सध्याच्या परिस्थितीत आरोग्य, शिक्षण, शेती, रोजगार उद्योग, व्यवसाय, नोकरी अशा अनेक बाबतीत कुटूंब, कार्यालय, शासन, प्रशासन, माध्यमं अशा सर्व पातळ्यांवर आपण सर्वजण प्रचंड सैरभैर झालो आहोत. भारतातल्या अनेक राज्यांतले चित्र असेच आहे. महाराष्ट्रात हे चित्र अधिक भयावह होताना दिसत आहे. नाशिक, नगर, नागपूर, बुलढाणा, यवतमाळ, औरंगाबाद, बीड, पुणे, मुंबई या शहरांत आणि जिल्हयांमध्ये कोरोनाचा कहर झाला आहे.
कोरोनाचे रुग्ण हजारांच्या पटीत वाढू लागले आहेत आणि आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. मागणी अधिक आणि पुरवठा कमी झाल्याने अर्थशास्त्रीय सिद्धांतानुसार सर्व आरोग्य सेवा-सुविधा गरिबांना परवडणारच नाहीत इतक्या महाग झाल्या आहेत. 'न भूतो न भविष्यती' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कुणाला दवाखान्यात दाखल होण्यासाठी बेडच मिळेना तर कुणाला दवाखान्यात असुनही उपचार मिळेनात. औषधांचा आणि ऑक्सीजनचा तुटवडा ही नवीच समस्या निर्माण झाली आहे. उपचाराअभावी कोरोना रुग्णांचे बळी जात आहेत.
या परिस्थितीत राज्य व केंद्र सरकार एकमेकांवर दोषारोप करुन राजकीय होळी खेळत आहेत की आपली राजकीय पोळी भाजत आहेत हे कळेनासे होईल इतक्या टोकाचे आणि हीन दर्जाचे राजकारण सुरु आहे. यातून जनतेच्या मनातला दोन्ही सरकारवरचा विश्वास कमी झाला आहे. अशा वेळी स्वतःवर आलेले संकट परतवून लावण्यासाठी लोकांनी आपापल्या वैयक्तिक ओळखीचा उपयोग करुन घेण्याचा प्रयत्न केला आणि इथेच परिस्थिती हाताबाहेर जायला सुरुवात झाली. समाजकंटकांचे फावले आणि त्यांनी दवाखान्यात बेड मिळवणे, रेमडेसीवीर इंजेक्शन मिळवणे किंवा ऑक्सिजन मिळवणे यासाठी काळाबाजार सुरु केला. "अडला हरी... गाढवाचे पाय धरी..." या उक्तीप्रमाणे सामान्य जनता या काळ्या बाजारात विनातक्रार सामील झाली.
दुसरीकडे सोशल मिडीयातून काळ्या बाजाराचे सचित्र वर्णन ऐकायला व पहायला मिळू लागले. समाज माध्यमांतून गावोगावच्या लोकांपर्यंत या काळ्या बाजाराच्या सुरस कथा पोहोचल्या आणि त्यातून जोखीमप्रवण व्यक्ती आणि त्यांच्या कुटूंबांमध्ये कोरोनाची दहशत निर्माण झाली. लोकांची आता कोरोनाग्रस्त, कोरोनात्रस्त, कोरोनाभयग्रस्त आणि कोरोनामस्त अशा प्रकारची सरळ सरळ विभागणी झाली आहे. काहींना नकोसा आणि काहींना हवासा वाटणारा हा कोरोना सध्या आपल्या समाजजीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे.
अशा वेळी सर्वच लोकांची मानसिकता प्रचंड नकारात्मक बनली आहे. कुणाचाही कुणावर विश्वास राहीलेला नाही. प्रत्येकजण दुसऱ्यावर चिखलफेक करण्याच्या प्रयत्नात स्वतःची जबाबदारी विसरला असुन 'बुडत्याचा पाय आणखी खोलात' जाऊ लागला आहे.
अशा भयावह आपद्ग्रस्त परिस्थितीचा आणि एकूणच प्रशासनाचा कोणताही पूर्वानुभव महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांकडे नाही. तरीही तज्ज्ञांची मते विचारांत घेवून, त्यांच्याशी सल्लामसलत करुन, आघाडीतल्या भागीदारांशी जुळवून घेत मुख्यमंत्र्यांनी अत्यंत संयमाने संयत परंतु दमदार पावले टाकली आहेत. योग्य वेळी योग्य रितीने संवाद साधून त्यांनी जनतेला या कठीण काळात धीर देण्याचे काम निश्चितपणे केले आहे. मंत्रीमंडळातील त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील तशीच जबाबदार व उल्लेखनीय भूमिका पार पाडली आहे. ही त्यातल्या त्यात जमेची गोष्ट म्हणावी लागेल.
राजकारण बाजूला ठेवून कोरोनाशी लढा देवू पाहणाऱ्या राज्य सरकारच्या बरोबरीने राज्यातील जनतेने आणि विरोधी पक्षांनीसुद्धा राजकीय विरोधाचा अभिनिवेष काही काळापुरता झुगारुन देवून कोरोना आपत्काळातला हा लढा एकत्रितपणे करायला हवा.
आपल्या सैरभैर झालेल्या जगण्याला सावरण्यासाठी विशेष प्रयत्न म्हणून आपण सर्वांनी एकादश व्रताचा अवलंब करायला हवा. असं मला प्रकर्षानं वाटतं. सर्वानी 'एकादश व्रताचा' अंगीकार करुन समाजाच्या, संस्थांच्या आणि व्यक्तीच्या पातळीवर पुरेशी साथ दिली तर कोरोनाशी आपल्याला यशस्वीपणे लढा देता येईल. माझ्यालेखी या एकादशव्रतामधील अकरा ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत :
१) सर्वांनी कोरोनासह जगण्याची सवय लावून घ्यावी.
कोरोनासह जगायचं म्हणजे आपल्या भोवताली अदृष्य स्वरुपात वावरणाऱ्या कोरोनाचा आपणास संसर्ग होऊ नये याची व्यवस्थित काळजी घ्यावी लागेल. तोंडाला मास्क लावणे, आपले हात अधुनमधून साबणाने स्वच्छ धुणे, गर्दीत जाण्याचे टाळणे, कामाशिवाय बाहेर न जाणे, बाहेर गेल्यावर दोन माणसांत सुरक्षित अंतर राखणे, बाहेरुन घरी आल्यावर स्वतःला व सोबतच्या सर्व वस्तूंना निर्जंतुक करुन घेणे, बाजारातून आणलेले वाण्- सामान, भाजीपाला, फळे निर्जंतुक करुन घेणे, उघड्यावरचे अन्न न खाणे, जंक फूड, फास्ट फूड इ. ला नकार देणे या सर्व गोष्टींची आपणास सवयच लावून घ्यावी लागेल.
सरकारने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार प्रत्येकाने आपले लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे. या लसीच्या दुष्परिणामांबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे अनेकांची मने विचलीत होतात. लस टोचून घेण्याविषयी आकस निर्माण होतो. अशावेळी आपल्यावर उपचार करणारे डॉक्टर, त्यांचे सर्व सहकारी, सर्व सरकारी अधिकारी, पोलीस, राजकीय नेते या सर्वांनी लस टोचून घेतली आहे. या गोष्टीचा आपण सकारात्मक अर्थ लावून आपण लस टोचून घेण्याची गरज अधोरेखित करायला हवी.
२) निसर्गनियमांचे काटेकोर पालन करावे.
माणूस हा निसर्गाचा एक अविभाज्य घटक आहे. त्याने बुद्धिच्या आधाराने स्वतः बाबत काही चुकीचे व खोटे समज निर्माण केलेले आहेत. ते निसर्गाला ते मान्य नाहीत. आपण सर्वांनीच या पुढच्या काळात निसर्गनियमांचे पालन काटेकोरपणे करायला हवे.
आपण सगळे खूप लहान आहोत. निसर्गाच्या कार्यक्षमतेपेक्षा आपण खूपच लहान आहोत. आपण आजपर्यंत विकसित केलेलं तंत्रज्ञान, वैज्ञानिक प्रगती खूप छोटी आहे. निसर्गाला आव्हान देण्याएवढे आपण नक्कीच मोठे नाहीत. आपले हे खुजेपण आणि निसर्गाचे मोठेपण आपण स्वीकारायला हवे.
३) माणसांमध्ये भेदभाव करु नका.
मानवनिर्मित भेदभाव निसर्ग मानत नाही, त्याला सगळे सारखेच असतात, मग आपण भेदभाव करणारे कोण ? आज हजारो मृत्यु होत आहेत, निसर्गाने कोणताही भेदभाव केला नाही. जात, धर्म, वर्ण, वर्ग, वंश, देश, गरीब, श्रीमंत हे सगळं मानवनिर्मित असून ते निसर्गाला अमान्य आहे. सजीवांच्या सुरक्षित अस्तित्वासाठी आवश्यक असलेली जैवविविधता निसर्गात भरपूर आहे परंतु त्या आधारे निसर्ग कोणताही भेदभाव करीत नाही. माणसानंही तसंच भेदभावरहीत जगणं आवश्यक आहे.
४) योग्य वेळी योग्य ठिकाणी थांबायला शिका.
आयुष्यात माणसानं गती महत्वाची मानली. चाकाचा शोध लावला. आपल्या विकासाचा वेग वाढवला. हे खरं असलं तरी माणसानं स्वतःहून योग्य वेळी, योग्य जागी थांबणं आवश्यक आणि अधिक महत्वाचं आहे. दुसऱ्या कुणीतरी आपणास थांबवण्यापेक्षा आपण स्वतःच कुठं आणि कधी थांबायचं हेे ठरवूया. थोडी विश्रांती घेऊया. पुढील वाटचाल करताना जे आपल्याापेक्षा खूप मागे राहिले आहेत त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करुया.
५) सोबतच्या माणसांशी सुसंवाद सुरु ठेवा.
जीवंतपणी सोबत आहोत तोपर्यंत आपल्या प्रियजनांना वेळ द्यावा, मनातलं सांगावं, मनमोकळं बोलावं. संवाद सुरु असणं महत्वाचं आहे. सोबत राहा. एकमेकांना जीव लावा. प्रेम करा. हट्ट पुरवा. त्यांचं काही चुकलं असल्यास त्यांना मोठ्या मनानं माफ करा. तुमचं काही चुकलं असल्यास तुम्हीही माफी मागा. आनंदी राहण्यासाठी हे खूप गरजेचं आहे.
६) पैशासोबतच माणुसकीही टिकवा.
कितीही पैसे असतील तरी काही गोष्टी विकत मिळत नाहीत. आनंद, समाधान, सकारात्मक दृष्टिकोन आणि विचार अशा गोष्टी कोणत्याही किंमतीला विकत मिळत नाहीत. माणसांच्या सोबतीने आणि निसर्गाच्या संगतीनेच त्या मिळवता येतात. सोबतीला माणसं हवीत, तर ती प्रेमानं जोडली पाहिजेत. माणूसकीनं वागवलं की सोबतची माणसं टिकतात. पैसा मिळवण्यासोबत माणसंही जोडा.
७) वर्तमानात जगावं.
भूतकाळात रमणं आणि भविष्याच्या काळजीत झुरणं या दोन्हीही गोष्टी अत्यंत घातक आहेत हे वारंवार सिद्ध झालं आहे. भूतकाळात आलेले अनुभव मार्गदर्शक ठरावेत, भविष्याचं योग्य नियोजन करावं पण या दोन्हींचाही आपल्या वर्तमानावर कोणताच प्रभाव किंवा दबाव असता कामा नये. आपला 'आज' म्हणजेच आपला वर्तमान आपण आनंदात घालवायला हवा.
८) दुसऱ्यांचा आदर करा.. गुणांची कदर करा.
परिस्थितीनुरुप सगळ्यांनाच एक संधी मिळत असते. ज्याला संधी मिळाली तो स्वतःला इतरांपेक्षा वेगळा, मोठा, विशिष्ठ, अतिविशिष्ट असं काहीतरी आपण समजायला लागतो. तिथंच खरी समस्या उभी राहते. वास्तविक जगातले सगळेच लोक महत्वाचे असतात. प्रत्येकाचं स्वतःचं असं काहीतरी महत्त्व असतंच. बदलणाऱ्या परिस्थितीसोबत त्यांचं स्थान आणि महत्वही बदलत असतं. ज्यांच्या घरी लहान लेकरं आहेत त्यांच्यासाठी दूधवाला सगळ्यात महत्वाचा असतो. ज्यांचे नातेवाईक आजारी आहेत त्यांच्यासाठी डॉक्टर महत्वाचे असतात. संरक्षणासाठी पोलीस, स्वच्छतेसाठी सफाई कर्मचारी असं प्रत्येकाचं स्थान सर्वांसाठी महत्वाचं असतं. हे लक्षात घेवून आपण सर्वांचा आदर करायला शिकलं पाहिजे. असा आदर करताना समोरच्या माणसाची जात, धर्म, विचारधारा, राजकीय पार्श्वभूमी, पक्षीय अभिनिवेष यासारख्या गोष्टी बाजूला ठेवून समोरच्या माणसाचा 'माणूस' म्हणून स्वीकार व्हायला हवा.
आपल्या लोकशाही राज्यव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर आपल्याकडे सतत कोणती ना कोणती निवडणूक सुरु असते. त्यामूळे गावातला आणि शहरातलाही सामान्य माणूस सुद्धा कायम राजकीय अभिनिवेषात असतो. या सततच्या राजकीय अभिनिवेषामूळे आपल्या जवळचे मित्र, नातलग यांच्यात विनाकारण शत्रुभाव तयार होतो. सामान्य माणसानं ही गोष्ट आवर्जून टाळायला हवी. राजकीय पक्षांमध्ये सुरु असणाऱ्या चढाओढी व इतर तत्सम गोष्टींकडे आपण लक्षपूर्वक दूर्लक्ष करायला हवं.
९) 'तूच आहेस तूझ्या जीवनाचा शिल्पकार':
आपल्या परिस्थितीसाठी नेहमी आपण स्वतःच जबाबदार असतो. कोणतेही सरकार किंवा प्रशासन हे आपणास फक्त मार्गदर्शन करीत असते. ते आपल्यासाठी कायदे, नियम बनवू शकतात पण त्यांचं पालन करणे हे केवळ आपल्याच हातात असते. आपण आपली जबाबदार नागरिकाची भूमिका समजून घेणं आणि ती आपल्या संयमी कृतीतून दाखवणं फार महत्वाचं आहे. नाहीतर त्याचे परिणाम स्वतःला आणि समाजालाही भोगावेच लागतात. त्यासाठी आपण डोळसपणे परिस्थितीचं नीट आकलन करुन घेणं आणि त्यातून आपलं शहाणपण वाढवणं अधिक महत्त्वाचं आहे.
१०) साधी राहाणी उच्च विचारसरणी स्वीकारावीच लागेल.
लॉकडाऊनच्या निमित्ताने काही दिवस घरी बसल्यावर आपल्याला एक नक्की समजले आहे की, आपल्या जगण्यासाठीच्या खऱ्या गरजा खूपच कमी आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्याशिवाय आपण सहज जगू शकतो.
लॉक डाऊन नंतर देशाची, राज्याची आणि आपल्या सर्वांचीच आर्थिक घडी विसकटलेली असताना अगदी रोज नव्या डिश करुन अन्नधान्य वाया घालवायची ही वेळ नक्कीच राहिलेली नाही. जेवढं गरजेचं आहे तेवढंच रांधा. हौशीने रोज नवे प्रकार करुन उधळपट्टी टाळा. पुढचे दिवस आणखी कठीण असणार आहेत. पाणी, वीज, अन्न सर्व काही जपूनच वापरावं. सावध आणि सजग व्हायला हवं. कारण कोरोना सोबतची आपली ही लढाई दीर्घकाळ चालणार आहे. आर्थिक व्यवस्थेला बसणारे चटके आपल्या संकटात आणखी भर घालतील. सतत बदलणारे मोसमी हवामान, त्यावर अवलंबून असणारा पाऊस, वाढती बेरोजगारी असे सर्व प्रश्न नव्या रुपात उभे राहातील. आपल्यासमोर रोज नवे आव्हान उभेे राहील. त्यावेळी लढण्यासाठी लागणारेे बळ आपल्याला बचतीच्या माध्यमातून उभे करावे लागणार आहे. आज आपल्या हाती असणारे उपाय, पर्याय जपून वापरणे ही प्रत्येकाची वैयक्तिक आणि सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांची देशाप्रति काय कर्तव्ये आहेत याची प्रत्येकाला जाणीव होणे आवश्यक आहे. केवळ सरकार, प्रशासन, आरोग्य व्यवस्था आणि सुरक्षा व्यवस्था यांची जबाबदारी आहे असं समजून चालणार नाही. आपल्या उदरनिर्वाहाचे साधन टिकवून ठेवणे ही आपली स्वतःची देखील जबाबदारी आहे.
कोरोना महामारीमूळे जगभरातही जी 'आजार स्थिती' आली आहे, ती दीर्घकाळ टिकणारी आहे. त्यामूळे आपले जे काही रिसोर्सेस आहेत, ते जपून वापरायला हवेत. साधं, ताजं, पोषणमूल्य असलेलं अन्न खाणं बरं राहील. तेलकट-तुपकट खाऊ नका. चमचमीत, मसालेदार, जड पदार्थ खाणं टाळा. भसाभस किराणा संपवू नका. थोडक्यात भागवण्याचे हे दिवस आहेत. एखादं सेलिब्रेशनसुद्धा साधं, सकस, सात्विक होऊ शकतं. हवं तर पुढचं किमान एक वर्षभर ही आणीबाणीच आहे असं समजा. आपल्या मुलांनाही हे सगळं नीट समजावून सांगा. अनावश्यक गरजाही आपण ओळखायला हव्यात. त्याची सवय टाळायला हवी.
११) उपजत चांगल्या गोष्टींचा पुन्हा पुन्हा वापर करावा.
माणूस म्हणून काही चांगल्या गोष्टी आपल्याकडे उपजतच आहेत आणि त्यामुळेच आपण इतर प्राण्यांपेक्षा वेगळे आहोत. गेल्या काही दिवसांत आपण आपल्यातील या चांगल्या गोष्टींची उजळणी केली आहे. एकात्मता, धैर्य, संयम, कल्पकता, रुग्णसेवा, जबाबदारीचे भान, परोपकारी वृत्ती, कृतज्ञता भाव, कुटूंबियांप्रति प्रेम आणि काळजी याच त्या गोष्टी आहेत. आपणास त्यांचा वापर यापुढेही नियमितपणे करावा लागेल.
अशा एकादश व्रताचा अंगिकार करणं हीच सध्याच्या काळाची 'कळीची' गरज आहे. त्यामूळं दाहीदिशेनं सैरभैर झालेलं आपलं जीवन आपल्याला नक्कीच सावरता येईल.
# लेखक #
© श्री अनिल उदावंत
(साहित्यिक)
ज्येष्ठ प्रशिक्षक व समुपदेशक
सावेडी, अहमदनगर
संपर्क : ९७६६६६८२९५