मानवी मृत्यूचे सात प्रकार शास्त्राने सांगीतले आहेत.
१) आधी = उपजत मृत्यू
२) व्याधी = आजारपणाने येणारा मृत्यू
३) जरा = वृद्धापकाळाने येणारा मृत्यू
४) घात = खून वगैरे
५) आघात = मानसिक धक्का बसल्याने येणारा मृत्यू ६) अपघात = अनैसर्गिक पध्दतीने येणारा मृत्यू
७) आत्मघात = आत्महत्या

शास्त्राने सांगीतलेल्या मृत्यूच्या या प्रत्येक  प्रकारच्या मृत्यूचा बारकाईने विचार केला तर 'आत्मघात' हा स्वतःच पुढाकार घेऊन प्रयत्नपूर्वक व जाणीवपूर्वक स्वतःचा मृत्यू ओढवून घेण्याचा प्रकार आहे, ज्याला प्रचलीत अर्थाने 'आत्महत्या' असे म्हटले जाते.
प्रभू रामचंद्रांनी शरयु नदीत घेतलेली जलसमाधी, श्री संत ज्ञानेश्वरांनी आळंदीत इंद्रायणी काठी घेतलेली संजीवन समाधी, राष्ट्रसंत विनोबाजी भावे यांचे पवनारच्या आश्रमातले प्रायोपवेशन, साने गुरुजींनी आत्मक्लेशातून केलेला देहत्याग, थोर सेनानी पृथ्वीराज चौहान यांनी केलेले आत्मसमर्पण आणि एडाल्फ हिटलर या हुकूमशहाने स्वतःच्या हाताने स्वतःचीच संपविलेली जीवनयात्रा ही आणि अशी अनेक उदाहरणे आत्मघाती प्रकारच्या मृत्यूची उदाहरणे आहेत. एका अर्थाने हा आत्महत्येचा इतिहास आहे!

प्राचीन काळी अवतारकार्य संपल्यावर जीवंत राहण्याचे कोणतेही प्रयोजन नाही; म्हणून अवतार संपविला जात असे. अवतार संपविण्याचा देखील मोठा सोहळा त्या काळी घडत असावा असे मानन्यास भरपूर वाव आहे. प्रभु रामचंद्रांच्या जलसमाधीबाबत रामायणात वर्णन आलेले आहे, तसेच ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याचे वर्णन करणारे अनेक अभंग तत्कालीन संतश्रेष्ठांनी आपापल्या गाथ्यांत लिहून ठेवले आहेत. समाजमान्य पद्धतीने असे अवतार संपविणे कदाचित श्री संत ज्ञानेश्वरांच्या काळापर्यंत सुरु असावे; त्यानंतरच्या काळात मात्र अशी अवतार संपविल्याची उदाहरणे दृष्टीपथात येत नाहीत.

थोर सेनानी पृथ्वीराज चौहानांनी सलग सतरा लढाया जिंकल्यावर अठराव्या लढाईत त्यांचा पराभव झाला. त्यांना युद्धकैदी बनवून अफगाणिस्तानात नेण्यात आले. त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारावा म्हणून त्यांना आग्रह करण्यात आला. ते सहजासहजी ऐकत नाहीत हे पाहून त्यांचे डोळे फोडून त्यांचा अतोनात छ्ळ करण्यात आला. अशाही परिस्थितीत आपल्या कवी मित्राच्या मदतीने संधी साधून आवाजाच्या दिशेने बाण चालविण्याचे धनुर्विद्येतील कौशल्य वापरुन त्यांनी यौवनी राजाचा शिरच्छेद केला. आपल्या हातून यौवनी राजा मारला गेला आता शत्रु सैन्याकडून आपला छळ होईल म्हणून एकमेकांच्या अंगावर तलवारी चालवून आपल्या कवी मित्राबरोबरच पृथ्वीराज चौहान या शूरवीराने आपल्या प्राणाचे बलिदान देवून एका अर्थाने आत्मसमर्पण केले. अशी इतिहासात नोंद आहे.

वेगवेगळ्या लढायांमध्ये आपल्या देहाची विटंबना, छळ टाळण्यासाठी असे आत्मसमर्पण केले जात असे. अशा लढायांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या सैनिकांच्या पत्नी, माता, भगिनी व मुलीदेखील शत्रु सैन्याकडून आपल्या अब्रूचे धिंडवडे निघू नयेत म्हणून आत्मसमर्पण करीत असत. हे अशा प्रकारचे आत्मसमर्पण त्याकाळी संस्कृतीच्या रक्षणार्थ आवश्यक आणि म्हणूनच समाजमान्य मानले जात होते. या आत्मसमर्पणाला 'जोहार' म्हटले जात असे. स्त्रियांनी सती जाण्याची प्रथाही अशीच होती. आधुनिक काळात जोहार किंवा सती प्रथांचे अस्तित्व कायद्याने नष्ट केले आहे.

विसाव्या शतकात राष्ट्रसंत विनोबाजी भावे यांचे प्रायोपवेशन खूप गाजले होते. विनोबाजी वृद्धापकाळाने आजारी असताना त्यांनी 'प्रायोपवेशन' करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आधी सर्व औषधांचे सेवन बंद केले व नंतर अन्न सेवन पूर्णपणे बंद करुन या जगाचा निरोप घेतला.

जगप्रसिद्ध 'श्यामची आई' जगासमोर आणून मुलांवर संस्कार घडविणारे परमपूज्य श्री साने गुरुजी यांना एवढ्या अथक प्रयत्नानंतरही समाजात बदल घडत नाही, हे पाहून प्रचंड नैराश्य आले होते. नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या गुरुजींनी 'आत्मक्लेश' करायचा निर्णय घेतला. त्यांनी हळूहळू अन्न - पाणी वर्ज्य केले. आणि त्यातच त्यांचे प्राणोत्क्रमण झाले.
आपल्याकडील काही विशिष्ठ समाजात व धर्मात अतिवृद्ध व्यक्तींनी व्रत करण्याची पद्धत अजुनही प्रचलीत आहे. संथारा व्रत हे अशा प्रकारचे व्रत आहे.

अशा रितीने अवतार संपविणे, आत्मसमर्पण, जोहार, सती, संथारा, प्रायोपवेशन, आत्मक्लेश हे स्वेच्छेने, स्वतःच पुढाकार घेवून, जाणीवपूर्वक व प्रयत्नपूर्वक देहत्याग करण्याचे मार्ग होते. असे असले तरी या सर्व मार्गांना समाजात नैतिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक प्रतिष्ठा दिली जात असल्याने अशा प्रकारच्या कोणत्याही आत्मघाती मृत्यूला 'आत्महत्या' म्हटले गेले नाही. अर्थात सांप्रतकाळी हे मार्ग कायद्याने बंद करण्यात आले असून यातील कोणत्याही मार्गांला कोणाकडूनही तथाकथित नैतिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक प्रतिष्ठा दिली जात नाही.

कुप्रसिद्ध हुकूमशहा एडाल्फ हिटलरने मात्र आपल्या मनासारखे घडत नाही म्हणून निराश झाल्यावर नैराश्याच्या गर्तेत जाऊन स्वतःच्या हाताने स्वतःवरच गोळ्या झाडून घेत आपले जीवन संपविले. तेव्हा सगळ्या जगाने या मृत्यूचे वर्णन 'आत्महत्या' असेच केले आहे.

आपल्याकडे शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, संसार -पिडीत महिला, प्रेमी युगूलं, असाध्य आजाराने त्रस्त झालेले रुग्ण यांच्या आत्महत्येच्या अनेक घटना घडतात. त्याबाबत समाजमन फारसं हळवं होताना दिसत नाही. सामान्य माणसांच्या मृत्यूनं हळवं होण्याइतका संवेदनशील समाज आता कालबाह्य झालाय. काही वर्षापूर्वी भय्युजी महाराज यांनी आपल्या डोक्यात गोळ्या घालून घेतल्या., काही महिन्यांपूर्वी सुशांतसिंहने गळफास लावून घेतला आणि आता काही दिवसांपूर्वी डॉ. शीतल आमटे यांनी स्वतःला विषारी इंजेक्शन टोचून घेतले. तीन वेगवेगळ्या क्षेत्रातील वलयांकित व्यक्तींनी टोकाचा निर्णय घेवून स्वीकारलेला त्यांचा मृत्यू म्हणजे आत्महत्याच ठरला. या आत्महत्यांनी मात्र समाज मनात बरीच कालवाकालव झालीय. समाजमाध्यमांवर पोस्टचा पाऊस पडतोय. कदाचित ही तीनही व्यक्तिमत्वं अनेक सामान्य जनांचे आदर्श होते. आपला आदर्श अचानकपणे असा कोलमडून, कोसळून धारातीर्थी पडलेला पाहिल्यावर "यांचं असं तर आपलं कसं?" या विचाराने सामान्य जनतेमध्ये कोलाहल माजलेला दिसतोय. या वलयांकीत व्यक्तींनी आत्महत्या का केली असेल? याचा तर्कवितर्क लावणं जोरात सुरु आहे. आपापल्या आकलनानुसार त्यांच्या आत्महत्यांची कारणं काय असतील? याबाबतची रांगडी मतंही मांडली जात आहेत.

खरंच माणसं आत्महत्या का करत असावीत?

आत्महत्येनं प्रश्न सुटत नाहीत, हे मरणाऱ्या माणसाला पक्कं माहित असतं. तरीही माणसं आत्महत्या करतात.

याचा काय अर्थ लावायचा? हे न समजल्यामूळे मागे राहीलेली आलम दुनियेतील माणसं आपापल्या पद्धतीनं, आपापल्या कुवतीनुसार अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात.

एखाद्या व्यक्तीच्या आत्महत्येची कारणं समजून घेताना आर्थिक अडचणी, व्यावसायिक अपयश, प्रेमभंग, नकोसे झालेले प्रदीर्घ आजारपण अशा काही कारणांचा प्रामुख्याने विचार केला जातो. वरवर पाहाता कुणालाही हीच कारणे खरी वाटतात. सामान्यतः यातल्या एखाद्या कारणाचे लेबल लावून आत्महत्येचा गुंता सोडवल्याच्या भावनेने समाधानाचा सुस्कारा टाकला जातो. पण कोणत्याही आत्महत्येची ही खरी कारणे असतात का? या प्रश्नाचे उत्तर माझ्या दृष्टीने 'नाही' असेच आहे.

एखाद्या माणसाची जडणघडण कशा रितीने झाली आहे? म्हणजेच त्याचेे सामाजिकीकरण (socialisation) कशा रितीनेे झाले आहे? हेेे पाहाणे फार महत्वाचे असते. या जडणघडणीनुसार माणसाचा स्वभाव, त्याची विचार करण्याची पद्धत, एखाद्या घटना - प्रसंगाचा अर्थ लावून, त्याचे विश्लेषण करुन प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया देण्याची पद्धत, यश- अपयशाला सामोरे जाण्याची पद्धत या गोष्टी अगदी नकळत पण निश्चितपणे ठरत असतात.

एखाद्या व्यक्तिचे सामाजिकीकरण घडवण्यात त्याचेे कुटूंब, शाळा, भोवतालचा समाज यांची अहम भूमिका असते. कुटूंबातील पालक, भावंडे किंंवा इतर नातलग, शाळेतील शिक्षक, शाळकरी मित्र, आणि भोवतालच्या समाजातील जात, धर्म, वर्ग, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शासन, प्रशासन, मनोरंजनाची साधने, मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक व अन्य समाजमाध्यमे या सर्वांच्या माध्यमातून व्यक्तिची जडणघडण होत असते.

आयुष्य जगताना प्रत्येकालाच कधी ना कधी कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागते. आपल्या वाट्याला आलेल्या विविध समस्या, प्रश्न, अडचणी व त्यांचेे स्वरुप आणि तीव्रता यानुसार आपला मूड हलत असतो, मूड बदलत असतो. वास्तविक प्रत्येक माणसाला आयुष्यात कधी ना कधी आपला जीव नकोसा होत असतो! पण म्हणून कोणी लगेच आपला जीव देत नाही. ज्याच्या जडणघडणीमध्ये काहीतरी त्रुटी राहीलेली असते, अशा व्यक्तीच बहुधा जीव देण्याच्या या विचाराला बळी पडतात.

एखाद्या व्यक्तीची जडणघडण होतेे म्हणजे नेमके काय होते? हे समजून घेतले तर आपल्या जडणघडणीकडे आपण नीट लक्ष देऊ शकतो. माणसाला त्याच्या जगण्यातून अनेक चांगले वाईट अनुभव मिळत असतात. माणूस या प्रत्येक अनुभवाचा आपल्या शैलीत विचार करतो. त्याचा बरोबर किंवा चुकीचा अर्थ लावतो. आणि या अर्थाला साजेसा 'प्रतिसाद' किंवा 'प्रतिक्रिया' देण्याचा प्रयत्न करीत असतो. हा प्रतिसाद किंवा ही प्रतिक्रिया हीच त्या व्यक्तिच्या व्यक्तिमत्वाची ओळख ठरत असतेे.

मूळात 'प्रतिसाद' आणि 'प्रतिक्रिया' या दोन्ही गोष्टी संपूर्णपणे वेगळ्या आहेत. प्रतिसाद सकारात्मक असतो. प्रतिक्रिया नकारात्मक असते. एखाद्या गोष्टीसाठी प्रतिसाद द्यायचा की प्रतिक्रिया? हे ठरवता येणं महत्वाचंं असतं. यात थोडीशी गल्लत झाली तरी त्याचे अंतिम परिणाम विपरित स्वरुपात समोर येवू शकतात. एखाद्या व्यक्तिनं आपल्या मनाला आणि मेंदूला चांगली सवय लावलेली असेल, आपल्या मानासिक आरोग्याची नीट काळजी घेतली असेल तर त्या व्यक्तिला  प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया यापैकी एकाची निवड योग्य वेळी योग्य रितीने करता येते. अशी योग्य वेळी योग्य निवड करण्यालाच शास्त्रीय परिभाषेत 'समायोजन' असं म्हणतात. प्राप्त परिस्थितीशी असं योग्य समायोजन करता आलं नाही तर कोणतीही व्यक्ती आत्महत्या करण्याचा निर्णय घेऊन तो निष्ठूर व कठोरपणे अंमलात आणण्याची शक्यता असते. बरेचदा आत्महत्या करु पाहणाऱ्या व्यक्तिला देखील त्यानं निवडलेला हा मार्ग पसंत नसतो. मात्र त्याला त्यावेळी अन्य योग्य पर्याय सुचलेला नसतो किंवा दुर्दैवाने त्यावेळी त्याच्यासमोर योग्य पर्याय उपलब्ध होत नाहीत.

मन व मेंदूला चांगल्या सवयी लावणं म्हणजेच एका अर्थानं मनाची मशागत करणं होय. प्रत्येक माणसाने मानवी मनात चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही रुपात असलेल्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, आवड, निवड, वृत्ती, प्रवृत्ती, विचार, मतं, भावना, वेदना, संवेदना या सर्व गोष्टींचे व्यवस्थापन करायला शिकणे आवश्यक आहे. अभ्यास, स्वाध्याय, रियाझ, साधना, आराधना या मार्गाने हे व्यवस्थापन प्रत्येकाला शिकून घेता येते.

खरेतर "शरीर आणि मनाची निरोगी स्थिती म्हणजे 'आरोग्य' होय." दुर्दैवाने आपल्या समाजात आरोग्याच्या संकल्पनेबाबत मोठाच गैरसमज पसरलेला आहे. आपण सर्वजण शरीराच्या निरोगी स्थितीला जितके महत्त्व देतो तितके महत्त्व मनाच्या निरोगी असण्याला देत नाहीत. ही फार मोठी चूक आपण अनादि काळापासून करीत आलो आहोत. अजुनही आपण तीच चूक पुन्हा पुन्हा करीत आहोत.

"ठेविले अनंते तैसेचि राहावे I
चित्ती असू द्यावे समाधान ॥"

असं आपण म्हणत असलो तरी आपलं मन समाधानी अर्थात निरोगी राहण्यासाठी आपण कोणताच विशेष प्रयत्न करीत नाहीत!
"सर्व सिध्दीचे कारण I मन करारे प्रसन्न ॥" या उक्तीचा आपणास विसर पडला आहे !

# लेखक #
श्री अनिल उदावंत
ज्येष्ठ प्रशिक्षक व समुपदेशक
सावेडी, अहमदनगर
संपर्क : ९७६६६६८२९५

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel