत्रांवर व मासिक पुस्तकांवर आपल्या लेखांचा भडिमार करणार्या नवीन लेखकाच्या ताज्या दमाने आम्ही वाटेल त्यावर हल्ला करण्याची चिकाटी सोडली नाही. अल्पावकाशातच आमची गाडी सर्वांच्या नीट लक्षात ठसून ती समोर दिसू लागताच जो तो तरुण तोंड चुकवावयाला लागला. प्रत्येकाला आमची भीती वाटू लागली. पुढे पुढे तर तरुण मंडळी आमच्या वार्यालाही उभी राहिनाशी झाली. रानात पारध्याची चाहूल ऐकताच झुडपांखाली दबा धरून बसणार्या सशाप्रमाणे, स्वैर भटकणारे तरुण मंडळी आमच्या गाडीची घंटा कानी पडताच जागच्या जागी दडी मारून बसत. कोणत्याही तरुणाच्या अंगी कसलाही दांडगा सैतान संचारला असला, तरी आमच्यापुढे त्यांची क्षणमात्रही मात्रा चालत नसे. मामूल वहिवाटीप्रमाणे पोरासोरी खच्चून भरलेली पुण्यातली सभास्थाने आम्ही आत पाऊल टाकताच ओसाड पडून जिकडेतिकडे शुक्क होऊन जात असत. एखाद्या शाळेच्या दाराशी आमची गाडी उभी राहताच सर्व शाळाभर एकदम शुकशुकाट होऊन इन्स्पेक्टरची तपासणी आल्याप्रमाणे शाळेत शांतता होत असे. कित्येक कच्च्या दिलाचे तरुण तर रात्री-अपरात्री दडपल्यासारखे होऊन आमच्या नावाने बरळत दचकून उठत. आमच्या तोंडाला तोंड देण्यापेक्षा वाटेल त्या संकटाला तोंड देण्याची तरुणांची तयारी दिसू लागली. एकदा तर नदीत डुंबत असलेल्या एका तरुणाने आम्हाला घाटावर पाहताच तोंड चुकविण्यासाठी तळाशी बुडी मारून कायमची जलसमाधी घेतली. खेडेगावातून काळीजकाढे आल्याची बातमी पसरली, म्हणजे पोरांची जी पळापळ होते, तीच 'बाळक्या आला रे आला!' या आरोळीने होऊ लागली.
या रीतीने तिन्हीत्रिकाळी सारखी टेहळणी चालू असताना, आमचे प्रयत्न सर्वस्वीच फसत असत, असे नाही. कधीकधी आमचे प्रयत्न मोहरण्याच्या सुमाराला त्यांच्यावर आभाळ येई, तर कधी आमच्या प्रयत्नांचे फळ ऐन पाडाला येऊन डागाळावयाला लागे. एखादे लग्न जमविताना विघ्नांचे बाहुल्य किती असते, या गोष्टीची आम्हाला या वेळी चांगली जाणीव पडली. पत्रिकांच्या भानगडीत एखाद्या वेळी मंगळ आडवा पडे, आणि एखाद्या वेळी शनीची साडेसाती भोवे. कधी एकनाड येई!तर कधी एक रास जमून येई! या ठिकाणी ग्रहांचे षडाष्टक निघावे तो त्या ठिकाणी माणसाचे खडाष्टक व्हावे! कोठे देवगणाचा राक्षसगणाशी सामना जुंपे, तर कोठे राक्षसगण मनुष्याला गिळावयाला तयार होई. कोठे गोत्राशी बस्तान बसावे, तो मामाचे गोत्र अडून बसे! कोठे पत्रिका जमल्या, तर हुंडयाची उडी अजिबात आमच्या डोक्यावरून जाई! एक ठिकाणी काय तर म्हणे वरणभात होतो, तर दुसरीकडे बादरायणसंबंधाने परतवले होते. एका मुलाने हुंडा घेण्याचे उदार मनाने नाकारले; पण तो विलायतेला जाऊन दोन वर्षे राहण्याचा खर्च मागू लागला. हा खर्च दिला असता तर त्याची विलायतेत राहण्याची उत्तम सोय झाली असती; पण मग तिंबूनानांना मात्र हिंदुस्थानात राहावयाची सोय उरली नसती. हुंडयावर असेच पाणी सोडणारा दुसरा एक महात्मा मोटरसाठी हटून बसला. त्याला मोटर घेऊन दिल्यावर सर्वसंगपरित्याग करून नानांना त्याच मोटरीखाली सापडून मरण्याखेरीज गत्यंतर नव्हते! तिसर्या एका उदारधीने हुंडयापांडयाबद्दल अवाक्षर न काढता दोन्हीकडून नानांनी कार्य करून घेतल्यास लग्नाची कबूलजबाबी दिली. दोन्हीकडून लग्न करावयाच्या प्रसंगी पोरीला दूधभात घालून पिवळी केली व मणिमंगळसूत्र बांधले म्हणजे आटोपले, अशा समजुतीने या कराराला नाना तेव्हाच तयार झाले. परंतु सदर नवरदेव उच्चकुलीन असल्यामुळे लग्नसमारंभ मात्र त्यांच्या इभ्रतीला साजेसा झाला पाहिजे, अशी त्यांनी अट घातली होती. त्यांच्या मानपानाबरहुकूम खर्चाचा कच्चा खर्डा पाहताच नानांच्या पोटात धस्स होऊन त्यांनी तो नाद सोडून दिला. कारण, त्या बेताने खर्च केल्यानंतर मिरवणुकीच्या प्रसंगी नानांना निराळा बेंडबाजा आणण्याचे प्रयोजनच राहिले नसते! त्याचप्रमाणे एका मुनीमाने हुंडयाबद्दल अगदी विरूध्द बोलून करणीपोषाखासाठी मात्र एवढया जबर रकमेची मागणी केली, की 'करणी कसाबाची व बोलणी मानभावाची' ही म्हण थोडी बदलून 'करणी जावयची व बोलणी मानपानाची' या स्वरूपाने लग्नकार्यातून तिचा उपयोग करावा, असे मला वाटू लागले. स्वत:ला पोषाख चढविण्यात नानांना साफ नागविण्याचा त्याचा निर्धार झालेला दिसत होता. याप्रमाणे बेसुमार मागण्या मागताना भावी बायकोच्या बापाचा माल म्हणजे आपल्याच बापाचा माल, अशी या चढेल कर्णाची समजूत झालेली दिसून येते. एका ठिकाणी सर्व गोष्टी यथासांग जुळून शेवटी मुलाने आपले लग्न पूर्वीच झाल्याचे सांगून टाकले. दुसर्या एका आचरटाने सारे ठरवून अखेर आपली भलतीच जात असल्याचे सांगितले. तिसर्या एका फारच जुन्या- अगदी बुरसटलेल्या- वळणाच्या मनुष्याने ठकीची अत्यंत धार्मिक रीतीने परीक्षा घेऊन लग्नाला प्रथम रुकार दिला. अगदी मनूच्या वचनाप्रमाणे मुलीला तारांपैकी, नद्यांपैकी किंवा फुलांपैकी नाव ठेवलेले नाही, हे सुध्दा या धर्ममूर्तीने चौकस रीतीने पाहून घेतले. हे स्थळ जवळजवळ कायमचे ठरल्यासारखे झाल्यामुळे ठकीचे अगदी जाडेभरडे रासवट नाव ठेवल्याबद्दल आम्ही आपल्याला धन्यवाद देऊ लागलो; परंतु अखेर, मुलगी बसली म्हणजे तिचे मोकळे केस जमिनीला लागतात, आणि हे लक्षण माहेरकरांना वाईट असते, अशा रूढ कारणांमुळे त्याच्या घरच्या बायकांनी लग्न मोडून काढिले! माहेरकरांना वाईट असलेल्या लक्षणामुळे भावी सासरकरांनी पोर नाकारणे, आणि जमिनीवर लोंबणार्या केसांमुळे माहेरकरांचा सत्यानाश होणे, या दोन कार्यकारणभावांत बलवत्तर कोणता, हे ठरविण्याचे काम मी माझ्या वाचकांवरच सोपवून मोकळा होतो. मुलीची जीभ नाकाला लागते किंवा मधले बोट मागे वाकविले तर मनगटाला लागते, यासाठीसुध्दा लग्ने फिसकटल्याची उदाहरणे एक दोन जागी आढळून आली. एका माउलीने तर ठकीला जेवावयाला बसवून जेवताना मुलगी एक बोट वळवते, एवढयावरच आम्हाला निरोप दिला. आणखी एका ठिकाणी असाच बायकांनी मोडता घातला. आम्ही सारी इमारत अगदी कळसापर्यंत चढवीत नेल्यावर ऐन गृहप्रवेशाच्या वेळीच बायकांनी इमारतीचा पायाच खचवून टाकला. ठकीच्या मामीच्या सावत्र सख्ख्या भावजयीच्या आत्येबहिणीची चुलतनणंद पहिली एकदोन वर्षे सासरी नांदत नव्हती, अशी बिनतारायंत्राची बातमी कोठून मिळाल्यामुळे मुलीच्या माहेरकरांचे वळण वाईट असल्याबद्दल सर्रास शेरा मारून त्यांनी लग्न फिसकटवून टाकले! एकदा मुलाच्या मामाच्या मोलकरणीच्या मुलाची व आमच्या गाडीवाल्याच्या दत्तक बापाची एक नाड जमल्यामुळे लग्न जमेना, व दुसऱ्यांदा तर प्रत्यक्ष मुलाच्या बापाची आणि आमच्या गाडीच्या पवळया बैलाचीच एक रास जमल्यामुळे हातचे स्थळ दवडावे लागले! अशा रीतीने लग्ने मोडावयास वाटेल ती कारणे पुरतात, असे आमच्या अनुभवाला पूर्णपणे येऊन चुकले! अखेर अखेर तर; आबाभटजींच्या कानात अतिशय केस असल्यामुळे, माझ्या एका बुटाला धोतराच्या काठाचा लेस लावलेला असल्यामुळे, चिमण्याच्या कुरळया केसांचा योगाने त्याचे डोके उफराटया पिसांच्या कोंबडीप्रमाणे दिसत असल्यामुळे एखाद्या जवळजवळ कायम होत आलेल्या स्थळाखाली धरणीकंप होतो की काय अशीही आम्हाला भीती वाटू लागली. आता आणखी एका ठिकाणचा अनुभव देऊन लग्न फिसकटण्याच्या कारणांची ही यादी पुरी करतो.
या ठिकाणी आम्ही आमच्या नेहमीच्या वहिवाटीप्रमाणे कुटुंबकबिल्यासह जाऊन तळ घातला. सर्व प्रकारच्या तडजोडी होऊन अखेर मुलगी पाहण्याचा समारंभ निर्विघ्नपणे पार पडला. मुलीला आई असल्याची साक्ष पटविण्यासाठी आमच्या नूतनपरिणीत नव्या वहिनीही हजर होत्याच! सर्वतोपरी पटल्यावर उभयपक्षांकडील तयारी होऊन 'सीमांतपूजना'चा समारंभही पार उरकला. मात्र सदर समारंभाच्या वेळी विहीणबाईच्या नात्याने तेथे आलेल्या नव्या वहिनीकडे पाहून व्याह्यांनी जरा संशययुक्त मुद्रेने त्यांच्या तेथे येण्याबद्दल कारणाची पृच्छा केली. आम्हीही द्विगुणित आश्चर्याने 'चहूंकडे अशीच चाल आहे, त्यात नवल ते कशाचे?' असे उत्तर देऊन मोकळे झालो. व्याही यानंतर काही विशेष बोलले नाहीत; परंतु शेवटी 'वाङ्निश्चयाच्या समारंभासाठी ती मंडळी आमच्याकडे येताच सारे कोडे उलगडले. ठकीला वधूच्या जागी व नव्या वहिनींना विहिणीच्या जागी बसलेल्या पाहताच व्याही ताडकन् उठून उभे राहिले व विचारू लागले की, या दोहोंतली तुमची मुलगी कोणती? आम्ही ठकीकडे बोट केले आणि नव्या वहिनींची नीट माहिती दिली. अस्से काय? मग आम्ही यांनाच वधू समजलो. मुलगी पाहावयाच्या वेळी तुम्ही हे सांगावयास हवे होते. तिंबूनानांच्या कुटुंबालाच नवरीमुलगी समजून आम्ही रुकार दिला. आता या मुलीशी आम्हाला लग्न कर्तव्य नाही. असे सणसणीत उत्तर देऊन व्याहीमंडळीने घरचा रस्ता धरला.
लग्न फिसकटण्याची कारणे आणखी देत बसलो तर एक महाभारत रचून काढावे लागेल! दिलेल्या उदाहरणांवरून हे काम किती बिकट आहे, याची वाचकांना कल्पना होईलच. अशा प्रकारे बहुतेक स्थळे हातची गेल्यामुळे तूर्त स्थलसंकोचास्तव येथेच मुक्काम करणे भाग पडत आहे. पुढील खेपेला ठकीच्या लग्नासाठी केलेल्या मोहिमेतील ठळक स्वाऱ्यांची सविस्तर माहिती देऊन अखेर ठकीचे लग्न एका आकस्मिक कारणामुळे कसे अचानक जमून आले, ते सांगण्याचा संकल्प आहे. सत्यसंकल्पाचा दाता भगवान्!