(दामू कोशांतून शब्द काढीत आहे; एका बाजूला दिनू भूगोल घोकीत आहे; प्रत्येकाजवळ पुस्तके व वह्या पडल्या आहेत; जवळच कपडे पडले आहेत.)
दामू : (डिक्शनरीत पाहतो) एफ ए बी एल ई, एफ ए-
दिनू : (मोठयाने) खानदेश जिल्ह्यातील तालुके- (तीनदा घोकतो.) धुळे, अमळनेर, एरंडोल, पाचोरे, धुळे, अमळनेर, एरंडोऽल-
दामू : एफ एबी एल ई फेबल म्हणजे कल्पित गोष्ट. (लिहू लागतो.)
दिनू : धु-ळे, अमळनेर-
दामू : दिन्या, हळू घोकणा रे! माझा शब्द चुकला की इकडे! हे बघ, फेबल म्हणजे कल्पित नेर झाले आहे. हळू घोक. (शब्द पाहू लागतो) बी ई ए यू-
दिनू : धुळे, अमळनेर, एरंडोल-
दामू : लागलास का पुन्हा ओरडायला? (वेडावून) धुळे, अमळनेर- मोठा आला आहे भूगोल करणारा! हळू घोक.
दिनू : अन् तू मोठा आला आहेस शब्द काढणारा! नाही घोकीत हळू जा! तुला वाटेल तर माजघरात जाऊन बैस. धुळे- अमळनेर-
दामू : ऐकत नाहीस?- नाही?- देऊ का भडकावून एक श्रीमुखात?
दिनू : का रे दादा त्रास देतोस? ए आई गं, हा दादा बघ मला उगीच मारतो आहे. धुळे- अमळनेर.
दामू : मारतो का रे? नाही गं आई. हाच. मोठमोठयाने ओरडतो आहे सारखा अन् अभ्यास करू देत नाही. आता ओरड तर खरा, की सांगतो कसे काय आहे ते! बी ई ए यू- (डिक्शनरी चाळू लागतो.)
दिनू : ओरडेन, ओरडेन! तुला भिईन की काय? धुळे, अमळनेर-
दामू : दम खा! काढतोच तुझे 'धुळे-अमळनेर!' (त्याला मारावयास धावून जातो; तो पळू लागतो.)
दिनू : आई, बघ गं हा दादा! धुळे अमळनेर- (घरात पळून जातो.)
दामू : पळून गेलास, नाहीतर दाखविला असता स्वारीला चांगला इंगा! धुळे-अमळनेर करतो मोठा! येऊ दे आता बाहेर बच्चंजीला! म्हणजे काढतो सारा खानदेश जिल्हा. (जागेवर येऊन बसताना पेन्सिलीवर पाय पडतो.) अरे, अरे, अरे! गडबडीत पेन्सिल मोडून दोन तुकडे झाले तिचे; पण हे बरे झाले! एक तुकडा हरवला तर दुसरा आहेच! अन् आज पाटीवर शुध्दलेखन काढावयाचे आहे कुठे? हे एवढे शब्द काढले की झाले काम! अबब! केवढा लांबलचक शब्द हा! (डिक्शनरी उघडतो) बी ई ए यू- (दिनू येतो.)
दिनू : दादा, तुला आईने-
दामू : आलास का पुन्हा त्रास द्यायला! बी ई ए यू-
दिनू : तुला आईनं चहा घ्यायला बोलाविलं आहे, यायचं असेल तर ये नाही, तर नको येऊ. (दिनू जातो.)
दामू : अरे चोरा! नको येऊ काय? म्हणजे एकटयालाच चहा प्यायला! मग काढीन मी शब्द! (दामू जातो. जगू दुसरीकडून येतो.)
जगू : (धापा टाकीत) दादा-दादा, अरे ती बघ तिकडे- (पाहून) अरेच्या! दादा कुठे गेला? इथे तर दादाही नाही आणि दिनूही नाही! हा- हेच ते चित्रांचे पुस्तक! (रीडर उचलतो.) कशी छान चित्रं आहेत रंगीबेरंगी! बरं सापडलं आहे आयतंच! शेजारच्या रघूला दाखवितो आत नेऊन! अस्सं लपवून न्यावं; नाहीतर दादा पाहील एखादा! आलाच दिनू! (जगू दामूचे रीडर घेऊन जातो. दिनू येतो.)
दिनू : धुळे, अमळनेर- पुढे काय बरं? किती तालुके आहेत हे? धुळे, अमळनेर- पण पुढचा कोणता तालुका? (भूगोलात पाहतो. दामू येतो.)
दामू : अरे! माझं रीडर काय झालं इथलं? आता होतं की इथे! दिन्या, रामोशा, एवढयासाठी आधी धावत आलास काय? तरीच, आण माझं रीडर! देतोस की नाही?
दिनू : अरे वा! मला रे काय ठाऊक तुझं रीडर नि फिडर? मी आपला भूगोल पाठ करीत बसलो आहे. मी कशाला घेऊ रीडर?
दामू : भूगोल पाठ करीत होतास नाही का? कसा देत नाहीस रीडर तेच पाहातो! (त्याच्याकडे धावून जातो.)
दिनू : (मोठयाने ओरडून) का रे मारतोस दादा? आई-
दामू : दिन्या, हात तरी लावला आहे का तुला? नाही गं आई, दिन्या उगीच कांगावा करतो आहे. यानं माझं रीडर लपवून ठेवलं आहे, अन् आता देत नाही.
दिनू : मी शप्पथ घेईन! पाहिलंसुध्दा नाही तुझं रीडर मी! तूच कुठंतरी टाकून दिलं असशील आणि मला विचारतो आहेस!
दामू : कुठं तरी टाकून दिलं! आता इथं नव्हतं का? तुझ्या देखत तर शब्द काढीत होतो . दिनू : मी नव्हतो पाहात तुझ्याकडे. मी माझा भूगोल करीत होतो.
दामू : मग झालं काय बुवा रीडर? आता शब्द कसे काढायचे?
दिनू : अरे, त्या गादीतबिदीत असेल! रात्री तू पडल्या पडल्या वाचीत नव्हतास का?
दामू : खरं रे खरं! चल आपण या गाद्या उलगडून पाहू.
दिनू : चल. धुळे, अमळनेर, एरंडोल, पाचोरे.
दामू : तो शब्दसुध्दा मी विसरलो. हा, बी ई ए यू- (दोघेही बिछाने उलगडतात.)
दामू : बी ई ए यू- बिछान्यात तर नाही कुठे!
दिनू : मग गुंडाळून ठेवू हे बिछाने? धुळे, अमळनेर, एरंडोल, पाचोरे. (बिछाने गर्दीने गुंडाळून ठेवितात; त्यातच दामूचे कपडे व टोपीही गुंडाळून ठेवितात. दोघेही आपापल्या जागी बसतात.)
दामू : बी ई ए यू- आता शब्द कसे करावे बुवा?
दिनू : (हसत) भलं झालं; आता एका माणसाला मार बसणार. धुळे, अमळनेर-
दामू : हसतोस काय? तूच लपविलं आहेस पुस्तक! आण पाहू तुझी पिशवी! मला तुझा झाडा घ्यायचा आहे!
दिनू : तर- तर! आणीत नाही जा!
दामू : आणीत नाहीस? बघू या बरं गंमत! आण पिशवी (त्याच्या अंगावर धावून जातो, तोच पाय पडून दिनूची पाटी फुटते.)
दिनू : फोडलीस का माझी पाटी? आता आईला सांगतो.
दामू : सांग, सांग जा! मुद्दाम पाय दिला का पाटीवर? तूच मुद्दाम पाटी वाटेत ठेवलीस! मीच सांगतो आईला, की या दिन्यानं माझं रीडर लपविलं आहे! आण इकडे ती पिशवी. (पिशवीची ओढाताण होते. बंद तुटतो.)
दिनू : धुळे- अमळनेर. सोड पिशवी- सोड ना रे! धुळे-
दामू : रीडर दे! नाही सोडीत पिशवी!
दिनू : धुळे, अमळनेर- सोड, पिशवी सोड. (जोराने पिशवी ओढतो. बंद तुटतो. दिनू पडतो.) तोडलास का बंद पिशवीचा? आता आईला सांगतो.
दामू : मी तोडला का बंद? मी नुसती पिशवी धरून ठेवली होती. तूच जोराने ओढलीस अन् माझं नाव घेतोस का?
दिनू : येऊ दे बाबांना आता! म्हणजे चामडीच लोळवायला सांगतो! धुळे, अमळनेर- (दोघेही आपापल्या जागेवर बसतात.)
दामू : कोणता तो मोठा शब्द? बी ई ए यू- पण आता शब्द करायचे कसे! रीडरच नाही मुळी!
दिनू : (वेडावीत) टाइमटेबल गेलं रीडरमध्ये! ठेवावं कशाला रीडरमध्ये? मास्तर सांगतात रोज, की टाइमटेबल भिंतीला लावावं, ते उगीच का? घ्या आता. छडी लागे छम् छम्-
दामू : दिन्या, तुला रे कोणी चोमडेपणा सांगितला आहे हा? जाऊ दे माझं टाइमटेबल गेलं तर!
दिनू : तुला बोलतो आहे का मी! आम्ही आपले मनाशी बोलतो.
दामू : असं आहे का? दाखवू का एकदा इंगा?
दिनू : हो, हो दाखीव. धुळे, अमळनेर- आईला सांगेन- टाइमटेबल गेलं रीडरमध्ये-
दामू : शेजारच्या गणूला अभ्यास विचारून येतो. (जाऊ लागतो.)
दिनू : मी बाबांना सांगेन, की एक मनुष्य अभ्यास टाकून खेळायला गेला होता.
दामू : सांग जा- खेळायला जातो आहे का मी? (जातो.)
दिनू : गेला की दादा बाहेर! अरेरे! माझं टाइमटेबल हरवलं असतं तर मी गेलो नसतो असा? धुळे- अमळनेर. (शिटी वाजवीत जगू येतो.)
दिनू : जग्या, कुठली रे शिटी ही? माझी वाटते?
जगू : हो, आली आहे तुझी! शेजारच्या रघूला मी चित्रे दाखविली त्यानं दिली मला ही शिटी. (शिटी वाजवतो.)
दिनू : जगू, आपल्याला दे बुवा ही शिटी. मी तुला चित्रांचे पुस्तक देईन. मग पाहू बरं कोण देतो शिटी? (डोळे मिटतो व हात पसरतो.) जगू देतो का दामू देतो? जगू देतो का दामू देतो?
जगू : जगू देतो. पण तू पाहतोस डोळे उघडे ठेवून! अगदी डोळे मिटून घे!
दिनू : हं, हे घे अगदी डोळे मिटून घेतले! आता कोण देते पाहू. जगू देतो का कोण देते? (जगू जवळ येतो.)
जगू : बघू नकोस हं! हं ही घे शिटी! (त्याच्या हातावर हात मारून पळून जाऊ लागतो.) मिळाली शिटी?
दिनू : अरे चोरा, फसवतोस काय? आता घेतोच शिटी (जगू व दिनू पळून जातात. दामू येतो.)
दामू : दुसर्या तासाला भूगोल आहे. इंग्लंडमधील शहरे करायची आहेत. काल झाली त्याच्या पुढे! पण काल किती झाली हे कुणाला ठाऊक? (भूगोल काढतो.) इंग्लंडमधील शहरे! (दोनदा घोकतो.) काय आहे हे नाव!हं, ऑक्सफर्ड आणि केंब्रिज- विद्यालयाकरिता प्रसिध्द. आक्सफर्ड केंब्रिज. कें-ब्रि-ज- (दिनू येतो व आपल्या जागेवर बसवतो.)
दिनू : बस म्हणावे आता रडत! आणलीच की नाही शिटी! धुळे- अमळनेर (शिटी वाजवतो.)
दामू : दिन्या, शिटी आहे काय रे? बघू या बरे कशी आहे ती! आक्सफर्ड-
दिनू : आता कशाला बघू या बरे? काल आम्हाला भवरा दाखवीत नव्हतास नाही का? आता घे शिटी! (शिटी वाजवितो व आपल्याजवळच ठेवतो.)
दामू : नाही तर नको देऊ जा! आम्ही दुसरी आणू चांगली! आक्सफर्ड आणि केमरीज- (घरात जातो.)
दिनू : धुळे- अमळनेर- एरंडोल- पाचोरे- फार तालुके आहेत या जिल्ह्यांत! (ऐकून) जग्या शिटीसाठी अजून रडतोच आहे वाटते! (शिटी वाजवतो.) (शिटी वाजवून खाली ठेवतो. तोंड पुशीत दामू येतो व आपले जागेवर बसतो.)
दिनू : दादा, काय खात होतास रे आता?
दामू : कुठे? काही नाही! मी आईजवळ गेलो नाही, आईने मला लाडू दिला नाही, मी तो खाल्ला नाही! काही नाही! आक्सफर्ड आणि केमरीज विद्यालयाकरिता प्रसिध्द- (दिनूकडे पाहून हसतो.)
दिनू : हसू नकोस काही! मी पण घेतो आईजवळून लाडू. धुळे-अमळनेर-एरंडोल-
दामू : कसा फसविला चोराला! आता ती शिटी घ्यावी तेवढी. (जाऊन शिटी घेतो व जागेवर बसतो.)
दामू : आक्सफर्ड आणि केमरीज- आक्सफर्ड आणि केमरीच- आक्सहर्ड आणि केमरीच (दिनू येतो.) मिळाला लाडू?- धम्मक लाडू दिला असेल आईने! लाडू पाहिजे नाही का? आक्सहर्ड आणि केमरीच- (दिनू जागेवर बसतो.)
दिनू : नसू दे लाडू नसला तर! धुळे-अमळनेर-एरंडोल-अरे! एथली शिटी काय झाली? आता इथं होती की! (दामू शिटी वाजवतो.)
दामू : आक्सहर्ट आणि केमरिच-
दिनू : अरे चोरा! शिटी चोरलीस काय, चोर कुठला!
दामू : दिन्या, गाढवा! मी तुझा दादा, अन् मला चोर म्हणतोस? काल भरतभाव पाठ केलास, त्यात हेच शिकलास वाटते? भरत असा रामाला चोर म्हणत नव्हता!
दिनू : पण रामसुध्दा असा भरताच्या शिव्या चोरीत नव्हता! मोठा आला आहे राम व्हायला! आण माझी शिटी.
दामू : देत नाही जा! मला चोर म्हणतोस नाही का?
दिनू : कसा देत नाहीस पाहू? धुळे, अमळनेर- (त्याच्या अंगावर धावून जातो; दोघांची मारामारी होते; जगू येतो.)
दामू : (दिनूला खाली पाडून) शिटी पाहिजे का? देऊ का एक शिटी तोंडात?
दिनू : जग्या, ओढ त्याचा पाय! मीच घेतो ही बघ! (शिटी घेऊन जगू जातो.)
दामू : पाहिजे का शिटी? बोल! म्हणशील का चोर आता?
दिनू : आई, बघ गं हा दादा कसा बोकांडी बसला आहे!
दामू : बोकांडी बसलो आहे का रे? तूच मला मारायला आलास; शिटी पाहिजे! (दोघेही आपापल्या जागेवर जाऊन बसतात.)
दिनू : तुला तरी कुठे मिळाली? तुला नाही मला नाही. घाल कुत्र्याला! धुळे-अमळनेर-एरंडोल-पाचोरे-पाचोरे.
दामू : आस्कहर्ट आणि केपरीच- आस्कहर्ट आणि केपरी-आस्कहर्ट आणि केपरी, आस्क- (कुत्र्याचे ओरडणे ऐकू येते. दामू घोकीत खिडकीजवळ जातो. आस्कर आणि खेपरी, आस्कर आणि खेपरी. दिन्या ही बघ कुत्र्यांची भांडाभांडी. आरकर आणि खेपरी. चास्कर आणि- आपला मोत्या पण आहे! खेपरी, चास्कर आणि खेपरी- चास्कर, मोत्या छू:! छू:! मोत्या! चास्कर आणि खेपरी. दिन्या, बघ तर खरा! मोत्या छू:!
दिनू : कुठे रे? कुठे पाहू? धुळे- अमळनेर! (धावत खिडकीकडे जाऊ लागतो. वाटेत पाय लागून दामूची दौत सांडते.) दादा, दौत सांडली रे!
दामू : कशी सांडली? केलास सारा घोटाळा! वर्डबुकावर सगळी शाई सांडलीस! आज इन्स्पेक्शन आहे तेथे काय दाखवू आता?
दिनू : मी काय केलं रे? तूच दौत उघडी टाकलीस! वर्डबुक असं पसरून ठेवलंस! मी नुसता येत होतो, तर पाय लागला फक्त माझा! (हाताने शाई भरू लागतो.)
दामू : आता चाकू तरी दे! म्हणजे वर्डबुकावरची शाई तरी खरडून टाकतो! (जगू येतो व शिटी वाजवतो.)
जगू : दादा, दिनू, जेवायला चला लौकर. चल दिनू, दादा, ऊठ!
दामू : आलो रे बुवा! सगळा घोटाळा झाला! (तिघेही घरात जातात. पांडू गडी येतो.)
पांडू : तीन मुलं आहेत, पण तीन तऱ्हेची आहेत! घर झाडता झाडता नकोसे होते! काय कागद! काय चिंध्या! काय बुके! नुसता उकिरडा करून ठेविला आहे! दामूरावाचे कपडे या गादीत! आणि शाळेत जाताना कपडे कुठे आहेत म्हणून ओरडेल आता! असू देत गादीतच कपडे! ही बुके एवढी पिशव्यांतून ठेवावी म्हणजे झाले! कोणाची बुके कोणती हेही समजत नाही! सगळी बुके गोळा करून, अर्धी एकाच्या पिशवीत आणि अर्धी दुसर्याच्या पिशवीत ठेवावी. मग घेतील आपली पाहून! (सर्व पुस्तके दोघांच्या पिशव्यांतून भरतो व जातो. दामू व दिनू येतात.)
दिनू : धुळे-अमळनेर-
दामू : अरे, आता राहू दे तुझे धुळे-अमळनेर! कपडे घाल लौकर! घंटेची वेळ झाली. अरे! माझी पुस्तकं काय झाली? पिशवीत एवढीच सारी! दिन्या पाहू दे तुझी पिशवी!
दिनू : मी नाही दाखवीत जा!
दामू : तुझी पिशवी मोठी रे कशानं झाली? माझी पुस्तकं घेतलीस वाटतं! पाहू पिशवी!
दिनू : नाही दाखवीत! आता दुसरा बंद तोडायचा आहे वाटतं! सारा घोटाळा केला आहेस माझा! पिशवीचा बंद तोडलास! पाटी फोडलीस!
दामू : आणि तू काय कमी केलं आहेस? दौत सांडलीस! वर्र्डबुक बिघडविलस, रीडर लपविलस! पुस्तकं चोरलीस! अरे, पण माझे कपडे कुठे आहेत? सकाळी मी येथे ठेवले होते! काय करावं, शाळेची तर वेळ झाली! आणि कपडे नाहीत. दिनू मी शाई तयार करतो, दोघांनाही होईल! तू आईला सांग, म्हणावे दादाचे कपडे सापडत नाहीत. पांडूनं केरात नेलेन् वाटतं. तर आता पेटीतून नवे कपडे काढून दे! (दिनू जातो) पांडू अगदी आंधळा आहे! केरात कपडेसुध्दा दिसले नाहीत त्याला! शाईची बाटली कुठं आहे बुवा? (दिनू येतो.)
दिनू : दादा, आई म्हणते, तिला काम आहे. आज तू माझे कपडे घाल आणि मी जगूचे घालतो.
दामू : तुझे कपडे मला रे कसे होतील? लांडे नाहीत का होणार? जा, नीट सांग आईला. (दिनू जातो.) काय घर आहे पाहा! शाईची बाटली सुध्दा सापडत नाही! हं:! ही पाहा सापडली एकदाची. आता दोघांच्या दौती भरून घ्याव्या. (दिनू येतो.)
दिनू : दादा, आई म्हणते, नाही तर मर!
दामू : बरं तर मग! दे तुझे कपडे मला आणि तू जगूचे घे!
दिनू : हे घे. (आपले कपडे त्याला देतो.) जगू, अरे जग्या, मला तुझी टोपी आणि कोट दे पाहू! आण रे लवकर!
जगू : (आतून) आणतो रे. (दामू कपडे घालतो.)
दामू : हं दिन्या, ही बाटली घे. आता मी दौत धरतो; तू शाई ओत. (दिनू शाई ओततो. जगू हळूच कपडे घेऊन दिनूच्या मागे उभा राहतो.)
दामू : हं अस्सं! ओत आणखी! आता ही दुसरी दौत. ओत हिच्यात!
जगू : (एकदम ओरडून) हे घे कपडे! (दिनू घाबरतो. हातातून बाटली पडते. दामूच्या कपडयांवर शाई पडते.)
दिनू : केवढयानं ओरडलास रे जग्या? भ्यालो ना मी!
दामू : अन् तू माझ्या कपडयांवर शाई सांडलीस ती?
दिनू : तुझे नाहीत काही कपडे ते! माझे आहेत! (कपडे घालतो.)
दामू : बरे, चला आता लौकर! नाहीतर उशीर होईल! आज आणखी इन्स्पेक्शन आहे!
दिनू : इन्स्पेक्शन आहे, अन् तुझा पोषाख हा असा!
दामू : अरे पोषाख राहू दे. इतका वेळ सारखा अभ्यास केला तरी अभ्याससुध्दा झाला नाही. चल, चल, लौकर. (तिघेही जातात.)