द ब्लॅक डेलिया हे एलिझाबेथ शॉर्टच टोपणनाव होतं. तिचा जन्म १९२४ साली आणि मृत्यु १९४७ साली झाला. एलिझाबेथचे शव जानेवारी १५,१९४७ साली लेमर्ट पार्क लॉस अँजेलिस येथे सापडले. ब्लॅक डेलियाची केस पुस्तकांमध्ये प्रकाशित करण्यात आली होती. काहींनी यावर एक छोटी चित्रफितीसुद्धा बनवली होती. हि केस इतकी प्रसिद्ध होण्याचे कारण या गुन्ह्यामागची क्रुर भीषणता आहे. एलिझाबेथचे शव मिळाले तेंव्हा तिच्या शरिरावर बरेच घाव होते शिवाय तिच्या कमरेवर इतका खोल वार केला होता ज्यामुळे तिचे शरीर दोन तुकड्यात विभागले गेले होते. एलिझाबेथच्या शरिरात रक्तच राहिले नव्हते. तिचे शव पुर्णतः नग्नअवस्थेत होते. तिच्या ओठांजवळुन सुरा फिरवुन तिचे ओठ गालावरुन कानांपर्यंत खेचण्यात आल होते. असे चित्र आपल्याला आत्ताच्या बॅटमॅनच्या चित्रपटात दिसेल. त्यामध्ये जोकर या विलनने जसे आपले गाल फाडुन घेतले आहेत तसेच काहीसे एलिझाबेथच्या चेहर्याचे चित्र होते. तिचे हात वरच्या दिशेने कोपरापासुन नव्वद अंशात ठेवले गेले होते जणु काही कुणीतरी तिला शिक्षाच दिली आहे. एलिझाबेथच्या मृत्युचे कारण रक्तस्राव आणि या प्रकारामुळे लागलेला जबरदस्त धक्का असे सांगण्यात आले होते. याचाच अर्थ तिला जिवंतपणी दोन तुकड्यात कापले गेले होते.
या सगळ्या प्रकारामध्ये अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके संशयित होते. तरीही आजपर्यंत कुणावरचाही आरोप सिद्ध झाला नाही. जसजसे दिवस पुढे जाऊ लागले तसे एलिझाबेथचे अनेक हितचिंतक समोर आले जे या केसची शहानिशा करण्यासाठी पैसे खर्च करायलाही तयार होते.
एलिझाबेथच्या खुन्याने वेगवेगळया अनेक वर्तमानपत्रांना तसेच मासिकांना संपर्क केल्याचेही किस्से आहेत. एलिझाबेथच्या खुनाची प्रसिद्धी कमी होत आहे असे जाणवल्यावर त्या खुन्याने तिच्या काही गोष्टी ज्या तिने मरणापुर्वी परिधान केल्या होत्या त्या एका वर्तमानपत्राला लिफाफ्यातुन पाठवल्या. त्या लिफाफ्यात एक ऍड्रेसबुक ही होते. ज्याच्या कव्हरवर "मार्क हँन्सन" असे छापले होते. हा तोच इसम होता ज्याने एलिझाबेथला शेवटचे पाहिले होते. द ब्लॅक डेलिया हे एक प्रचंड खळबळजनक वृत्त असल्याने बर्याच जणांनी वाहत्या गंगेत हात धुऊन घेतले. वेगवेगळे पुरावे दाखवुन आपण खुनाच्यावेळी तिथे होतो असे सांगितले. परंतु पुराव्यांअभावी आजपर्यंत कुणीही या केससाठी गजा आड गेले नाही.